Tuesday, February 28, 2012

लिहितांना थोड चुकल की ग्रामीण साहित्य आणि जास्त चुकला की दलित साहित्य

आज आमच्या एका इंग्रजीच्या प्राध्यापक मित्राला काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन झालेल्या दलित आणि ग्रामीण साहित्यातील शब्दांच्या खंडाच्या बद्दल बोललो. त्यावर त्यांनी हसत हसत फार छान अशी टेबलाच्या पलीकडची या दोन साहित्यांची डेफिनिशन सांगितली. म्हंटले 'लिहितांना थोड चुकल की ग्रामीण साहित्य आणि जास्त चुकला की दलित साहित्य'. मग कळाल साहित्य प्रकार दोन पण शब्दकोश एकच का ते!

अफूचे एजंट म्हणून पोलिसांना आणि अफू प्रोसेसिंग कारखान्यावर राजकारण्यांना ठेवल्यास

यंदा आपण ठरवलं गावाकड जाऊन थोडी शेती घेऊन १०० ते २०० एकर मध्ये सहकारी का होईना पद्धतीने शेती करायची. उसा फिसाच्या नदी लागायचच नाही. च्यायला कापूस त नगच. आता तुम्ही म्हणाल लावणार तरी काय हा. कॉलेज मध्ये एका मित्राच्या शेतकऱ्यांची मुले इंजीणर होवून काय करणार या प्रश्नावर  आम्ही हसत  म्हणायचो  १० एकर विन्डोज, २० एकर जावा वगेरे लावूत. पण आता विंडोज चे ही कापसासारखे मार्केट गेल्याने तो ही पर्याय उरला नाही आणि जावा वगैरे ओर्याकाल सारख्यांनी विकत घेतल्याने पेटंट वगैरे मध्ये  अडकवून केस करतील ही भीती. तशी केसेस ची आम्हाला भीती नाही इकडे म्हणजे भारत पोलीस वगैरे म्यानेज करता येतात. पण काल परवाच  शासनाने अफुच्या शेतीचा पर्याय आम्हाला डोक्यात आणून दिला. धन्यवाद. आणि अफू वगैरे सारखा प्रकार आम्ही शेतात घेतल्याने आमच्या वर केस वगैरे होईल पण त्याच अफूचे एजंट म्हणून पोलिसांना आणि अफू प्रोसेसिंग  कारखान्यावर राजकारण्यांना ठेवल्यास ती भीती नाही. आणि वर्षभर टीव्ह्यांवर जाहिराती दिल्यास अफूच काय पण दारूच्या बाटल्या जरी झाडाला पिकवल्या तरी त्याची बातमी येणार नाही, इव्हन सबसे तेज चानेल वर सुद्धा. आता बोला. तर मग भागीदारी वगेरे साठी तयार असाल तर कळवा. - आपलाच अफुवीर अफू न घेतलेला भावी शेतकरी (कारण ती अजून ही आम्हाला परवडत नाही)!

आणि समस्त समाजाला आणि टीव्ही वाहिन्यांना आम्हाला अफूची आयडीया दिल्याबद्दल शतशः आभार आणि सर्व अफुप्रेमींनी आमच्या शेतात होवून हुर्ड्या सारखा अफूचा आस्वाद घ्यावा हे आताच निमंत्रण. त्याला हुर्डा पार्टी वगैरे म्हणायचे कि नाही हा प्रश्न आम्हाला पडला. पण नाही. आताच आम्हाला एक जुनाच शब्द आठवला रेव्ह वगैरे असच काही तरी. कारण त्या आमच्या ही अफूची शेती करण्याच्या आधी पासूनच अस्तिवात आहेत, म्हणून याला नवीन संकल्पना वगैरे म्हणता येणार नाही. असो. सर्वांनी अफूचा आस्वाद घ्यावा. आणि आमच्या काही वर्षांच्या संशोधनावरून हे ही आम्हाला चांगलेच माहित आहे की अफूची फार मागणी आहे. कारण इकडे म्हणजे भारतात मतदान करतांना लोक एक तर अफू घेऊ येतात किंवा मग काही लोक अफू घेऊन घरी झोपून राहतात. तसेच मिडिया मध्ये जास्ती लोक पुस्तक, इतिहास वाचायच्या भानगडीत न पडता अफूचा पर्याय निवडून धाड धाड बोलतात. किती केले तरी आमची अफू विकली जाणार याची आम्हा खात्री. आमच्या नव्या व्यवसायाला शुभेच्छा द्या. आणि कुणी तरी आम्हाला त्या शोध पत्रकाराचा पत्ता द्या ज्याने अफू वगैरे महाराष्ट्रात पिकवली जाते हा शोध लावला आमचे पायतान फारच चोपडे झाले आहे.
जय महाराष्ट्र.

