Saturday, May 2, 2020

४०० ते ५०० वर्षांत उभी राहिलेली संस्कृती आपली खरी संस्कृती - महाराष्ट्र दिन २०२०


महाराष्ट्र दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा. तसं ज्याला आज आपण महाराष्ट्र म्हणतो, त्याचा हा आधुनिक जन्म दिवस. महाराष्ट्र कधी पासून अस्तित्वात असेल? म्हणजे इथली संस्कृती, आपण जे वागतो, जगतो, बोलतो, राहतो वगैरे वगैरे. कधी पासून हे सगळं असं असावं? याचं उत्तर आपल्या सारख्या सामान्यांपेक्षा हा ज्या कोणत्या विषयाचा विषय असेल त्या विषयाच्या निष्णातांना जास्त चांगलं माहित असेल. तरी, आपला एक सामान्य माणूस म्हणून या भूमीवर अधिकार आहे आणि त्याच अधिकाराने आपण आपला एक अंदाज लावू शकतो. म्हणजे ज्ञानेश्वर-नामदेव इथे आपल्याला या मराठी राज्याची - महाराष्ट्राची - सुरुवात झाली असावी, असा अंदाज लावता येईल.म्हणजे आजच्या आपल्या मराठी म्हणता येईल अशा संस्कृतीची सुरवात तिथून झाली असं आपण समजू शकतो. किंवा मला जे मांडायचं त्या साठी ते सोयीचं आहे म्हणून समजा हवं तर! पण मीच कशाला वारकरी साहित्यातच संत बहिणाबाईंनी लिहून ठेवलयं -


संतकृपा झाली । इमारत फळा आली ॥ १ ॥
ज्ञानदेवें रचिला पाया । उभारिलें देवालया ॥ २ ॥
नामा तयाचा किंकर । तेणें रचिलें तें आवार ॥ ३ ॥
जनार्दन एकनाथ । खांब दिधला भागवत ॥ ४ ॥
तुका झालासे कळस । भजन करा सावकाश ॥ ५ ॥
बहिणी म्हणे फडकती ध्वजा । निरूपणा केलें वोजा ॥ ६ ॥  



तर ज्ञानदेव, नामदेव, जनाबाई इथून ते अगदी तुकाराम महाराजांपर्यंत या संस्कृतीची पाळेमुळे पक्की झाली. बरं फक्त वारकरी संस्कृतीच तेंव्हा सगळ्या महाराष्ट्राची संस्कृती होती का? तर कदाचित तीच मुख्य संस्कृती असावी. कारण इथल्या सर्व स्तरातील सगळ्या जातीत आणि अगदी धर्मातही वारकरी संत होऊन गेलेत आणि दुसरं काही इतकं प्रबळ नव्हतं ही. किंवा कर्मकांडाची आणि सनातन्यांचीही संस्कृती असावी, पण तिला वेळो वेळी ज्ञानेश्वरांपासून सगळ्यांनी पराजित केले. म्हणून तीही आपली मुख्य संस्कृती नसावी. 



ही जर आपली अगदी ४००  ते ५०० वर्षांत उभी राहिलेली संस्कृती आपली खरी संस्कृती होती, तर ती आपण तशीच जपलीये कि त्यात सरमिसळ - भेसळ कलीये हे आपण आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्याने पुन्हा पाहायला हवं. ज्ञानेश्वर, एकनाथ, गोरा कुंभार, चोखामेळा, जनाबाई, तुकाराम, दामाजी, नरहरी सोनार, नामदेव, मुक्ताबाई, विसोबा खेचर, सावता माळी किंवा सोपानदेव आणि इतर अनेक संत पाहिल्यास किंवा त्यांच्या लिहलेल्याचा सार पाहिल्यास खालील २ महत्वाच्या गोष्टी आपल्याला दिसतात.

