Monday, January 25, 2010

प्रभात फेरी आणि झेंडा वंदन : प्रजासत्ताक दिनाच्या सर्वाना खूप खूप शुभेच्छा!

सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
१५ ऑगष्ट १९४७ ला देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला .. आणि देशाला स्वातंत्र्य लाभले.
हे मिळालेले स्वातंत्र्य प्रत्येक नागरिकापर्यंत पोचवण्याचे अवघड काम साध्य करण्यासाठी २६ जानेवारी १९५० रोजी भारताचे संविधान लागू करण्यात आले.
सामान्यातल्या सामान्य व्यक्तीला देखील या संविधानाचा आधार लाभला ...  आणि प्रत्येकाला ह्या स्वातंत्र्याचे खरे-खुरे बळ प्राप्त झाले.



प्रजासत्ताकचा सूर्य उगवतोय !

                                                                                              

झेप घेणारे पक्षी: स्वतंत्र प्रजासत्ताक आणि उगवलेला सूर्य: लोकशाही स्वातंत्र्याने आणलेला प्रकाश



झंडा उंचा रहे हमारा !
                                                      भारत माता कि जय !



आणि हे प्रजासत्ताक चे भावी आधारस्तंभ



जिजाऊ.कॉम तर्फे प्रजासत्ताक दिनाच्या या खास दिवशी केलेला एक संवाद,  
"पुन्हा एक नवा स्वातंत्र्य लढा !"  नक्की वाचा . देशासाठी दिलेले आपले १० मिनिट नक्कीच वाया जाणार नाहीत याची आम्हाला खात्री आहे. 
तो लेख इथे पीडीएफ डाउनलोड ही करा 
 

पुन्हा एक नवा स्वातंत्र्य लढा !

प्रजासत्ताक या शब्दाची साधारण पणे फोड केली तर त्याचा अर्थ म्हणजे प्रजेची सत्ता! २६ जानेवारी १९५०, आमच्या त्या काळच्या महान नेत्यांनी एक स्वप्नं पाहिले. इंग्रजांच्या राजवटी खाली असणारी सत्ता पूर्णपणे प्रत्येक भारतीयाच्या हाती सोपविण्याचे, कल्याणकारी सरकार ची स्थापना करून समाजातील तळा गळातील लोकांपर्यंत हे मिळालेले स्वातंत्र्य पोहचवायचे.
मुळात स्वातंत्र्य ही संकल्पनाच त्या वेळी एवढी मोठी होती की त्याचा खरा-खुरा अर्थ लोकांपर्यंत पोचवण्याचे फार मोठे आव्हान त्या सर्वांसमोर होते. स्वातंत्र्य तर मिळाले. पण पुढे काय? खूप मोठ्या दूरदृष्टी ची त्या वेळी गरज होती. आमच्या सुदैवाने ती दृष्टी त्यावेळच्या लोकांमध्ये होती. खूप दूरचा विचार करून त्यांनी या देशाचे भवितव्य ठरवण्यासाठी २६ जानेवारी १९५० साली भारत देशाचे संविधान संसदेसमोर ठेवले. हजारो वर्षांपासून ठराविक लोकांच्या हाती असलेली सत्ता आता खऱ्या अर्थाने सर्वसामान्य जनतेच्या हाती येणार होती, खूप मोठी जबाबदारी या देशाच्या प्रत्येकावर येणार होती.

आज ६० वर्षे पूर्ण झाली, आम्ही या प्रजासत्ताक राष्ट्राचे एक जबाबदार नागरिक म्हणून जगत आहोत. आजच्या या दिवशी आपण काही जबाबदार नागरिकांशी संवाद साधावा असे सहजच मनाला वाटून गेले. खर तर हा संवाद इतर कोणाशी नसून हा माझा स्वतःशीच केलेला एक संवाद असू शकतो. हा आपल्या प्रत्येक जबाबदार नागरिकाचा स्वतःशीच केलेला संवाद देखील असू शकतो. माहित नाही; पण बोलावेसे वाटले.
६० वर्षे पूर्ण झाली! एकदा मागे वळून बघावेसे नाही का वाटत? ज्या भारत देशाचे स्वप्न आम्ही पाहिले होते तो देश हाच आहे का? उत्तर नाही असेल तर, का नाहीये तो तसा ? कोण शोधणार याचे उत्तर? काही तरी चुकल्यासारख वाटतंय का तुम्हाला? हे असच चालत राहणार आहे का ? ६० वर्षे झाली, उद्या ७० ही होतील, आपण या प्रजासत्ताक राष्ट्राचे शतक हि साजरे करू; पण तुम्हाला वाटते का त्या वेळी काही बदललेले असेल? जर हे असेच चालणार असेल तर मला तरी नाही वाटत काही बदलले असेल. कुठे तरी चुकतंय ? आपला काल-आज-आणि उद्या ह्या तिन्ही चा विचार करण्याची वेळ आली आहे. आणि हा विचार कुठल्या तरी पिढीला एकदा करावाच लागतो. मग तो आपणच का करू नये?


कधी हि न मावळणाऱ्या इंग्रजी सत्तेचा सूर्य अखेर १५ ऑगष्ट १९४७ ला मावळला. जगाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या स्वातंत्र्य संग्रामाचा शेवट झाला आणि देश स्वतंत्र झाला. जगा समोर एक आदर्श असणारा आमचा हा स्वातंत्र्य लढा यशस्वी झाला. ह्याच तेजस्वी आणि प्रेरणादायी स्वातंत्र्य लढ्याचा उज्वल इतिहास दाखवणारे एक हि स्मारक आमच्या या देशात असू नये ह्या पेक्षा शरमेची दुसरी काय गोष्ट असेल! केवळ या स्वातंत्र्य लढ्याला अर्पण केलेले एक हि स्मारक आमच्या अखंड देशात कुठेही नाहीये. येणाऱ्या पिढीला दाखवण्याकरिता एक हि असे स्थळ किंवा स्मारक नाहीये जिथे आम्ही त्यांना दाखवू शकू कि हे बघा, ६० वर्षापूर्वी आपण इथे होतो, असा होता आमचा देश , हे स्वप्न होते आणि आता बाहेर बघा आमचा हाच भारत! हे पाहिल्यावर तरी कदाचित येणाऱ्या पिढीला काही तरी चुकत असल्याची जाणीव होईल आणि त्यांचे विचार बदलतील.
आज तो काळ आठवतो, २६ जानेवारी १९५०, भारताचे संविधान लागू झाले, भारत एक प्रजासत्ताक राष्ट्र बनले, आमची लोकशाही आपल्या पायावर भक्कमपणे उभी राहिली, या संविधान समितीचे अध्यक्ष होते डॉ. बाबासाहेब आंबेडकर, समाजातील दलित, शोषित आणि तळा गळातील समाजाचे सच्चे प्रतिनिधी. हा क्षण जगाला एक प्रकारे दाखवून देत होता कि भारताने एका फार मोठ्या सामाजिक क्रांतीकडे आपले पाहिले पाऊल टाकले आहे, केवळ भारतातच नव्हे तर सबंध जगामध्ये एक विश्वास निर्माण झाला. हा विश्वास होता सामाजिक एकतेचा! हा विश्वास होता समानतेचा! प्रत्येक भारतीयाच्या स्वातंत्र्याचा! हा विश्वास होता त्याला सन्मानाने जगण्याचा, मग त्याचा धर्म, जात, भाषा, लिंग कोणतेही असो सर्व जन एकाच पातळीवर, कोणी हि मोठा नाही किंवा लहान नाही. सर्व भारतीय समान! हजारो वर्षाची गुलामगिरीतून मुक्त होऊन एका स्वातंत्र्याची पहाट अनेकांच्या आयुष्यात प्रथमच उगवली गेली. प्रत्येक भारतीय नागरिकाच्या मुलभूत अधिकारांना संरक्षण देण्यात आले, धर्म स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य , गरीब, कष्टकरी, अल्पसंख्य आणि मागासलेल्या समाजाचे संरक्षण आणि संवर्धन, ठराविक समाजाकडे असलेली शिक्षणाची मक्तेदारी मोडून संविधानाने शिक्षणासारख्या पवित्र मंदिराची द्वारे सर्वांसाठी खुली केली गेली. याच संविधानाने केंद्र आणि राज्य सरकारसाठी काही मार्गदर्शक तत्वांचा उल्लेख देखील केला आहे. उदा:- सामाजिक आरोग्य, समाजातील लोकांचे राहणीमान उंचावण्यासाठी प्रयत्न करणे ह्या सारखे कार्य हे राज्य सरकाचे असेल, देशाची सुरक्षा, देशाचे अखंडत्व याची जबादारी हि केंद्राची असेल इ.
छोट्यात छोट्या गोष्टीचा विचार करून कोणावरही अन्याय ना करता एवढ्या मोठ्या देशाचे संविधान लिहिले गेले , सर्व -सर्व तर सामावले आहे या संविधानामध्ये. मग असे का घडले की ६० वर्षे पूर्ण झाली तरी आज हि आम्ही सर्वसामान्य मुलभूत गरजा देखील पूर्ण करू शकलो नाही?