Sunday, February 19, 2012

होय, याच माती मध्ये युगपुरुष छत्रपती शिवराय जन्माला आलेसह्याद्रीच्या माथ्यावर वर्षानुवर्षे तळपणारा एक क्रांतीसूर्य ज्याने स्वातंत्र्य आणि स्वाभिमानाचा प्रकाश या मातीच्या प्रत्येक घरा- घरा पर्यंत पोचवला, गुलामगिरीचा अंधकार नष्ट करून सामान्य कष्टकर्यांच्या हातून स्वराज्य निर्माण केले. या महाराष्ट्राचा अभिमान, अस्मिता आणि ओळख म्हणजेच स्वराज्य संस्थापक, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज.
जगाच्या पाठीवर आपल्या अफाट बुद्धिमत्तेच्या आणि प्रचंड पराक्रमाच्या जोरावर ज्यांनी आपला ठसा उमटवला, क्षणाचीही उसंत न घेता उभं आयुष्य सामान्य रयतेसाठी खर्ची घालणारा, स्वराज्यातील प्रत्येकाच्या पोटात अन्न पडल्यावरच दोन घास खाणारा, सामान्यातल्या असामान्य शक्तीला ओळखून त्या शक्तीला जागं करणारा आणि त्या शक्तीचा स्वराज्य निर्मिती च्या कार्यात उपयोग करून घेणारा असा आमचा जाणता राजा.
जगाच्या इतिहासातील असे सोनेरी पान जिथून पुढे एक नवा अजरामर इतिहास निर्माण झाला, जो आजही लाखो करोडो लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवतो, घरा-घरांमध्ये प्रेरणास्तंभ म्हणून आमच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनलेला आहे. इथली माती आजही गर्वाने सांगते - "होय, याच माती मध्ये युगपुरुष छत्रपती शिवराय जन्माला आले!" आजही शिवरायांचे नाव घेताच आमचा उर भरून येतो. जय भवानी - जय शिवाजी ची आरोळी ऐकली तरी आमचे रक्त सळसळते, मनगटा मध्ये एक बळ प्राप्त होते आणि आयुष्या मध्ये काही तरी करून दाखवण्याची, काही तरी घडवण्याची प्रचंड उर्जा निर्माण होते. अशा शिव छत्रपतीचा याच दिवशी म्हणजे १९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरीवर जन्म झाला. या शिव जयंतीच्या तुम्हाला जिजाऊ.कॉम तर्फे खूप खूप शुभेच्छा.
शिवाजी महाराजांसारखा दीपस्थंभ या राष्ट्रातील अनेक पिढ्यांना प्रेरणा आणि प्रकाश देत आलेला आहे. तोच प्रकाश आणि प्रेरणा तुम्हाला, आम्हाला आणि येणाऱ्या पिढ्यांना ही नक्की पुरेल इतका अजून प्रखर आहे. जग किती ही बदलत असले तरी या न त्या प्रकारे शिवराय हे व्यक्तीमत्व अनेकांना अनेक क्षेत्रात प्रेरक ठरतच आहे. मग ती सामाजिक, राजकीय वा मग औद्योगिक चळवळ का असेना. एकीकडे जागतिकीकरणात बदलणारा समाज इतिहासाबद्दल उदासीन होत असतांना दुसरीकडे शिवाजी महाराजांच्या नावावर खूप मोठा तरुण वर्ग संघटीतही होत आहे. प्रश्न पडतो - असं का? किंवा मग हे दोन वेग वेगळे वर्ग का? एकीकडे 'उदासीनता' तर दुसरीकडे प्रचंड 'श्रद्धा'. आणि उदासीन वर्ग या श्रद्धाळू वर्गाकडे अशा रीतीने बघतो जस काय हे सगळे श्रद्धाळू प्रतीगामीच. कुठे तरी चुकतंय. प्रत्येक गोष्टीच उपयोग मूल्य काढण्याची सवय लागलेला समाज महापुरुषांच्या बाबतीतही 'यांची उपयोगिता काय?' हा प्रश्न करते. प्रश्न करणे अतिशय योग्य. पण उत्तरासाठी प्रयत्नाबद्दलही उदासीनता. असो.