१. जाती पातीचा कसलाही भेद या संस्कृतीने शिकवला नाही किंवा किंबहुना जाती पती मिटाव्यात, भेदा भेद अमंगळ हीच या संस्कृतीची शिकवण राहिली. त्याकाळी अगदीच भेदा भेद इथे नव्हताच असं मला म्हणायचं नाहीं. पण तो यां त्या काळच्या आदर्शांत तरी दिसत नाहीं.  
२. सगळ्याच संतांनी कर्मकांड, वेद, सनातनी धर्मांधता, चमत्कार इत्यादींच्या मागे न जाता (किंवा जशास तसे न जाता त्यांना पारखून आपल्या हिताचं ते घ्यावं) खरा भक्तिमार्ग जो नामस्मरणात आहे तो सांगितला. आणि याला साक्षात ज्ञानेश्वर माउलींच्या या ओळींचा आधार आहे -

योगयागविधी येणे नोहे सिद्धि ।
वायांचि उपाधि दंभधर्म  ।।१।।
भावेविण देव  न कळे निःसंदॆह ।
गुरुवीण अनुभव कैसा कळे ।।२।।
तपेविण  दैवत दिधल्यावीण प्राप्त ।
गुजेविण  हित कोण सांगे ।।३।।
ज्ञानदेव सांगे  दृष्टांताची मात ।
साधूंचे संगती तरुणोपाय ।।४।।      



अजून पुढे आपली गफलत होऊ नये म्हणून 'साधू' ची व्याख्याही जगतगुरु तुकाराम महाराजांनी केलीये ती अशी -

जे का रंजले गांजले ।
त्यासि म्हणे जो आपुलें ॥१॥
तो चि साधु ओळखावा ।
देव तेथें चि जाणावा ॥२॥



अजून ज्ञानेश्वर माउली म्हणतात - 


जरी वेद बहुत बोलिले | विविध भेद सुचिले |
तऱ्ही आपण हित आपुले | तेचि घेपे ||






म्हणजेच वेदांमध्ये जरी अनेक गोष्टी लिहिलेल्या असतील तरी आपण  त्यातून आपल्या योग्य आणि हिताचे तेच निवडावे, हा अधिकार माउलींनी सर्व ज्ञानी जणांना दिला होता.



आणि जगतगुरु तुकाराम महाराजांच्या शब्दात ही -

वेदाचा तो अर्थ आम्हांसीच ठावा।
येरांनी वाहावा भार माथां।
खादल्याची गोडी देखिल्यासी नाहीं।
भार धन वाही मजुरीचें।।


म्हणजेच आपल्याच या वेदान्तातून ज्ञान न घेता त्याचा केवळ भार वाहने म्हणजे वेडेपणाच असे काहींसं तुकोबांनी देखील सुचवले.



पुढे वेदांचा अर्थ काय तर -

वेद अनंत बोलिला। अर्थ इतुलाचि शोधिला।।
विठोबासी शरण जावें। निजनिष्ठा नाम गावें।।
सकळशास्त्रांचा विचार। अंतीं इतुलाचि निर्धार।।
अठरापुराणी सिद्धांत। तुका म्हणे हाचि हेत।।


आणि ते या सगळ्याचा असा सोक्ष मोक्ष लावतात -

तुका तरी सहज बोले वाणी। त्याचे घरी वेदान्त वाहे पाणी।।


खरं  तर चारही वेदांचे सार तुकोबांनी आपल्या गाथेमध्ये अतिशय परखडपणे आणि सामान्य लोकांना समजेल या भाषेत लिहून ठेवले. म्हणून तुकोबारायानंतर वेदाच्या किंवा धर्माच्या पुन्हा आपल्याला नव्या व्याख्या कुणी सांगायची गरज नाही.

म्हणजे हे सगळं व्यस्थित पाहता आपली महाराष्ट्राची संस्कृती ही भेदा - भेद न मानणारी, धर्माच्या रूढी, त्याचे जाचक नियम मोडून काढणारी, दांभिकतेला ठेचून काढणारी होती. पूजा पाठ आणि कर्मकांड यात न रमता फक्त नामस्मरणाने भक्तीमार्ग प्राप्त करणारी होती. गोर गरीब यांचा कैवार करणारी होती. आपल्या कामात 'कांदा, मुळा, भाजी।अवघी विठाई माझी' म्हणून देव पाहणारी होती.

पुढे, जिजाऊ साहेबांनी, शिवरायांनी आणि संभाजी महाराजांनी शतकभर इथल्या माणसांना स्वाभिमान आणि स्वातंत्र्य शिकवलं. वरच्या सगळ्या गोष्टी तशाच ठेऊन. म्हणूनच तर शिवशाहीत स्त्रियांना सन्मान होता. जाती पतींच्या पलीकडे प्रत्येकाला कर्तृत्वानुसार जागा होती, संधी होती. सोप्या भाषेत सांगायचे तर संत परंपरेने सांगितलेल्या संस्कृतीस राजाश्रय लाभले.