आजच्या या दिवशी काही आकडेवारी सांगतो, डोकं भन-भनायला होता हे पाहिल्यावर,
आज हि आमच्या देशामध्ये साक्षरतेचे प्रमाण हे अक्षरशः लाज वाटण्यासारखे आहे. ७३% पुरुष हे साक्षर तर केवळ ४८% स्त्रिया आमच्या देशात साक्षर आहेत, स्त्री शिकली तर अक्खे कुटुंब शिकते म्हणतात; मग ४८% साक्षर स्त्रिया काय आमच्या देशाचे भवितव्य ठरवणार ? आज हि प्रत्येकी १००० जन्माला येणाऱ्या मुलांपैकी ५७ मुले हि जन्मताच मृत्युमुखी पडतात, ० ते ५ वर्षे वयोगटातील ४६% लहान मुलं हि कुपोषित असतात. आता हि आमची आजची ताजी आकडेवारी, हि असली कुपोषित आणि जन्मताच मृत्यूला सामोरे जाणारी आमची पिढी उद्याचा देश घडवेल का ?


जगाच्या पाठीवर मनुष्य विकास दर (म्हणजेच सोप्या भाषेत सांगायचे तर- ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स) सांगायचा झाला तर आपल्या देशाचा नंबर १३४ व लागतो (एकूण देश १८४, बघा !!!). याच बाबतीत भूतान, सारखे गरीब देश सुद्धा आपल्या अगोदर येतात! भारत एक महासत्ता होण्याची स्वप्न बघणारे आम्ही आणि आमच्याच देशात असलेली हि भयंकर परिस्थिती! हा एवढा मोठा विरोधाभास! कस शक्य आहे महासत्ता बनणे? महासत्तेची स्वप्नं बघण्याआधी संविधानाने दिलेली सत्ता / अधिकार तरी सर्वांपर्यंत पोहचू शकलो का हे बघावे लागेल. आणि हे अधिकार जर सर्वांपर्यंत पोचले नसतील तर त्याची जबाबदारी आपल्या प्रत्येकाला घ्यावीच लागेल ( अर्थात जे उद्याच्या भारत देशाची स्वप्ने बघतात त्यांनीच).
पण नेमकं काय चुकल ? उत्तर सोप्पं आहे, ह्या राजकारण्यांनी आणि आपण नागरिकांनी मिळून आपल्या देशाची वाट लावली; काय बरोबर ना?
मी हि तेच म्हणतोय, आंबेडकर पण हेच म्हणाले होते कि संविधानामध्ये तर सर्वच बाबींचा समावेश केला आहे पण ह्याची अंमलबजावणी कशी होते ह्यावर सगळ काही अवलंबून आहे. आणि तेच झाला! हे संविधान चूक लोकांच्या हाती पडल. ६० वर्ष झाली तरी आम्ही खरोखर स्वतंत्र झालो आहोत का? राजे- राजवाडे गेले आणि आता आमदार-खासदार आणि मंत्री आले, त्यांना जसे वाटेल त्यांनी तसा आमच्या देशाचा रथ चालवायचा! आम्ही मस्त आरामात या रथामध्ये आप आपली बुड घट्ट टेकवून बसलो आहोत. सर्वांना वाटतंय आमचा हा रथ फार जोरात पळतोय. पण मित्रांनो ह्या भारत देशाच्या रथाची चाके खोलवर रुतली गेली आहेत. गेली कित्येक वर्षे आम्ही एकाच जागेवर अडकून पडलो आहोत. रथ चालवणारे आपली लगाम सोडायला तयार नाहीयेत आणि आमच्या सारखे बसलेले आपआपली सीट सोडायला तयार नाहीयेत! नाही; काही बिचारे लोक आहेत जे आपला सर्वस्व विसरून, आपली मिळालेली जागा सोडून हा रुतलेला रथ पुढे ढकलण्याचा प्रयत्न करीत आहेत, पण अशा वेळी बहुसंख्य समाज फ़क़्त आपल्या आपल्या सीट वरून फ़क़्त त्यांच्या कडे बघण्याचा कार्यक्रम करत बसला आहे. कसा पुढे जाणार मग हा रथ? कोणालाच कसली चिंता नाहीये, आपलीच गाडी, आपलीच माडी आणि आपल्याच बायकोची गोल गोल साडी! एवढाच विचार करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. एवढा मोठा पसारा असलेला हा भारत देशाचा रथ पुढे ढकलायला बळ कमी पडतंय. अशावेळी थोडी तरी जाण असलेल्यांनी आता आपल्या जागेवरून उठण्याची वेळ आली आहे.



