Sunday, May 27, 2012

ग्रामीण भागातील शाळांमध्ये हुशार आणि गरजू विद्यर्थ्यांना आर्थिक साहाय्य


नव्या शैक्षणिक वर्षात काही ग्रामीण भागातील शाळांमध्ये हुशार आणि गरजू विद्यर्थ्यांना आर्थिक साहाय्य करण्याचा मानस आहे. काही आर्थिक मदत करण्याची इच्छा असल्यास माहिती द्या
आपल्याशी संपर्क करण्यात येईल.
For more Information please visit : http://jijau.com/?q=node/48

बेगडी चाळवली वाल्यांना विनंती


मित्रहो, कुणी ही कुणाच्या धार्मिक भावना दुखवू नये. जाती विरहित समाज निर्मिती हे आपण सर्वांच एक उदिष्ट आहे. कुणा एका जातीला टार्गेट करून जातीवाद जाणार नसतो आणि जाणार ही नाही. आता कुणाला काय कंटेंट टाकू द्यायचे आणि काय नाही यावर बंधन घालणे मला व्यक्तिगत पटत नाही. कुणाचे काही विचार असतील तर त्या विचारांना विचारांनी उत्तर देऊन किंवा त्याच पद्धतीने उत्तर देवून त्याचा विचार बदलण्याचा प्रयातना करावा, किंवा मग कुणी झोपेचे सोंग घेतल्यास मग त्याकडे दुर्लक्षच करावे. पण एकाद्या राग प्रश्न विचारू नका आणि मांडू नका असा म्हणून कधीच शांत होणार नसतो. तो आज नाही तर उद्या आणि इथे नाही तर अजून कुठे बाहेर पडणारच आहे. तरी एक स्पष्ट करतो जिजाऊ.कॉम हे कुण्या ही जातीय वा धार्मिक संघटनेशी संबंधित नसून, कुण्याही जातीचा द्वेष करणे वा कुण्याही धर्माचा द्वेष करणे या यास लाजीवनी बाबा मानते. अजून थोडा स्पष्टच बोलतो. सध्या काही एका विशिष्ट जातीला. जाऊद्या ना सरळच बोलतो, ब्राम्हणांना शिव्या घालण्यात अग्रेसर म्हणजे काही मराठे आहेत. नीट पहिला तर एकेकाळी ब्राम्हण जातीव्यवस्थेचे मार्गदर्शक होते आणि त्याच व्यवस्थेचे संरक्षक महाराष्ट्रात मराठे होते. आजही जातीय तंट्यात गोर गरिबांची घरे जाळण्यात आणि त्यांच्या लेकी बळींना अपमानित करण्यात महराष्ट्रात तरी अग्रेसर मराठेच आहेत. ज्या प्रकारे आरएसएस १०० ठीक चांगले काम करेल पण एकाद्या गावात जावून दलितांना मंदिरात प्रवेश करवून द्यावा (काढ्याने तो कधीच दिलेला आहे, पण समाजाने दिल्या का नाही ते बघा एकदा) किंवा त्या पेक्षा ही चांगले ग्राम व्यवस्थेत त्यांना मनाची पदे देवून अंतर जातीय विवाहाची चळवळ निर्माण करावी. ते नाहीच जमले तर कमीत कमी कधी जातीय भांडणे झालीच एकाद्या गावात तर गायब तरी राहू नये, असे कधी ही करत नाही. कमीत कमी मला किंवा माझ्या अनेक मित्रांना तरी दिसलेली नाही. तसेच या नव्या जातीय संघटनांचे. अनेक ठिकाणी मराठा समाजातील लोक जातोय द्वेषातून भांडणे करतात आणि तिथे या संघटना पब्लिकली समजवून सांगायला कधी जाणार नाहीत किंवा जात ही नाहीत. जातीविरहित समाज फक्त पुस्तकात सांगून तयार होताच नसतो आणि होणार ही नाही.
त्यामुळे बेगडी जातीय विरहित समाजाचे नेतृत्व आहोत असे दाखवून पुन्हा नव्या पाटीलक्या आणि देशमुख्या बळकावण्या पलीकडे अनेकांच इतर काही उदेश्य दिसत नाही. अशा हे बेगडी चाळवली वाल्यांना कळकळीची विनंती राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी किंवा मग संभाजी महाराजाच्या नावाने तरी ही सगळी कामे करून नयेत. बाकी समाज सुज्ञ आहे.
जय जिजाऊ!
www.jijau.com

