Saturday, April 30, 2022

महाराष्ट्र कधी पासून अस्तित्वात असेल?

 आपण महाराष्ट्राच्या संस्कृतीचे अजूनही खरंच पाईक आहोत कि भरकटलोत ?


महाराष्ट्र दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा. तसं ज्याला आज आपण महाराष्ट्र म्हणतो, त्याचा हा आधुनिक जन्म दिवस. महाराष्ट्र कधी पासून अस्तित्वात असेल?


म्हणजे इथली संस्कृती, आपण जे वागतो, जगतो, बोलतो, राहतो वगैरे वगैरे. कधी पासून हे सगळं असं असावं? याचं उत्तर आपल्या सारख्या सामान्यांपेक्षा हा ज्या कोणत्या विषयाचा विषय असेल त्या विषयाच्या निष्णातांना जास्त चांगलं माहित असेल. तरी, आपला एक सामान्य माणूस म्हणून या भूमीवर अधिकार आहे आणि त्याच अधिकाराने आपण आपला एक अंदाज लावू शकतो. म्हणजे ज्ञानेश्वर-नामदेव इथे आपल्याला या मराठी राज्याची - महाराष्ट्राची - सुरुवात झाली असावी, असा अंदाज लावता येईल.म्हणजे आजच्या आपल्या मराठी म्हणता येईल अशा संस्कृतीची सुरवात तिथून झाली असं आपण समजू शकतो. किंवा मला जे मांडायचं त्या साठी ते सोयीचं आहे म्हणून समजा हवं तर! पण मीच कशाला वारकरी साहित्यातच संत बहिणाबाईंनी लिहून ठेवलयं -


संतकृपा झाली । इमारत फळा आली ॥ १ ॥

ज्ञानदेवें रचिला पाया । उभारिलें देवालया ॥ २ ॥

नामा तयाचा किंकर । तेणें रचिलें तें आवार ॥ ३ ॥

जनार्दन एकनाथ । खांब दिधला भागवत ॥ ४ ॥

तुका झालासे कळस । भजन करा सावकाश ॥ ५ ॥

बहिणी म्हणे फडकती ध्वजा । निरूपणा केलें वोजा ॥ ६ ॥  


तर ज्ञानदेव, नामदेव, जनाबाई इथून ते अगदी तुकाराम महाराजांपर्यंत या संस्कृतीची पाळेमुळे पक्की झाली. बरं फक्त वारकरी संस्कृतीच तेंव्हा सगळ्या महाराष्ट्राची संस्कृती होती का? तर कदाचित तीच मुख्य संस्कृती असावी. कारण इथल्या सर्व स्तरातील सगळ्या जातीत आणि अगदी धर्मातही वारकरी संत होऊन गेलेत आणि दुसरं काही इतकं प्रबळ नव्हतं ही. किंवा कर्मकांडाची आणि सनातन्यांचीही संस्कृती असावी, पण तिला वेळो वेळी ज्ञानेश्वरांपासून सगळ्यांनी पराजित केले. म्हणून तीही आपली मुख्य संस्कृती नसावी. 


ही जर आपली अगदी ४००  ते ५०० वर्षांत उभी राहिलेली संस्कृती आपली खरी संस्कृती होती, तर ती आपण तशीच जपलीये कि त्यात सरमिसळ - भेसळ कलीये हे आपण आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्याने पुन्हा पाहायला हवं. ज्ञानेश्वर, एकनाथ, गोरा कुंभार, चोखामेळा, जनाबाई, तुकाराम, दामाजी, नरहरी सोनार, नामदेव, मुक्ताबाई, विसोबा खेचर, सावता माळी किंवा सोपानदेव आणि इतर अनेक संत पाहिल्यास किंवा त्यांच्या लिहलेल्याचा सार पाहिल्यास खालील २ महत्वाच्या गोष्टी आपल्याला दिसतात.


१. जाती पातीचा कसलाही भेद या संस्कृतीने शिकवला नाही किंवा किंबहुना जाती पती मिटाव्यात, भेदा भेद अमंगळ हीच या संस्कृतीची शिकवण राहिली. त्याकाळी अगदीच भेदा भेद इथे नव्हताच असं मला म्हणायचं नाहीं. पण तो यां त्या काळच्या आदर्शांत तरी दिसत नाहीं.  