बहुसंख्य समाज हा आपल्या रोजी - रोटी मध्ये गुंतून पडला आहे. त्यामुळेच आम्ही काही ठराविक लोकांच्या हाती आमची हि लोकशाही सोपवली आहे. देशाच्या निगडीत असलेल्या प्रश्नांवर रोज जरी आपल्यला काही काम करता येत नसले तरी ते काम याच सरकार कडून करवून घेणे हे आपलेच कर्तव्य आहे. आपण कोणत्या लोकांना हे देश चालवण्याचे महत्वाचे काम सोपवत आहोत हे हि एकदा तपासून बघायला हव.
वरील आकडेवारी वरून आपल्या देशाची आणि पर्यायाने देशातील नागरिकांची काय अवस्था आहे हे तर आपल्या लक्षात आलेच असेल; आता हि आकडेवारी हि बघा- सध्याच्या 'गरीब भारताच्या' लोकसभेमध्ये २०% खासदार हे असे आहेत कि ज्यांची मालमत्ता हि ५ करोड रुपये पेक्षा जास्त आहे, २००४ च्या लोकसभे मध्ये प्रत्येक खासदाराची मालमत्ता सरासरी १.९२ करोड एवढी होती, आणि २००९ मध्ये म्हणजे केवळ ५ वर्षामध्ये आमच्या सध्याच्या खासदारांची सरासरी मालमत्ता हि केवळ रुपये ४.८२ करोड एवढी आहे.. ( हि फ़क़्त जाहीर केलेली मालमत्ता आहे, हे विसरू नका!). २००९ च्या लोक सभे मध्ये १५० खासदार हे गुन्हेगारी पार्श्वभूमी चे आहेत. त्यातील ७३ खासदारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत ( जसे कि खून, खंडणी, ई).
हे झाला राजकीय क्षेत्र. आता ह्या सगळ्या पासून प्रशासन तरी कस दूर राहू शकते? पोलीस असो, सैन्य असो किंवा आमची न्याय व्यवस्था सर्वच जन या भ्रष्ट व्यवस्थेचे एक एक पात्र बनले आहेत. नुकतीच घडलेली रुचिका केस आणि अशा अनेक केसेस ज्या मध्ये सबंध व्यवस्था कशी एखाद्याचा बळी घेऊ शकते हे वारंवार दिसून आले आहे. जेव्हा सगळे जग हे वेगाने पुढे पुढे जात आहे ,तेव्हा आपण मात्र मंदिर-मस्जिद च्या लढ्या मध्ये व्यस्त आहोत. आज हि जातीच्या नावावर गावा गावा मध्ये अन्याय-अत्याचार रोजच होत असतात. त्यातच आमचा मोठेपणा! खाली दबलेल्या लोकांना अजून दाबायचे ह्यातच आम्ही आमची सर्व क्रय शक्ती व्यर्थ घालवत आहोत.संपूर्ण समाजव्यवस्था पोखरली जात आहे, ज्या संविधानाची निर्मिती समाज घडवण्या साठी झाली होती आज त्याचाच आधार घेऊन लोक समाजामध्ये विकृती निर्माण करत आहेत.

"साला सारा सिस्टीम हि खराब है" असा म्हणून म्हणून ६० वर्षे पार पडली. काय बदल घडला? काहीच नाही! उलट परिस्थती अजून बिकट होत गेली, बिघडत गेली.
का घडले असे? कारण आपण आपली सीट काही सोडली नाही, आपण आपली जागा सोडली नाही. एकाच जागेवर एखाद्या गांडूळा चिटकून बसलो. आपण खरच काही -काही केले नाही. आणि करणाऱ्या एखाद्याला कधी साथ हि दिली नाही. केवळ एक प्रेक्षक बनून राहिलो आणि आपल्याच या देशाचा तमाशा आपल्याच डोळ्याने बघत आलो. आज जग जवळ आले आणि आता इतर पाश्चिमात्य देशांकडे बघून आपण त्यांचा हेवा करत बसतो. वर्षानु वर्षे झाली, आम्ही फ़क़्त बघतच आहोत; पण आपली परिस्थती काही बदलली नाही!

ज्या व्यवस्थेला आपण रोज शिव्या घालतो, त्या व्यवस्थेला निव्वळ दोष देतो, पण आपण विसरतो कि ह्या व्यवस्थेचा सर्वात मोठा पार्ट म्हणजे आपण, होय आपण ! आपणच गेली ६० वर्षे बदललो नाहीत तर व्यवस्था तरी कशी बदलेल? ज्या व्यवस्थेचा सर्वात मोठा भाग जर अपंग झाला असेल ती व्यवस्था तरी कस काम केल आणि काही केलंच तरी त्या कामाची गुणवत्ता तरी काय असेल?
कुठलाही देश हा परिपूर्ण नसतो, तो तसा बनवावा लागतो. त्या साठी किमान प्रामाणिक पणे प्रयत्न तरी करावे लागतात. मग जर बहुसंख्य समाज जो कि आज थंड पडला आहे, तो पेटला तर नक्कीच हा बदल होऊ शकतो.आज हि संविधान हे असे अस्त्र आहे कि याच अस्त्राचा उपयोग करून आम्ही याच प्रस्थापित व्यवस्थेला एक आव्हान देऊ शकतो. शिक्षणाचा अधिकार, माहितीचा अधिकार ह्या सारखे अधिकार आणि कायदे ह्यांचा वापर करून आपण वेळोवेळी ह्या भ्रष्ट व्यवस्थेला तडा देऊ शकतो. हे पण लक्षात ठेवावे लागेल की सगळच काही अंधकारमय नाही, पण अंधार मात्र पसरलाय आणि तो अजूनच भयंकर होत आहे. राष्ट्राचे भविष्य पूर्णतः अंधकारमय होण्या आधी या अंधाराची जाणीव आपणाला झाली पाहिजे, कारण तेंव्हाच तर प्रकाशाकडे जाण्याची गरज भासेल.

सध्याच्याच व्यवस्थेमध्ये राहून सुद्धा खूप काही घडवता येते ह्याची अनेक उदाहरणे समाजा मध्ये आहेत, फ़क़्त या वेळी केवळ बघण्यापेक्षा काही तरी कृती करूया. प्रत्येकाने गांधी किंवा भगतसिंग बनण्याची गरज नाहीये, ते तसे होता हि येत नाही. गांधी आणि भगतसिंग हे आपल्यासारख्या हजारो-लाखो लोकांतूनच घडत असतात. आपण स्वतःला घडवूया आपोआप आपल्यातूनच उद्या गांधी,भगतसिंग सारखे लोक जन्माला येतील. ते येतील तेव्हा येतील! पण सध्या मला स्वतःला घडवणे तर माझ्या हातामध्ये आहे आणि ते मी करणार!




प्रजासत्ताक दिनाच्या ह्या दिवशी, मी जी शपथ, जी प्रतिज्ञा माझ्या शाळेची १० वर्षे रोज 'नुसती' घेत राहिलो आज पासून ती प्रतिज्ञा प्रत्यक्षात साकार करण्यासाठी मनापासून प्रयत्न करणार. तुम्ही हि करा!
प्रजासत्ताक दिनाच्या सर्वाना खूप खूप शुभेच्छा!

जय हिंद ! जय भारत !




[विचार करा! इतरांना ही विचार करायला लावा. राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात आपला सहभाग नोंदवा. नवीन शैक्षणिक, कृषी आणि इतर योजनांसाठी जिजाऊ.कॉम [www.jijau.com] ला भेट द्या.]

आम्हाला माहित नाही आम्ही जग बदलू शकतो की नाही, पण ते बदलण्याची तीव्र इच्छा मात्र आम्ही हृदयात बाळगतो!
                                                                       - कार्यकर्ते जिजाऊ.कॉम




इथे चित्रासहीत हा लेख डाउन्लोड करा

Sunday, January 24, 2010

भिवंडी येथील विजयानिमित्या शिवसेनेचे अभिनंदन आणि बाळासाहेब ठाकरे यांना जन्म दिवसानिमित्या हार्दिक शुभेच्छा




बाळासाहेब ठाकरे यांना जन्म दिवसानिमित्या हार्दिक शुभेच्छा [२३ जानेवारी]
महाराष्ट्राच्या राजकरणात एक अतिशय महत्वाचे स्थान असणारे नेते आणि शिवसैनिकांचे आदरस्थान, परखड भाषा आणि विनोदी वृत्ती असलेल्या बाळासाहेबांना खूप खूप आयुष्य लाभो हीच महाराष्ट्रीय जनतेची परमेश्वराकडे प्रार्थना!








