Monday, June 25, 2012

राजश्री शाहू महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !

इतिहासातील असे एक अद्भुत व्यक्तिमत्व ज्यांच्या कार्याने आणि विचारांनी हि मायभूमी लक्ख उजळून निघाली, छत्रपती शिवरायांचा खरा खुरा वारसा पुढे चालवणारे, समाजातील शेकडो वर्षांच्या अन्याय, अत्याचारांविरुद्ध लढा उभारणारे आणि या देशातील सामान्य रयतेला खऱ्या लोकशाही स्वातंत्र्याची पहिली ओळख करून देणारे, लोकांचे राजे... राजश्री शाहू महाराज यांची आज जयंती.

हजारो वर्षांपासून खोलवर चिखलात रुतलेले, अडकलेले सामाजिक क्रांतीचे चाक ज्यांनी फिरवले, दबलेल्या, मागासलेल्या समाजाला राजाश्रय देऊन खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहणारे राजश्री.
सामान्य रायातेसाठी शिक्षणाची, रोजगाराची दारे खुली करून समाजाला उभारी देण्याचे काम ज्यांनी केले. सामान्य रयतेच्या ताटातली भाकरी खाऊन त्यांच्यात मिसळून असामान्य व्यक्तिमत्व लाभलेला हा खरा खुरा राजा.

या माझ्या राजाला जिजाऊ.कॉम आणि मुख्यमंत्री परिवारातर्फे खरा खुरा मनाचा मुजरा.

जय महाराष्ट्र

व्हिडियो साठी आभार . - स्टार माझा अमोल सुरोशे (नांदापूरकर)

Sunday, June 17, 2012

राष्ट्रमाता-राजमाता जिजाऊ साहेब पुण्यतिथी.


[१२ जानेवारी १५९८- १७ जून १६७४]

स्वराज्य स्थापन झाले. रायगडावर महराजांचा भव्य दिव्य असा राज्याभिषेक झाला. आऊ जिजाऊ च्या डोळ्यांसमोर शिवराय 'छत्रपती' झाले. जिजाऊ साहेबांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. ज्या स्वराज्यासाठी अवघं आयुष्य या आईने वेचले, ते स्वराज्य शिवबाच्या छत्रपती होण्याने भक्कम झाले होते. विश्वाचे डोळे दिपले होते तो समारोह आणि राजेपण पाहून आणि या आईच्या डोळ्यात साठले होते आनंदाचे अश्रू.
स्वराज्यासाठीचा संघर्ष आणि त्यातील जय आणि पराजय सारं काही पाहिलं, अनुभवलं आणि मार्गदर्शील होत आऊ साहेबांनी. ह्या सगळ्या आठवणी डोळ्यात साठवून जिजाऊ साहेबांनी १७ जून १६७४ रोजी रायगडाच्या पायथ्याशी पाचाड येथे या जगाचा निरोप घेतला. स्वातंत्र्य आणि स्वाभिमानाची एक मशाल तो विचार प्रत्येक मावळ्यात आणि शिवबात तेवत ठेवून शांत झाली. मशाल शांत तेंव्हाच झाली जेव्हा गुलामगिरीचे जंगल जवळपास नष्ट झाले होते. राज्याभिषेकाच्या निमित्याने त्या गुलामगीरीने आच्छादलेल्या मातीत स्वराज्याची फुलबाग रुपाला आली होती. एका धगधगत्या मशालीला आपल्या ठिणग्यांचा वनवा करावा लागला होता आणि तेंव्हा कुठे ही फुलबाग. 
                                         
त्याच फुलबागेतली फुलं, त्याच मावळ मातीतली फुलं, तोच प्रामाणिक स्वातंत्र्य आणि स्वाभिमानाचा विचार देठ असणारी फुलं आणि महाराष्ट्रातील असंख्य मराठी माणसांच्या हातातून आलेली फुलं राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेब यांच्या चरणी अर्पण करून जिजाऊ.कॉम आज पुण्यतिथी दिनी स्वाभिमान आणि स्वातंत्र्याच्या या भवानीला कोटी कोटी अभिवादन करते. 
                                            
