Thursday, August 2, 2012

अण्णा - आत्ता खरं आंदोलनाला पाहिलं यश लाभलं !


अगदी दोनच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री वरून अण्णांना एक राजकीय पर्याय देण्यासंबंधी आवाहन करण्यात आले होते, आणि आज जंतर मंतर वरून अण्णांनी देशाला एक राजकीय पर्याय देण्यासंबंधी एक सकारात्मक पाऊल उचलले. सर्वात प्रथम अण्णांचे आणि त्यांच्या सहकार्यांचे अभिनंदन.

भ्रष्टाचार आणि भ्रष्ट व्यवस्थेला कंटाळून वर्षभरापूर्वी लाखो लोक अण्णांच्या पाठीशी उभे राहिले आणि बघता बघता लोकपाल कायद्यासाठी सुरु केलेले आंदोलन एक जन आंदोलन - चळवळ म्हणून बाळसे धरू लागले. भ्रष्टाचाराने पिचलेली जनता बघता बघता या चळवळी मध्ये सहभागी होऊ लागली, परंतु गेले काही दिवस सामान्य माणूस या आंदोलनापासून थोडासा दुरावला. याला अनेक कारणे आहेत, त्यापैकी एक म्हणजे देशातला सामान्य माणूस जो रोजी रोटीच्या चक्रामध्ये अडकला गेला आहे त्याला हे आंदोलन, उपोषण पेलवले नाही आणि तशी अपेक्षा करणे हि गैर. नेमके हेच घटनाकारांनी ओळखले होते आणि पुढील शेकडो वर्षांचा विचार करून या देशाला एका संविधानाच्या चौकटीत बांधले, याच संविधानाने सामान्यातल्या सामान्य माणसालाही एक हक्क दिला, आवाज दिला. हा देश कुठल्या प्रकारच्या  लोकांच्या हाती असावा हे ठरवण्याचा  हक्क दिला. त्यांचे जिव्हाळ्याचे प्रश्न कुणीतरी देशाच्या सर्वोच्च ठिकाणी मांडावेत आणि ते सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत म्हणून लोकशाही प्रदान केली. 

देशाला ६५ वर्षे झाली स्वतंत्र होऊन आणि देशातील अनेक घटकांचा आवाज संसदेमध्ये घुमू लागला, शेतकऱ्याचा, कामगारांचा, दलितांचा , अल्पसंख्याकांचा पण दुर्दैवाने गेल्या काही वर्षांमध्ये सच्च्या भारतीयांचा आवाज काही त्या संसदेमध्ये ऐकायला मिळेना. जनतेचे खरे प्रतिनिधीच जनतेपासून दुरावले आणि पैश्याच्या जवळ गेले. आणि आता इथेच  खरी गरज होती यांना बदलण्याची कारण ज्या लोकांमधून हे निवडून आले त्यांनाच यांनी आता दूर केले म्हणून यांना दूर करण्याची आता वेळ आली आहे. 

हि वेळ आता आली आहे हे अण्णा आणि या आंदोलनाने ओळखले आणि खऱ्या अर्थाने हे या आंदोलनाचे पहिले यशस्वी पाऊल ठरले.

खर तर आता या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्यांची कसोटी लागणार आहे, खूप मोठी जबाबदारी यांच्या खांद्यावर येऊन ठेपली आहे आणि हीच या आंदोलनाची सर्वात कठीण परीक्षा असणार आहे त्यामध्ये हि हे आंदोलन यशस्वी होईल अशी आशा आपण सगळे बाळगू.  

आपल्या देशात असा एक मोठा वर्ग आहे कि जो फेसबुक, ट्विटर किंवा मेडीयावर मोठ्या हिरारीने सहभागी होतो परंतु   या सबंध राजकीय व्यवस्थेपासून स्वतःला दूर ठेवतो आणि इथेच सगळी फसगत होते. देशाला खरे स्वातंत्र्य मिळवून देण्याचे आणि सामान्य माणसाने त्याच्यात सहभाग नोंदाविण्यासाठीच  तर हि लोकशाही ची देन आहे. हि लोकशाही आपल्या सारख्यांच्या सहभागाने अधिक बळकट  होईल यात तिळमात्र हि शंका  नाही.

आता खऱ्या रूपाने हे आंदोलन लोकांशी जोडले जाऊ लागले आहे आता काही कर्तव्य आहेत ती या देशातील नागरिकांची आणि त्याच कर्तव्याची आठवण टीम अण्णा आणि आपण सर्व मिळून लोकांना सतत करून देऊ.

जय हिंद - जय भारत.

No comments:

Post a Comment