तसेच, भिवंडी येथील विजयानिमित्या शिवसेनेचे अभिनंदन
ठाणे जिल्ह्यातील १३७-भिवंडी (पूर्व) विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा निकाल शनिवारी जाहीर करण्यात आला. शिवसेना पक्षाचे रुपेश लक्ष्मण म्हात्रे विजयी झाले आहेत. त्यांना ३५ हजार ३७६ मते मिळाली आहेत.

अन्य उमेदवार, त्यांचा पक्ष आणि त्यांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे आहेत-सय्यद मुझफफर हुसेन नझर हुसेन-इंडियन नॅशनल काँग्रेस-२४,४१८, फरहान अबु असिम आजमी- समाजवादी पार्टी-३३,७००, बदीउज्जमाँ-नॅशनल लोकहिन्द पार्टी-२२२, जाधव भाईदास अनंता-अपक्ष-१४४, नाथानी मोहम्मद हनीफ इब्राहीम-अपक्ष-८२, मोमीन मुख्तार अहमद अब्दुल हक-अपक्ष-९५, राष्ट्रपती-अपक्ष-२५१, सिद्दीकी मुकीम अब्दुल नईम अ.-अपक्ष-२३६, संजय लक्ष्मण पाटील-अपक्ष-५६३. (
सौजन्य: महान्यूज )

अंतर राष्ट्रीय उच्च तंत्रज्ञान कृषी प्रदर्शन, पुणे

पुणे येथे नुकतेच अंतर राष्ट्रीय उच्च तंत्रज्ञान कृषी प्रदर्शन अग्रोवन च्या साह्याने पार पडले. कृषी प्रदर्शनात फक्त सामान्य शेतकऱ्यासाठीच नाही तर सधन शेतकऱ्यासाठी आणि मध्यम आणि उच्चवर्गीयांसाठी [वाईन ;-)] सुद्धा अनेक आकर्षक गोष्टी होत्या.
काही चित्रे येथे देत आहे !


सुस्वागतम



शेतकरी मित्र



राष्ट्रच भविष्य



जत्रा



                            कृषी प्रदर्शन! (काही हरकत नाही; आता आम्ही का कार घेऊ नी का काय ?)


                                            कृषी प्रदर्शन, मस्त!



                            टेलिकॉम आलं! आता तंत्रज्ञान हि येऊ द्या 'सामान्य' शेतकऱ्यापाशी!



                                                         उपस्थित मान्यवर



           कृषितला उद्योग. हेच भविष्य आहे ! आणि साखर महाग झाली आहे, गुळाचा विचार केला जाऊ शकतो !



                                         वस्तू एक, कामे अनेक !



शिक्षित तरुण, वूड बी शेतकरी :-)!

                                                                                                                                         


शेती करावी का?



पुस्तके


   

कृषी यांत्रिकीकरण योजना आणि त्या संबंधी असल्येल्या अनुदांच्या योजना बद्दल अधिक माहिती साठी इथे भेट द्या.

     

Monday, January 18, 2010

मराठी ब्लॉगर मेळावा (उशीर झाला पोस्ट टाकायला पण असो!)

दिनांक १७ जाने. २०१० रोजी पुणे येथील, पु. ल. देशपांडे उद्यानात वेब वरील सर्व मराठी ब्लॉगर चा मेळावा पार पडला. मराठी भाषेचे वेब वरील अस्तित्व  आणि त्याच्या भविष्याचा वेधच या मेळाव्यात आला. खूप लोकांनी  या मेळाव्या बद्दल अधिक तपशीलासाहित लिहिलंय, म्हणून मी त्याच लिंक इथे देतो:
>सुरेश पेठेंचे माझे मनोगत 
>हरेकृष्णाजी 
>भुंगा (डोक्यातला)
>भुंगा (सोशल किडा)
एक फोटो आहे माझ्याकडे तो ही इथे टाकतो 





सर्व उपस्थितांचे मी आभार मानतो आणि हि पोस्ट संपवतो ;-) !

Sunday, January 10, 2010

राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मा साहेब जयंती

[१२ जानेवारी १५९८- १७ जून १६७४] आज १२ जानेवारी; इतिहासातील असा दिवस जो प्रत्येक स्वाभिमानी मराठ्याने [मराठा-प्रत्येक महाराष्ट्रीय] आपल्या हृदयात कायमचा कोरून ठेवला पाहिजे.आजच्या या दिवशी महराष्ट्राच्या इतिहासाला एक कलाटणी मिळाली होती. स्वाभिमानाची आणि स्वातंत्र्याची साक्षात भवानी जिजाऊ रूपाने सिंदखेड राजा येथे लखुजीराजे जाधवांच्या घरी प्रकटली. हीच ती स्वराज्य-जननी, हीच ती माता जिने स्वराज्याचे देखणे स्वप्न देखिले, हीच ती जननी जिने आमच्या रक्ता रक्ता मध्ये स्वाभिमान भिनवला. जिने 'प्रत्येक' मावळ्या मध्ये शिवबा घडवला. स्वराज्या साठी लढणाऱ्या प्रत्येकावर आगदी शिवबा प्रमाणेच प्रेम केले. जिजाऊ साहेबांनी आपल्या मायेने शिवाबंसाठी जीवाला जीव देणारे मावळे घडवले, स्वाभिमानाच्या ठिणगीने त्यांना पेटवले आणि पुढे हीच स्वराज्याची मशाल क्रूर यवनांना जाळून खाक करू लागली. आमच्या ह्याच शूर मावळ्यांना स्वप्नात पण बघून हेच जुलमी दुश्मन झोपेत पण दचकून जागी व्हायचे. ह्या सर्वांना एकत्र ठेवणारा तो शिवबा ह्याच माउलीने घडविला.

