Friday, May 20, 2011

"पांगिरा" - बदलत्या गाव पांढरीची कहाणी!

"पांगिरा" - बदलत्या गाव पांढरीची कहाणी, गावाचं जगणं कसं बदललं आणि ते यापुढेही कसं बदलत जाणार हे सांगणारा एक हृदय स्पर्शी चित्रपट !

ह्य़ा रांडमुंड वस्त्या
ह्य़ा रांडमुंड वस्त्या आणि हे सरावैरा बांध
वेशीपासून देशोदेशी पसरलेले हे जातीवंत सांड
शिवारामधल्या शिवीला आणि जात्यामधल्या ओवीला
गोठय़ामधल्या गाईला आणि थानं सुकलेल्या आईला
परकर पोलक्यामधल्या तायडीला नि पाळी चुकलेल्या बायडीला
खांदा नसलेल्या कावडीला नि गळा सुकलेल्या बावडीला
घे स्वप्नांचं पीक नि जागा मिळंल तिथं वीक
विकलं गेलं तरीबी ठीक, नाहीतर जा की मरणं शीक.
ह्य़ा रांडमुंड वस्त्या आणि हे सरावैरा बांध
वेशीपासून देशोदेशी पसरलेले हे जातीवंत सांड
उंबरा तुटलेली दारं, ही चौकटी फुटलेली घरं
वांझ झालाय पापणीचा पूर, विझून गेलाय चुलीमधला धूर
कोरडय़ाठाक आभाळाचं हे मातीमोल गाऱ्हाणं
कपाळपांढऱ्या गर्भामधलं हे हंबरणारं गाणं
जन्मनागव्या पाठीवरचा हा चरचरणारा वळ
दुखपांगळ्या पायांमधलं हे थरथरणारं बळ
ह्य़ा रांडमुंड वस्त्या आणि हे सरावैरा बांध
वेशीपासून देशोदेशी पसरलेले हे जातीवंत सांड
सेनेगल, सोमालिया, व्हेनेझुएला, मेक्सिको, हाइती
चंदीगड, सिमला, तिरुअनंतपुरम, नाशिक, नगरची भावकी
तांबवे खुर्द, म्हसवे बुद्रुक, मौजे कासारवाडा ठावकी
मका लांब पळत गेला, गायब झाली तूर
रान होतं उंबरवासाचं, त्याचा हरपून गेलाय सूर
कांदा-िलबू, मिरची-कोिथबीर, खुडता येत नाही आलं,
मातीमधलं पिवळं सोनं, काळंठिक्कार झालं.
ह्य़ा रांडमुंड वस्त्या आणि हे सरावैरा बांध
वेशीपासून देशोदेशी पसरलेले हे जातीवंत सांड

- संजय कृष्णाजी पाटील

No comments:

Post a Comment