Monday, July 16, 2012

जिजाऊ.कॉम - "ग्रामीण शिक्षण चळवळीला एक छोटीशी फुंकर!"

 
महाराष्ट्रातील ग्रामीण भागाचा सबंध चेहरा मोहरा बदलण्यासाठी, शहर आणि गाव यांच्यातील दरी कमी करण्याच्या हेतूने जिजाऊ.कॉम तर्फे गेली काही वर्षे थेट ग्रामीण भागांतील शिक्षणावर कार्य करण्याचे ठरवले. बघता बघता याच ग्रामीण मातीतून तयार झालेले अनेक कार्यकर्ते या उपक्रमाच्या पाठीशी उभे राहिले. एक एक करून अनेक जन सोबत आले आणि या वर्षी एका ऐवजी ३ शाळांची निवड करण्यात आली. तीन शाळांमधून जवळपास चाळीस हुशार आणि होतकरू विद्यार्थी निवडले गेले ! या सर्वांचे कौतुक करावे तेव्हडे थोडेच.

असंख्य अडचणी आणि कित्येक किलोमीटर चे अंतर कापून दररोज शाळेकडे जाणारी यांची पाऊले येणाऱ्या काळात विविध क्षेत्रात आपला ठसा उमटविल्या शिवाय राहणार नाही याची खात्री पटली. यांना कोणाच्या मदतीची नाही तर प्रोत्साहनाची गरज आहे याची हि जाणीव झाली आणि तेच करण्यासाठी जिजाऊ.कॉम ची टीम पोचली थेट त्यांच्या गावात.
ज्या तीन शाळांची निवड झाली त्या अश्या -
  • श्रीमती. सरस्वतीबाई भाले पाटील विद्यालय, मानवत जि. परभणी
  • जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पौळ डिग्रस, ता. सेलू जि. परभणी
  • जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नांदगाव (खुर्द) जि. परभणी

वरील तीनही शाळेमधील विद्यार्थ्यांबद्दल संपूर्ण माहिती संकलित करणारे जिजाऊ.कॉम चेच ज्ञानेश्वर रेंगे सर, हरकळ सर, मदन कदम सर, शहाणे सर, नांदापूरकर बाई आणि इतर सर्व शिक्षकांनी बहुमोल योगदान दिले, त्यांच्या शिवाय योग्य मुलांपर्यंत आपल्याला पोचणे शक्यच झाले नसते. शाळेचे अध्यक्ष, मुख्याध्यापक तसेच इतर सर्व कर्मचारी वृंद सर्वांचेच योगदान या कार्यक्रमासाठी राहिले.


अजून एक गोष्ट जाणवली ती म्हणजे ग्रामीण भागातील पालकांचा शिक्षणाप्रती असलेल्या दृष्टीकोनात झालेला प्रचंड बदल, आम्ही किती हि मेहनत घेऊ पण आमच्या लेकरा बाळांचे शिक्षण पूर्ण झालेच पाहिजे हि त्यांची असलेली इच्छा नक्कीच एक फार मोठा झालेला बदल आहे. शिक्षणाशिवाय आपल्याला तरणोपाय नाही हा एकमेव मंत्र आता सर्व ग्रामीण भागातील विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना उमगला आहे. त्यासाठी त्यांचे प्रयत्न हि सुरु आहेत, असंख्य अडचणी आहेत पण कुठे हि न डगमगता हि मंडळी पुढे पुढे जातांना दिसत आहे.


हरकळ सर, रेंगे सर यांच्या सारखी हाडाची शिक्षक मंडळी या विद्यार्थ्यांना घडवण्यात आपली धन्यता मानते, यांच्या सारख्यांची किंमत गावकर्यांना हि असते हे एक मोठे आशादायक चित्र दिसून आले.

बदल सर्वांनाच हवा आहे, गरज आहे सामुहिक प्रयत्नांची ! अगदी सहजपणे सोडवता येणाऱ्या समस्या आपण आपल्या स्तरावरच सोडवल्या गेल्या पाहिजेत, त्यासाठी शासकीय मदतीची वाट बघण्यात अर्थ नाही. गावातील अनेक शिकून पुढे गेले.. त्यांनी आता एकदा मागे वळून बघण्याची गरज आहे, मागे राहिलेल्या आपल्या लहान भावंडांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे.

हीच प्रामाणिक भावना उराशी बाळगून टीम जिजाऊ आणि त्याला जोडले गेलेले शकडो कार्यकर्ते राष्ट्रानिर्मानामध्ये आप आपला सहभाग नोंदवत आहे, आणि असेच चित्र सर्वत्र दिसावे हीच एक अपेक्षा आम्हा सर्वांची आहे.

जिजाऊ.कॉम प्रणित राष्ट्रनिर्माणाच्या ह्या शैक्षणिक चळवळीला मनापासून पाठींबा देणाऱ्या प्रत्येकाचे खूप खूप आभार.

तुम्ही दिलेल्या सहकार्याची आणि सहभागाची खरच तोड नाही, हे तुमच्या शिवाय शक्य हि नाही. आपण सर्व सोबत असतांना आता भविष्याची काळजी नाही, हे असेच अखंडपणे चालू राहावे हीच आई भवानी चरणी प्रार्थना !

जय जिजाऊ - जय शिवराय!

अमोल सुरोशे (नांदापूरकर) व प्रकाश पिंपळे (पाटील)आणि सर्व कार्यकर्ते 
- जिजाऊ.कॉम

पूर्ण रिपोर्ट येथे पहा.

No comments:

Post a Comment