या माउलीने आपले उभे आयुष्य या स्वराज्याच्या जडण घडणीसाठी पणाला लावले. आपले सौभाग्य आणि आपल्या पोटचा गोळा देखील या स्वराज्याला ओवाळून टाकीला. एक पत्नी म्हणून धीराने शहाजी राजांच्या सोबत उभ्या राहिल्या. शिवरायांच्या मातृत्वा बरोबरच त्यांचे गुरुत्व हि त्यांनी स्वीकारले; प्रसंगी याच माउलीने हाती तलवारही धरली. स्वदेश, स्वधर्म, स्वभाषेची जान तेंव्हा सर्वांना झाली आणि अखेर कित्येक वर्षाच्या संघर्षा नंतर ३२ मन सोन्याचे सिंहासन रायगडी अवतरले. स्वराज्य मिळाले आणि त्या स्वराज्याला छत्रपती मिळाला. जिजाऊच्या नव्हे तर कुणाच्या आशीर्वादाने.
कित्येक मावळ्यांनी आपले मरण पेलून धरून, त्याला घडीभर ताटकळत ठेवून हे स्वराज्य घडवले, टिकवले आणि वाढवले. हे स्वराज्य साकार होण्यासाठी कित्येकांनी आपले रक्त सांडलेले आहे. आणि हे असे घडायला, झोकून देऊन लढायला प्रवृत्त व्हायला गरज असते शिवबाची आणि तो शिवबा घडायला गरज असते ते जिजाऊचीच!
इतिहासाचे ज्ञान नसले तरी चालेल पण जान मात्र असायलाच हवी! या धावणाऱ्या जगात नक्कीच आपल्याकडे वेळ नाही. तसा तो कोणत्याच पिढीला नसतो. ज्याला त्याला आप-आपली कामे असतात; पण वेड लागल की वेळ मिळतो! त्यामुळे जमेल तेंव्हा इतिहास आठवून पहावा, त्यातून धडे घ्यावेत. चुकांना सुधारून पुन्हा चुका रहित इतिहास लिहावा. नाविन्य तर हवच; ते आणण्यासाठी ही स्वातंत्र्य घ्याव. पण हे सगळ करताना समोर कुणाचातरीआदर्श असला तर प्रवास आणि नव-निर्माण सुखकर जाते. वेगळ सांगायची गरजच नाही- इतिहास घडवनारी माणसे इतिहास विसरू शकत नाहीत आणि इतिहास विसरणारी माणसे कधीच इतिहास घडवू शकत नाहीत !!
आपल्या पिढीत प्रत्येकाला काही तरी करण्याची तळमळ आहे, प्रत्येका मध्ये ती जिद्द आहे; अहो, कारण आमचा इतिहासच तसा सोनेरी आहे, कारण आम्हाला वारसाच तसा लाभला आहे! रक्तात आहे ते दिसणारच ना मग! आज गरज आहे ती प्रेरणेची, एका योग्य दिशेची. आम्हाला काही प्रश्न पडले, कशी सापडेल हि दिशा? सामान्यातल्या अती सामान्या मध्ये सुद्धा एक वेगळेपण असते, त्याच्या मधे सुद्धा काही तरी करण्याची जिद्द असते, कसा मिळेल त्याला वाव? कशी मिळेल त्यांना काही तरी करण्याची संधी ? सगळी कडे अंधार असतांना कोण देईल त्यांना प्रकाश? सगळ राष्ट्र एकाच दिशेला पळतंय, बरं ती दिशा चूक की बरोबर हे तरी कुणी पडताळून पाहताय का? आम्ही प्रगती करत आहोत की इतर काही? आम्ही म्हणतो आकडेवारी नुसार राष्ट् प्रगती करत आहे. आम्हाला फक्त एका प्रश्नाच उत्तर द्या, होय तुम्हीच, तुम्हा जसा समाज आणि जस राष्ट्र हव आहे, ते हेच का? आकडेवारीला विरोध नाही पण शेवटचा माणूस सुखी आहे का? नसेल तर का नाही ? [कुणी म्हणत असेल- "होय, शेवटचा माणूस सुखी आहे", तर यजमान आपण खोट बोलत आहात! घरा बाहेर पडा एकदा!] आणि या सर्वांचे उत्तर शोधतांना कुठे तरी मनात येऊन जाते-

अंधार होत चाललाय दिवा पाहीजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे॥
आता, शिवबाच का? हा प्रश्न कुणाला जर पडला असेल तर, कृपया एक लक्षात ठेवा शिव-चरित्रा सारखा धगधगता दीपस्तंभ आपल्या समोर असतांना आपल्या सारख्या तरुणांना इतरत्र भटकण्याची गरज नाहीये. जगाच्या पाठीवर जिजाऊ, शिवबा आणि संभाजी सारखे व्यक्तिमत्व आपल्याला सापडणार नाही. आपल्याला ह्याचा अभिमान असला पाहिजे; त्यांचे चरित्र आमच्या मनावर कोरले गेले पाहिजे. जीवनाच्या वेगवेगळ्या प्रसंगांना कसे तोंड द्यायचे ह्याचे जातिवंत उदाहरण म्हणजे शिव चरित्र! कोलंबस किंवा सिकंदर ह्यांचा आम्ही आदरच करतो; पण, जेंव्हा आपण आदर्शासाठी प्रत्येक वेळी परकीयांकडे बघतो तेंव्हा काही ओळी आठवतात:

कशास हवा तूम्हा सिकंदर,

कशास हवा कोलंबस,

छ्त्रपतीला स्मरा एकदा, अरे छ्त्रपतीला स्मरा एकदा;

अन् बघा, तुम्हिच हो सिकन्दर, अन् तुम्हिच हो कोलम्बस, तुम्हिच हो कोलम्बस!


इतिहास हा नुसता पाठ्यपुस्तकाचा भाग न राहता तो आमच्या रक्तामध्ये भिनला पाहिजे. सामान्यांना तो आपला वाटला पाहिजे. खोटा अभिमान, स्वार्थी बाणा, आणि पोकळ गप्पा याला कुठल्याही प्रकारे महत्व द्यायला नकोय. प्रत्येकाने थोडेसेच पण काही तरी करावे, भले ते कुठेही असो. आपण ज्या समाजामध्ये राहतो त्याप्रती आपले काही कर्तव्य आहे. आज ही स्वातंत्र्य शेवटच्या लोकांपर्यंत पोचले नाहीये, गरीब श्रीमंत ही दरी वरचेवर वाढत चालली आहे. समाजामध्ये "बळी तो कान पिळी" हि भावना वाढत चालली आहे. खाली असणारा आज सर्व बाजूने दाबला जात आहे. हे चांगल्या समाजाच्या निर्मितीचे लक्षण नाहीये. विचार करा, तुमच्या मुलाला तुम्हाला हव ते शिक्षण द्यायचे आहे, देता येईल? हवा तो व्यवसाय करायचा आहे, करता येईल? समजा त्याला राजकारणात जायचे आहे, सोप्पा आहे का ते? आर्थिक आणि सामाजिक प्रगतीचे काही अंशी का होईना फक्त दिखाऊ-उच्चांक आपण गाठत आहोत. पटत नसेल तर, वरील काही प्रश्नांना एकदा खरी-खुरी उत्तरे देऊन पहा.
ही परिस्थती बदलण्याची गरज आली आहे आणि त्यासाठी गरज आहे अशी भावना बाळगणाऱ्या, ही भावना समजणाऱ्यानी एकत्र येण्याची! थोडे थोडकेच असले तरी चालती, पण प्रयत्न करणारे असावेत. अशा युवकांना आमचे आवाहन आहे- एकत्र या! काही तरी करण्याची हीच भावना आपल्या सर्वां मध्ये एक नाते निर्माण करते आहे. कुठे काही चांगले होत असल्यास पुढे होऊन अशा प्रवृत्तींना प्रोत्साहन द्या. कुठे काही चूक घडत असल्यास त्याच्या आड येण्याची हिम्मत ही ठेवा. तुमच्यासारखे या जगात खूप आहेत आणि नक्कीच तुमच्यासोबत उभे राहतील. आपले विचार प्रकट करा, त्या विचारांना आचरणात आणा, आपल्या स्वतःची आणि आपल्या समाजाची निर्मिती अथवा विकृती ही आपल्याच हाताने होत असते. बदल घडलाच पाहिजे आणि तो आपणच घडवायचा आहे. कदाचित प्रश्न पडत असेल की मीच का आणि आत्ताच का? तर, एक लक्षात ठेवा- तुम्ही नाही तर कोण? आणि आता नाही तर कधी?
जिजाऊ.कॉम आपल्याला एका स्वतंत्र आणि स्वाभिमानी विचारांच्या चळवळी साठी आवाहन करते आहे. आपल्या सर्वांना एकत्र बांधण्याचा प्रयत्न करत आहे. या साठी गरज आहे आपल्या सहकार्याची. आम्हाला मान्य आहे, ही तर या कार्याची फ़क़्त सुरुवात, पण हाती घेतलेले हे कार्य आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत प्रामाणिकपणे पुढे नेत राहू हा विश्वास तुम्हाला आम्ही देऊ इच्छितो. एका सुखी संपन्न आणि प्रगत महाराष्ट्राचे आणि देशाचे स्वप्न साकारण्या साठी जिजाऊ.कॉम ची आपल्या सर्वांना ही भावनिक साद- काही करा आणि कुठे ही करा, पण करा. ज्याने राष्ट्र घडेल!
जिजाऊ मा साहेब ह्यांच्या ह्या जन्मदिनी त्यांना कोटी कोटी प्रणाम! त्यांनी आम्हाला एक इतिहास दिला, आम्हाला आमची एक ओळख दिली, आम्हाला शिवबा दिला, आम्हाला त्यांच्या काळजाचा तुकडा म्हणजे त्यांचा शंभू बाळ दिला, आज आम्ही काय देणार त्यांच्या ह्या महाराष्ट्राला?
आपण प्रत्येकजण त्यांना एक वचन देऊ - ''राष्ट्राच्या निर्मितीचे कार्य माझेच आहे अस समजेन आणि तिच्या साठी मला शक्य होतील ते आणि शक्य होईल तिथे प्रयत्न करेल. चांगले बदल घडवेल आणि त्यांची सुरवात माझ्यापासून करेल".
हे आई जिजाऊ, आम्हास ते बळ दे, तो आशीर्वाद दे!