 
  

Wednesday, May 16, 2012

प्रत्येकाने पहावा असा एक चित्रपट : डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

Tuesday, May 15, 2012

विधानसभा : काऊन्ट डाऊन सुरु करा

आजकाल नेते फारच पूजले जातायेत. नेत्यांची शेंबडी पोर पण 'साहेब' म्हणून बोलावली जातायेत. मोफतच्या कार्यकर्त्यांच्या जीवावर मग पुन्हा समाजच्या आणि नागरिकांच्या मानगुटीवर बसायला तयार. आणि 'झंड' समाज सगळच 'झंड' असून असल्या 'घमंडी' नेत्यांच्या मागे उभा राहतो किंवा मग घरी तरी झोपतो, आप आपापल्या नेचर प्रमाणे खाली किंवा वर. मग पुन्हा पुढली काही वर्षे त्यांच्या समोर मना खाली घालून चालणे आलेच, ते ही स्वतःच्या चुकीमुळे म्हणा किंवा मग हलगर्जी पणामुळे म्हणा. 
इथून पुढे अस नको असेल तर येणाऱ्या निवडणुकात लायक, प्रामाणिक आणि स्वच्छ लोकांनाच निवडून द्या. आत्ता पासूनच शोधायल लागा आशी लोक अपक्ष, पक्ष कशी ही चालतील. प्रामाणिक कार्यकर्त्यांनी नेत्यांची धुनी-भांडी आणि चाटाया उचलायचा सोडून बंडाचे बिनधास्त निशाण उचलावे. या वेळेस जनता नक्कीच पाठीशी उभी राहील. कुणाला मदत लागल्यास मुख्यमंत्री.कॉम सदैव तयार आहे मदतीला.  
काऊन्ट डाऊन सुरु करा!
जय जिजाऊ. जय शिवराय.
जय महाराष्ट्र!

[मुख्यमंत्री.कॉम ला प्रामाणिक नेत्यांबद्दल/कार्यकर्त्यांन बद्दल छापायला आवडेल]

