Friday, November 18, 2011

बापुसाहेबां बद्दल त्यांच्या एका मित्रा कडून .....

बापूसाहेबांच्या निधनाचे वृत्त समजले. अलीकडेच झालेल्या आम्हा उभयतांच्या भेटीत त्यांच्या प्रकृतीचा अंदाज आला होता. उपचारासाठी त्यांना मुंबईत आणले होते. माझा वाढदिवस 12 डिसेंबर व माझ्या पत्नीचा 13 डिसेंबर आहे. बापू मुंबईत हॉस्पिटलमध्ये होते. 12 नोव्हेंबरला मला व प्रतिभाला उभयतांच्या वाढदिवसासाठी, 12 व 13 डिसेंबरसाठी अभीष्टचिंतनाचे पत्र बापूसाहेबांकडून आले. त्यांनी हे पत्र महिनाभर आधीच का पाठविले याचा मी विचार करत होतो. 12 डिसेंबरपूर्वी बापूसाहेब निघून गेले. कदाचित आपण नसू याचा अंदाज व खात्री त्यांना असावी; म्हणून जाण्यापूर्वीच आम्हा उभयतांचे त्यांनी अभीष्टचिंतन केले असावे. 

1967 मध्ये मी बारामतीहून व बापूसाहेब लातूरहून असे दोघेही महाराष्ट्र विधानसभेत आलो. बापूसाहेबांनी राज्याचे सहकारमंत्री केशवराव सोनावणे यांचा पराभव केला होता. मीसुद्धा एका साखर कारखान्याच्या धनाढ्याचा पराभव केला होता. मी सत्ताधारी कॉंग्रेस पक्षाचा सदस्य, तर बापूसाहेब विरोधी समाजवादी पक्षाचे सदस्य. पण आमची मैत्री विधिमंडळाच्या पहिल्या अधिवेशनातच झाली. बापूसाहेब उत्तम वक्ते होते. फार थोड्या कालावधीत वैधानिक कार्यात त्यांना मान्यता मिळाली. विधानसभेचे अधिवेशन असो किंवा राष्ट्रकुल संसदीय दलाची बैठक असो, मी आणि बापूसाहेब कायम बरोबर असायचो. पुढील निवडणुकीत बापूसाहेबांनी मतदारसंघ बदलला. मात्र, त्यांना त्या निवडणुकीत यश आले नाही. त्यांच्याविरुद्ध अंबेजोगाई पंचायत समितीचे सभापती बाबूराव आडसकर यांनी निवडणूक लढवली. बापूसाहेब उत्तम वक्ते असल्याने त्यांच्या भाषणाला उपस्थिती चांगली असायची. पण मतदारसंघातील विकासाची कामे करण्याचा अधिकार पंचायत समितीच्या सभापतींकडे असायचा. त्याचा फायदा श्री. आडसकरांना झाला. कोणत्याही खेड्यात गेले की श्री. आडसकर लोकांना विचारायचे आणि जाणवून द्यायचे, ""तुझ्या गावचा रस्ता कोणी केला? म्या केला. तुझ्या गावाला पाणी कोणी दिलं, म्या दिलं.'' ही प्रचाराची पद्धत. ""कामाला मत द्यायचे की उत्तम भाषणाला मत द्यायचे? उत्तम भाषण ऐकायचे असल्यास बापूसाहेबांचे भाषण मी गणपती उत्सवात ठेवेन. सबब मला मत द्या!'' अशा श्री. आडसकरांच्या प्रचाराच्या गमती बापूसाहेब आम्हाला हसून सांगायचे. 

