Tuesday, November 29, 2011

हल्ले, आंदोलन, राष्ट्र आणि राजकारण ....

शरद पवार यांच्यावर झालेल्या हल्ल्याला एक वेगळाच रूप आलेल दिसतंय. सरळ पाहता तो हरविंदर का कोण वेडा वाटतोच. पण त्याच्या कृत्याने समाज जागा झाला आहे आणि एकदम क्रांती होणार आहे अशा भ्रमात जे आहेत किंवा जे क्रांती सदृश्य परिस्थिती असं याच वर्णन करतात त्यांनी कृपया याचा विचार करावा की खरचच अस कृत्य म्हणजे महागाई किंवा इतर गोष्टींचे सोल्युशन आहे का? 
मला सत्ताधारी पक्ष किंवा शरद पवार यांची पाठराखण करायची नाही किंवा कुणाला विरोधही करायचा नाही. पण राष्ट्राच्या हिताच काय ते सांगण्यपेक्षा विरोधी पक्ष आयत्या बिळावरचा नागोबा होत आहे. बरं त्यांना ही बाजूला ठेवले तर ज्यांना अस वाटतेय की हा हल्ला योग्य होता, जनतेचा रोष होता, तर त्यांना मला हे सांगावस वाटतेय की बाबांनो या देशात रोष याव्यात अशा घटना रोजच होत आहेत आणि कदाचित अनेक शतकां पासून होत आहेत. समाजातला गरीब आणि दलित वर्ग इतका छळला जात होता आणि जातोय आणि त्याच कारण काही परकीय शक्ती किंवा अंतराष्ट्रीय धोरण वगेरे नव्हते. ते होते आणि आहेत आपलेच सामाजिक आणि आर्थिक गटातील स्वार्थी वरचे गट. मग त्या खचलेल्या आणि त्रस्त वर्गांनी कधी यांच्यावर लाथाबुक्क्यांनी किंवा तलवारीने वार केले का? आणि कुणी तशी परिस्थीच नव्हती अस म्हणत असेल तर क्षमा करा पुढे आपण वाचू ही नका कारण तुम्हाला ते समजणार ही नाही. 
हे हल्ले करणारे माथेफिरू आणि व्यवस्था बदलण्यासाठी इच्छुक असणारे क्रांतिकारी यांच्यात फार फरक असतो. राजकारण्यांनी या राष्ट्रात खूप चुका केल्यात, पण या राष्ट्राच स्वातंत्र्य ही अबाधित आहे त्यांच्या मुळेच आणि हा गाडा चालतोय त्यांच्या मुळेच. आता त्या चुकांचं खापर फक्त त्यांच्यावर फोडून वाल्ह्या कोळ्याच्या कुंटुंबा सारखं करत आहोत आपण. भारत पारतंत्र्यात होता तोवर हिंसक आणि अहिंसक सगळेच मार्ग राष्ट्रासाठी चांगले होते. पण जेंव्हा आपण स्वतंत्र झालो त्या नंतर मतदान आणि लोकशाही नावाची खूप मोठी हत्यारे आपल्या हातात दिली गेली. 
पण त्यांचा वापर न करता आपण नको त्या मार्गाने आपल्याच निर्वाचित शासनाला गुन्हेगाराच्या कठडीत उभं करून नग्न करत आहोत. म्हणजे आंदोलन करायचेच नाही का? - तसं नाही आंदोलन करायचे, पण शासनाला वेठीस धरण्यासाठी नव्हे तर लोक जागृती साठी. मग ते राजकीय पक्ष काढून का असेना किंवा मग न काढता का असेना. कारण या मार्गाने प्रश्न मुळापासून सुटेल आणि चिघळत जाणार नाही. कारण सध्य प्रकारच्या आंदोलनाने राजकीय जमातीची इतकी अब्रू गेली आहे की राजकारणी व्हायला आणि सरकारी कर्मचारी व्हायला ही कदाचित पुढच्या पिढ्या दहादा विचार करतील आणि पुन्हा अक्षम आणि समाजाची जाण नसणारे इथे राज्यकर्ते बनतील, अशी भीती आहे. उलट प्रकार तर असा व्हावा की राजकारणाबद्दल तरुण पिढीत फक्त जागृती नको तर आवड निर्माण व्हावी - कारण लोकशाहीत प्रत्येकजण राज्यकर्ता असतोच की. आणि एकदाका तशी लाट आली की मग समाजातील योग्य ती लोके बरोबर राज्यकर्ते बनतील. पण लोकशाहीला मारक हा घृणास्पद खेळ थांबवायला हवा.
राष्ट्र निर्माण ही फक्त शासनाची जिम्मेदारी नाहीच, एक सुदृढ समाज व्यवस्था निर्माण करणे ही ही शासनाची जिम्मेदारी नाही, ती आहे फक्त आणि फक्त आपली. विचार करणारी डोकी निर्माण करणे आणि त्या डोक्यांना विचार करायला चांगले विचार देणे हे राष्ट्रातील प्रत्येक सुजाण नागरिकाचे काम आहे नव्हे त्याला हे बंधनकारक आहे, नसता मग त्याला पुन्हा हे राष्ट्र अस का आहे अस म्हण्याचा हक्क माझ्या मते तरी नाही. सध्या जे होतेय ते म्हणजे निवडणुकीच्या वेळेस- "अरे वेळ नाही असल्या फालतू गोष्टी साठी मला" -आणि जेंव्हा स्वतःला कुठे तरी आपल्या आळसाचा फटका बसतो तेंव्हा - "अरे कुणी निवडून दिली असली फालतू लोक इथे" - अशी ओरड. अशांना माझा सल्ला -  जा आणि जाऊन बघा किती लोक उभी आहेत आपल्या मतदार संघात, किती अपक्ष वेड्या सारखी दर वेळी जनता आता जागेल उद्या जागेल म्हणून उभी असतात. बर फक्त ते निवडून आले तर एका दिवसात प्रश्न सुटेल का ? तर नाही. कुणी ही निवडून आला तर प्रश्न एका दिवसात सुटणार नाही. पण समाजात एक आशा मात्र येईल की बदल घडू शकतो. आणि सध्या जी आशा निर्माण झाली ती खरं तर पूर्णतः समाजाची आशा मारणारी आहे. आंदोलन यशस्वी झाले तर आनंदच, पण पुढे १० वर्षा नंतर राष्ट्र कुठे असेल याची मला भीतीच वाटते. भ्रष्टाचार तर जायलाच हवा आणि तो एक मोठा शत्रू ही पण मार्ग... असो. 
सुजाण समजून घेतील!

जय हिंद!
                                                                                                           - प्रकाश पिंपळे     

1 comment:

Chetan Pagar said...

सुजाण समजून घेतील!
जय हिंद!

Post a Comment