संसदीय लोकशाहीची वाटचाल

संसदेच्या ६० वर्षांच्या इतिहासाचे सिंहावलोकन १३ मे रोजी संसदेच्या विशेष अधिवेशनात झाले. भारतात लोकशाही रुजली हीच ६० वर्षांतील मोठी उपलब्धी आहे, असे यावेळी सर्व वक्त्यांनी सांगितले. पण कारभाराची गुणवत्ता घसरलेली आहे. हे असेच होईल, असे भाकीत खुद्द पंडित नेहरू यांनी केले होते. दुर्दैवाने ते खरे ठरले.. भारतात लोकशाही टिकली, लोकांचे मूलभूत हक्क कायम राहिले, भारताची आर्थिक स्थितीही सुधारली, पण लोकशाही राज्य व्यवस्थेची गुणवत्ता सुधारली का? कार्यक्षम, गुणवान राज्य कारभार लोकांना मिळतो का? लोकांच्या आशाआकांक्षांचे प्रतिबिंब संसदेच्या कारभारात पडते का? या प्रश्नांचे उत्तर दुर्दैवाने नाही, असेच द्यावे लागते. आश्चर्य याचे वाटते की भारतीय लोकशाहीची गुणवत्ता ढासळेल अशी शंका स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांना व विचारवंतांना होती. काय होऊ शकते याचे भाकीत त्यांनी केले होते. पण तसे होऊ नये, म्हणून काय करावे हे त्यांना सांगता आले नाही वा खबरदारीही घेता आली नाही. ‘इकॉनॉमिक वीकली’च्या जुलै ५८च्या अंकातील ‘नेहरूंनंतर’ हा लेख गाजला होता. नेहरूंची कारकीर्द पूर्ण भरात असताना, बुद्धिवंतांपासून सामान्य जनतेपर्यंत सर्वावर त्यांचे अधिराज्य असताना नेहरूंनंतर काय होईल हे सांगण्याचा आगाऊपणा या लेखात करण्यात आला. लेखाचा लेखक अद्याप अनामिक राहिला आहे. मात्र तो द्रष्टा असावा. भारतीय लोकशाही कोणत्या मार्गाने जाईल याबद्दलचे त्याचे निदान अचूक म्हणावे असे आहे. तो म्हणतो..
‘टिळक, गांधी आणि नेहरू यांची वारसदार म्हणून काँग्रेसला मिळालेल्या प्रतिष्ठेमुळे सुरुवातीच्या काही वर्षांत निरोगी विरोधी पक्ष तयारच होणार नाही. नंतरच्या काळात जेव्हा लोकांमध्ये नव्या पिढीतील नेत्यांबद्दल असंतोष वाढायला लागेल तेव्हा केवळ स्वसंरक्षणाचे उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून हे नेते जात, धर्म आणि प्रादेशिक हितसंबंधांच्या आधाराने मते मिळविण्याचा आणि शेवटी मतदानात गडबड करून निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करतील. काँग्रेसला पैशाचा मोह टाळणे कठीण होईल. मिश्र अर्थव्यवस्थेत व्यापारीकरण व समाजवाद यातील रेषा धूसर होतील. त्यामुळे शासनावर नियंत्रण ठेवणाऱ्याला चमकदार लाभ मिळत राहतील. व्यवसाय, उद्योग व नोकरवर्गाला हा लाभ मिळून पैशाचा लोभ वाढतच जाईल आणि आर्थिक हितसंबंध कार्यकर्त्यांवर कब्जा करतील. जातीय, धार्मिक व प्रादेशिक गटांमुळे प्रथम राज्यातील आणि मग केंद्रातील शासन यंत्रणा खिळखिळी होईल. प्रत्येक राजकीय पक्ष देशभक्ती सिद्ध करण्याच्या स्पर्धेत उतरेल. देश फुटण्याची चिंता व्यक्त करून काँग्रेस मते खेचून घेण्याची धडपड करील, तर जनसंघ (आजचा भाजप) पाकिस्तानची भीती दाखवेल आणि कम्युनिस्ट पक्ष अमेरिकी साम्राज्यवादाला होणाऱ्या विरोधाचा आधार घेईल..’
आपल्या आजच्या परिस्थितीचे इतके चपखल वर्णन अन्य कुठे मिळेल?