आज जिजाऊ साहेबांना जाऊन ३०० पेक्षा ही अधीक वर्षे झाली, पण विचारांनी जिजाऊ साहेब आपल्यातच आहेत. त्यांच्याच स्वाभिमान आणि स्वातंत्र्याच्या विचारांनी बळ दिले आणि जिजाऊ.कॉम हा संकल्प मे २००९ मध्ये साक्षात आला. अगदी प्रकल्प वेब वर जाताच लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि हात घेतलेले कार्य फक्त दोघांना पेलवणारे नाही हे जाणवले. मदतीसाठी हाक दिली आणि बघता बघता महाराष्ट्रभरातून अनेक जणांचे हात मदतीसाठी धावून आले. माहितीची भर पडली आणि पुन्हा माहितीची अपेक्षा ही वाढली. महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून खेड्या-पाड्यातून फोन येऊ लागले. माहिती साठी आसुसलेला आणि माहिती नसल्यामुळे काही अंशी मागे पडलेला महाराष्ट्र कानाने ऐकला आणि डोळ्यांनी वाचायला लागला.

राष्ट्राच्या काना कोपऱ्यात, खेड्यात, शहरात अनेकजण या ना त्या प्रकारे राष्ट्रनिर्माणासाठी काही ना काही करत आहेत. काही लोक संघटीत होऊन झुंज देत आहेत तर काही लोक एकटेच. त्या प्रत्येक कार्यकर्त्याला (कृपया कार्यकर्ता म्हणजे कार्यकर्ती ही वाचा) जिजाऊ.कॉम हे एक हक्काचे व्यासपीठ आहे. धर्म, जात, पक्ष आणि वर्ग विरहित चळवळीचे एक माहेरघर आहे. अनेक प्रश्नांनी लादलेली आपली डोकी कुठे तरी रिकामी करायची असतील, जाचक व्यवस्थेबद्दल आवाज उठवायचा असेल किंवा मग एखादया विषयावर मार्गदर्शन हवे असेल तर जिजाऊ.कॉम हे प्रत्येक कार्यकर्त्याचे हक्काचे ठिकाण व्हावे हे आम्हा सर्व कार्यकर्त्यांचे स्वप्न.
आऊ जिजाऊ च्या नावे चालणारी ही चळवळ आपल्या सगळ्यांना राष्ट्रानिर्मानात मार्गदर्शन करत राहो हीच आऊसाहेबां चरणी प्रार्थना. पुन्हा एकदा त्या माउलीला, आऊ जिजाऊला, राष्ट्रमातेला कोटी कोटी अभिवादन. 
       
जय जिजाऊ.


आपलेच,
कार्यकर्ते, जिजाऊ.कॉम

www.jijau.com

Monday, June 11, 2012

पाऊले चालती पंढरीची वाट !!!


जगत गुरु संत तुकाराम महाराज पालखी (देहू), संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी (आळंदी) आणि अश्या अनेक हजारो पालख्यांमध्ये सामील झालेल्या तमाम वारकऱ्यांना आमचा प्रणाम !
सबंध समाजाला एकत्र बांधून ठेवणारा, अठरापगड जातीतील लोकांना जीवन जगण्याचा सोप्पा मंत्र देणाऱ्या भागवत धर्माचा पताका आपल्या खांद्यावर घेऊन निघालेली हि वारकरी मंडळी .. त्यांच्या पायी हे मस्तक त्रिवार वंदन.

बोला ग्यानबा - तुकाराम.. पंढरीनाथ महाराज कि जय.. टाळ मृदुंगाच्या गजरात, भजन कीर्तन करीत, डोक्यांवर तुळशी वृंदावन घेऊन.. पाऊले चालली आपल्या पांडुरंगाच्या भेटीला.

