Thursday, November 24, 2016

यशवंतराव चव्हाण यांचे पुण्यतिथी दिनी स्मरण

सामान्य जनतेच्या दुःखाला फाईलींमध्ये बघणारा हा माणूस, संक्रमणात पडलेल्या आमच्या व्यस्थेच्या स्थितीकडे बघून पुन्हा पुन्हा आठवतो. 

यशवंतराव चव्हाण यांना स्मृती दिनी विनम्र अभिवादन!!
 
त्यांच्याबद्दल अजून काही  http://www.mukhyamantri.com/search/label/yashwantrao%20chavan 

Friday, October 21, 2016

मराठा मोर्चे - आरक्षण - शिक्षण - शेती - ब्राम्हण मुख्यमंत्री - जिल्हा परिषद आणि नगर पालिका


मराठा मोर्चांनी महाराष्ट्राच्या समाजकारणात आणि राजकारणात खळबळ उडवून दिलीये. यात आता शंका नाही. मोर्चे वर पाहता जातीय दिसत असले तरी ते तसे नाहीयेत. एक तर जातीचा आधार घेऊन मोर्चे काढावे लागणे हीच पुरोगामी महाराष्ट्राला लाजिरवाणी बाब आहे. होय महाराष्ट्र पुरोगामीच आहे. कारण एका मुख्यमंत्र्याने भोंदूंच्या सभेत हजेरी लावल्याने किंवा पुरोगामी शब्दाला फुरोगामी म्हणून हिणवल्याने, आपलं पुरोगामित्व नाहीसं होईल इतकं ते तकलादू नाहीये. तर, जातीच्या नावाने मोर्चे काढण्याची 'गरज' पडणे ही बाब ती लाजिरवाणी.

या मोर्चांकडे खरे तर मराठ्यांचे मोर्चे म्हणून बघण्यापेक्षा, महाराष्ट्रातील बहुसंख्य 'नागरिकांचे' मोर्चे म्हणून आपण बघायला हवे. कोपर्डीचे दुर्दैवी प्रकरण घडल्यावर त्याचा इन्स्टंट रिप्लाय म्हणून ऍट्रॉसिटीच्या ऍक्टचा विरोध केला गेला. त्याने ऍट्रॉसिटी हा मुद्धा या मोर्चाचा गाभा आहे असे भासले, किंवा राजकीय फायद्यासाठी भासवले गेले. ही बाब स्वजातीय मतदार घट्ट व्हावा म्हणून 'वंचितांचे राजकारण आम्ही करतो' म्हणरांनी केली. जातीअंताच्या मार्गातील सगळ्यात मोठे अडसर 'हे' जातीवादी आहेत. आपल्याच लोकसमूहाला इतरांची भीती दाखऊन, आम्ही कसे तुमचे संरक्षणकरते याचा भास निर्माण करणे, ही राजकीय स्वार्थ्यांची फार जुनी चाल आहे. ती मराठा, ओबीसी, ब्राम्हण (रास्वसं), मुस्लिम नेते आजवर खेळत आलेत. पण त्याची लागण दलित नेत्यांनाही बऱ्याच प्रमाणात झालेली आहे, यात आता शंका नाही.

या मोर्च्यांच्या निमित्याने इथच्या बहुसंख्य असणाऱ्या जातीचे प्रश्न समोर आले. ही चांगली बाब. पण, पण काही अंशी साईड इफ्फेक्ट म्हणून जातीय अस्मिताही बरीच प्रबळ झाली. तिचा आपल्याला येणाऱ्या जिल्हा परिषद आणि नगर पालिकेला फायदा होईल या समजाने अनेकांना गुदगुल्याही होत असतील(राष्ट्रवादी काँग्रेसचा इथे काही संबंध नाही ). पण, संख्येने जास्त असल्याने मराठा समाजावर एक फार मोठी जबाबदारी या राज्याच्या भविष्याची आहे. या राज्याचं भविष्य अंधारात, तर तुम्ही त्या अंधारापासून दूर राहू शकत नाहीत. म्हणून जात न पाहता येणाऱ्या प्रत्येक निवडणूकित चांगल्या लोकांना निवडून द्यावं.