त्याआधी १९५७च्या जानेवारीत कोलकात्यात भरलेल्या सायन्स काँग्रेसमध्ये प्रख्यात मानववंश शास्त्रज्ञ एम एन श्रीनिवास म्हणाले, ‘जात हा कसा शक्तिशाली घटक बनला आहे याचे पुरावे सादर करतो. ब्रिटिश येण्यापूर्वी जातीला इतके महत्त्व नव्हते. प्रौढ मतदान व मागासवर्गीय गटांना संरक्षण दिल्यानंतर जातींची ताकद चांगलीच वाढली. वर्ग व जातीविरहित समाज निर्माण करणे हे आपले उद्दिष्ट आहे, पण नेमके त्याविरुद्ध घडून जात हा प्रबळ घटक बनला आहे. जातीविरहित समाजनिर्मितीसाठी संविधान शपथबद्ध असले तरी जशीजशी राजकीय सत्ता जनतेच्या हातात जाण्यास प्रारंभ झाला तशी जातीजातीतील सत्ताकांक्षा व क्रियाशीलता वाढू लागली. जात हा सामाजिक क्रियाशीलतेचा प्रमुख घटक बनला’
दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पूर्वी श्रीनिवासन यांनी हे भाषण केले. त्यावर तीव्र टीका झाली व भारतातील शहाणा मतदार जातीचे राजकारण झुगारून देईल, अशी ग्वाही सर्व वृत्तपत्रांनी दिली. परंतु, पुढील प्रत्येक निवडणुकीत श्रीनिवासनांची अटकळ खरी ठरत गेली.
खुद्द पंडित नेहरूंना काय वाटत होते? भारतात संसदीय लोकशाही स्थिर करण्याचे श्रेय नेहरूंच्या १८वर्षांच्या कारकीर्दीस जाते. altक्षमता व परिस्थितीची अनुकूलता असूनही हुकूमशहा होण्याचे कधी त्यांच्या मनातही आले नाही. उलट भारताला पुरोगामी वळण देणे व संसदीय संकेत रुजविणे याला त्यांनी प्राधान्य दिले. लोकसभेची पहिली निवडणूक ५२ साली झाली व त्यासाठी नेहरूंनी धुवाधार प्रचार केला. प्रचार सुरू असतानाच डिसेंबर ५१ मध्ये युनेस्कोच्या चर्चासत्रात, लोकशाहीच सर्वोत्तम शासन देऊ शकते हे मान्य करताना ते म्हणाले, ‘मात्र प्रौढ मतदानाच्या आधुनिक पद्धतीतून निवडल्या जाणाऱ्या प्रतिनिधींची गुणवत्ता हळूहळू घसरत जाते. त्यांच्याकडे ज्ञानाची कमतरता असते आणि प्रचाराचा आवाज प्रचंड असतो. मतदार त्या आवाजाला प्रतिसाद देतो. यातून एकतर हुकूमशहा निर्माण होतात वा निर्बुद्ध राजकारणी. असे राजकारणी कितीही दलदल माजली तरी तग धरतात आणि पुन्हा पुन्हा निवडून येतात. कारण बाकीचे खाली पडलेले असतात..’
भारतीय लोकशाहीची गुणवत्ता काय दर्जाची आहे, याचा वेध पहिल्याच प्रचारात नेहरूंना आला होता. षष्टय़ब्दीनिमित्त रविवारी झालेल्या विशेष अधिवेशनात अनेक सदस्यांनी सध्या खासदारांवर होत असलेल्या टीकेचा उल्लेख करून नाराजी प्रगट केली. मात्र लोकांनी टीका करावी अशी परिस्थिती येईल असे भाकीत नेहरूंनी लोकसभेच्या जन्माच्या वेळीच केले होते, याची आठवण कुणालाही नव्हती.
नेहरू हुकूमशहा झाले नाहीत. त्यांच्यासारखा बुद्धिवान व संवेदनशील नेता निर्बुद्ध राजकारणी होणे शक्यच नव्हते. तथापि, ७०नंतर काँग्रेसमध्ये, निर्बुद्धांची नसली तरी होयबांची फळी जोमदार होऊ लागली. हा काळ त्यांच्या कन्या इंदिरा गांधींचा होता. त्यांच्या देशप्रेमाबद्दल शंका नाही. काँग्रेसची नाळ त्यांनीच गरिबांशी जोडून दिली आणि बँकांच्या राष्ट्रीयीकरणासारखे अनेक निर्णय घेऊन काँग्रेसला स्थितीवादी होण्यापासून वाचविले. पाकिस्तानला पराभूत करून देशात आत्मविश्वास जागविला. मात्र त्यांच्याच काळात गुणवत्तेपेक्षा व्यक्तिनिष्ठेला अतोनात महत्त्व आले. नेहरूंच्या कारभाराला तात्त्विक बैठक होती, व्यापक विचार