Tuesday, January 29, 2013

तुम कायको टेन्शन लेते!

ज्या देशात राजकारण्यांचे शक्ती प्रदर्शन तलवार उंचावून होत असेल तेथेच गांधी अहिंसेसाठी आणि बाबासाहेब शिक्षण व लोकशाही साठी होवून गेलेते यावरचा विश्वास उडतो. 'समोर येईल त्याला अडवा पाडू' अशी भाषा वापरून राजकारण करणारे काय घ. न. टा. लोकहिताचे निर्णय घेणार? अर्रर्र चुकल की, जिथ मराठ्यांची राजकारणातली, बामणांची शिक्षणातली आणि मारवड्यांची धंद्यातली मक्तेदारी सगळ्यांनीच गपगुमान मान्य केली तिथ अजून काय एक्सपेक्ट करणार? हो एक करणार ना - यांना सोडून सगळ्यांचे बाय डीफाल्ट पुरोगामी पण. चलने दो, सब ठीक है. आल इस वेल. तुम कायको टेन्शन लेते!

Monday, January 21, 2013

आतंकवाद भगवा की हिरवा यात बुडालेले आमचे सत्ताधारीएकीकडे हे असे असतांना आतंकवाद भगवा की हिरवा यात बुडालेले आमचे सत्ताधारी आणि अपोजिशन. एका डोळ्यात या भागीनिसाठी पाणी आणि दुसऱ्या डोळ्यात नुसते गप्पांचे गुऱ्हाळ मांडणाऱ्या राजकारण्यान बद्दल संताप. असो. भारतीय 'काही' हिंदूंच्या, मुसलमानांच्या, ख्रिस्चानांच्या, जैनांच्या आणि अगदी बौद्धांच्याही बेगडी धर्मावादावर बोलायचय, पण थोडा वेळ आहे. तितकच काय पण स्वतःला पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या अनेक संघटनांच्या दुटप्पी धोरणावर आणि कर्तुत्वावर ही खूप काही बोलायचंय. बर गैरसमज होऊ नये म्हणून थोडा सांगतोच. ज्या प्रकारे सगळ्या धर्मातील लोक आपापल्या मंदिरात, मशिदीत, चर्च मध्ये किंवा मग विहारात इतर धर्माबद्दल चर्चा करतांना 'ते अशे आणि ते तशे' अशा मिटक्या मारून गप्पा मारतात, त्यावरून तर विविधतेत नटलेला आणि एकसंध भारत खरच किती एकसंध आहे यावर संशय येतो. या चर्चा जवळपास सगळीकडे होतात. अगदी पुरोगामी आणि सहिष्णू म्हणवणाऱ्या वारकरी संप्रदायात ही. पण याच मूळ कारण तो धर्म किंवा पंथ नसून त्याचा राजकारणासाठी आणि वर्चस्व कायम ठेवण्यासाठी उपयोग करणारे धूर्त सामाजिक, धार्मिक आणि राजकीय नेतृत्व आहेत. अजून खूप काही मांडायचय पण धीराने.

Saturday, January 19, 2013

राष्ट्राच्या भविष्याचा वेध - माजलेले नेतृत्व, घाबरट आणि स्वार्थी नागरिक - पुढे काय?

या राष्ट्रातच काय पण कुठे ही या पूर्वी जगण्याचा फार असा आमचा अनुभव नाही. विचारलच तर अभ्यास ही फार नाही. पण तरीही जितक कळलंय त्यावरून अगदीच भितीदायक अशा भविष्याकडे वाटचाल होतीये असे वाटते. अनेकदा 'आशा' लागते हे सगळे सुधारेल म्हणून. पण बऱ्याच वेळेस नुसता भ्रमनिरस होतो.

