Tuesday, August 26, 2008

हे राज्य मराठ्यांचे नव्हे, मराठी माणसांचे असेल

हे राज्य मराठ्यांचे नव्हे, मराठी माणसांचे असेल, असे विधान राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राचा मंगलकलश आणताना केले होते. चव्हाण हे मराठा होते. तरीही हे राज्य केवळ मराठ्यांचे असणार नाही व ते तमाम मराठी माणसांचे असेल, असे त्यांनी सांगितले होते. हे मराठा समाजाने कायमचे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. या मराठी माणसांतही महात्मा फुले यांच्या बहुजन समाजाच्या व्याख्येनुसार जो रंजला गांजलेला समाज आहे त्याच्या सर्वंकष कल्याणाला त्यांनी प्राधान्य दिले होते.

महाराष्ट्रात मराठ्यांची संख्या किती किंवा कोणत्या जातीची संख्या किती हे ठामपणाने सांगता येत नाही. कारण १९३१ नंतर जातीनिहाय खानेसुमारी झालेली नाही. तरीही महाराष्ट्रात कोणत्याही जातीपेक्षा मराठा जातीचे संख्याबळ अधिक आहे, ही वस्तुस्थिती आहे. मराठा ही जात अथवा जातसमूह शेती आणि सैन्य यांच्याशी संबंधित होती. पंचकुळी, शहाण्णवकुळी हे घटक वतनाशी संबंधित होते तर वतनाशी संबंधित नसलेले पण शेती करणारे कुणबी किंवा कुळवाडी यांचाही समावेश मराठ्यांत केला जात असल्याने समाजशास्त्रीयदृष्ट्या मराठा जातीला जातसमूह म्हणजेच क्लस्टर ऑफ कास्ट असेही मानतात. लग्नाच्या बाबतीत पदर लागतो का हे पूर्वी पाहिले जात असे, काही प्रमाणात आजही पाहतात. पण कोण कोणत्या पदावर, हुद्यावर, किती मालदार, किती शिकला, काय करतो याला हल्ली पदरापेक्षा अधिक महत्त्व दिले जाते. त्यामुळे पंचकुळी, शहाण्णवकुळी आणि शेतीशी संबंधित असलेले इतर मराठा यांच्यात हल्ली विवाहसंबंधही होतात. अनुलोमच नव्हे तर प्रतिलोमही. पंचकुळी व शहाण्णव-कुळीचा सुंभ जळाला आहे, पण पीळ थोडाफार कायम आहे, विशेषत: पंचकुळीत. पण काळाच्या ओघात मराठा नावाचा जातसमूह आता जात या संकल्पनेत समाविष्ट झाला आहे. पूर्वी ज्यांना मराठा न्हावी, मराठा परीट आणि निव्वळ कुणबी म्हटले जायचे, या जाती मराठा जातीपासून वेगळ्या झाल्या. त्यांना मराठा समाजाने स्वीकारले नसावे. या जाती मराठा जातसमूहापासून काही अंतरावर होत्या. कालांतराने या जातींचा समावेश इतर मागास समाजात झाला.

मराठ्यांचे संख्याबळ जास्त असले तरी वतनदार वगळता शेती आणि सैन्याशी संबंधित असलेला बाकीचा समाज हा दारिद्यातच होता. अख्ख्या बहुजन समाजालाच शिक्षणाचा गंध नव्हता. त्यामुळे एकोणिसाव्या शतकात अनेकांनी शिक्षण प्रसाराच्या चळवळीत झोकून दिले. बहुजन समाजाची शिक्षण घेण्याची ऐपत नव्हती. जातीचे अडथळेही होते. त्यामुळे जातवार बोर्डिंग सुरू करण्यात आली. शिष्यवृत्त्या देण्यात आल्या. गरीब ब्राह्मण शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी माधुकरीची पद्धत होती. तशी इतर समाजात तरतूद नव्हती. पण ब्राह्माण समाजातील हा आदर्श पुढे काही वतनदार मराठ्यांनी घेतला. तेही गरीब बहुजन समाजातील होतकरू विद्यार्थ्यांना आपल्याकडे शिक्षणाला ठेवून घ्यायला लागले. शाहू महाराज, डॉ. आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी भगीरथ प्रयत्नांनी शिक्षणाची गंगाच महाराष्ट्रात आणली म्हणून बहुजन समाजाला शिक्षणाचा परिसस्पर्श झाला. तिथूनच बहुजन समाजाच्या भौतिक प्रगतीची घोडदौड सुरू झाली.

यशवंतराव चव्हाणांनी सत्तेच्या माध्यमातून बहुजन समाजाला आपल्या पायावर उभे करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मराठेच नव्हे तर बहुजनांतील प्रत्येक दीनदुबळ्या समाजाला सत्तेत सहभागी करून घेण्याचे धोरण घेतले. म्हणून साता-यासारख्या मराठ्यांच्या बालेकिल्ल्यातही परीट, न्हावी अशा इतर मागास समाजातील कार्यकर्त्यांना तिकीट देऊन सत्तेत सहभागी करून घेतले. प्रतिष्ठा दिली. बळ दिले. त्यासाठी पंचकुळीच्या अहंकाराचीही त्यांनी तमा केली नाही. उलट अशांना त्यांनी खड्यासारखे राजकारणातून बाजूला केले आणि हे ख-या अर्थाने बहुजन समाजाचे राज्य आहे, हे जगाला दाखवून दिले. त्याच यशवंतरावांना तथाकथित कुलीन मराठ्यांनी खाजगीत हीनकुळाचे ठरवायलाही कमी केले नव्हते. पण यशवंतरावांनी त्यांना भीक घातली नाही. कुणबी असो की परीट, न्हावी असो की भंडारी, माळी, बौद्ध, मातंग अशा अठरापगड घटकांची मोट बांधली. फुल्यांच्या संकल्पनेतील बहुजन समाजाची एकजूट घडवून त्यांनी या समाजाला ताठ मानेने उभे केले.

