Sunday, July 22, 2012

लोकसत्ताच हा आग्रलेख लिहिलाय बाकी भारी!


आधुनिक महाराष्ट्राचे भाग्यविधाते.(की महाराष्ट्राचे आधुनिक भाग्यविधाते. जाऊद्या. आमचा नेहमीच हा गोंधळ होतो). शरदचंद्ररावजी पवार यांनी अखेर बंड केले ते योग्यच झाले. किती म्हणून त्या काँग्रेसवाल्यांची मग्रुरी सहन करावी? सत्ताधारी असले म्हणून काय झाले? आम्ही आणि आमच्यासारखे आहेत म्हणून या काँग्रेसवाल्यांना सत्ता मिळाली.
एरवी चार खासदार मागे असलेला एक नेता शोधूनसुद्धा सापडणार नाही त्या काँग्रेसवाल्यांकडे. हे एवढे पंतप्रधान मनमोहन सिंग. दुसऱ्या खेपेला पंतप्रधान झाले. पण लोकसभेत जायचे नाव नाही? पंतप्रधान होते, आताही आहेत तरी पण राज्यसभेतच. पण आमचं, राष्ट्रवादीचं कोणी काय बोललं कधी? कोणी अपमान केला त्यांचा कधी? एक उदाहरण सांगा मिशी कापून देऊ. का नाय केला त्यांचा इन्सल्ट आम्ही? कारण आपल्याला सायबांनी सांगितलं, की मोठा विद्वान माणूस आहे त्यांना रिस्पेक्ट द्यायचा. आमच्या सायबांनी शब्द दिला की दिला. त्यांचा शब्द आम्ही नाही खाली पडू देत कधी. तसंच ते राष्ट्रपती होणार असलेले प्रणब मुखर्जी. इतकी वर्षे पोलिटिक्समध्ये आहेत.. कधी आले लोकसभेत? आता आता शेवटी शेवटी. आम्ही कधी केला त्यांचा इन्सल्ट? नाही. का? तर त्यांना साहेब मानतात म्हणून. तेव्हा आमच्या साहेबांना मानायला नको यांनी? यांच्यासारखे आमचे साहेब काही राज्यसभेवाले नाहीत! अगदी जल्मापासूनच आमचे साहेब लोकसभेवाले आहेत. काय बिशाद त्यांना बारामतीत मतं मिळणार नाहीत! कामच केवढं करून ठेवलंय साहेबांनी. इतकं की आता सुप्रियाताईंनी काहीही केलं नाही तरी हरकत नाही. नाही तर ते सोनिया गांधी किंवा राहुल गांधी. असतील त्या काँग्रेसप्रमुख. पण काय दशा आहे अमेठीची? धूळच धूळ. ना उद्योग ना कारखाना. विटांच्या भट्टय़ांशिवाय आहे काय? बारामतीला येऊन बघा म्हणावं मतदारसंघ कसा असतो ते! काय नाही आमच्या बारामतीत? कितीही मोठा उद्योगपती असो. साहेबांनी बारामतीत आणलाच म्हणून समजा! नुसतं उद्योगपतींचंच काय घेऊन बसलायत? आख्खंच्या आख्खं थंड हवेचं ठिकाणसुद्धा आणलं साहेबांनी बारामतीच्या जवळ! त्या लवासाच्या नावानं काँग्रेसवाले खूपच वसा वसा करतात! पण जमलंय का त्यांना असं काही करणं ? काय केलंय त्या राहुलनं आपल्या मतदारसंघासाठी सांगा की? उगा कुठं दलिताच्या घरी जेव, कुठे भाकरतुकडा खा वगैरं नाटक करायलाय तो. पण असल्या बोंबलभिक्या उचापतींनी काय कुठं देशाची प्रगती होती क्काय? प्रगती करायची तर साहेबांसारखी दृष्टी हवी! कुठं काय डेव्हलप करता येईल ते साहेबांना हेलिकॉप्टरातूनपण दिसतं! त्यांना इतक्या वरनं जे दिसतं ते या काँग्रेसवाल्यांना गाडीतूनसुद्धा दिसत नाही. तरी आमच्या साहेबांचा अपमान? काय मोठं मागितलं आमच्या साहेबांनी? दुसऱ्या नंबरचाच आग्रह धरला ना? मग त्यात काय इतकं आखडायचं कारण होतं काँग्रेसवाल्यांना. गाढव कुठचे! इतिहास पाहा म्हणावं त्यांना म्हणजे कळेल मराठी माणसाचा जीव दुसऱ्या नंबरसाठी कसा तुटतो ते. मागितलाय का कधी एका मराठी माणसानं पहिला क्रमांक? इतिहासातसुद्धा सापडणार नाही. या काँग्रेसवाल्यांना कळायला पायजे मराठी माणूस दुसऱ्या नंबरसाठीच प्रयत्न करतो ते! आमच्या बाजीरावानं बघा..! सत्ता कुणासाठी राबवली? तर, साडेतीन वर्षांच्या दिल्लीत बसलेल्या बादशहासाठी! ते शेंबूडही पुसता न येणारं पोट्टं राजेपदावर आणि आमचा शूर सर्दार बाजीराव त्याचा दोन नंबर! एवढे आमचे शूर सरदार होते. त्यांच्या मदतीनं घेता नसता आला का बाजीरावाला पहिला नंबर? पण नाही केलं त्यानं तसं. कारण मराठी माणसाचा विश्वास आहे आपल्या नंबर दोन वर! झालंच तर आमच्या साहेबांचे साहेब. म्हंजे येशवंतराव. कसला तगडा गडी! आता साहेब ज्याला