मानवाच्या सुसंकृत होण्याकडचा प्रवासच वेगळ्या वाटेला लागलाय अस वाटायला लागत. कदाचित देव ही संकल्पना याच प्रवासात माणसाला आधार म्हणून सोबत करण्यासाठी पूर्वजांनी शोधली असावी. आणि आपण बावळटांनी सगळा प्रवासच तिच्या नावे  लिहून आजचा दिवस कसा 'मजेत' जाईल यावर फक्त लक्ष केंद्रित केलेय.
अगदी गेल्या ५ वर्षातल्याच भारतात घडलेल्या घटना नीट बघितल्यास आपला प्रवास अंधाकाराकडे आहे हे निश्चित होते. राजकारण्यांनी केलेला भ्रष्टाचार लोक जसे जसे जास्त शिकतील तसा तसा खरेतर कमीच व्हायला हवा. पण घडतंय काय तर उलटे. दिवसेन दिवस भ्रष्टाचाराचे आकडे वाढतेच. करातला तितका पैसा खाल्ला म्हणून तर राग आहेच पण, त्याही उपर लोकांबद्दलची आस्था आणि त्यांच्या प्रश्नाबद्दलची संवेदनशीलता नष्ट होण्याच्या मार्गाला लागलीये याचा फार राग येतो. करोडोंच्या देशात मोजकेच शहाणे उरलेत की  काय? शेंबूड पुसणारे पोरही आम्हाला आमचे नेतृत्व वाटायला लागते तेंव्हा सक्रिय राजकारणात तळमळीने प्रामाणिकपणे ज्यांनी XX घासलीये त्यांच्या उदेश्यावर ही संशय घ्यावासा वाटतोय. मोजके सोडले तर दादा, भाऊ, बंटी असल्या चिरकुटा शिवाय कुणाचे राजकारण नाही. इतके सारे सुशिक्षित आपल्याकडे आहेत, तेथे ही जर असलेच शेंबडे निवडून येणार असतील तर तुमच्या शाळेच्या सरर्टिफिकेटवर नक्कीच संशय  येईल. पण सगळ्यांच्याच सरर्टिफिकेटवर कसा संशय घ्यावा ? म्हणजे शिक्षण पद्धतीतच असे नागरिक तयार करण्याचे शिक्षण दिले जात असावे. गुलामांच्या फ्याकट्रयाच.

मागे एका शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी या सगळ्या परिस्थितीवर हताश होवून बोलत असतांना एक अनुभव सांगितला. अतिशय लागणारा आणि मार्मिक असाच -
तर हे नेते असेच एक मोठ्या शहरातून गावाकडे ट्रेन ने निघाले होते. गाडी स्टेशनवर आल्यावर यांनी खिडकीतून एका गृहस्थाला जागा ठेवायला सांगितली. यांच्या खिशाला शेतकरी संघटनेचा बिल्ला बघून खिडकीतूनच गृहस्त म्हणाले 'अहो आजकाल तुमची शेतकरी संघटना फारच थंड झाली आहे.' आधी आत तर येवू द्या अस म्हणून शेतकरी नेते आत गेले आणि त्यांच्या समोर बसले आणि त्या गृहस्ताला त्यांचा परिचय विचारला. तर गृहस्तांनी आपण निवृत्त प्राध्यापक असून काहीतरी कामानिमित्य इकडे आलो होतो असा परिचय करून दिला. तेंव्हा आमचे हे नेते म्हंटले, तर आता सांगा तुम्हाला आमच्या शेतकरी संघटनेची थंड हवा कधी आणि कोठे लागली ते. गृहस्त शांत. पुढे नेते बोलते झाले, तर तुम्ही सगळे म्हणजे तुम्ही सगळे शिकले लोक 'खोजे' झालेले आहात. तेंव्हा गृहस्तांनी 'खोजे' म्हणजे काय असे विचारताच नेते हसून म्हंटले, आता निवृत्त प्राध्यापक तुम्ही, तुम्हाला त्याचा अर्थ चांगला माहीत असावा. थोडेशे ओशाळले निवृत्त प्राध्यापक शांत बसलेले पाहून यांनीच त्याचा अर्थ स्पष्ट केला. तर तो असा की इस्लामी राजवटीत बादशाह लोक त्यांच्या संख्येने खूप असलेल्या बायकांच्या सेवेसाठी आणि संरक्षणासाठी काही पुरुष नेमत. पण ते पुरुष नपुंसक केलेले असत. तर अशे हे 'नपुंसक केलेले संरक्षक, सेवक किंवा रखवालदार म्हणजे खोजे' अशी व्याख्या सांगताच प्राध्यापक साहेब ते आम्ही कसे? असा प्रश्नकरते झाले. नेत्यांनी अगदीच स्पष्ट करतांना म्हंटले, राजकारण्यांपेक्षा शिकलेले? तुम्ही! हुशार? तुम्ही! संखेने जास्त? तुम्ही! तरीही व्यवस्थेला तुम्ही म्हणजे फक्त राखणदार! ती आहे तशीच ठेवणे हे आपले परम कर्तव्य समजून तुम्ही तिला फक्त आणि फक्त राजकारण्यांची बनवून ठेवली. पुढे नक्कीच काहीच चर्चा झाली नसणार.