नवा समाज निर्माण होत असतांना जो की आपल्याकडे आता फार गतीने होतोय. म्हणजे खेड्यांची शहरे होत असतांना आणि शहरांची महानगरे होत असतांना समाजाच नव-निर्माण होत असत. मूल्य बदलतात, संस्कृती बदलतात. अर्थार्जनाचे मार्ग बदलतात. काही प्रश्न सुटतात आणि अनेक नवे निर्माण होतात. आणि इथेच या नव्या प्रश्नांच्या उत्तरासाठी गरज असते ती तुमच्या ऐतिहासिक महापुरुषांची. त्यांच्या जीवनातून आणि कार्यातून आपोआप उत्तरे मिळत असतात. त्या उत्तरांच एक्झिक्युशन म्हणजे पुन्हा नव्या समाजाची निर्मिती. पण यासाठी मूलतः तो महापुरुष आपण शिकायला पाहिजे आणि समजून घ्यायला पाहिजे. आणि ही जबादारी प्रत्येक वेळी मुख्यतः समाजातील तरुण वर्गाची असते. ती आपण सर्वांनी या जयंतीच्या माध्यमातून पार पाडायला हवी. आणि काही अंशी महाराष्ट्रीय तरुण ती खूप चांगल्या प्रकारे पार पाडतही आहे.
प्रत्येकाच्या व्यक्तिगत आयुष्यात शिवरायांच्या चरित्राने खूप योग्य आणि अर्थ पूर्ण अशी दिशा मिळू शकते. शिवाजी महाराजांनी एक आदर्श मुलगा, आदर्श पती आणि आदर्श पिता म्हणून स्वतःला सिद्ध तर केलंच पण अवघ्या मुलुखाच पालकत्वही त्यांनी स्वीकारलं. रंजल्या गांजल्या जनतेच्या पाठीशी एक खंबीर आधार म्हणून उभे राहिले. ज्याचं जीवन म्हणजेच एक संघर्ष, पण या संघर्षातूनही त्यांनी एक असामान्य-अभूतपूर्व कार्य हाती घेतलं आणि प्रत्येकाला आपल वाटावं अस स्वराज्य निर्माण केल. आज आम्ही काय करतोय? एकविसाव्या शतकातील अतिशय वेगाने पुढे जाणारी आमची पिढी, आपल्या अमर्याद वेगाने धावतेय आणि फक्त धावतेय. या धावण्याला दिशा नाहीये. आज जीवनाचा अर्थ केवळ आणि केवळ "अर्थ" प्राप्तीतच उरला आहे असा समज वरचेवर वाढतच आहे. स्पर्धेच्या या जगात आपल्या आयुष्यातील सर्व काळ, सर्व क्षण हे आपण केवळ कुठलातरी संघर्ष करण्यातच घालवतो. म्हणजे अग्रेसिव्ह नव्हे तर डिफेन्सिव्ह खेळण्यात घालवतो. जीवनाच्या प्रत्येक पायरीवर संघर्ष हा अटळच. तो कुणीही नाकारूच शकत नाही. पण या संघर्षातून काहीच बाहेर पडत नसेल तर याला जगण्याची धडपड असेच म्हणतात; होय, 'केवळ जगण्याची धडपड'!आजकाल कुणाच्या ही आयुष्याकडे बघा. अख्ख आयुष्य फक्त धडपड करून शेवटी काय उरते? आणि काय देऊन जाता दुसऱ्याला? हेच लोक मोजतात. मग काय देऊन जाणार आपण येणाऱ्या पिढीला?.... स्वतःला चार भिंतींच्या आत कोंडून ठेवणारे आम्ही येणाऱ्या पिढीला त्याच 'चार भिंतीं शिवाय' काय देऊ शकणार? हाच का आपला वारसा, हाच का आपला इतिहास येणाऱ्या पिढ्यांसाठी 'चार भिंतींचा'? नाही. नक्कीच नाही.