होता. वैचारिक उलाढालींची कदर होती. इंदिरा गांधींच्या काळात संजय गांधींनी जमा केलेल्या फौजेला असा तात्त्विक पाया नव्हता. नीतिमत्तेबद्दल तिरस्कार होता. लोकशाही व्यवस्थेबद्दल असहिष्णुता होती. ‘इकॉनॉमिक अ‍ॅन्ड पोलिटिकल वीकली’चे संपादक कृष्ण राज यांनी म्हटले होते की, ‘इंदिरा गांधींनी सूत्रे हाती घेतली तेव्हा काँग्रेस पक्ष सुसंघटित होता. अनेक पातळ्यांवरचे नेतृत्व देशभर विकसित झाले होते. ती पक्षयंत्रणा इंदिरा गांधींनी हेतूपूर्वक मोडून टाकली. गांधी कुटुंबीयांच्या आदेशानुसार जो वागत नाही, त्याच्यावर त्यांचा विश्वास नव्हता. बरोबरीचे सर्व नेतृत्व खलास केले. नवा पक्ष उभा केला असला तरी त्यामध्ये लोकशाही यंत्रणा नव्हती.’
रस्ता इथे चुकला.. त्याच बरोबर इंदिरा गांधींना या रस्त्याने चालण्यास अटकाव करण्यास जयप्रकाश नारायण यांची लोकनीती अयशस्वी ठरली. उलट देशाच्या दुर्दैवाने पुढील काळात प्रत्येक राजकीय पक्ष याच रस्त्याने चालू लागला. देशात लोकशाही टिकली, कारण त्यातून करीअर करायची संधी अनेकांना मिळाली. झटपट पैसा मिळविण्याचे ते उत्तम साधन झाले. राजकारणावर जगणाऱ्यांची एक समांतर अर्थव्यवस्था तयार झाली. देशात लोकशाही टिकणे हे या अर्थव्यवस्थेला हवे आहे, कारण तो त्यांच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे.
अर्थात राष्ट्राच्या इतिहासात ६० वर्षे ही एखाद्या बिंदूप्रमाणे असतात. केवळ साठ वर्षांच्या अनुभवावरून देश अधोगतीला चालला आहे असा निष्कर्ष काढता येत नाही. इतिहासातील एखादाच क्षण वा कालखंड पकडून त्यावर निष्कर्ष बेतणेही चुकीचे ठरते. प्रत्येक देशाच्या इतिहासात भारतासारखे कालखंड आले आहेत व त्यावर मात करून ते देश समृद्ध झाले आहेत. परंतु ६० वर्षांचा प्रवाह डोळसपणे पाहिला तर आपल्याला जागरूक होता येते. चुकीचा मार्ग सोडून नवे वळण घेता येते.
असे नवे वळण घेण्यासाठी लागणारी ऊर्जा तरुणांकडून येते. मात्र अलीकडे तरुणांमध्येच राजकारणाबद्दल कमालीचा तिरस्कार निर्माण झाला आहे. नेहरूंपासून राजीव गांधींच्या काळापर्यंत प्रत्येक दशकात, तरुणांची नवी पिढी जोमाने राजकारणात येत होती. प्रस्थापितांशी संघर्ष करीत कारभाराला वळण देण्याची धडपड करीत होती. त्यातील काही नंतर प्रस्थापित झाले, तर अन्य विरोधी पक्षांत विसावले. नवी अर्थनीती आल्यापासून मात्र तरुणांचा ओघ आटला. आज राजकारणात उतरणारे तरुण हे व्यावसायिक राजकारणी आहेत, मागील काळासारखे तात्त्विक राजकारणी नाहीत. दुसरा लोकनीतीचा पर्याय जयप्रकाशजींच्या निधनानंतर लुप्त झाला होता. आज अण्णा हजारेंकडे तो क्षीणसा दिसला तरी त्याला सुसंघटित तात्त्विक, वैचारिक पाया नाही. 
भारतात लोकशाही टिकली असली तरी कार्यक्षम, लोकांना सर्वागाने सक्षम करणाऱ्या कारभाराचे ध्येय अद्याप बरेच दूर आहे. ‘भारतात लोकशाही ही वरवरची नक्षी आहे’ या बाबासाहेब आंबेडकरांच्या विधानाची यावेळी आठवण होते. मात्र ही नक्षी खोलवर रुजविणे आणि नेहरूंचे इशारे फोल ठरविणे ही शेवटी आपलीच जबाबदारी आहे.
(सर्व प्रमुख अवतरणे ‘गांधींनंतरचा भारत’ या रामचंद्र गुहा यांच्या पुस्तकातून)