भक्तीचा एक अद्भुत सोहळा .. आयुष्यात प्रत्येकानं अनुभवावा असा सोहळा.
- मुख्यमंत्री

Thursday, June 7, 2012

कित्ती तोडणार शिवरायांना ?

शिवराय. सह्याद्रीच्या माथ्यावर वर्षानुवर्षे तळपणारा क्रांती सूर्य ! या मराठी मातीचा अखंड प्रेरणा स्त्रोत !

पण ह्या सूर्याला हि ग्रहण लावण्याचे काम गेले काही दिवस याच मातीमध्ये होतांना दिसते आहे.  शिवाजी महाराज किंवा त्यांचा इतिहास आला म्हणजे वाद हा आलाच हे काही आता या महाराष्ट्राला नवीन नाही , ज्या युगपुरुषाची कीर्ती आणि मूर्ती आम्ही सतत डोळ्यासमोर ठेवली पाहिजे त्यांचे नाव घेताच आज आठवण - उजळणी  होते ती त्यांच्याबद्दलच्या विविध वाद - विवादांची. बर हे वाद - विवाद निर्माण करणारे म्हणजे कोल्ह्या - कुत्र्यांच्या औलादीच ! लचके तोडून खाणे आणि पळून जाने हाच यांचा धंदा. पण आज माझा सवाल आहे कित्ती लचके तोडणार या महाराष्ट्राच्या आराध्याचे ! ज्याने सबंध अठरापगड जातींना एकत्र बांधून, खांद्याला खांदा लाऊन, उभा आयुष्य स्वराज्य निर्मितीसाठी खर्ची घातलं आज त्यालाच प्रत्येक जन टोळी टोळीने वाटून घेत आहे, ऐकायला आवडणार नाही पण हे सत्य आहे, आमच्या मातीचा आमचा पहिला वाहिला छत्रपती आम्ही वेगवेगळ्या गटा - तटांमध्ये वाटून टाकला.

तिथी वाल्यांचा एक गट ! तारखे वाल्यांचा एक गट !... ब्राम्हणांचा शिवाजी कुठे मराठ्यांचा शिवाजी ! बहुजनांचा शिवाजी .. तर कुठे आर एस एस वाल्यांचा शिवाजी .. एका शिवाजीचे एवढे तुकडे. खरतर शिवराय हे इतिहासातील एक निर्विवाद व्यक्तिमत्व आहे कि ज्याची दखल सबंध जगणे घेतली, सर्वांनी मानावे असे ते व्यक्तिमत्व पण आम्ही त्यांचे काय केले?

सर्वप्रथम तर आम्ही ह्या बहुआयाम्ही आणि धुरंदर व्यक्तिमत्वाला दैवत्व देऊन त्यांच्यातील असामान्य गुणांना झाकण्याचा प्रयत्न केला, शिवराय आणि त्यांचे विचार डोक्यात घालवण्या ऐवजी त्यांना फ़क़्त डोक्यावर घेऊन फिरणाऱ्या आणि मिरवणाऱ्या टोळ्या निर्माण करण्यात आल्या ! मला नेहमी प्रश्न पडतो.. शिवराय देवाचे अवतार होते का ? नक्कीच नाही... ते आपल्या सारखेच हाडामासाचे पण एक अद्भुत व्यक्तिमत्व. मग त्यांच्या जयंत्या - पुण्यतिथी - राज्याभिषेक सोहळे हे पंचांग पाहून का बरं?
जो राजा  उभे  आयुष्य कुठल्याही वेळेची - काळाची तमा न बाळगता केवळ आणि केवळ लढत राहिला.. तुमच्या आमच्या साठी.. या मातीसाठी ! त्यांचे  सोहळे - त्यांची आठवण आज आम्ही पंचांग पाहून करणार आहोत का ? बर हे पंचांग वाले .. वर्षातील उरलेले सर्व दिवस इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे चालणार.. ह्यांच्या शाळा.. सुट्ट्या.. कार्यालये.. हे सर्व तारखेनुसार ह्यांना चालते,  ३१ डिसेंबर सुद्धा चालतो. फ्रेन्डशिप डे चालतो, व्हैलेनटायीन डे चालतो ! पण शिवरायांच्या बाबतीत ह्यांचे नीती नियम वेगळे.