साहेब म्हणतात तो गडी मोठाच असणार नाही का? अगदी हिमालयाच्या मदतीला धावून गेलेला सह्य़ाद्रीच तो. तेव्हा केवढा पावरफुल असणार. पण केला का कधी पहिल्या नंबरासाठी प्रयत्न त्यांनी? नाहीच ते. कारण त्यांना माहीत होतं आपण मराठी. म्हणजे दुसऱ्या नंबरलाच असणार म्हणून. नंतर विश्वनाथ प्रताप सिंग पंतप्रधान असतानाचा आठवा म्हणावं त्या काँग्रेसवाल्यांना. आमचे नाना दंडवते केव्हढे लोकप्रिय होते तेव्हा. जनता दलाचे किती जण म्हणाले त्यांना व्हीपींना बाजूला सारून तुम्हाला पीएम करतो म्हणून. व्हीपींना दगा देणं काय अशक्य होतं का त्यांना? ऐकलं असतं त्यांचं.. नसते झाले पंतप्रधान? पण नाही केलं त्यांनी ते! का? कारण त्यांना दुसराच नंबर हवा होता म्हणून. मराठी ना ते! इतिहास काही माहीत नसेल त्या काँग्रेसवाल्यांना, पण वर्तमान तरी नको का कळायला? इकडं तिकडं जरा बघा म्हणावं म्हणजे कळेल त्या काँग्रेसवाल्यांना मराठी माणूस कसा दुसऱ्या नंब्रावरच खूश असतो ते. आता क्रिकेटचं घ्या. आपला सचिन तेंडुलकर. इतका मोठा वर्ल्ड चँपियन. सेंच्युऱ्यांची सेंचुरी करणारा. पण जमलं का त्याला क्रिकेट टीमचं कॅप्टन बनणं? दणकून आपटला होता तो कॅप्टन झाल्यावर. कॅप्टनकी सोडली, नंबर दोनला आला आणि बघा कसा खेळू लागला वाघासारखा ते! म्हंजे मुद्दा तोच नाही का? नंबर एकसाठी नाहीच मराठी माणूस ते. झालंच तर इतक्या कंपन्या आहेत बघा आपल्या देशात. मोठमोठय़ा. आता महासत्ता होणार म्हटल्यावर देशात इतक्या कंपन्या असणारच की! पण या कंपन्यांपैकी एकाचा तरी अध्यक्ष. किंवा गेला बाजार मुख्य कार्यकारी अधिकारी की काय म्हणतात ते. आहे काय मराठी सांगा बरं? आता याच कंपन्यांचे सेक्रेटरी पाहा. शंभरातल्या ऐंशी तरी कंपन्यांचे सेक्रेटरी तुम्हाला मराठी दिसतील म्हणजे दिसतीलच. म्हणजे पाहा. एक क्रमांकाचं पद असतंय का कधी मराठी माणसाकडे ते. आता आमच्यात सगळेच काही दोन नंबरवर समाधान मानणारे असतात असं नाही. ते शिवाजी महाराजांचं बघा. महाराज हे पहिले, आणि शेवटचेही, मराठी माणूस पहिल्या क्रमांकावर जाऊद्या म्हणणारे. पण तेही नियमाला अपवाद असतात तसे. बाकी आमचा इतिहास आणि वर्तमान दुसऱ्या नंबरासाठीच्या स्पर्धेचाच. आता हीच दुसऱ्या नंबराची पनवती तोडायचा प्रयत्न केला एकदा आमच्या साहेबांनी. राजीव गांधी गेले तेव्हा. त्या वेळी आमच्या साहेबांना वाटलं आपण पहिल्या क्रमांकावरच उडी मारावी. थेट पंतप्रधानपदच मिळवायचं होतं त्यांना. बरोबर सुरेश कलमाडीही होते. काय कुठं मिळतं आणि त्यासाठी पैसे कसे आणायचे हे त्यांच्याइतकं कोणाला माहीत असणार? तेव्हा साहेबांचा विजय पक्का होताच. पण नरसिंह राव हे आमच्या साहेबांपेक्षा बेरकी निघाले. का? विचारा बरं. कारण ते मराठी नाहीत म्हणून. मराठी नसल्यामुळे त्यांना बरोबर माहीत पहिल्या क्रमांकावर कसं पोचायचं ते. त्यामुळे त्यांनी आमच्या साहेबांचा पत्ता कापला.
आता इतकं समजावून सांगितल्यावर तरी काँग्रेसवाल्यांना कळायला नको का? आपण मराठी तसे दोन नंबरवालेच. आता त्या दुसऱ्या नंबरालाही हे दिल्लीवाले आव्हान देऊ लागलेत. आमची, मराठी माणसाची ही दुख(स)री राष्ट्रवादी बाजू दिल्लीवाले कधी समजून घेणार?
सौजन्य:  लोकसत्ता
-----

पण हे सगळे लिहितांना किंवा राजकारणाची समीक्षा करतांना सगळ्यांनी एक लक्षात ठेवायला हवे किं राजकारण हे धूर्त असतेच आणि ते असावेच. म्हणजे साहेब धूर्त आहेत असा मी म्हणत नाही. याला धोरणी राजकारण म्हणतात. आणि राजकारण हे राजकारण असते इथे संतांचा बाजार भरेल अशी अपेक्षा करणे हे अगदीच चूक. देव (न मानणारांसाठी निसर्ग) सगळ्या अराजकीय पणाचा  आव आणणाऱ्या 'बाबांना', 'अण्णांना'  आणि संतांना सद्बुद्धी देवो हीच अपेक्षा.   



No comments:

Post a Comment