सौजन्य : लोकसत्ता

Sunday, May 13, 2012

छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!


छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
ज्यांच्या इतिहासाची पाने उलटताना अंगावर काटा उभा राहतो .. ज्या युग पुरुषाने स्थापन केलेले स्वराज्य आपल्या खांद्यावर ज्यांनी अगदी लीलया पेलले .. वाढवले .. इतिहासामधील एक अदभूत व्यक्तिमत्व, म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज.
ज्या माणसाने ९ वर्षे तलवारीवर मरण पेलून धरल, जो माणूस वादळा सारखा ह्या सह्याद्रीच्या दऱ्या खोर्यात घोंगावत राहिला.
इतिहासामध्ये ज्यांची नोंद एक हि लढाई न हरलेला राजा म्हणून आहे. १२० लढाया एक हि हार नाही, एक हि तह नाही .. एकाच वेळी ३-४ दुष्मनांसोबत निकराची लढाई देणारा राजा म्हणून संभाजी राजांची नोंद इतिहासाने घेतली
शिवरायांनी आरमाराचे महत्व ओळखले होते, अतिशय दूरदर्शी पणाने त्यांनी सागरी शक्तीचे महत्व ओळखून आरमारही स्थापना केली होती, पुढे याच सागरी आरमाराला चौपटीने वाढवण्याचे काम संभाजी महाराजांनी केले. चंगेखान नावाच्या अरबी सरदार कडून नाव नवीन युद्ध नौका तयार करण्याचे तंत्र त्यांनी अवगत केले, मराठा आरमार अतिशय प्रबळ आणि प्रभावी बनवले.
टोपीकर, आदिलशहा, गोव्याचे पोर्तुगीज , निजामशाही, मुगल अशा अनेक शत्रूंची एकाच वेळी लढा देण्याचे काम त्यांनी केले. संभाजी राजे स्वतः रणांगणात उतरत असत. त्यांच्या साडे आठ वर्षाच्या कालावधी मध्ये एक हि बंड झाले नाही . तमाम मराठा समाज त्यांच्या मागे एक दिलाने उभा राहिला. शिवरायांनी स्थापन केलेले स्वराज्य चौपटीने वाढवण्याचे कार्य संभाजी राजांनी केले.
याच संभाजी ने वयाच्या चौदाव्या वर्षी एक संस्कृत मधून ग्रंथ लिहिला.. त्याचे नाव "सात-सतक" मानवी जीवन मुल्यांवर चर्चा करणारा हा महान ग्रंथ त्यांनी लिहिला .. बुध भूषणम् याच संभाजी ने लिहिला पण हे आम्हाला माहित नाही . भाषेचे प्रचंड प्रभुत्व असलेला हा राजा.
खुद्द औरंजेब दक्खन स्वारीवर आलेला असतांना त्या पापी औरंग्याला तब्बल ८ वर्षे सीमेवर हात चोळीत बसावयास भाग पाडीले, त्याला १ किल्ला सुध्दा जिंकता येऊ नये यातच संभाजी राजांचे राजकारणी, रणधुरंधर व्यक्तीमत्व सिध्द होते.केवळ एका जहागिरीपोटी नाराज झालेल्या गणोजी शिर्के नामक हरामजाद्याने स्वतःच्या बहिणीच्या कुंकुवाचा लिलाव मांडत मोगली सैन्याच्या तोंडात महाराजांच्या रुपाने आयता घास दिला.
स्वकीयांनीच विश्वास घात करून संभाजी महाराजांना औरांजेबाच्या तावडीत पकडून दिले , आणि आतिशय निर्दयपणे त्यांचा छळ करण्यात आला, त्यांचे डोळे काढले गेले, जीभ खेचून काढण्यार आली, नखे ओढून काढली, शरीरावर अमर्याद असे घाव केले .. त्यांचा मृत्यू येई पर्यंत औरंजेब त्यांच्यावर अत्याचार करताच राहिला, पण हा सह्याद्रीचा छावा जरा हि डगमगला नाही .. थोडा हि बिचकला नाही. खर तर जीवावर बेतल्यावर मानसे कसे स्वाभिमान शून्य होतात याची उदाहरणे बरीच आहेत पण संभाजी राजांनी स्वतः ला हा काळिमा लाऊन घेतला नाही, आपल्या शेवटच्या श्वास पर्यंत त्यांनी औरंजेबा पुढे आपली माण झुकवली नाही.
संभाजीराजांचा देह औरंगजेबाच्या पाशवी वृत्तीला बळी पडला, पण त्याच बलिदानातून आणि हौतात्म्यातून मराठी राज्य बचावले आणि पुढे याच मराठी माती मधे औरंजेबाचा देह गाडला गेला हे मराठी मनाच्या बांधवांना कधीच विसरता येणार नाही.
याच संभाजीचा चारित्र्य हनन करण्याचे काम आमच्याच काही हरामखोर बखरकारांनी आणि इतिहास करांनी केले आहे, खरा संभाजी कधी लोकांसमोर येऊ दिलाच नाही. पण सूर्याचा प्रकाश किती काळ लपवून ठेवणार एक दिवस तरी आमच्या तमाम मराठी लोकांच्या डोक्या मध्ये हा उजेड पडल्याशिवाय राहणार नाही. सूर्य सारख्या तेजस्वी आणि ओजस्वी शिवाजी राजांचा राजांचा पुत्र म्हणजे सिंहाचा छावाच. आणि ज्या जिजाऊ ने शिवबा घडवला त्याच जीजौंच्या संस्कारात वाढलेला शंभू बाळ कसा काय रंगेल ठरवला जाऊ शकतो. छत्रपती शिवाजी महाराज हे या स्वराज्यचे संस्थापक तर याच महाराष्ट्राचा दुसरा छत्रपती म्हणजेच संभाजी महाराज हे या स्वराज्याचे संरक्षक म्हणून होते.
उगवणाऱ्या सूर्याचा प्रकाश जसा घर घर पर्यंत पोचतो त्याच प्रमाणे माझ्या या शूर शंभू राजांचा इतिहास आमच्या घर घर पर्यंत पोचावा असे आवाहन आपल्याला जिजाऊ.कॉम परिवार तर्फे करण्यात येत आहे.
जय जिजाऊ .. जय शिवराय .. जय संभाजी


।। जिजाऊसाहेब ।।

।। जिजाऊसाहेब ।।

माता असावी तर जिजाऊसाहेबांसारखी, असं सार्थ अभिमानानं म्हटलं जातं. मोठ्या जिद्दीनं जिजामातेनं पुत्र शिवबाची जडणघडण केली... पुढं शिवरायांनी स्थापन केलेल्या स्वराज्यामागं खरी प्रेरणा होती ती जिजाऊसाहेबांचीच...