तर या नेत्यांनी आमचेही डोळे चांगलेच उघडले. सगळे अव्यवस्थेचे खापर इथच्या मजूर, गरीब आणि शेतकरी वर्गावर फोडून फक्त लिखित आणि तोंडी हिरोगिरी करणारे आमच्यासारखे शिकलेले या पापाशी आपले देणे घेणे नाही अस म्हणून बसलेत. अशात  कधी कधी मेणबत्त्या घेवून आणि काळ्या रिबिनी लावून निषेध व्यक्त करतात. बर त्याचा खरच काही उपयोग झाला असता तर नक्कीच स्तुती केली असती. पण ज्यांना कोर्टाच्या निर्णयाचाही फरक पडत नाही त्यांना तुमच्या निषेध-निषेध-निषेध चा काय फरक पडणार? आंदोलने आणि चाळवळीही जागृतीच्या पलीकडे काहीच करू शकत नाहीत इतक्या नपुंसक झाल्यात. कमीत कमी अशातल्या या काही अनुभवावरून तरी. झालेली जागृती पुढे क्षणात मिटवून टाकायला क्रिकेट, करीना किंवा मग जालीम अशे उपाय म्हणजे  तुमचे 'शायनिंग इंडिया' किंवा मग 'डायरेक्ट टू अक्काउंट' आहेच. रोज रोज होणाऱ्या बेगडी आणि चमकू चळवळीनी पोटापासून ओरडनार्यांचे आवाज ऐकूच येत नाहीत. मग खरा प्रश्न्न बाजूला राहून 'पंतप्रधान बाहेर येवून का नाही बोलला' हाच मुख्य मुद्दा होतो. मग पंतप्रधानही  फक्त  'मुख्यच' मुद्याचे उत्तर देतात. सगळे समाधानी. चार दिवस जागृतीचे. बाकीचे सगळे स्त्री भ्रूणहत्येचे, विनयभंगाचे, बलात्काराचे, समाज सेवकांच्या बदडण्याचे, शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे, घसरणाऱ्या रुपयाचे आणि हे सगळ तितकेही गंभीर वाटू नये म्हणून सतत टी. व्ही. वर येणाऱ्या मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे, जिंकलेल्या क्रिकेटचे, दिलेल्या प्याकेजचे किंवा नागरिक साला भाकरीत गुंतून पडवा म्हणूनच कदाचित वाढलेल्या महागाईचे आणि व्याज दाराचे.