आणि शासनानेही आपण धर्मसत्तेच्या जीवावर नाही तर लोकसत्तेच्या जीवावर निवडून आलोय याची जाण ठेवावी. मराठ्यांना आरक्षण द्यावं कि नाही ते सखोल अभ्यास करून ठरवावं. बाबासाहेबांनी संविधानाच्या संदर्भातच एकदा खूप मूल्यवान गोष्ट सांगितली होती. ती अशी - "प्रत्येक पिढीसाठी त्या त्या पिढीने नियम आणि संविधान ठरवावं. मागच्या पिढीने घातलेले नियम आणि त्यांचं अंधानुकरण करणं म्हणजे, जिवंत असणाऱ्या या पिढीचं जगणं मेलेले ठरवतायेत असं होईल." ते व्हायला नकोय. आणि नेमकं तेच आपण करतोय असं वाटतं. धर्म म्हणजे जगण्याचे नियम, जे बदलणाऱ्या माणसासोबत बदलत असतात. वेद. पुराण, स्मृती, मेलेल्या माणसांनी लिहलेली सगळी पुस्तकं आणि तितकच काय तर संविधान सुद्धा, आपल्या आजच्या जगण्याच्या कसोटीवर घासून बघितलं पाहिजे. खरं उतरलं तर वापरावं, नसता त्याला बदलायला हात धजायला नकोत. संविधानाच्या बाबतीत, आपण ते बदल वेळोवेळी करतोय, ही खरं तर आनंददायी बाब आणि म्हणूनच त्या काळच्या दूरदृष्टी नेतृत्वाचे आपण असंख्य आभार मानायला हवेत.

आरक्षण हे मुळीच गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम नाही. ते तुमचं व्यवस्थेत रिप्रेसेंटेशन असावं म्हणून आहे. हा त्याचा मूळ गाभा. आता फ्रेम केलेल्या कायद्याच्या ओळीत हा गाभा पकडता येणं कायदे मंडळाचं काम आणि कौशल्य. ते अशात प्रामाणिकपणे केले जात नाही असे दिसते. खरंतर आरक्षणाला आपण डेली फूड म्हणून न वापरता फक्त सप्लिमेंट म्हणून वापरयाला पाहिजे. योग्य तितकच आणि हवं तिथेच. नसता त्याचे साईड इफेक्ट इतके होतायेत की इथची समाज व्यवस्था ओबड धोबड गाठी-गाठींनी वाढलीये.

तर आरक्षण काही मूळ प्रश्न सोडवणार नाही. सरकारी नौकऱ्या कमी होणार आणि त्यांचं कंत्राटीकरण होणार या काळ्या दगडावरच्या दोन पांढऱ्या रेघा आहेत. सरकारी शिक्षण व्यस्था अगदीच ऑक्सिजनवर आहे. म्हणून आर्थिकभार काहीसा हलका, तो ही काही काळासाठीच, आरक्षणाने वाटेलही, पण तो काही दूरगामी उपाय नाही.

खरं तर शेतीचा प्रश्न हा सगळ्यांचं मुळ आहे. ५ एकर मध्ये ५-१० लाखाचं उत्पादन झाल्यास कोण मारून घ्यायला ४-५ लाखाची नौकरी करेल. हा साधा सोपा विचार आहे. पण ती काही फायद्याची राहिली नाही, ठेवली नाही. आणि हे पुन्हा पुन्हा बोललं जातंय. शासनाच्याही डोक्यात तेच भरलंय - शेती काही फायद्याची होऊ शकत नाही. मुळात हा असला विचार शासन व्यस्थेने करणे आणि शेतीच्या प्रश्नांकडे, तिच्या फॉर्मच्या बदलाकडे दुर्लक्ष करणे हा निव्वळ आत्मघाती मूर्खपणा आहे. आणि हो, सब्सिडीवर चार लोखंडी नांगर देणे, फळबागांसाठी अनुदान देणे याला लक्ष देणे म्हणत नाहीत.