बहुजन समाजात मराठ्यांचे संख्याबळ जास्त आहे. त्यामुळे शिक्षणाचे, प्रगतीचे, बदलाचे, विकासाचे आणि राजकारणाचेही सर्वाधिक फायदे या समाजाला मिळाले. त्यामुळे सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठा या समाजाला मिळाली. तीही बहुजन समाजातील इतर घटकापेक्षा अधिक. तालुका पंचायतीपासून जिल्हा परिषदा, नगरपालिका, महापालिका, विधिमंडळ, संसद व सत्तेत सगळ्या पातळ्यांवर या समाजाला कोणाहीपेक्षा कितीतरी जास्त प्रतिनिधित्व आहे. नोकऱ्यांतील प्रमाण कोणाहीपेक्षा जास्त आहे. पण राजकारण आणि सत्ताकारणाच्या पलीकडेही शिक्षणक्षेत्रात, कारखानदारीत, उच्चशिक्षणात, प्रशासकीय सेवेत, लष्करात, तंत्रज्ञानात, ज्ञानविज्ञानाच्या क्षेत्रात, संशोधनात, देशात आणि देशाबाहेरही विविध क्षेत्रांत मराठा समाज कर्तृत्वाच्या जोरावर ताठ मानेने उभा आहे. हे फुले-शाहूंपासून यशवंतरावांपर्यंत झालेल्या प्रयत्नांचे फलित आहे.

पण दुर्दैवाची गोष्ट अशी की राजकारणाशी संबंधित असलेल्या बहुतेक मराठ्यांनी हे आदर्श कधीच झुगारून दिलेले आहेत. गुणवत्तेच्या बुद्धिभेदावर राजकीय फायदे उपटण्याचा प्रकार प्रथम यांनीच सुरू केला. आर्थिक निकषावर राखीव जागांची मागणी करीत बहुजन समाजात फूट पाडली आणि जात व धर्मावर आधारलेले फॅसिस्ट तत्त्वज्ञान गावागावात नेले. गरीब आणि बेरोजगार मराठ्यांची माथी भडकावून दीनदलित दुबळ्या समाजाला लक्ष्य केले. सहकार व राजकारणातील मराठ्यांनी तर बहुजन समाजातील इतर घटकांचे हक्क नाकारून कुटुंब आणि गोतावळ्याच्या दावणीलाच सगळी सत्ता बांधली आहे.

गरिबी, अशिक्षितपणा सगळ्या समाजात आहे. मराठा समाजाने मोठी प्रगती केलेली असली तरी मराठ्यांमध्ये गरिबांचे प्रमाण मोठे आहे. पण आजही जातीच्या उतरंडीप्रमाणे आपण खालीखाली गेलो तर दारिद्य, अशिक्षितपणा याचे अधिकाधिक विदारक चित्र दिसते. अख्ख्या जातीत एखादा टक्का सुस्थितीत दिसतो. भटके-विमुक्त-आदिवासींत एखादाच सुशिक्षित व सुस्थितीत आढळतो. बहुजन समाजाच्या तळाशी जसजसे जाऊ तसतसे दारिद्याचे चित्र गडद होत जाते. याकडे आता कुणीही लक्ष द्यायला तयार नाही.

उलट आपल्यातील गरिबीचे भांडवल करून सत्ता-संपत्ती-प्रतिष्ठेला मुकलेल्या घटकांचे हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. मराठा समाजातील कुणबी समजाचा आणि त्यांचा ओबीसीत समावेश करा, अशी मागणी केली जात आहे. दडपण आणण्यासाठी हिंसक मार्ग अवलंबिले जात आहेत. खरे म्हणजे महाराष्ट्रात अभिजन ब्राह्मण वगळता उरलेले बहुजन शूद्रातिशूद्र होते. क्षत्रिय होते की नव्हते याबद्दल वाद आहेत. पण ब्राह्मण पुरोहितशाहीच्या नादी लागून मराठ्यांनी क्षत्रियत्वाचे दावे केले, ही वस्तुस्थिती आहे. आज तेच मराठे आम्हाला कुणबी समजा आणि ओबीसीत समावेश करा, अशी दुटप्पी मागणी करू लागले आहेत. यामुळे तमाम मराठी समाजामध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सत्तासंपत्तीच्या केंद्रीकरणामुळे इतर सगळ्या समाजांत मराठ्यांविषयी तिटका-याची भावना वाढत आहे. अशावेळी काहीजणांनी गरीब मराठ्यांना भडकावण्याचे उद्योग सुरू केले आहेत. त्यांना मराठा धनदांडग्यांशी लढवण्याऐवजी गरिबांच्या पंगतीतील पत्रावळ्या ओढण्यास प्रवृत्त केले जात आहे. त्यातून उद्या गरीब मराठ्यांचे कल्याण होण्याऐवजी अख्ख्या बहुजन समाजातच अराजक माजणार आहे. एका बाजूला शिवाजी महाराजांचे, शाहूंचे नाव घ्यायचे आणि दीनदलितांच्या घरावर गाढवाचा नांगर फिरवायचा, ही या प्रभृतींची बदनामीच आहे. त्यापेक्षा छत्रपती शिवाजी, शाहू आणि यशवंतराव हे आमचे कोणी लागत नाहीत, इतके तरी जाहीर करा. तेवढेच त्यांच्यावर उपकार होतील.

from: http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3405394.cms