२. सगळ्याच संतांनी कर्मकांड, वेद, सनातनी धर्मांधता, चमत्कार इत्यादींच्या मागे न जाता (किंवा जशास तसे न जाता त्यांना पारखून आपल्या हिताचं ते घ्यावं) खरा भक्तिमार्ग जो नामस्मरणात आहे तो सांगितला. आणि याला साक्षात ज्ञानेश्वर माउलींच्या या ओळींचा आधार आहे -


योगयागविधी येणे नोहे सिद्धि ।

वायांचि उपाधि दंभधर्म  ।।१।।

भावेविण देव  न कळे निःसंदॆह ।

गुरुवीण अनुभव कैसा कळे ।।२।।

तपेविण  दैवत दिधल्यावीण प्राप्त ।

गुजेविण  हित कोण सांगे ।।३।।

ज्ञानदेव सांगे  दृष्टांताची मात ।

साधूंचे संगती तरुणोपाय ।।४।।      


अजून पुढे आपली गफलत होऊ नये म्हणून 'साधू' ची व्याख्याही जगतगुरु तुकाराम महाराजांनी केलीये ती अशी -


जे का रंजले गांजले ।

त्यासि म्हणे जो आपुलें ॥१॥

तो चि साधु ओळखावा ।

देव तेथें चि जाणावा ॥२॥


अजून ज्ञानेश्वर माउली म्हणतात - 


जरी वेद बहुत बोलिले | विविध भेद सुचिले |

तऱ्ही आपण हित आपुले | तेचि घेपे ||


म्हणजेच वेदांमध्ये जरी अनेक गोष्टी लिहिलेल्या असतील तरी आपण  त्यातून आपल्या योग्य आणि हिताचे तेच निवडावे, हा अधिकार माउलींनी सर्व ज्ञानी जणांना दिला होता.


आणि जगतगुरु तुकाराम महाराजांच्या शब्दात ही -


वेदाचा तो अर्थ आम्हांसीच ठावा।

येरांनी वाहावा भार माथां।

खादल्याची गोडी देखिल्यासी नाहीं।

भार धन वाही मजुरीचें।।


म्हणजेच आपल्याच या वेदान्तातून ज्ञान न घेता त्याचा केवळ भार वाहने म्हणजे वेडेपणाच असे काहींसं तुकोबांनी देखील सुचवले.


पुढे वेदांचा अर्थ काय तर -


वेद अनंत बोलिला। अर्थ इतुलाचि शोधिला।।

विठोबासी शरण जावें। निजनिष्ठा नाम गावें।।

सकळशास्त्रांचा विचार। अंतीं इतुलाचि निर्धार।।

अठरापुराणी सिद्धांत। तुका म्हणे हाचि हेत।।


आणि ते या सगळ्याचा असा सोक्ष मोक्ष लावतात -


तुका तरी सहज बोले वाणी। त्याचे घरी वेदान्त वाहे पाणी।।


खरं  तर चारही वेदांचे सार तुकोबांनी आपल्या गाथेमध्ये अतिशय परखडपणे आणि सामान्य लोकांना समजेल या भाषेत लिहून ठेवले. म्हणून तुकोबारायानंतर वेदाच्या किंवा धर्माच्या पुन्हा आपल्याला नव्या व्याख्या कुणी सांगायची गरज नाही.


म्हणजे हे सगळं व्यस्थित पाहता आपली महाराष्ट्राची संस्कृती ही भेदा - भेद न मानणारी, धर्माच्या रूढी, त्याचे जाचक नियम मोडून काढणारी, दांभिकतेला ठेचून काढणारी होती. पूजा पाठ आणि कर्मकांड यात न रमता फक्त नामस्मरणाने भक्तीमार्ग प्राप्त करणारी होती. गोर गरीब यांचा कैवार करणारी होती. आपल्या कामात 'कांदा, मुळा, भाजी।अवघी विठाई माझी' म्हणून देव पाहणारी होती.