दुसरं शिक्षण व्यवस्थेचं बाजारीकरण आणि त्याच्या क्वालिटीची लागलेली वाट. तसं हे इथेच नाही तर जभर सगळीकडे होतंय. पण अमेरिकेने यावर काही तरी उत्तर काढावं, मग केंद्र सरकाने कॉपी मारून करावं काही तरी आणि मग तुम्ही मी इथं महाराष्ट्रात काही तरी करू, याची वाट बघंन हा ही मूर्खपणाच आहे. वेळीच शिक्षणाच्या बाजारीकरणाला आळा घातला तरच आपण उजेडात जगू शकू, नसता डोळे आले म्हणून दाखवायला गेल्यावर तुमचे माझे डोळे काढून विकल्या शिवाय डॉक्टरला त्याचे शैक्षणिक कर्ज फेडता येणार नाही.

खरं तर अनेक प्रश्न आहेत, त्यांना सोडवणं सोप्प नाही, पण इच्छा शक्ती असल्यास, तितकंही अवघड नाही. फक्त जनतेला हे सगळं माझ्यासाठी चाललंय हे वाटायला हवं. बाप म्हणून शासनाचं लोकांवर प्रेम असेल तर, लोक मारही खाऊन घेतात. पण शासनच धर्मसत्तेचे सुपुत्र (औलाद) आहोत असे वाटून मेलेल्यानी लिहलेल्या गोष्टींच्या समर्थरणात उतरत असेल तर, जगणाऱ्यांना ते आपले वाटणे थोडे अवघड आहे.

बाकी मराठा मोर्चे ब्राम्हण मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आहेत अशी आवळ काहींनी उठवली आहे, त्या मूर्खांनाही जनतेने वेळीच घरचे मार्ग दाखवावेत. कारण कुणाच्या जातीवरून त्याने काय करावं आणि काय करू नये हे ठरवणचं तर मुळी जातीवाद आहे. पण म्हणून त्याच्या सगळ्याच चुकांकडे डोळे झाकही करू नये.

जय महाराष्ट्र.

Monday, October 3, 2016

'मोदी-विरोध' आणि 'देश-विरोध' यातला फरक

असंख्य अशा स्वातंत्रता सैनिकांच्या बलिदानाने मिळालेलं हे स्वातंत्ऱ्य. कालच या स्वातंत्र्याच्या शिखराला ज्यांनी कळस चढवला त्या महात्मा गांधींची जयंती झाली. निर्विवाद गांधीजींशिवाय असंख्य अशा अनेकांचा या स्वातंत्र्य चळवळीत भाग होता. असो. पण त्या सगळ्या आहुत्यांनंतर स्वातंत्र्य भारत आता किती काळ स्वातंत्र्य आणि अखंड राहील याची सगळ्यांनाच तेंव्हा चिंता होती. मधल्या काही काळात ती चिंता फौल होती असं म्हणण्याजोगी परिस्थिती होती. पण अशात, पुन्हा दुही माजते कि काय, याची चिंता नाही वाटल्यास नवल.

काही धर्मांध मुस्लिमांनी त्या काळी पाकिस्तान वेगळा मागितला आणि घेतलाही. समजूतदार इथे राहिले. धर्मांध सगळ्या धर्मात असतात. पाकिस्तानचं पुढे काय झालं हे सगळ्या जगाला माहित आहे. अमेरिकेच्या फंडिंगवर सरकार आणि आखातांच्या फंडिंगवर अतिरेकी जगतायेत या पलीकडे त्यांची प्रगती नाही. आणि होणारही नाही. इतक्या आत्मविश्वासाची अनेक करणे आहेत. शोध घ्यावीशी वाटणारांना सापडतील.

अशातच झालेल्या पाकिस्तानी अतिरेकी हल्ल्यांना भारताने, भारताच्याच पाकिस्तानने बळकावलेल्या जमिनीवर जाऊन कारवाई केली. अशा कारवाया होत राहिल्या पाहिजेत. आणि त्या आधीपासून गरजेनुसार होतही आलेल्या आहेत. याने त्या भागातून पाकिस्तान स्पॉन्सर्ड टेररिजम आटोक्यात आणायला मदत होईल.