वर्षानुवर्षे आमचा अखंड प्रेरणा स्त्रोत असणारे शिवराय हेच आम्हाला शिकवून जातात. त्यांनी ही आयुष्यभर संघर्ष केला. उभं आयुष्य फक्त घोड दौड. कधी विश्रांती नाही किंवा कधी कुठलाही राज विलास नाही. आयुष्यात होता फक्त संघर्ष. पण या संघर्षातूनही त्यांनी खूप काही घडवलं. जीवाला जीव देणारे मित्र कमावले. स्वदेश, स्वधर्म आणि स्वभाषेसाठी प्रंसगी मृत्यूलाही सामोरे जाणारे मावळे घडवले. शेकडो वर्षांची सामाजिक गुलामगिरी नष्ट करून सामान्य माणसाच्या खांद्यावर स्वराज्याची पताका दिली. आज ताठ मानेने आपण जे घराबाहेर पडतो ते त्या युग पुरुषामुळेच. तीनशे वर्ष झाली शिवराय आजही तुमच्या आमच्या मनामध्ये कायम आहेत आणि त्यांचे विचार हजारो वर्षे या मातीमध्ये कायम राहतील, हीच त्यांची कमाई. कदाचित असच काहीतरी आपल्या प्रत्येकाकडून या समाजाला अपेक्षित आहे.
आपल्याच सोनेरी इतिहासाला, संस्कृतीला जपणारे आजच्या काळात मागासलेले ठरवले जाऊ लागले आहेत. पाच्छिमात्य देशांची आणि त्यांच्या महापुरुषांची जवळीक बाळगणारे आधुनिक ठरवले जातात. इथे कुठल्याही प्रकारे कुठल्याही परकीय महापुरुषांचे महत्व कमी करण्याचा हेतू नाहीये, पण आज आमच्या घरांमधून आमच्याच महापुरुषांच्या छायाचित्रांची, पुस्तकांची जागा आज कशाने व्यापली आहे हे आपल्याला वेगळ सांगायची गरज नाही. प्रचंड विरोधाभास असणारी ही परिस्थिती अधिक बिकट बनत चालली आहे, शिवरायांना मनापासून मानणाऱ्या सर्वांवर ही एक फार मोठी जबाबदारी आहे.
नव्या समाजाला अनेक प्रश्न पडत आहेत आणि त्या प्रश्नांना आता भौगोलिक आणि राजकीय सीमा ही राहिल्या नाहीत. आणि आश्चर्य हे की आपल्याकडे जवळपास सगळ्या प्रश्नांची उत्तरे, होय नवे जरी असले तरी, शिव चरित्रात सापडतात, हा अनेकांचा अनुभव आहे. त्यामुळे शिवाजी महाराज या दीपस्थंभा समोर उभे राहा नक्कीच प्रकाशून निघाल.
येणाऱ्या काळाची संकटे ओळखून आपल्या इतिहासातील सर्वच महापुरुषांच्या चरित्राचे पुन्हा पारायण करायची वेळ आली आहे. आणि शिवाजी महाराजा हे त्यात अग्रणी हवेत. समस्त शिव भक्तांनी मिळून उचलाव असं हे फार मोठ्ठ शिवधनुष्य आहे.
पुन्हा एकदा सर्वांना शिव जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!जय शिवराय!
आपलेच
कार्यकर्ते
जिजाऊ.कॉम
www.jijau.com