पुढे, जिजाऊ साहेबांनी, शिवरायांनी आणि संभाजी महाराजांनी शतकभर इथल्या माणसांना स्वाभिमान आणि स्वातंत्र्य शिकवलं. वरच्या सगळ्या गोष्टी तशाच ठेऊन! म्हणूनच तर शिवशाहीत स्त्रियांना सन्मान होता. जाती पतींच्या पलीकडे प्रत्येकाला कर्तृत्वानुसार जागा होती, संधी होती. सोप्या भाषेत सांगायचे तर संत परंपरेने सांगितलेल्या संस्कृतीस राजाश्रय लाभले.


अजून पुढे, शाहू महाराजांनी इथे न्याय आणि समानतेची चळवळ अजून मजबूत केली आणि वंचित आणि संधीच्या परिघाबाहेर असलेल्यांना परिघात आणलं, आणण्याचे प्रयत्न केले. पुढे महात्मा फुल्यांनी, बाबासाहेबांनी या सगळ्या प्रयत्नांना सामाजिक आणि राजकीय आधार आधार दिला. अगदी बाबासाहेबांपर्यंत आपल्याला ज्ञानेश्वरांनी सुरु केलेल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीची नाळ जशास तशी दिसेल. या भूमीत भेदा-भेद आणि दांभिकतेचा विरोध ज्ञानेश्वर माउलींनी सुरु केला, जगतगुरूंनी प्रखर केला, छत्रपतींनी त्या विरोधाला राजकीय छत्र दिलं, शाहूंनी त्याला व्यापक केलं, फुल्यांनी पुन्हा वेगळ्या भाषेत ते लोकांपर्यंत नेलं आणि बाबासाहेबांनी पुन्हा त्याला आधुनिक जगात, बदलेल्या राजकीय व्यवस्थेत, जगतगुरु तुकाराम महाराजांसारखं प्रखर करून व्यवस्थेच्या तोंडावर मारलं! हि संस्कृतीची नाळ इथवर कायम होती म्हणूनच बाबासाहेबांच्या पहिल्या पाक्षिकाला (म्हणजे मॅगझीनला जे १९२० ला त्यांनी सुरु केले) तुकाराम महाराजांच्या विचारांची प्रेरणा होती. बाबासाहेबांनी जगतगुरु तुकाराम महाराजांच्या या ओळी मूकनायक या पाक्षिकाच्या नावासोबत अगदी वरती छापत.


काय करू आता धरुनिया भीड । निःशंक हे तोंड वाजविले ।।

नव्हे जगी कोणी मुकीयांचा जाण । सार्थक लाजोनी नव्हे हित ।।      


हीच आपली खरी संस्कृती!


आता आपण या संस्कृतीचे अजूनही खरंच पाईक आहोत कि भरकटलोत ?


आजूबाजूला जातीय द्वेषाच्या, म्हणजे जाती पाळणाऱ्या आणि द्वेषातून जातीअंत करू पाहणाऱ्या सवयी, चळवळी बघितल्या की हीच का आपली संस्कृती जी निपजण्यासाठी ८००-९०० वर्ष लागलीं? ज्ञानेश्वर माउली ते तुकारामांनी यासाठीच का घातला होता अट्टाहास या संस्कृतीच्या इमारतीचा ? असे प्रश्न पडतात.  ज्या कर्मकांडाच्या आणि जाचक रूढी-धर्माच्या बाहेर इथला समाज पडावा म्हणून माउलींनी अत्यंत हालअपेष्टा सहन केल्या, नामदेवांनी प्रबोधन केलं, तुकारामांनी तर सरळ सरळ युद्ध केलं, त्यातच पुन्हा आपण फसणार आहोत का? देवाला बाद करायला मुळीच सांगत नाहीये. पण आपण या संतांनी सांगितलेला निकोप मार्ग सोडून पर्यायाने आपली खरी संस्कृती सोडून आपण इतर मार्गांनी देव मिळवायचा प्रयत्न आपण करणार असूत, तर आपला धर्म आणि संस्कृती हायजॅक म्हणजे अपहरण केली जातीये याची जाणीव होऊ नये इतके निर्बुद् आपण आहोत का?