1975 मध्ये देशात आणीबाणी जाहीर झाली. बापूसाहेबांनी जयप्रकाशजींच्या आंदोलनात पुढाकार घेतला होता. त्यांना अटक होऊन 19 महिने कारावासाची शिक्षा झाली. आणीबाणी संपली; बापूसाहेबांची सुटका झाली. जनता पक्षाची स्थापना झाली. सर्व आणीबाणीविरोधक जनता पक्षात एकत्र झाले. बापूसाहेबांनी औरंगाबादमधून लोकसभेची निवडणूक लढवून मोठ्या मताधिक्‍याने जिंकली. बापूसाहेब दिल्लीला आले. जनता पक्षाच्या नेतृत्वाची जबाबदारी चंद्रशेखर यांच्याकडे देण्यात आली होती. मोरारजीभाई देसाईंच्या नेतृत्वाखालील सरकार केंद्रात आले. बापूसाहेबांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळण्याची परिस्थिती होती; पण बापूसाहेबांनी मात्र चंद्रशेखर यांच्याबरोबर जनता पक्षाच्या सरचिटणीसपदाची जबाबदारी घेणे पसंत केले. ती जबाबदारी त्यांनी शेवटपर्यंत सांभाळली. पुढे राज्यसभेत बापूसाहेब आले, तेथेही उत्तम संसदपटू म्हणून त्यांचा लौकिक झाला. बापूसाहेबांचा पिंड राष्ट्र सेवा दलाच्या सैनिकाचा. सुरवातीच्या काळात बिहारला जाऊन जयप्रकाशजींबरोबर त्यांनी काम केले. महाराष्ट्र राष्ट्र सेवा दलाचे नेतृत्व अनेक वर्षे त्यांनी केले. 1980 मध्ये आम्ही मंडळींनी काढलेली जळगाव ते नागपूर शेतकरी दिंडी असो, की चंद्रशेखर यांची भारत यात्रा असो, कोठेही सामान्य माणसाच्या प्रश्‍नांसाठी संघर्ष वा कार्यक्रम यामध्ये बापूसाहेबांचा सक्रिय सहभाग होता. एस. एम. जोशी हे बापूसाहेबांचे श्रद्धास्थान. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या वेळी नामांतराला पाठिंबा दिल्याने बापूसाहेबांना फार यातना सहन कराव्या लागल्या, त्याची बापूसाहेबांनी कधीही खंत बाळगली नाही. परंतु औरंगाबादला एस. एम. जोशींना यातना सहन कराव्या लागल्या, याचे दुःख बापूसाहेबांना झाले. पुढे दिल्लीमध्ये संसदीय काम, पक्षाचे संघटनात्मक काम करताना, बापूसाहेब मराठवाडा विकासाच्या चळवळीत गोविंदभाई श्रॉफ, अनंत भालेराव यांच्या समवेत राहिले. पण या चळवळीच्या काळात महाराष्ट्राच्या ऐक्‍याच्या संदर्भात मात्र कधीही तडजोड केली नाही. 

दलित, शोषितांवरील अत्याचाराचे किंवा अधिकाराचे प्रश्‍न असोत, अशात बापूसाहेबांनी कधीही माघार घेतली नाही. राजकीय, सामाजिक चळवळीसाठी त्यांनी आयुष्याचा फार कालावधी घालवला. अखेरच्या काळात सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या कामाला त्यांनी वाहून घेतले. राज्यातील सर्व थरांतील शैक्षणिक प्रश्‍नांकडे त्यांनी लक्ष दिले. एक उत्तम सहृदयी मित्र, जिवाभावाचा सहकारी म्हणून बापूसाहेब आम्हा सहकाऱ्यांबरोबर होते. आम्हा दोघांचा पंचेचाळीस वर्षाचा स्नेहभाव होता. आम्हा दोघांचेही श्रद्धास्थान म्हणजे यशवंतरावजी चव्हाण व एस. एम. जोशी. एस. एम. यांच्या निधनानंतर बापूसाहेब फारच हळवे झाले. एस.एम. नाहीत हे त्यांना पटतच नव्हते. किशोर पवार, भाई वैद्य, मृणालताई गोरे अशांची संगत म्हणजे बापूसाहेबांचे टॉनिक होते. अखेरपर्यंत या सहकारी मित्रांच्या सार्वजनिक कामात बापूसाहेब रमत होते. सार्वजनिक जीवनात बापूसाहेबांसारखा निर्मळ मित्र, स्वच्छ राजकारणी, कौटुंबिक सलोखा जपणारा सहकारी मिळणे दुर्मिळ. सुधाताई व मुलींच्या दुःखाला कसा आवर घालावा हे काही समजत नाही. 
                                                                                         - शरद गो. पवार


सौजन्य: सकाळ  

1 comment:

सौ गीतांजली शेलार said...

खरोखर ग्रेट मैत्री ! असे होणे नाही आता .......

Post a Comment