अजून पुढे, शाहू महाराजांनी इथे न्याय आणि समानतेची चळवळ अजून मजबूत केली आणि वंचित आणि संधीच्या परिघाबाहेर असलेल्यांना परिघात आणलं, आणण्याचे प्रयत्न केले. पुढे महात्मा फुल्यांनी, बाबासाहेबांनी या सगळ्या प्रयत्नांना सामाजिक आणि राजकीय आधार आधार दिला. अगदी बाबासाहेबांपर्यंत आपल्याला ज्ञानेश्वरांनी सुरु केलेल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीची नाळ जशास तशी दिसेल. या भूमीत भेदा-भेद आणि दांभिकतेचा विरोध ज्ञानेश्वर माउलींनी सुरु केला, जगतगुरूंनी प्रखर केला, छत्रपतींनी त्या विरोधाला राजकीय छत्र दिलं, शाहूंनी त्याला व्यापक केलं, फुल्यांनी पुन्हा वेगळ्या भाषेत ते लोकांपर्यंत नेलं आणि बाबासाहेबांनी पुन्हा त्याला आधुनिक जगात, बदलेल्या राजकीय व्यवस्थेत, जगतगुरु तुकाराम महाराजांसारखं प्रखर करून व्यवस्थेच्या तोंडावर मारलं! हि संस्कृतीची नाळ इथवर कायम होती म्हणूनच बाबासाहेबांच्या पहिल्या पाक्षिकाला (म्हणजे मॅगझीनला जे १९२० ला त्यांनी सुरु केले) तुकाराम महाराजांच्या विचारांची प्रेरणा होती. बाबासाहेबांनी जगतगुरु तुकाराम महाराजांच्या या ओळी मूकनायक या पाक्षिकाच्या नावासोबत अगदी वरती छापत.


काय करू आता धरुनिया भीड । निःशंक हे तोंड वाजविले ।।
नव्हे जगी कोणी मुकीयांचा जाण । सार्थक लाजोनी नव्हे हित ।।      








हीच आपली खरी संस्कृती!



आता आपण या संस्कृतीचे अजूनही खरंच पाईक आहोत कि भरकटलोत ?



आजूबाजूला जातीय द्वेषाच्या, म्हणजे जाती पाळणाऱ्या आणि द्वेषातून जातीअंत करू पाहणाऱ्या सवयी, चळवळी बघितल्या की हीच का आपली संस्कृती जी निपजण्यासाठी ८००-९०० वर्ष लागलीं? ज्ञानेश्वर माउली ते तुकारामांनी यासाठीच का घातला होता अट्टाहास या संस्कृतीच्या इमारतीचा ? असे प्रश्न पडतात.  ज्या कर्मकांडाच्या आणि जाचक रूढी-धर्माच्या बाहेर इथला समाज पडावा म्हणून माउलींनी अत्यंत हालअपेष्टा सहन केल्या, नामदेवांनी प्रबोधन केलं, तुकारामांनी तर सरळ सरळ युद्ध केलं, त्यातच पुन्हा आपण फसणार आहोत का? देवाला बाद करायला मुळीच सांगत नाहीये. पण आपण या संतांनी सांगितलेला निकोप मार्ग सोडून पर्यायाने आपली खरी संस्कृती सोडून आपण इतर मार्गांनी देव मिळवायचा प्रयत्न आपण करणार असूत, तर आपला धर्म आणि संस्कृती हायजॅक म्हणजे अपहरण केली जातीये याची जाणीव होऊ नये इतके निर्बुद् आपण आहोत का?



खरं तर जे (सत्ता पिपासू आणि धनलोभी लोक) आपल्याला नवा धर्म शिकवत आहेत तेच एका भयंकर मोठ्या अरिष्टात फसलेत आणि त्याची त्यांना कल्पनाही नाही. म्हणून हि संस्कृती वाचवायची असेल. ही म्हणजे वर आपण जिच्या बद्दल बोललो ती. तर आपल्याला सगळ्यांना - प्रत्येक मराठी म्हणून घेणारांना - पुन्हा ज्ञानेश्वर तुकाराम वर्तनात आणावे लागतील. त्यांच्या सांगितल्याचे नवे अर्थ लावावे लागतील आजच्या समाजानुसार. तेंव्हाच दीन म्हणजे दरिद्री होत जाणाऱ्या महाराष्ट्राचा नवा महाराष्ट्र दिन साजरा करण्यात खरा आनंद येईल!

जय महाराष्ट्र!     







No comments:

Post a Comment