Wednesday, February 15, 2012

होय! तुमचे एक मत बदल घडवू शकते.


माझ्या एका मताने काय फरक पडेल म्हणून आम्ही मतदानाला बाहेर पडत नाहीत पण या मुळे एक एक असे करून एकूणच सुशिक्षित लोकांची मतदानाची टक्केवारी घसरते आणि मग इतर मार्गाने मिळवलेल्या मतदानावरच निवडणुकांचे भवितव्य अवलंबून राहते. याला जबाबदार आपणच.
पैसे वाटून , दारू वाटून इतर आमिषे दाखवून करवून घेतलेल्या मतदानाचे उत्तर आपल्या सारख्या लोकांनीच द्यायचे असते.. ते इतर कोणीच रोकु ...शकत नाही.

कुठलाच उमेदवार चांगला नाही हि तक्रार सुद्धा नकोच .. कारण, एकदम परफेक्ट उम्मेद्वार सापडत नसला तरी हि त्यातल्या त्यात उत्तम उम्मेद्वाराला मतदान करणे हेच व्यवहार्य ठरते. आणि ह्याला कोणीच अपरिहार्यता म्हणू नये ह्याला सामाजिक व्यवहार्यता असे म्हणतात.

आपल्या समाजासाठी .. आपल्या विकासासाठी .. रोजच्या प्रश्नांवर उत्तरे शोधण्यासाठी .. आजचा थोडा वेळ काढा.. संविधानाने दिलेला सर्वोच्च अधिकार, मतदान.. त्याचा वापर करा.

जय हिंद .. जय भारत

Monday, February 13, 2012

आरोग्य सेवांचे खाजगीकरण - बैठक - १९ फेब्रुवारी २०१२ - मुंबई


खालील पत्र शेअर करत आहे. जमल्यास उपस्थित राहावे. 
----
प्रिय साथींनो,
        महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. राजेंद्र गावीत यांनी व काही अधिकारी यांनी मिळून खाजगीकरणाचा एक घाट घातला आहे. महाराष्ट्रातील 14 वैद्यकीय महाविद्यालयांमध्येसी.टी.स्कॅन व एम.आर.आय.च्या सुविधांचे खाजगीकरण करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. त्याच बरोबर वैद्यकीय महाविद्यालयांमधील प्रयोग शाळेतील तपासण्यांच्या सेवांचेही खाजगीकरण करायचा प्रयत्न चालू  आहे. 
       यात भर म्हणजे सार्वजनिक आरोग्य मंत्री श्री सुरेश शेट्टी यांनी देखील जिल्हा रुग्णालयांमधील सी.टी.स्कॅन व एम.आर.आय., सोनोग्राफी इ. सुविधांचे खाजगीकरणकरण्याचा घाट घातला आहे.
       सदरचे खाजगीकरण हे अनावश्यक, चुकीचे असून 'सर्वांसाठी आरोग्य सेवा' देण्याच्या शासनाच्या कर्तव्यापासून फारकत घेणारे आहे. अनेक ठिकाणाचा अनुभव सांगतो की अशा खाजगीकरणा मुळे गरीब व गरजू रुग्ण या ना त्या कारणामुळे आरोग्य सेवेपासून वंचित ठेवले जातात. अशा खाजगीकरणाला अर्थातच विरोध करायला हवा. खाजगीकरणाचा हा प्रस्ताव पुढे गेला असल्याने आपल्याला घाई करायला हवी. 
       सदर प्रशाची व्याप्ती आणि गांभीर्य पाहता आरोग्य क्षेत्रातील संस्था, संघटना, युनियन्स याच बरोबर या भूमिकेशी बांधिलकी असणाऱ्या इतर संघटना, युनियन्स इ.यांनी एकत्र येऊन राज्य पातळीवर व्यापक लढा देणे  गरजेचे आहे. त्या दृष्टीने आखणी करण्यासाठी जन आरोग्य अभियानाने पुढाकार घेउन एक बैठक दिनांक१९ फेब्रुवारी २०१२ रोजी (वेळ-सकाळी ११ ते २)  मुंबईत आयोजित केली आहे. 
       या बैठकीत पुढील मुद्द्यांवर चर्चा होण्याची अपेक्षा आहे.
  1. महाराष्ट्रातील आरोग्य सेवांचे होऊ घातलेले खाजगीकरण आणि त्याचे संभाव्य परिणाम 
  2. या खाजगीकरणाला होत असलेला विरोध आणि टीका 
  3. आरोग्य सेवांचे खाजगीकरण रोखले जावे म्हणून काय करता येईल? पुढील रणनीती काय असेल?
  4. सार्वजनिक आरोग्य सेवा सुधारण्यासाठी खाजगीकरणाशिवाय कोणते मार्ग उपलब्ध आहेत? 