"जिजिआऊ वालिदा-द-राजा शिवाजी' म्हणजे राजा शिवाजींची माता "जिजाऊ' ही राजमाता जिजाऊसाहेबांची मुद्रा आहे. जिजाऊसाहेबांच्या सदरेवरून सुटणाऱ्या आज्ञापत्रांच्या माथ्यावर दिमाखात ही मुद्रा उमटवली जात असे. होय स्वतंत्र मुद्रा! तीही एका स्त्रीची! हे शिवकाळात एक आश्‍चर्यच होतं. ज्या काळात स्त्रियांना काहीच अधिकार नव्हते, त्या काळात शिवाजीराजांची ही माता आपली मुद्रा वापरत होती. एवढंच नव्हे तर, राजसदरेवर बसून न्यायनिवाडेही करीत असे. जिजाऊसाहेबांनी दिलेली न्यायनिवाड्याची काही पत्रंही आज उपलब्ध आहेत त्यावर उमटवलेल्या त्यांच्या मुद्रेसह. जिजाऊंनी दिलेला निर्णय पुत्र शिवबा तर मानत असेच; शिवाय सर्व गोतसभाही एकमुखानं हा जिजाऊंचा निर्णय मानत असे.

जिजाऊसाहेबांच्या कर्तबगारीचे दाखले-पुरावे मराठ्यांच्या इतिहासात अनेक मिळतात. त्यांनी शेतीसाठी शिवगंगा नदीवर बांधलेली लहान धरणं आजही सुस्थितीत आहेत. या नदीच्या काठावर त्यांनी बसवलेले पेठ शिवापूर ही व्यापारी पेठ आजही नांदती आहे. पुण्याजवळील खेडे-बाऱ्यात जिजाऊंनीही लोकोपयोगी कामे करून घेतली. या गावाजवळच जिजाऊंची खासगी शेती (शेरी) ही कामथडीच्या ओढ्याला लागून होती. अशी लोकोपयोगी कामं करणाऱ्या जिजाऊसाहेब राज्यकारभारातही भाग घेत असत.

सन 1666 मिर्झाराजा जयसिंगाशी तहात ठरल्याप्रमाणं शिवाजीराजांना आग्य्राला जावं लागले. राजे आग्य्राला दिनांक 6 मार्च 1666 रोजी स्वराज्यातून निघाले. तिथे ते 17 ऑगस्ट 1666 पर्यंत औरंगजेबाच्या कैदेत होते. तिथून निसटले आणि चार महिन्यांनी 21 नोव्हेंबर 1666 मध्ये म्हणजे जवळजवळ नऊ महिन्यांनी स्वराज्यात परत आले. या नऊ महिन्यांच्या काळात स्वराज्याचा कारभार जिजाऊसाहेबांनीच सांभाळला होता आणि नुसता सांभाळला नव्हता; तर ऑगस्ट 1666 मध्ये कोल्हापूरजवळील प्रसिद्धगड ऊर्फ रांगण्याचा बेलाग-दुर्गम-दुर्गही जिंकून स्वराज्याच्या सीमा वाढवल्या होत्या, असे हे राजमातेचे प्रशासन होते.