खरं तर जे (सत्ता पिपासू आणि धनलोभी लोक) आपल्याला नवा धर्म शिकवत आहेत तेच एका भयंकर मोठ्या अरिष्टात फसलेत आणि त्याची त्यांना कल्पनाही नाही. म्हणून हि संस्कृती वाचवायची असेल. ही म्हणजे वर आपण जिच्या बद्दल बोललो ती. तर आपल्याला सगळ्यांना - प्रत्येक मराठी म्हणून घेणारांना - पुन्हा ज्ञानेश्वर तुकाराम वर्तनात आणावे लागतील. त्यांच्या सांगितल्याचे नवे अर्थ लावावे लागतील आजच्या समाजानुसार. तेंव्हाच दीन म्हणजे दरिद्री होत जाणाऱ्या महाराष्ट्राचा नवा महाराष्ट्र दिन साजरा करण्यात खरा आनंद येईल!


जय महाराष्ट्र!

Wednesday, April 13, 2022

हा भारत नावाचा किल्ला मजबूत केलाय साक्षात भीमाने!

या देशाची इतकी तंतोतंत नस ओळखणाऱ्या काहींच लोकांपैकी डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक.

हा देश, याचा भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य बाबासाहेबांनी वेळीच समजले. त्या भविष्याला स्वातंत्र्यानंतर सुरक्षित राखण्यासाठी अगदी परफेक्ट योजना बाबासाहेबांनी संविधानात करून ठेवली आहे. कितीही समाजकंटक आले, नकळतच का असेनात, त्यांना फार यश या देशाला इजा पोहचवण्यात येणार नाही. म्हणुनच खऱ्याअर्थाने ते आधुनिक भारताचे शिल्पकार आणि निर्माते आहेत!

हा भारत नावाचा किल्ला मजबूत केलाय साक्षात भीमाने!

भीम जयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा!

जय भीम!

---

किती तंतोतंत ते या देशाला ओळखायचे हे त्यांच्या या भाषणाच्या काही भागावरून कळेल. 


If we wish to maintain democracy not merely in form, but also in fact, what must we do?- The first thing in my judgement we must do is to hold fast to constitutional methods of achieving our social and economic objectives.


- The second thing we must do is to observe the caution which John Stuart Mill has given to all who are interested in the maintenance of democracy, namely, not “to lay their liberties at the feet of even a great man, or to trust him with power which enable him to subvert their institutions”. 


- The third thing we must do is not to be content with mere political democracy. We must make our political democracy a social democracy as well. Political democracy cannot last unless there lies at the base of it social democracy.

---We must begin by acknowledging the fact that there is complete absence of two things in Indian Society. 


- One of these is equality. 

On the social plane, we have in India a society based on the principle of graded inequality which we have a society in which there are some who have immense wealth as against many who live in abject poverty.


- The second thing we are wanting in is recognition of the principle of fraternity.

 What does fraternity mean? Fraternity means a sense of common brotherhood of all Indians – of Indians being one people. It is the principle which gives unity and solidarity to social life.


----

Independence is no doubt a matter of joy. But let us not forget that this independence has thrown on us great responsibilities. By independence, we have lost the excuse of blaming the British for anything going wrong. If hereafter things go wrong, we will have nobody to blame except ourselves. There is great danger of things going wrong. Times are fast changing. People including our own are being moved by new ideologies. They are getting tired of Government by the people. They are prepared to have Governments for the people and are indifferent whether it is Government of the people and by the people. If we wish to preserve the Constitution in which we have sought to enshrine the principle of Government of the people, for the people and by the people, let us resolve not to be tardy in the recognition of the evils that lie across our path and which induce people to prefer Government for the people to Government by the people, nor to be weak in our initiative to remove them. That is the only way to serve the country. I know of no better.


- Dr. Babasaheb Ambedkar 

(In a speech to the Constituent Assembly of India on November 25, 1949)मला बाबासाहेब या कारणांनी आवडतात

 मला बाबासाहेब अनेक कारणांनी आवडतात, त्या पैकी काही विशिष्ट कारणे ;