बर सबंध भारतातील इतर सर्व महापुरुषांची जयंती अथवा पुण्यतिथी हि तारखेनुसार होते, आज २ ऑक्टोबर ला काय असते हे सांगायची गरज नाही, १४ एप्रिल ला काय असते हे सांगायला कुण्या विद्वान पंडिताची गरज लागत नाही..  मग असे असतांना केवळ शिवरायांच्या बाबतीतच असे का ?

सरकारी पातळीवर हा प्रश्न सोडवला गेला.. पण राजकीय आणि सामाजिक पातळीवर हा प्रश्न फार मोठे स्वरूप घेऊन उभा आहे.

एका सामान्य माणसाला.. जो शिवरायांना त्याच्या मनापासून मानतो, त्यांच्या पासून प्रेरणा घेतो आज त्याला निट कळत नाही कि कधी या महापुरुषाचे मी स्मरण करू.. कधी त्यांना आदरांजली अर्पण करू.. कधी माझा राजा छत्रपती झाला तो सोहळा साजरा करू? तिथीने करू कि तारखेने ? मग तिथी वाले कोण आणि तारखे वाले कोण ? दोघांची विचारसरणी काय ? मी कुणाच्या सोबत उभा राहू.. ? त्यांचे वाद.. ?  राहू द्या .. जाऊ द्या  !!! म्हणजे सुरुवातीला शिवरायांचा विचार डोक्यात असणार्याचा शेवट हा असल्या विचारांनी होतो.. हे फार - फार भयावह आहे. इतिहासनी दिलेला हा अजरामर ठेवा आम्ही आमच्या हातांनी संपवतोय. का देतोय मुठभर टोळक्यांच्या हाती या मातीचा बहुमोल मुकुट मनी ?

महाराजांना मानणार्यांनो एकत्रित पणे उभे राहा, पुढच्या पिढीसाठी जपून ठेवलेली हि एक अनमोल शिदोरी आहे.. ती नष्ट होण्या अगोदर जागे व्हा.

का नाही आपण त्या राजाच्या नावे एकत्रित पणे उभे राहू शकत .. दुभंगलेली जनता पाहून तो सह्याद्री सारखा कणखर राजा हि आज अश्रू ढाळत असेल.. परकीयांशी तर ते लढले, पण स्वकीयांनीच घात केला असे म्हणण्याची वेळ येऊ देऊ नका.. खरच ती वेळ येऊ देऊ नका.

शिवरायांची जयंती, पुण्यतिथी किंवा शिव राज्यभिषेक दिन हा सद्य परिस्थती मध्ये दोन - दोन वेळा साजरे केले जातात, यामुळे निर्माण होणारा संभ्रम, शंका, आणि समाजमनातील दुही हे सर्वच खऱ्या शिव भक्तासाठी प्रचंड  वेदनादायक आहे. याच वेदनेने सर्वांना विनंती करीत आहे कि सबंध मानवजातीला आदर्श असणारे हे व्यक्तिमत्व जगभर न्यायचे असेल, मऱ्हाटी मुलुखाचा खरा स्वातंत्र्य दिन जगभर साजरा करायचा असेल तर आपण सर्वांनी  शिवरायांचे सर्व ऐतिहासिक क्षण  हे कुठल्याही वादाविना तारखे प्रमाणे एकत्र येऊन साजरे करावेत.


जय महाराष्ट्र.. जय जिजाऊ .. जय शिवराय

अमोल सुरोशे (नांदापूरकर)

Tuesday, June 5, 2012

शिवराज्याभिषेक



शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!