बैठकीचे स्थळ - भूपेश गुप्ता भवन, तिसरा मजला,रवींद्र नाट्य मंदिर,
 सिद्धी विनायक मंदिराजवळ, ८५ सयानी रोड, प्रभादेवी, मुंबई- २५ 

दिनांक- १९ फेब्रुवारी २०१२, वेळ- ११.00 ते २.00 

वरील बैठकीनंतर जन आरोग्य अभियानाची अंतर्गत बैठक होईल.
तरी आपण या बैठकीत सहभागी व्हावे ही नम्र विनंती.  

आपल्या सहभागाच्या अपेक्षेत.....

आपला,
अभिजित मोरे 
जन आरोग्य अभियान, महाराष्ट्र राज्य

Wednesday, February 8, 2012

जिजाऊ जयंती वक्तृत्व आणि निबंध स्पर्धा : मानवत

१२ जानेवारी २०१२, राजमाता जिजाऊची, जिजाऊ साहेबांची जयंती. जिजाऊ साहेबांचे विचार नव्या पिढीने वाचावेत आणि समजून घ्यावेत या उद्देशाने जिजाऊ.कॉम ने मानवत, जिल्हा परभणी येथील भाले-पाटील विद्यालयात १२ जानेवारी रोजी जिजाऊ जयंती निमित्य वक्तृत्व आणि निबंध स्पर्धा आयोजित केली. या स्पर्धेच्या संकल्पनेची आणि संचालनाची मुख्य जबाबदारी जिजाऊ.कॉम चे आणि याच शाळेत अध्यापनाचे काम करणारे ज्ञानेश्वर रेंगे यांनी पार पाडली. शाळेतील प्रत्येक शिक्षकाचा ही यात मोलाचा वाटा आहे.
या शाळेतील ७०% हून ही अधिक विद्यार्थी जवळपासच्या खेड्यातून येतात. प्रत्येक गाव जवळपास ४ की.मी. पेक्षा जास्तच अंतरावर. येण्या जाण्याचे मुख्य साधन सायकल, असेल तर  एस.टी नसता मग बरेच जन पायी ही. अशी ही ग्रामीण शाळा. पण नवल करावे इतके तल्लख विद्यार्थी. वक्तृत्व स्पर्धेला ४७ विद्यार्थ्यांनी भाषणे केली आणि अवघा परिसर दुमदुमून टाकला. इतक्या प्रचंड प्रतिसादाचे स्वप्न ही आम्ही पहिले नव्हते. मग काय स्पर्धा दोन दिवस घ्यावी लागली. काही वक्ते आज आणि काही उद्या. काही हाताची घडी घालून तर काही हात वारे करत चिमुकले वक्ते धाड धाड बोलत होते. आणि आवाज फक्त मुलांचाच नव्हे तर चिमुकल्या मुलींचा ही आसमंत दुमदुमून सोडत होता. ह्याच उद्याच्या जिजाऊ आणि हेच उद्याचे शिवबा, हेच चित्र डोळ्या पुढे उभे राहिले. भाषेला ग्रामीण मातीचा गंध आणि रांगडेपणा पण विश्वाच्या कोण्याही प्रश्नावर बोलण्याची तयारी असलेला हा नवा भारतीय समाज पाहून आता विश्व विजय फार दूर नाही हेच वाटले. वक्तृत्व स्पर्धेचा विषय होता - "राजमाता जिजाऊ". तसाच प्रतिसाद निबंध स्पर्धेला ही. विषय ही  होतेच तसे बदलत्या आणि मागच्या समाजाचा ठाव घेणारे - आऊ जिजाऊ, स्त्री पुरुष समानता आणि आजच्या काळात आईची गरज, कर्तव्य आणि जबाबदारी. अगदी रुळलेल्या अक्षरातले निबंध प्रत्येक वाक्यातील विचार डोळ्याला विलोभून डोक्याला भांबावून सोडत होते. काही निबंध वाचतांना वाटले काय हे? - आणि फार विचार न करताच मन म्हंटले "ग्रामीण सोने अन अजून काय!"