आपले प्रतिनिधी कसे आहेत यावरून आपण किती चांगले आणि आपण कुठे जातोय याचाच अंदाज येत असतो. देश काही मोजक्यांनाच चालवण्यासाठी आउट-सोर्स केलाय अस वागून या वेळी तरी चालणार नाही. येणाऱ्या इलेक्शनला सोमे-गोमे पुन्हा निवडून आले तर आपल्या मुली घराबाहेर पडू देवू नका, आपल्या पोरांना गुलाम म्हणून जगण्याची शिकवण द्या, घर बीर न घेता कुण्या तरी नेत्याने आणि उद्योजकाने  बांधलेल्या सदनिकांमध्ये आयुष्यभरासाठी किरायाने राहण्यासाठी समान बांधून ठेवा, मानेला ताठ ठेवण्यासाठी जसे बेल्ट मिळतात तसेच मान कायम खाली ठेवण्यासाठी बेल्ट आताच स्वस्तात मिळाले तर ते ही  घेवून ठेवा कारण येणाऱ्या काही वर्षात त्याचीही गरज भासेल. आणि नकोय अस भविष्य तर डोक्याने मतदान कुण्याही पक्षाला करा पण प्रामाणिक आणि स्वाभिमानी माणसांनाच करा.

पण फक्त त्याने चालणार नाही तर निवडणुकी पूर्वीच तुमचा कल दाखवून द्या. म्हणजे तिकिटे सुद्धा अशाच लोकांना मिळतील. इतका मोठा बदल सोप्पा नसतोच, पण तरी करायचा निश्चय आम्ही तरुणांनी मुख्यमंत्री.कॉम वर केलाय. आमच्या या प्रवासाचा भाग व्हा, सामील व्हा. आपण सगळ्यांनी सोबत प्रयत्न केले तर किती नक्कीच बदल होईल. येथे  (https://www.facebook.com/mukhyamantridotcom)  मुख्यमंत्री.कॉम ला काननेक्ट व्हा म्हणजे संपर्कात राहता येईल. डोक्यातल्या विचारांना फक्त डोक्यात ठेवले तर पश्चातापाशिवाय दुसरे काहीच करता येणार नाही. 

जय हिंद. जय महाराष्ट्र.          

Friday, January 11, 2013

आता तूच हो सावित्री अन तूच हो जिजाऊ - १२ जानेवारी "जिजाऊ जन्मदिन विशेष" !!स्वातंत्र्य आणि स्वाभिमानाची साक्षात भवानी राष्ट्रमाता जिजाऊ साहेब  आणि स्त्री शिक्षणाची एक मूळ धुरा आणि आधुनिक युगाची सरस्वती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या मातीच्या या दोन महान लेकींना, मातांना शत - शत प्रणाम !  महाराष्ट्राच्या मातीत आणि या मातीतल्या माणसांच्या  मनात आणि आचरणात ज्यांनी  स्वाभिमान आणि स्वातंत्र्य पेरलं  त्या  राजमाता - राष्ट्रमाता जिजाऊ साहेब  यांना त्यांच्या जयंती दिनी कोटी कोटी नमन आणि तुम्हा सर्वांना जिजाऊ जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.


ज्या मातीमध्ये जिजाऊ जन्माला आल्या, ज्या मातीमध्ये सावित्री बाई अखेरपर्यंत  झुंजल्या, जिथे राणी लक्ष्मीबाई, अहिल्याबाई, ताराराणी लढल्या  त्याच माती मध्ये आजहि  स्त्रीची रोज रोज विटंबना होतांना दिसते आहे. दिल्ली मध्ये घडलेली पाशवी घटना असो कि कुठे लहान चिमुकल्या मुलींवर होणारे अत्याचार असो किंवा आज हि गावामध्ये उघडी नागडी  करून फिरवली जाणारी आमची दलित भगिनी असो, वर्षानुवर्षे या स्त्रीची घोर विटंबनाच चालली आहे. काळ बदलला, राहणीमान बदलले, सभोवतालची परिस्थती बदलली पण स्त्रियांच्या बद्दल असलेली भोगवस्तू किंवा मालकी मानणारी हीन मानसिकता अजूनही कुठे तरी कायम आहे आणि याचाच प्रत्यय रोज येतांना दिसतो आहे . खर तर या विश्वात ईश्वरानंतर निर्माणाचा अधिकार 
कुणाला प्राप्त  आहे तर तो या स्त्री ला ! स्त्री म्हणजे निर्माती ! स्वराज्य निर्माणकरते युगपुरुष शिवछत्रपती यांना  निर्माण करणारी, घडवणारी माता म्हणजे जिजाऊ. महात्मा  फुल्यांना पावलो - पावली साथ देणारी आणि स्त्री शिक्षणाचे बीज ज्यांनी रोवले ती स्त्री म्हणजे सावित्री बाई .

