Tuesday, August 8, 2017

द्वेष नसलेली व्यवस्था आणण्यासाठीचाच तर हा अट्टाहास

मराठा मोर्चा. या बद्दल अनेकांचे अनेक विचार असतील. स्वयंस्पुर्त असा सर्व पक्षीय आणि निरपेक्षीय जमाव या मोर्चाचा भाग आहे. तो बहुतांश एका जातीचा आहे हे हि सत्य. अत्यंत विचार करून सहभागी होणारे ते हौशी. अशी सगळी मंडळी यात आहेत. म्हणून मग मागण्यांची विविधता. विरोधाभासी मागण्या हे सगळं यात आलंच. असो ते सगळं बाजूला ठेवून एक विचार करायला हवा. इतकी सगळी लोकं स्वतःहुन रस्त्यावर येतात तेंव्हा, कुठे ना कुठे त्यातली बहुतांश कशामुळे का असेना नाराज असणारच. त्यातली सगळी लोकं ही या भारतीय आणि महाराष्ट्रीय समाजाचा भाग आहेत. त्यांचं दुःख तेच सगळ्या समाजाचं दुःख. तेच गणित दलित, ब्राम्हण किंवा इतर कोणताही वर्ग यांना लागू असतं. या सगळ्या जाती त्यांच्या गुणा-अवगुणासहित आपल्या समाजाचा भाग आहेत. त्यांच्या प्रश्नाकडे त्रयस्थ होऊन पाहिल्यास, कुठे ना कुठे खोट, त्रुटी, त्यांचीच चूक असं काही तरी भासेल. पण त्यांच्यातलं होऊन बघितल्यास ते तसं नाहीये हे लक्षात येईल.
तसं तर जातीय संघठन करायची गरजच पडू नये. पण अजूनही जाती, प्रश्न सोडवण्यासाठीच्या संघटनांसाठी अपरिहार्य आहेत. हे सत्य. जाती निर्मूलनासाठीच्या रस्त्यावरचा जातीतील प्रेम वाढणं हा महत्वाचा टप्पा आहे आणि जाती निर्मूलन होत नाही तोवरची अरेंजमेंटही. त्यासाठी त्यांच्यातील द्वेष कमी व्हावा हे एक महत्वाचं उद्दिष्ट.
दुसरे तुमच्याबद्दल द्वेष बाळगणार नाहीत, याची खात्री देता येत नसते. पण तुम्ही इतरांबद्दल द्वेष बाळगू नये हे १००% तुमच्याच हातात आहे. ते करा. मराठ्यांनी आणि इतरांनीही.
मोर्चा शांततेत पार पडावा. रस्ते, गाड्या, लोकं, हे सगळं आपलंच आहे. आपण पर्मनंट आहोत. ही व्यवस्था अगदीच टेम्पररी. म्हणून द्वेष नकोच कुणाचा. द्वेष नसलेली व्यवस्था आणण्यासाठीचाच तर या मोर्चाचा अट्टाहास.