या दोन्ही स्पर्धेतील सगळ्यात जास्त प्रभावित केलेल्या भाषणांना आणि निबंधांना पारितोषिके देण्यात आली. पण त्या प्रत्येक छोट्या विचारवंताला सलाम. २६ जानेवारी २०१२ रोजी या स्पर्धेचे पारितोषिक वितरण झाले. शाळेच्या स्वच्छ धुतलेल्या गणवेशातले विद्यार्थिनी आणि विद्यार्थी पाहून आम्हाला ही शाळेतील अशा प्रजासत्ताक आणि स्वातंत्र्य दिनाची आठवण झाली. दुसरे दिवाळी आणि दसराच हे राष्ट्रीय सण! या कार्यक्रमातच शिवनेरी मित्र मंडळ म्हणून एक संघटन प्रत्येक वर्षी शाळेत अनेक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करत असते. त्यांचे ही काम खरच खूप प्रशंसनीय. त्यांना जिजाऊ.कॉम तर्फे खूप धन्यवाद आणि अशा राष्ट्र निर्माणाच्या कार्यासाठी शुभेच्छा.

जिजाऊ.कॉम तर्फे विजेत्यांना प्रमाणपत्र आणि काही शालेय साहित्य बक्षीस देण्यात आले. तसेच शाळेच्या अशा उपक्रमातील हिर-हिरीच्या सहभागा बद्दल शाळेला ही धन्यवाद पत्र देण्यात आले. कार्यक्रमाला शाळेचे अध्यक्ष श्री. भाले-पाटील आवर्जून उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम यशस्वी होण्या साठी  मुख्याध्यापक श्री. सुनील दुमाने तसेच इतर शिक्षक आणि शिक्षिका यांनी प्रयत्न केले. श्री. रणजीत भाले, अंकुश टेंगसे, नागनाथ लहाने, अनिल कोकरे, गणेश अतकरे, संजय जगताप, आनंद नांदगावकर, प्रकाश रासवे, रणवीर भाले, किसन भिसे, राहुल खंदारे, नंदकुमार नरवडे, बालाजी सोळंके, श्रीमती. के. बी. राठोड, अंजना कटारे, एन. व्ही. शेख, एम. डी. मडके आणि एम. आर. गाडे या सर्वांचे सहकार्यासाठी विशेष आभार. तसेच के के एम महाविद्यालयातील प्राध्यापक श्री. गुलाब शेख यांनी निबंध स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून खूप मोठी काम गिरी केली, त्यांचे ही खूप आभार.

या सर्वांच्या अशा  विचार घडवणाऱ्या उपक्रमांना आणि शैक्षणिक चळवळीला जिजाऊ.कॉम च्या हार्दिक शुभेच्छा!


आता फक्त"मुख्यमंत्री" !

