Sunday, June 26, 2022

आपल्या पूर्वजांचे, महापुरुषांचे विचार जेवढे होते तेच म्हणजे विश्व


शाहू महाराजांची आज जयंती. त्यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. राजा असूनही सामान्यांच्या खऱ्या प्रश्नाची आणि स्थितीची जान असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे ते वारस खरे शोभले. शिवाजी महाराजांनी ज्या लोककल्याणकारी राज्याची इमारत बांधली तिला फक्त शाबूत न ठेवता शाहू महाराजांनी तिच्यावर समानतेचे आणि प्रगतीचे अनेक मजले बांधले. एका अर्थाने शिवाजी महाराजांनी जे केलं त्याच्या कक्षा शाहू महाराजांनी विस्तारल्या. 

यातून एक खूप मोठ्ठं तत्व आपल्याला शिकण्यासारखं आहे. आपल्या पूर्वजांचे, महापुरुषांचे विचार जेवढे होते तेच म्हणजे विश्व, किंवा त्या पलीकडे अजून काहीच करता येणार नाही, किंवा असं काही असतं तर त्यांनी नक्कीच केलं असतं, या सगळ्या समजूती चूक आहेत. त्यांनी त्यांना त्या वेळी, त्या काळी, त्या परिस्थितीत जितकं बेस्ट करता येईल ते केलेले असते. म्हणूनच तर त्यांचं काम आणि ते अजूनही आपल्या स्मरणात आहेत. 

म्हणून, शिवाजी महाराज असोत किंवा अगदी बाबासाहेब त्यांच्या कामांच्या कक्षा आपण रुंद करायाच्यात. त्यांच्या अनेक विचारांना आजच्या परिस्थितीत आपल्याला कदाचित नाकारावे ही लागेल. त्यात त्यांचा अपमान मुळीच नसतो. त्यांनी ज्या स्पिरीट ने ते विचार तेंव्हा त्यांनी मांडले, त्या प्रकारचे निर्णय घेतले, कामं केली तो स्पिरीट जर इंटॅक्ट असेल तर ती त्यांच्या विचारांशी कसलीही प्रतारणा नाही. 🙏