या सावित्री आणि जिजाऊ च्या लेकी आजही बाटवल्या जात आहेत ! काळ बदलला आधी रस्त्यावर अत्याचार व्हायचे आता बंद दारामागे रोज रोज स्त्री वर अन्याय, तो हि स्वकियांकडून ! का आणि किती दिवस ?

हा ढोंगी समाज एकीकडे स्त्री ला शक्तीचे स्वरूप मानतो आणि दुसरीकडे तिच्यावरच बळाचा  बापर करतो ! तिच्यावरच वैचारिक, सामाजिक  आणि धार्मिक गुलामगिरी लादतो ! खर तर या देशातील जाती - धर्म  भेद निर्मूलनाचे कार्य याच  महिलांनी आपल्या हातामध्ये घेतले पाहिजे, कारण स्त्री हि कुठल्याही जाती धर्माची असो तिची अवस्था फार काही वेगळी नसते. समानता, आदर आणि अस्तित्वाच्या बाबतीत प्रत्येक जाती-धर्माची  स्त्री हि कमनशिबीच.

पण नशिबावर मात करून एक नवनिर्माण करणाऱ्या जिजाऊ सारख्या  महान आणि कर्तुत्ववान व्यक्तिमत्वाचा वारसा असणाऱ्या या मातीतील स्त्रियांनी आता स्वतः जागे होण्याची वेळ आली आहे. स्वतःच्या आणि एकूणच समाजाच्या रक्षणासाठी परत एकदा उभे राहण्याची आज खरी गरज आहे.

नवनिर्माण म्हंटले कि ते एका स्त्रीच्या हातून होणे हे ओघाने आलेच. विस्कटलेल्या सामाजिक परिस्थतीतून स्वतःच्या आणि पर्यायाने संपूर्ण समाजाच्या  उत्थानाकरिता आता तुलाच हाती तलवार, लेखणी घ्यावी लागणार आहे.

समाजनिर्मिती मध्ये, निर्णय प्रक्रिये मध्ये , राजकीय व्यवस्थेमध्ये आणि कुटुंब व्यवस्थेमध्ये स्त्रीला सन्मानाचे स्थान मिळवण्यासाठी  आता स्त्री नेच उभे राहिले पाहिजे आणि यासाठी याकामी तिला बळकटी देण्याचे कामही प्रत्येक स्त्रीनेच केले . समाजाच्या दूष  प्रवृत्ती विरुद्ध लढणाऱ्या स्त्रियांना बळ देण्याचे कार्य तुमच्या हातून घडले पाहिजे.

राजमाता - राष्ट्रमाता जिजाऊ म्हणजे गुलामगिरी आणि अन्यायावर  वर घणाघाती घाव करणारी पहिली ऐतिहासिक स्त्री.

या राष्ट्रामातेच्या जन्मदिनी -  स्वतंत्र आणि स्वाभिमानी समाज व्यवस्था निर्माण होवो आणि हे घडवण्यासाठी कधी हि न 
 न ढळणारी दृढ इच्छाशक्ती सर्वांना मिळो हीच प्रार्थना करू. 

याच जिजाऊ साहेबांच्या तमाम लेकींना सर्वोपातरी सन्मान मिळवून देण्याचे आणि आणि खंबीर पणे  त्यांच्या  पाठीशी उभे राहण्याचे  कार्य प्रत्येक शिव - शंभू प्रेमींकडून व्हावे,
जिजाऊ जयंतीच्या जिजाऊ.कॉम कडून पुन्हा  हार्दिक शुभेच्छा!राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ की......... जय!

जय जिजाऊ ! जय शिवराय !
जय हिंद! जय महाराष्ट्र!
धन्यवाद!

--कार्यकर्ते
जिजाऊ.कॉम www.jijau.com