जय जिजाऊ ! जय शिवराय !!

-जिजाऊ.कॉम परिवार
www.jijau.com


सदर कार्यात सहभागी व्हा, तुम्ही आमच्या पाठीशी नव्हे तर सोबत रहा. समविचारी लोकांना एकत्र करण्यसाठी आणि राष्ट्र निर्मितीत या नव्या लोकशाही मार्गाने जिजाऊ.कॉम च्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत. लोकसहभागाशिवाय आम्ही अपूर्ण आहोत. कारण हा शिवधनुष्य आमच्या एकट्याने पेलणे फार अवघड आहे. कृपया नोंदणी करा आणि आपल्या मित्रांना ही नोंदणी करण्यासाठी सांगा, आणि आज जिजाऊ जयंती निमित्य एक लाख नोंदणीचे उदिष्ट पूर्ण करण्यास मदत करा.
नोंदणी साठी कृपया भेट द्या: http://www.jijau.com/you-can-contribute/callforcontent/नोंदणी



Thursday, January 7, 2010

मराठवाडा जनविकास परिषदेची स्थापना

१६ जानेवारी रोजी ठाण्यात बैठक
‘लोकसत्ता’
ठाणे/प्रतिनिधी
संतांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मराठवाडय़ातून नोकरी, व्यवसायानिमित्त ठाणे जिल्ह्यात येऊन वास्तव्य करीत असलेल्या रहिवाशांच्या सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक उत्थानासाठी ‘मराठवाडा जनविकास परिषद’ या नावाने सामाजिक संस्था स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय बुधवारी येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एस.एम. टोम्पे यांच्या अध्यक्षतेखाली येथे ही बैठक झाली. ठाणे महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.आर.टी. केंद्रे, जिल्हा रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.ए.बी. नांदापूरकर, ‘लोकसत्ता’चे सहसंपादक राजीव कुळकर्णी, जिल्हा प्रतिनिधी सोपान बोंगाणे, डॉ. अविनाश भागवत, डॉ. राहुल कुलकर्णी, डॉ. संतोष कदम आणि विविध विभागात सेवा बजावत असलेले अन्य वरिष्ठ शासकीय, निमशासकीय अधिकारी व इतर मान्यवर बैठकीला उपस्थित होते.
मराठवाडय़ातील औरंगाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद, जालना व लातूर या आठ जिल्ह्यांतील मूळ रहिवासी असलेले हजारो नागरिक नोकरी, व्यवसायानिमित्त ठाणे जिल्हा व परिसरात राहतात. अनेक जण शासनाच्या विविध खात्यात वरिष्ठ अधिकारी आहेत, तर पत्रकारिता, कला, साहित्य, शिक्षण, न्यायपालिका , वैद्यकीय अशा अनेक क्षेत्रात काम करणारे नागरिकही ठाणे जिल्ह्यात वास्तव्य करीत आहेत, परंतु त्यांचा एकमेकांशी परिचय नाही. या प्रत्येकाच्या मनात आपल्या जन्मभूमीबद्दल काही तरी करण्याची इच्छा आहे. मराठवाडय़ाचा परिसर अजूनही आर्थिकदृष्टय़ा मागासलेला आहे.
उद्योग, व्यवसाय, पाणी, रोजगार या अभावी मराठवाडय़ाची ससेहोलपट सुरू आहे. त्यातून अनेक लोक ठाणे, मुंबई भागात स्थलांतरित झाले आहेत. त्यांच्या दैनंदिन जीवनातही अनेक समस्या आहेत. या नव्या संस्थेच्या माध्यमातून सर्वांनी एकत्र येऊन या समस्यांना स्पर्श करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे डॉ. टोम्पे यांनी सांगितले.
ठाणे जिल्ह्यात विखुरलेल्या मराठवाडय़ातील लोकांनी एकत्र येण्यासाठी येत्या १६ जानेवारी रोजी ठाणे येथे एका बैठकीचे आयोजन करण्यात आले असून, या बैठकीत ‘मराठवाडा जनविकास परिषदे’च्या कामाची पुढील रूपरेषा व दिशा निश्चित केली जाणार आहे. त्यामुळे या महत्त्वाच्या बैठकीला मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
तपशीलासाठी डॉ. नांदापूरकर- ९४२२५७३६७८, सोपान बोंगाणे- ९९८७५५९३५५, डॉ. संतोष कदम-९८२०२४५५२६, डॉ. भागवत- ९२२६१०५९७७ या दूरध्वनिवर अथवा vidya_kadam@hotmail.com , ashok.nandapurkar@gmail.com या ई-मेलवर साधावा।

अमोल सुरोशे नांदापूरकर

थ्रीच नाही, अनेक इडीयट आहेत या देशात!

कृषी क्षेत्रातील तीन वेडे [थ्री इडीयट]; शेतीतील प्रश्नांना आपल स्वतःच उत्तर दिलय या तीन युवकांनी. इतरांना नक्की प्रेरणा मिळावी आणि नाविन्यपूर्ण प्रयोगांना चालना मिळावी यासाठी, हा व्हीडीओ इथे देत आहोत. उद्या  तुम्हाला कृषी प्रश्नावर नवीन काही ही सुचल तर नक्की कळवा team@jijau.com, amol.suroshe@gmail.com, pbpimpale@gmail.com ला . त्या कार्याला जिजाऊ.कॉम वर नक्की प्रसिद्धी देऊत आणि तुमचे संशोधन इतरांपर्यंत पोहचवूत.
अशा संशोधकांनी आपली संशोधने या [http://www.nif.org.in/] शासकीय संस्थेकडे पाठवावीत, म्हणजे त्यांचा उचित गौरव ही केला जाईल. भारत सरकार ने अशा इनोव्हेटोर साठी एक धोरण ही बनवले आहे.