1. रक्ताचा एक ही थेंब सांडू न देता जगातील एक सर्वात मोठी सामाजिक क्रांती त्यांनी आपल्या देशात घडवून दाखवली.
2. आपल्या न्यायासाठी आणि हक्कांसाठी लढाई करतांना प्रचंड अभ्यास आणि सनदशीर मार्गाने हजारो वर्षे गुलामगिरीत पिचलेल्या सर्व शोषित, दलित आणि वंचितांना कायमस्वरूपी न्याय मिळवून दिला.
3. एका आयुष्यात एक माणूस एक मोठे आणि अशक्य वाटणारे स्वप्न बघतो आणि ते त्याच जीवनात प्रत्यक्षात देखील साकार करतो हे सगळे अभूतपूर्व आणि प्रेरणादायी.
4. परिस्थिती अनुकूल असतांना, समाज व्यवस्था विरोधात असतांना देखील जगातील सर्वोत्तम शिक्षण त्याच गुणवत्ते ने मिळवणे हे देखील प्रचंड प्रेरणा देणारे.
5. आपल्या ज्ञानाच्या बळावर जगातील पाहिजे ती नौकरी आणि हवा तेवढा पैसा कमावू शकले असते परंतु आपल्या ज्ञानाचा फायदा आपल्या देशातील पिचलेल्या लोकांकरिता करणारे युगपुरुष च.
6. संविधानाच्या माध्यमातून लोककल्याणकारी राज्याची निर्मिती करणारे आणि शेवटच्या माणसाला ही कसा न्याय मिळेल याची खबरदारी घेणारे बाबासाहेब आणि त्यांचे कार्य अद्भुत च.
7. राजकीय, आर्थिक, सामाजिक, ऐतिहासिक, साहित्य अश्या अनेक विषयांत प्रचंड प्राविण्य. अष्टपैलू व्यक्तिमत्व.
8. भारतीय स्त्रियांना, कामगारांना, तरुणांना, नोकरदारांना संविधानाच्या माध्यमातून या व्यवस्थेत उभे करणाऱ्या आणि त्यांना टिकवणाऱ्या संकल्पना मांडणारे बाबसाहेबच.
9. शिक्षणाची आणि नौकरीची गंगा सामान्य अति सामान्य लोकांच्या पर्यंत पोचवणारे आधुनिक भारताचे भगीरथ, ज्यांच्या मुळे कोटी कोटी कुळांचा अवघा उद्धार झाला.
10. शिका, संघटीत व्हा आणी संघर्ष करा, हा जादुई मंत्र ज्या समाजाला उमगला तो कधीच मागे राहिला नाही. हा सोप्पा आणि साधा मंत्र देणारे बाबासाहेब मला आवडतात.
11. जनावरांच्या पेक्षाही हीन वागणूक असलेल्या समाजाला ताठ मानेने आणि देशातील सर्वोच्च पदापर्यंत घेउन जाणारे बाबसाहेबच.
12. जगातील सर्वोत्कृष्ट संविधान देऊन भक्कम असलेल्या देशाचा कणखर पाया रचणारे, Architect of modern India - Dr Babasaheb Ambedkar
13. "शिक्षण हे वाघिणीचे दूध, जो पिणार तोच गुरगुरणार.", "अन्याय करणाऱ्या पेक्षा तो सहन करणारा जास्त गुन्हेगार" हे क्रांतिकारी विचार समाजाला ल देणारे बाबासाहेब मला आवडतात.
14. समता, न्याय आणि बंधुता हीच या देशाची आत्मा आहे हे ठासून सांगणारे बाबासाहेब मला आवडतात.
15. "मी प्रथम भारतीय आणि अंतिमतः देखील भारतीयच" या त्यांच्या विचारांची आज किती गरज आहे हे प्रत्येक पावलापावलावर लक्षात येते.
16. "ज्याला दुःखातून सुटका पाहिजे त्याला लढावे लागेल आणि लढायचे असेल तर त्याला अगोदर शिकावे लागेल कारण ज्ञानाशिवाय लढाल तर पराभव निश्चित आहे" हा विचार देणारे बाबासाहेब मला आवडतात.
अश्या अनेक गोष्टी आहेत, अनेक प्रेरणा आहेत त्या आपल्या पुढच्या पिढीलाही समजाव्यात म्हणून थोडके लिहून ठेवले.
तसे रोजच प्रेरणा घ्यावी अशी ही व्यक्तिमत्वे, तरीही विश्ववंद्य, भारतरत्न, युगप्रवर्तक , प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना माझे विनम्र अभिवादन.
तुम्हाला ते का आवडतात हे तुम्ही कमेंट मध्ये नक्की व्यक्त करा.

- अमोल सुरोशे-नांदापूरकर