युद्ध आणि हिंसा हे कुठल्याच प्रश्नांची उत्तरे नसतात. पण ते कॉन्फ्लिक्ट मध्ये असणाऱ्या दोन्ही बाजूंना कळायला हवं. नसता गरजेनुसार हिंसा आणि युद्ध नक्कीच जस्टिफाईड आहे.  

तर, राहिला मुद्दा भारतीयांनी याचं अंतर्गत राजकारण करण्याचा. देश कधीही सगळ्यात आधी असायला हवा. कारण देश आहे तर तुम्ही आहात आणि सीमाविरहित जग निर्माण होईस्तर, सीमा आहेत तरच देश आहे. नस्ता उद्या सीमेवरचा गोळीबार आपल्या नाकासमोर झाल्यावर आपल्याला जाग येऊन फायदा नाही. म्हणून, आर्मी लोक नियुक्त सरकारच्या सहमतीने जे करेल ते तुम्ही मी निर्विवाद मान्य करायला हवं. त्याचा उहा-पोह झालाच तर तो संवेदनशीलपणे आणि आततायीपणा न करता व्हावा.

एका गोष्टीचे अत्यंत हसू आले. 'सर्जिकल स्ट्राईक' चे फोटोज काही 'भारतात राहणाऱ्यांचीच' मागितले म्हणे. तर मित्रहो मान्य आहे 'मोदी' या व्यक्तीवर अनेकांचा विश्वास नाही. पण 'मोदी' म्हणजे 'देश' नाही. म्हणून 'मोदी-विरोध' आणि 'देश-विरोध' यातला फरक समजून प्रतिक्रिया व्यक्त कराव्यात. आणि मोदी भक्त्तांनी ही सरळ सरळ मोदींनीच सीमेवर जाऊन ५६ इंचांची आडवी धरली या अविर्भावात 'सोशल मेडिया सेल'चे "२०१४ का वोट काम आया, १५ लाख वसूल" हे असले फालतू मेसेजेस फरवर्ड करू नये. 

सीमेवरची सुरक्षा तुमच्या-माझ्या सारख्या बोटे चालवानरांमुळे होत नाही किंवा बॉर्डर सेक्युरिटी स्ट्रॅटेजी सोशल मीडिया स्ट्रॅटेजीसारखी उथळ नसते. म्हणून ती आपल्याला सहजा सहजी कळणार नाही ;). आणि मुळात ती तुमच्या माझ्या भल्यासाठीच आहे. त्या कारणानेच तुम्ही 'न्यूज-रूम' मध्ये आणि काही जण 'वॉश रूम' मध्ये आपले अत्यंत महत्वपूर्ण विचार व्यक्त करू शकता.

जय हिंद.

Tuesday, August 30, 2016

मुद्दा, ऍट्रॉसिटी कायद्याचा

शरद पवार काय म्हंटले याचं समर्थन करायला हे लिहीत नाही. ते चुकीचं बोलले असतील तर पुढल्या निवडणुकात त्यांच्या पक्षाची एकही व्यक्ती निवडून येऊ नये. हे या मुळे लिहतोय कारण जातीअंता बद्दल आत्मियता आहे.

उरला मुद्दा, ऍट्रॉसिटी कायद्याचा, तर ऍट्रॉसिटी कायदा सर्रास काढून टाकावा हेच मुळी चूक. आजही जातीय विद्वेषातून असंख्य घटना घडतात. आणि ऍट्रॉसिटी ने त्याला वचक आहे हे बिलकुल सत्य.

एक तर कोपर्डी प्रकरण, मग मराठा एकजूट आणि ऍट्रॉसिटी या सगळ्यांची सांगड घातली जातीये तीही चूकच. महाराष्ट्रातल्या सगळ्याच जाती न चुकता संघटित आहेत. त्यांना पुन्हा नव्याने आपल्या राजकीय कारकिर्दी साठी आक्रमक स्वरूप दिले जातेय. तुम्ही म्हणाल कुठेही कुन्याही नेत्याचे भाषण होत नाही या मोर्च्यांमध्ये. कुणाचेही बॅनर लागत नाही. तर यातून काही, कुणी, कुठल्या पदाला पोहचेल याचा थांग पत्ता काही वर्षांनी लागेल. मराठा आरक्षणाने अनेकांना तूप-पोळ्या खाऊ घातल्यात. जेवण फस्त होईस्तर लोकं येड्या...सारखी समर्थानात बोंबलत होती.