अशा या कर्तबगार मातेनं शिवरायांची जडणघडणच अशा तऱ्हेनं घडवली होती, की त्यातून "स्वराज्य संस्थापक शककर्तेची निर्मिती झाली आणि भारताला एक महान नृपती मिळाला. नुसता राज्यकर्ते घडवून आपले कर्तव्य करून देव-देव करीत बसणाऱ्या जिजाऊ नव्हत्या. शिवरायांनी स्थापन केलेल्या स्वराज्यातील येसाजी कंक, तानाजी मालुसरे अशा स्वराज्याच्या सरदार-सुभेदारांच्या कुटुंबांची काळजीही जिजाऊसाहेब करीत असत. यासंबंधीचे एक जिजाऊंचे पत्रच उपलब्ध आहे. रायगडाच्या पायथ्याला गुंजनमावळातील विठोजी शिलंबकर यांनी आपल्या कन्येचा विवाह गोमाजी नाईकांच्या पुत्राशी ठरवला होता; पण लढाईच्या धामधुमीत या तोलदार शिलंबकरांच्या जिंदगानीची धूळधाण उडाली होती. त्यामुळे विठोजीराव लग्नाची तारीख पुढे-पुढे ढकलत होते. जिजाऊसाहेबांना ही गोष्ट समजल्यानंतर त्यांनी विठोजीरावांना पत्र पाठवलं. हे पत्र म्हणजे जिजाऊ स्वराज्यातील मावळ्यांना कशा प्रकारे मदत करीत, त्यांची भाषा कशा वळणाची होती. त्यांच्यात सामान्य रयतेविषयी काय भावना होत्या, यावर स्पष्ट प्रकाश टाकते. या पत्रात जिजाऊ लिहितात,

""अजरक्‍तखाने रा. जिजाबाईसाहेब प्रति विठोजी हैबतराव सिलंबकर देशमुखतर्फे गुंजनमावळ, तुम्ही आपली कन्या गोमाजी नाईकांच्या लेकास दिधली. लग्न सिधी कारणे तुम्हास हुजूर बोलाविले. तुम्ही सांगितले, की सांप्रत रोजीचे खावयास नाही आणि लग्न सिधी कैसी होईल. त्यावरून तुम्हांस होन 25 व 500 माणसांचे जेवणाचे सामान दिधले असे. लग्न सिध करणे.''

अशा तऱ्हेनं या राजमाता स्वराज्यातील रयतेची काळजी घेत असत आणि म्हणूनच स्वराज्यासाठी शिवरायांसाठी हेच सामान्य लोक, असामान्य गोष्टी करीत. कोणी बाजीप्रभू खिंडीत धारातीर्थी पडत; तर कोणी सामान्य नाभिक शिवाजी काशीद खुशीने मृत्यूच्या पालखीत बसे; तर कोणी तानाजी आपल्या मुलाचे लग्न सोडून सिंहगडासारखा गड घेता घेता आपले प्राण देत असे.

स्वराज्याची शिवरायांची खरी प्रेरणा जिजाऊसाहेबच होत्या. जिजाऊंच्याशिवाय स्वराज्याची कल्पना, स्थापना, विस्तार त्यावर आलेल्या फत्तेखान - अफझलखान, शाहिस्तेखान, मिर्झाराजा-दिलेरखान-पठाण अशा अनेक संकटांचा यशस्वी सामना या विषयांचा विचार, अभ्यास जिजाऊसाहेबांशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. शिवरायांनी 6 जून 1674 रोजी स्वतःस राज्याभिषेक करून घेतल्यानंतर त्या खऱ्या अर्थाने "राजमाता' झाल्या. पण त्या फक्त राजमाताच नव्हत्या. खऱ्या अर्थाने त्या महाराष्ट्राच्या लोकमाता होत्या. लखोजी जाधवरावांसारख्या पराक्रमी पित्याच्या कन्या. शहाजी महाराजांसारख्या महान पराक्रमी पतीच्या पत्नी आणि शिवाजीराजांसारख्या शककर्तेची माता अशा अनेक रुपांत जिजाऊसाहेब आपल्यापर्यंत येतात. त्यातून त्यांच्या चरित्रातील पंचाहत्तर-शहात्तर वर्षांच्या आयुष्याचा एक विस्तारित पटच आपल्यासमोर येतो. तो मांडताना-लिहिताना शब्दांच्या मर्यादा सांभाळाव्या लागतात. असो. आजच्या बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्‍यातील "सिंधखेड राजा' इथल्या जाधवांच्या वाड्यातील त्यांचे जन्मस्थळ (त्यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी झाला.) आणि राजधानी रायगडाच्या पायथ्याला "पाचाड' या गावी असणारा त्यांचा वाडा, त्यांची समाधी (जिजाऊंचा मृत्यू शिवराज्याभिषेकानंतर लगेचच 17 जून 1674 रोजी झाला.) ही ठिकाणं आपली प्रेरणास्थानेच आहेत.
 

सौजन्य :  -- इंद्रजित सावंत  (Sakal Wratpatra)

- कार्यकर्ते jijau.com