आज "मुख्यमंत्री - कार्यकर्ता" च्या वाटचाली मधले अजून एक महत्वाचे पाउल पडले, गेल्या अनेक वर्षांची असलेली blogspot (http://mukhyamantri.blogspot.com) सोबत असलेली आमची युती सोडून आम्ही आता पूर्ण बहुमताने "मुख्यमंत्री" (www.mukhyamantri.com) झालोत.

हे शक्य झाले ते केवळ आपल्या सारख्या सामाजिक - राजकीय - ऐतिहासिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या जिवंत कार्यकर्त्या मुळेच, सबंध राज्यातूनच नव्हे तर देशातून मुख्यमंत्री ब्लॉग ला लाभलेली वाचक संख्या दिवसोन्दिवस वाढतच चालली आहे.. ती अशीच वाढत राहो तुमची साथ आम्हाला लाभत राहो आणि आमच्या हातून या महाराष्ट्राच्या वैचारिक जडण घडणीच्या कार्यात आणखी कणभर वाढच होवो.

मागची पिढी हि वर्तमान पत्र वाचून घडली आणि येणारी पिढी हि इंटरनेट विश्वात ब्लॉग / फोरम वाचून स्वतःला घडवणार आहे त्यामुळे येणाऱ्या पिढी साठी "मुख्यमंत्री" हे आणखी एक पुढचे पाउल.

या पुढे मुख्यमंत्री हा ब्लॉग (http://mukhyamantri.blogspot.com) केवळ मुख्यमंत्री.कॉम (www.mukhyamantri.com) या यु आर एल ने देखील आपणा सर्वांना बघता येईल.

धन्यवाद.

अमोल सुरोशे आणि प्रकाश पिंपळे

Sunday, February 5, 2012

मराठी साहित्य संमेलन

वसंत डहाके यांच्या अध्यक्षतेखाली चन्द्रपूर येथे ३ फेब्रुवारी ला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य नगरीत मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात झाली आणि पुन्हा जुने दिवस आठवले. ७१ वे कि ७२ सहुत्या संमेलन असेल, विजया राजाध्यक्ष या अध्यक्ष होत्या आणि त्या वेळ पासून साहित्य संमेलन फॉलो करायचा चांद लागला. निवडणुकीचे निकाल जसे ७२ तास डीडी वर यायचे तसे साहित्य संमेलनांचे अध्यक्षीय भाषण वाटायचे एक कार्यक्रम खूप मोठ्ठा आणि लांबच लांब. मग तेंव्हा काळात फार नव्हते पण मग ती भाषणे टीव्ही वर ऐकत चीड-बीड-चीड-बीड अक्षरात लिहून घेत होतो. बराच काही सुटायचं पण एकंदर अध्यक्ष काय म्हंटले याचा अंदाज वाचल्यावर यायचा. असो. ती कागदे खूप वर्षे जपून ठेवली होती, घरच्यांनी मागे आमच्या अनेक साहित्य कृतीं सहित रद्दीत घातली असं दोन चार वर्षां पूर्वी कळाल. असो. असा आमचा साहित्यिक म्हणून प्रवास कुठे तरी प्रकाशकाच्या कार्यालयात जाऊन 'सुरु' व्हायच्या ऎवजी दुकानीत साखर-शेंगदाणे यांच्या पुड्या बांधण्यासाठी होवून 'संपला'. ते ही असो, बारा झाल एकदाचा.
आता थोडा थांबतो. काही मित्र आले आहेत. नुसता साहित्य काय कामच. त्याला जीवनाचा गंध असावा. असं म्हणणारे ग्रेस यांचे खालील भाषण ऐका तोपर्यंत....!     

Friday, February 3, 2012

ग्रेस यांचे मराठी साहित्य संमेलनातील भाषण

ई- साहित्य संमेलन. अध्यक्ष ग्रेस हे या अध्यक्षीय भाषणात अनेक विषयांवर बोलतात. ज्ञानेश्वर, जातीव्यवस्था, भाषा आणि राष्ट्र अशा अनेक विषयांना ते हात घालतात. 
नक्की ऐकावे.