कुठल्याही समाजात कुणाबद्दल तरी द्वेष खद-खदतच असतो. बहुतांशी शेतकरी असणाऱ्या मराठयांमध्ये आधीच नापिकीची नाराजी, बेफाम सरकारी धोरणे आणि काही अंशी मराठ्यांचं राखीव कुरनं असलेलं राजकारण हातातून सुटतांना होणारी घालमेल; या सगळ्याच एकत्रित रूपांतर या मोर्चां मध्ये झालं. हे म्हणजे तुम्ही अनेक गोष्टींवर नाराज असता, आणि अचानकच कशाच्या तरी घटनेने तुम्हाला रडू कोसळतं तसं. ते रडणं या मागच्या सगळ्याचा परिपाक असतं.

असो. जसं आपल्याला मुस्लिम कट्टरतेचं, हिंदू कट्टरतेचं वावडं आहे तसंच या किंवा कुण्याही जातीय कट्टरतेचे वावडे व्हायला हवे. उद्या नसता आम्ही सोवळ्यात असतांना आणि गाडी चालवाटतांना ट्रॅफिक पोलिसांनी अडवू नयें, असेही नियम पूजेला जाणाऱ्या देवबाप्पाचे संघटन करेल. तेंव्हा मला वाटते अनेक जण त्याला विरोध करतीलच.

पण म्हणून, मग स्त्रियांचे हक्क, दिन दुबळ्यांचे रक्षण, धर्म रक्षण या नावाखाली जे सरळ-सोट, काही गोहत्या बंदी सारखे अडाणचोट, कायदे केले जातात आणि त्यांचं अंधानुकरण होतं ते चुकीचं. चुकीचं ते चुकीचंच. या कायद्यांना कुणीही स्पर्श करू नये असा अतिरेक कुणीही करणार असेल तर वेळ त्यांनाही माफ करणारा नाही.

खरं तर कायद्याने, बदलती सामाजिक आणि आर्थिक स्थिती या सगळ्याचा कानोसा घेऊनच वागायला हवं. नसता सेडिशनचा कायदा जसा शतकांपासून चालूये तसंच इतर अनेक कायद्याचेही होईल.

जातीय वास्तव अजूनही कटू आहे. पण त्याचं स्वरूप बदलतंय. शहरी आणि ग्रामीण जाती व्यवस्था वेगळी आहे. ती मुळातून, दोन्ही जागीही, संपलेली नाही हे खरंय; पण तिच्यात काहीच बदल झाला नाही असं म्हणणं, आपल्या जाती अंताच्या समर्थनाशी अप्रामाणिकपणा ठरेल. आणि म्हणूनच कोणत्याही कायद्याने कुणालाही अनिर्बंध वागण्याची मुभा मिळत असेल किंवा त्याचा दुरूपयोग होत असेल तर, त्या विचार करायलाच हवा.

बाबासाहेबांच्या भाषेत ...
...... Jefferson, the great American statesman who played so great a part in the making of the American constitution, has expressed some very weighty views which makers of Constitution, can never afford to ignore. In one place he has said:
“We may consider each generation as a distinct nation, with a right, by the will of the majority, to bind themselves, but none to bind the succeeding generation, more than the inhabitants of another country.”
In another place, he has said:
“The idea that institutions established for the use of the nation cannot be touched or modified, even to make them answer their end, because of rights gratuitously supposed in those employed to manage them in the trust for the public, may perhaps be a salutary provision against the abuses of a monarch, but is most absurd against the nation itself. Yet our lawyers and priests generally inculcate this doctrine, and suppose that preceding generations held the earth more freely than we do; had a right to impose laws on us, unalterable by ourselves, and that we, in the like manner, can make laws and impose burdens on future generations, which they will have no right to alter; in fine, that the earth belongs to the dead and not the living;”
I admit that what Jefferson has said is not merely true, but is absolutely true........