आय आय एम-अहमदाबाद चे  अनिल गुप्ता ही अशा संशोधकांच्या शोधता असतात: http://www.iimahd.ernet.in/~anilg/
http://www.indiainnovates.com/





विशेष आभार: रोहन पाटील


आणि नक्की भेट द्या: www.jijau.com

Monday, January 4, 2010

भारतातील `इंडिया' - - डॉ.दता पवार, तरुन भारत १२ मे, १९९३

माझा एक मित्र अमेरिकेत राहतो. त्याने एकदा आपल्या मुलीला भारतात पाठविले. भारत पहायला. आपला देश कसा आहे, आपला गाव कसा आहे, तेथील लोक कसे आहे, निसर्ग कसा आहे, नद्या कशा आहे, वगैरे अनेक गोष्टी तिने पहाव्यात अशी त्याची इच्छा होती. मुलगी दहा बारा वर्षांची, अमेरिकेत शिकलेली, वाढलेली. विमानातून मुंबईत उतरली. काही दिवसांनी आमच्या गावी आली. काही दिवसताच कंटाळी. कोणकोणत्या गोष्टी तिला आवडल्या नाहीत, हे मी सांगण्याची गरज नाही. आपण कल्पनेने सहज ओळखू शकाल.
पण महत्त्वाची बाब होती ती म्हणजे भाषा. तिला मराठी बऱ्यापैकी येत नव्हती त्यामुळे तिचा कोंडमारा झाला होता. तिच्या अनेक शंका होत्या. त्यांचे निरसन करणे मला कठिण जात होते. एकेदिवशी तिने `म्हैस अशी असते'? असा प्रश्न विचारला आणि आश्चर्य व्यक्त केले. `आम्ही चहासाठी दूध वापरतो, ते याच म्हशीचे ', असे जेव्हा मी तिला सांगितले तेव्हा ``शीऽऽ'' असा उद्‍गारच तिच्या तोंडून बाहेर पडला. शिवाय तिचे तोंड पहाण्यासारखे झाले होते.
``अंकल, असल्या घाणेरड्या, काळ्या , डर्टी प्राण्याचे दूध तुम्ही चहासाठी वापरता? म्हणजे मी जो आतापर्यंत चहा पीत होते त्या चहात या प्राण्याचे दूध घालीत होता?'' असे तिने एका मागोमाग अनेक प्रश्न विचारले. आपण असला चहा यापुढे पिणार नाही. तिने असा निश्चय का करू नये? अमेरिकेत तिने दूध देणारी म्हैस पाहिलीच नव्हती; तिचा काय दोष? तिचे जग वेगळे होत. पाश्चात्य संस्कृतीतले, साठ सत्तर वर्षे आमच्यापुढे असलेले. शिवाय तिच्या आईवडिलांनी तिच्यामनात स्वदेशाबद्दल स्वाभिमान. प्रेम निर्माणच केले नसेल तर तिचादोष काय? आपण भारतीय लोक स्वदेशाबद्दल, स्वसंस्कृतीबद्दल कितीसे भरभरून बोलतो, कितीसए जिव्हाळ्याचे बोलतो? त्या मुलीने मात्र मला विचार करायला लावले.
माझे मन `इंग्रजांच्या' नव्या संस्कृतीविषयी विचार करू लागले. आम्हा भारतीयांना परक्यांच्या गोष्टी फार आवडतात. इंग्रजांची भाषा आपल्याला मोहिनी घालते की नाही? ही एकच गोष्ट अशी आहे की, या देशातले भलेभले तिच्या प्रेमात पडले आनि प्रेमासाठी मेल. श्रीकृष्णाने पूतना मावशीला मारले ही एक पुराणातली गोष्ट. इंग्रजी भाषा ही आपली मावशी आहे, असा अनेकांचा समज आहे. आजचे श्रीकृष्ण `आई मरो अन्‌ मावशी जगो' असेच म्हणतात. मागील शतकात विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी याच मावशीला डोक्यावर घेतलेहोते. इंग्रजी भाषा म्हणजे वाघिणीचे दूध म्हणून तिचा गौरव केला होता. तो गौरव आजही चालू आहे. किंबहुना या मावशीबद्दलचे लोकांचे प्रेम वाढतच आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे पीक वाढत आहे. वाढो बापडे. भारतात `इंडिया' नावाचा देश आहे. त्या देशातील लोकांना इंडियन्स्‌ म्हणतात. तेही स्वतःला इंडियन्स्‌ म्हणवून घेण्यात धन्यता मानीत असतील तर इतरांनी बोटे का मोडवीत? तेली का तेल जले, मशालजीका जी जले! इंडियातले हे तेली आणि मशालजी एकच आहेत.
विष्णुशास्त्री चिपळूणकर खरा थोर माणूस, मराठी भाषा ही त्यांना एखाद्या चिखलात बसलेल्या, रूतलेल्या म्हशीसारखे वाटली असेल काय? तसे म्हणावे तर कठीण. कारण पुन्हा ते स्वतःला मराठीचे शिवाजी म्हणवत असत. आपण भारतीय लोक एकदम हुशार. `परभाषा' `स्वभाषा' करून घेण्यात केवढं औदार्य दाखवितो? आता तर इंग्रजीसारख्या भाषेशिवाय आणकी एकादी भाषा जगात असू शाकते, यावर या मंडळींचा विश्वासच नाही. त्यांची नैतिकता एवडी उंचावली आहे की बोलून सोय नाही.
जगाच्या पाठीवर स्वभाषा नसलेला देश म्हणजे भारत. असे का? आक्रमकांची भाषा स्वीकारायची ही इतल्या शासकवर्गाचा नित्याचा नियम आहे. शासक हे सत्तेचे महत्त्वाचे स्थान बाळगून असतात. त्यांनी स्वतःच्या स्थानांपलीकडे देशाला काही स्थान आहे, स्वभाषेला काही स्थान आहे, असे का मानावे? असे मानल्यामुळे आपल्या पदरात असे काय मोठे पडणार आहे? स्वतःचा देश नसलेले लोक, स्वतःची भाषा नसलेले लोक, स्वतःची संस्कृती नसलेले लोक, असे आम्हाला कोणी हिणविले म्हणून आमचे काय वाकडे होणार आहे? आपण नित्यनियमाने वाघिणीचे दूध पीत राहू या! लोकांना काय वाटते, याचा विचाअ करण्याचे कारण नाही.
निर्लज्ज माणूस सदासुखी असतोच का नाही? आपण अकारण `इंडिया'चा उद्धार करीत राहतो. भारत हा काही `इंडिया पेक्षा मोठा नाही. `ब्रिटीश' `इंडियन' सरकारचा विजय असो.
रशियात झालेल्या एका भाषापरिषदेच्या निमित्ताने सुप्रसिद्ध लेखिका श्रीमती मालतीबाई बेडेकर यांनी एक आठवण सांगितली होती. ती मोठी मार्मिक आहे. भारतातील विविध भाषा बोलणाऱ्या लेखककवींना या परिषदेला आमंत्रित करण्यात आले होते. परिषद संपली तेव्ह सर्व भारतीय कविलेखक एकत्र आले आणि इंग्रजीत बोलू लागले. तेव्हा तेथे उपस्थित असलेल्या एका रशियन लेखकाने त्यांना विचारले, ``तुमच्या देशाला स्वतंत्र भाषा नाही काय? तुम्ही सारेजण इंग्रजीसारख्य़ा परकीय भाषेत का बोलता? ही तर तुम्हांला, तुमच्या देशाला गुलाम करणाऱ्या देशाची भाषा!'' हे ऐकून सर्व भारतीय कवि, लेखक निरूत्तर झाले होते. आमचे चेहरे बघण्यासारखे झाले होते, असे मालतीबाई बेडेकरांनी सांगितले.
आम्हाला आमच्या भाषेत बोलायला कमीपणा वाटतो, हे त्याचे कारण असेल का? मग रशिया, फ्रांस, जपान, चीन या देशांचे पंतप्रधान आमच्या देशात आल्यावर आपापल्या भाषेत का बोलतात? त्यांना कमीपणा वाटत नाही काय?
मुंबईच्या एका संस्थेत रशियन भाषा शिकविण्याचे वर्ग चालतात. तेथे मी कधी कधी जात असे. एकदा एका मुलीला सहज गमतीने प्रश्न विचारला.
`काय ग, तू रशियन का शिकतेस?'
`रशियाचं आपल्या देशावर कधीकाळी राज्य आलं तर चटकन नोकरी मिळेल!' असं त्या मुलीन उत्तर दिलं होतं. या तिच्या उत्तरात भारतीय मनोवृत्तीचं प्रतिबिंब उमटलं आहे. मी आजही विद्यार्थ्यांना विचारतो की तुम्ही कशासाठी शिकता? तेव्ह त्यांचं उत्तर `नोकरीसाठी' शिकतो, असंच असतं. मुलांच्या आईवडीलांची मनोवृत्ती त्यांच्या मनोवृत्तीत प्रवर्तीत होते हे याचे कारण आहे.
इंग्रजी माध्यमाच्या शाळा कशासाठी काढता? असा जेव्हा प्रश्न विचारला जातो, तेव्हा या प्रश्नाचेही उत्तर `नोकरी' हेच असते. आईवडिलांनी `नोकरी'चा एवढा धसका का घ्यावा, याचे आश्चर्य वाटते. `मी ज्ञानासाठी शिकतो' `ज्ञान विचाअ करायला शिकविते,' म्हणून शिकतो' असे कोनीही उत्तर देत नाही. `भाकरी आणि भाकरी' मिळविणे एवढाच माफक विचार आमच्या शिक्षणात आहे. उच्च दर्जाची नोकरी फक्त इंग्रजी माध्यमाच्या शाळेत गेल्यामुळेच मिलते हा लोकांचा समज आहे. आणि तो त्यांनीच पसरविलेला आहे. भारतातील हे इंडियन लोक धन्य होत. याला विनाशकाले विपरीत बुद्धई म्हणता येईल. समाजातील `महाजन' ज्या वाटा मिळतात, त्याच बरोबर असतात, असे चित्र नेहमी दिसते, नव्हे समजले जाते. ते करतात तेच बरोबर अशी धारणा होते., नव्हे असते.
शिवाय अशा शाळांत राष्ट्रीय एकात्मता फार लवकर येते. राष्ट्रीय एकात्मतेच्या प्रचाराची नव्याने गरज भासत नाही. फक्त हवा तो भरपूर पैसा इंग्रजी माध्यमाची शाळा किंवा कॉन्व्हॅट स्कूल म्हणजे प्रतिष्ठेची केंद्रे. एरव्ही ज्यांना फी भरणे परवडत नाही तेही या शाळांत आपल्या मुलांना घालतात, फी भरतात, म्हणेल ती फी किंवा मागाल ती फी विना तक्रार भरण्याची तयारि दाखवितात. बाकी `नेटीव्ह' लोकांच्य शाळा नेट लावून चालवायच्या, तेथे पाच रुपये मदत करा म्हटले तरी लोक नाराज होतात. पैसे नसतात. ते तरी काय करणार? गुलामच ते.
`मटक्याचा' धंदा करणाऱ्यांची मुले आणि `झटक्याचा' धंदा करणाऱ्यांची मुले अगदी शेजारी- शेजारी बसू शकतात. `पॉकेटमार' किंवा `काळाबाजार ' करणाऱ्यांची मुले सुद्धा शेजारी शेजारी बसु शकतात. धर्म, भाषा, प्रांत, वर्ण यांच्या भिंती कोसळतात. अगदी सरकारी क्लासवन ऑफिसरचा मुलगा आणि त्याच्याच शिपायाची मुलगी शेजारी शेजारी बसु शकतात. डॉक्टर, वकील, व्यापारी या सर्वांनाच वाटते की इंग्रजी भाषेची चलती आहे. नोकरी, चाकरी मिळवून देणारी ती गुरूकिल्ली आहे. इंग्रजांच्या राज्यावर अजूनही सूर्य मावळत नाही हेच खरे आहे. आपण आजही इंग्लडंच्या राणीचा राज्यकारभार तर सांभाळीत नाही ना? पुन्हा जर इंग्रजांचे राज्य आलेच तर अडचण नको. आयतीच भाषा उपयोगी पडेल.
साहित्य, सर्व प्रकारच्या कला, थोरांची चरित्रे ही तर ज्ञान संपादनाची, संस्कृतीच्या संवर्धनाची, अभ्यासाची साधने. यांचे पुढे काय होणार? ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ, रामदास यांचे काय करणार? आधुनिक कविलेखकांनी निर्माण केलेल्या साहित्यसंपदेचे काय होणार? कॉमिक्सच्या चाऱ्यावर वाढणारी ही मुले पुढल्या आयुष्यात `ढिशॉंनऽऽ ढिशॉंनऽऽ' च्या वाटेने तर जाणार नाहीत ना? शिवाय आमची मुले मराठी म्हशींचे दूध पिऊन वाघाची डरकाळी कशी फोडणाअ? `काहीही होवो, तुम्हांला या उठाठेवी हव्यात कशाला?' असा माझा आतला आवाज मला अलीकडे सतावू लागला आहे.
                          --डॉ.दता पवार, तरुन भारत १२ मे, १९९३