Tuesday, August 2, 2016

शरद पवार नेमके रसायन काय आहे ?


शरद पवार नेमके रसायन काय आहे हे कळणे अवघड. साहेबांना शाहू पुरस्कारही  भेटतो आणि टिळक पुरस्कारही भेटतो. त्याच वेळी ते अण्णाभाऊंना हि विसरत नाहीत आणि तळागाळातल्या गरिबांनाही. 
राजकारणा पलीकडे जाऊन बघाल तर शरद पवार ही व्यक्ती महाराष्ट्राला लाभलेलं अत्यंत महत्वाचं व्यक्तित्व आहे.

लोकमान्य पुरस्कार मिळाल्या बद्दल शरद पवारांना मुख्यमंत्री.कॉम कडून हार्दिक शुभेच्छा! 

"स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि ते मी मिळवणारच", भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचे आद्य प्रवर्तक लोकमान्य टिळकांच्या या वाक्याने स्वातंत्र्यप्राप्तीची स्फूर्ती जनमनात संचारली. या ऐतिहासिक, अजरामर गर्जनेस १०० वर्षे पूर्ण होत आहेत. अशा वेळेस हा सन्मान प्राप्त होतोय, याचा मला आनंद आहे. नुकतेच राजर्षी शाहू महाराज पुरस्कारानेदेखील मला सन्मानित करण्यात आले. दोन वैचारिक मतभेद असणारे शाहू महाराज आणि लोकमान्य टिळक. मी स्वतःस भाग्यवान समजतो की, या दोघांच्याही नावाने दिले जाणारे मानाचे पुरस्कार एकाच वर्षी प्राप्त होण्याचा योग आलाय. आजचा दिवस फार थोर आहे, आजच्याच दिवशी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे. सामाजिक न्याय आणि समतेसाठी लढा देण्याकरिता अण्णाभाऊ साठे यांनी आपली लेखणी प्रभावी अस्त्रासारखी वापरली. आपल्या साहित्यामधून त्यांनी सामान्य कार्यकर्त्यांनाच घडवले असे नाही, तर सामान्य माणसातही शोषणाविरोधात प्रतिकार करण्याची क्षमता निर्माण केली. आज याप्रसंगी मी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचेही स्मरण करतो.          .... शरद पवार  

Thursday, July 21, 2016

आजी मुख्यमंत्री आणि माजी उप. मुख्यमंत्री दोघांनाही जन्म दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

महाराष्ट्राची लाडकी नेतृत्वं मा. देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार या दोघांनाही मुख्यमंत्री कडून जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

लोककल्याणासाठी दोघांनाही आरोग्य आणि दीर्घ आयुष्य लाभो!  

Friday, June 10, 2016

बाबासाहेबांनी नव्हे तर गोळवरकरांनी घटना लिहिली काय - शरद पवार


Thursday, June 2, 2016

#‎शेतकरी_कर्जमाफी‬ माफी नव्हे, बेजबाबदार पॉलिसीज् मुळे झालेल्या नुकसानीची भरपाई !