सौजन्य : http://www.tarunbharat.com/
विशेष आभार: रवींद्र पवार

[सदर लेख ए-मेल द्वारे मिळालेला आहे ]

Sunday, January 3, 2010

क्रांतीज्योती सावित्री बाई फुले जयंती निमित्य हार्दिक शुभेच्छा ....

स्त्री शिक्षणासाठी आपले संपूर्ण आयुष्य कारणी लावलेल्या .. आधुनिक जगतातील साक्षात सरस्वती म्हणजेच क्रांतीज्योती सावित्री बाई फुले.
आपल्या भारत देशातील मुलींसाठीच्या पहिल्या शाळेच्या पहिल्या महिला शिक्षिका म्हणून आपल्या कार्याची सावित्री बाईंनी सुरुवात केली .. आणि आज याच सावित्रीच्या लेकी पुरुषाच्या खांद्याला खांदा लाऊन समाजा मध्ये एक एक गड सर करतांना आपल्याला दिसत आहेत .. कोटी कोटी प्रणाम त्या सावित्री मातेला ... आणि त्यांच्या महान कार्याला.

बाईपणाचे दु:ख काय असते?
मी तुमच्यापेक्षा जास्त भोगलेय.
आरशात पाहून सांगा,
मी सावित्रीच्या शब्दाला जागलेय?
तकलादू आणि भंपक
स्त्रीमुक्तेची नशा
तुम्हांला आज चढली आहे.
कपडे बदलेले की,
पुरोगामी होता येते,
ही फॅशन तुम्ही पाडली आहे.
शिकली सवरलेली माझी लेक
संस्कृतीच्या नावाखाली
नाकाने कांदे सोलतेय..
होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय.....
(पूर्ण "http://suryakantdolase.blogspot.com/2010/01/blog-post_4960.html")
साभार सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)..

अधिक माहिती साठी ..
http://en.wikipedia.org/wiki/Savitribai_Phule

शुभेच्छुक ..
जिजाऊ.कॉम परिवार (www.jijau.com)