खरं दु:खं कसं असतं. तसं खरं खोटं काही नसतं. पण जे खोलवर, आतून माणसाला निराश करतं ते दु:खं वेगळंच. तीन-चार वर्षांपासून तुमच्या व्यवसायात तुम्ही नुकसानीत आहात. तुमची एक चिमुली ९वित शिकायला. मोठा मुलगा मेडीकलला. अगदी हुशार. सगळ्यात मोठी लग्न होऊन गेलेली. तिचा नवरा छोट्याश्या नौकरीत. छोट्या शहराच्या ठिकाणी. तिलाही वर्षभराची एक चिमुली.
जून येतो. चिमुलीला वह्या पुस्तकं घ्यायची असतात. ती झेड.पि.त नाही. विकत घ्यावी लागतात. कपड्या सहित सगळा मिळून खर्च १२००-१३०० रुपये. तुमचा व्यवसाय शेती. जून आला म्हणजे पाऊस येईल या श्रधेखातर तुम्ही बियाणंही घेनारं त्याचा खर्च १०-१५ हजार. मोठ्याची सरकारी कॉलेजचीच, पण फीस तर भरावीच लागते. तीही ४०-५० हजार. पुढे दिवाळीही येईल, पिकावर रोगही पडेल. आणि मागेच मोठीचं बाळंतपण हि झालेलं. तेही सिझर. खर्च रुपये ३०-३५ हजार.
आता या सगळ्या माहित असलेल्या आणि माहित नसलेल्या संख्यांच्या बेरजा लावल्या आणि खिशातली आणि ब्यांकेतली रक्कम मिळून त्यानां जुळवायला बसलं तर मेळ लागणारच नाही. कारण ब्यांकेत असतात रुपये फक्त १०० आणि खिशात पेट्रोल साठीचे रुपये ५०.
आणि आज २ जुन म्हणून तयार होऊन छोटी चिमुलि वह्या पुस्तकं खरेदी साठी गाडीवर मागे बसलेली. तुम्ही किक मारावी कि नाही या विवंचनेत. जावं तर कुण्या दुकानावर जावं याच विचारात. हातापायाला थरकाप सुटावा इतकी हतबलता. हे खोलवरचं दु:खं. उद्या संपेल कि परवा, नेमकं माहित नसलेलं. पाहवं तिथवर अंधार. तितक्यात कुणी तरी मागून धावत येतं. कुठे निघालात विचारतं. तुम्ही सांगता. तो म्हणतो मी पण येतो. तुम्ही तर जावचं कि नाही या विवंचनेत अजून. तो सांगतो ब्यांकेत जायचय, पिक कर्ज माफ झालय. क्षणातच हातापायात जिव आणि मनात आशा आणि धीर येतो. सुरु व्हायला १-२ मीनिटं घेणारी गाडी क्षणात सुरु होते.
साध्या ‪#‎शेतकरीकर्जमाफी‬ ‪#‎शेतकरी_कर्जमाफी‬ नं इतकं होणार असेल तर ज्यांच्या प्राईस रेगुलेटेड प्रोड्यूस ने पोटं भरून फ्रीमार्केटात काम करायची ताकत येते, जे पत्तीपुडा, झंडू बाम, पतंजली पेस्ट, लक्स ते टू व्हीलर, ट्राक्टर ते अगदी इंड्रेल पर्यंत प्रत्येक गोष्टीवर ट्याक्स देतात त्यांची गरजेची कर्जमाफी करायला काहीच हरकत नसावी. माफी कसली गांडूनो, तुम्ही केल्याला बेजबाबदार पॉलिसीज् मुळे झालेल्या नुकसानीची भरपाई आहे ती!

Thursday, April 21, 2016

Broken Education System

We think that the education system is changing and is becoming intelligent and more practical. But to most extent it's still broken and the fixes are wrong.

Following comment one one of the article on Indian Education system speaks a lot.

Mother of a kid writes:activity based learning in Indian system???? I see now in many schools in chennai flaunt they have activity based learning at school but reality parents are doing the activity based learning school homework at home because it is beyond the capacity of students

or eg: that day I was at a xerox shop where a mother came with her 2 children and she was asking the xerox man to make a copy of 'Grandparents' project for her elder girls school assignment. That girl was playing with her younger bro kid and havent had any idea of what was going on. It seems every kid had to submit glossy printouts of Granparents of different cultures across world. So the mother and xerox man were browsing details to complete assignment and I think both these adults only would be benefitted out of this assignment

Thursday, April 14, 2016

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 125 वी जयंती।।

आपल्या लहान मुला मुलींना खालील विचार आज जरूर समजून सांगा... हि खरी बाबासाहेबांना आदरांजली....

१) "शिका...!
संघटीत व्हा...!
संघर्ष करा....!"
        -डॉ. बाबासाहेब आंबेडकर

२) "तुमच्या मताची, किंमत मीठमिरची इतकी समजू नका. त्यातील सामर्थ्य ज्या दिवशी तुम्हाला कळेल तेव्हा ते, मत विकत घेऊ पाहणाऱ्याइतके कंगाल कोणीच नसेल..."
       - डॉ. बाबासाहेब आंबेडकर

३) "लोकांच्या अंगात देवी, भुतच कां येतात..,
न्युटन आयझॅक, कोपर्निकस यांच्यासारखे शास्त्रज्ञ कां येत नाहीत...?
जेव्हा शास्त्रज्ञ अंगात येतील तेव्हा भारत जगावर राज्य करेल..."                                          डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

४) "समता, स्वातंत्र्य, विश्वबंधुत्व या तीन तत्वावर आधारित जीवनमार्ग म्हणजे लोकशाही.
समता, स्वातंत्र्य, सहानुभूती यानेच व्यक्तीचा विकास होतो."
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

५) "माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नये. लाज वाटायला पाहिजे ती आपल्या दुर्गुणांची...."
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

६) "प्रज्ञा, शील, करुणा, विद्या, मैत्री या पंचतत्वावर प्रत्येक विद्यार्थ्याने आपले चरित्र बनविले पाहिजे..."
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

७) "मोठ्या गोष्टींचे बेत करण्यापेक्षा छोट्या गोष्टीने आरंभ करणे अधिक श्रेयस्कर ठरते..."
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर

८) "जेथे एकता~
तेथेच सुरक्षितता"
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

९) "काम लवकर करावयाचे असेल, तर मुहूर्त पाहण्यात वेळ घालवू नका."
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

१०) "दैवावर भरवसा ठेवून वागू नका, जे काम करावयाचे असेल ते आपल्या मनगटाच्या जोरावर करा..."
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

११) "आत्मोद्धार हा दुसर्याच्या कृपेने होत नसतो,
तो ज्याचा त्याने करायचा असतो..."
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

१२) "विचारक्रांती झाल्याशिवाय आचारात फेरबदल होवू शकत नाही. आचारात फेरबदल करावयाचा झाल्यास आधी मनावर बसलेल्या जुन्या विचारांची छाप काढून टाकणे अगदी अगत्याचे आहे...."
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

१३) " माणूस हा धर्मा करीता नसून, धर्म हा माणसा करिता आहे..."
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

१४) "सेवा जवळून, आदर दुरून, व् ज्ञान आतून असावे..."
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

१५) "जो प्रतिकूल लोकमताला घाबरून जात नाही, दुसऱ्यांचे हातचे बाहुले न होण्याईतकी बुद्धी ठेवतात, स्वाभिमान ज्याला आहे, तोच माणूस स्वतंत्र आहे असे मी समजतो."
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

१६) "स्वातंत्र्याचे हक्क भीक मागून मिळत नसतात, ते स्व-सामर्थ्याने संपादन करावयाचे असतात, देणगी म्हणून ते लाभत नसतात..."
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

१७) "ज्याप्रमाणे कोणत्याही राष्ट्राला दुसर्या राष्ट्रावर राज्य करण्याचा अधिकार नाही, त्याचप्रमाणे, कोणत्याही एका विशिष्ट वर्गाला दूसर्या वर्गावर अधिसत्ता गाजविण्याचा अधिकार नाही..."
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

१८) "ज्या राष्ट्रात माझ्या अस्पृश्य बांधवांची माणूसकी धूळीप्रमाणे तुडविली जात आहे, ती माणुसकी मिळवण्यासाठी मी सर्व परी लढण्यास तयार आहे...."
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

१९) "माझा जन्म सर्वसाधारण जनतेची जबाबदारी घेण्यासाठी असावा."
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

२०) "तुम्ही आपली गुलामगिरी नष्ट करा.स्वाभिमान शुन्यतेचे जीवन जगणे नामर्दपणाचे आहे."
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

२१) "आपण मला देवपदाला चढवू नका. एखाद्या व्यक्तीला देवपदाला चढवून इतराने आंधळेपनाने त्याच्या मागे धावत जावे, हे मी कमकुवतपनाचे लक्षण मानतो..."
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

२२) "माणसाने खावे जगण्या साठी, पण जगावे समाजासाठी...."
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

२३) "दुसर्याच्या सुख-दु:खात भागीदार व्हावयास शिकणे हेच खरे शिक्षण आहे..."