Friday, May 20, 2011

बाळासाहेब तुम्ही सुद्धा !!

सध्या राजकारणात आपली भूमिका बदलणे म्हणजे रोज कपडे बदलण्यासारखेच असते ! त्याचा आपल्याला गेल्या साठ वर्षाच्या काळात अनेक वेळा अनुभवही आला पण एक वाघ .. होय शिवसेनेचा वाघ माननीय हिंदू हृदय सम्राट यांना आपण ओळखतो ते त्यांच्या रोख ठोक आणि स्पष्ट भूमिकेमुळे , एकदा दिलेला शब्द किंवा केलेले विधान त्याच बाणेदारपणे रोखठोक पणे सांगणारा नेता म्हणून त्यांची ओळख, ९२ साली बाबरी पडली त्यावेळी सगळ्याच नेत्यांनी एका रात्रीत कशी कोलांटउडी खाल्ली हे आपल्या सर्वांना ठावूकच आहे पण सबंध भारत देशात हा एकमेव ढाण्या वाघ गरजला, " बाबरी जर माझ्या शिवसैनिकांनी पडली असेल तर त्याचा मला अभिमान आहे !" त्यांच्या या विधानावर बराच गोंधळ हि झाला पण त्यांनी त्यावेळी त्या रोखठोक पणे भूमिका घेतली त्याची आठवण आज हि तमाम हिंदू वर्गाला आहे आणि म्हणूनच ते आज हि हिंदू ह्रदय सम्राट म्हणून ओळखले जातात.

पण सध्या रोजच आपली भूमिका बदलणाऱ्या रोगाची लागण शिवसेनेलाही झालेली दिसतेय, त्याचे कारण म्हणजे सध्या चाललेली शिवशक्ती - भीमशक्ती नावाची नवीन राजकीय खेळी.

काल परवाच्या वर्तमानपत्रात वाचले कि बाळासाहेब म्हणाले कि " मी कधीच मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरास विरोध केला नव्हता".. आणि थोडा विचारात पडलो, १९९४ च्या वेळी १५-२० वर्ष भिजत पडलेला नामांतराच प्रश्न आला तेव्हा मराठवाड्यात जातीय तणाव पसरला, जाळपोळ झाली, दंगे झाले कारण काय तर मराठवाडा विद्यापीठास डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यात यावे हि बर्याच वर्ष पासूनची मागणी मान्य झाली आणि मराठवाड्यातील वातावरण तापले. त्यावेळी शिवसेनेची म्हणजेच बाळासाहेबांची भूमिका नामांतर विरोधी होती, २१ मे १९९४ रोजी परभणी येथील दत्तधाम मैदानावरील सभेमध्ये हा वाघ पुन्हा एकदा गरजला, "
आपण जीवनाच्या अखेरपर्यंत विद्यापीठ नामांतराला विरोध करीत राहू. लादलेले नामांतर कुणालाही मान्य नाही. काँग्रेसच्या मंत्र्यांना मराठवाडय़ात फिरू देऊ नका. काळे झेंडे दाखवून त्यांच्या गाडय़ा अडवा’ असे आवाहन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या सभेत केले होते. ‘नामांतराला तुमचा विरोध आहे का’ असे सभेतील नागरिकांना शिवसेनाप्रमुखांनी विचारले. हजारो नागरिकांनी हात वर करून त्यांच्या प्रश्नाला हात उंचावून होकारार्थी उत्तर दिले. ‘१९९५ मध्ये आपण नामांतरचा प्रश्न निवडून आल्यानंतर खऱ्या अर्थाने सोडवून दाखवू’ असे उद्गारही शिवसेनाप्रमुखांनी या सभेत काढले होते.
‘विद्यापीठ गेट म्हणजे दलितांना वाटते ही चैत्यभूमी आहे. म्हणून गेटला नमस्कार करताहेत. अरे यांना भाकरीचे पीठ खायला मिळत नाही आणि विद्यापीठासाठी लढताहेत. घाला अशांना जात्यात आणि रगडा. पण हे पीठ कोणी खाणार नाही’ असेही बाळासाहेब ठाकरे हे या सभेत बोलले होते.

१४ जानेवारी १९९४ ला तत्कालिन मुख्यमंत्री शरद पवार यांनी मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ’ असा केला. या घोषणेनंतर मराठवाडय़ात अनेक ठिकाणी जाळपोळ आणि जातीव तणाव निर्माण झाला होता. मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या निषेधार्थ शिवसेनेने दुसऱ्याच दिवशी म्हणजे १५ जानेवारीला मराठवाडा बंद पुकारला होता.
२१ जानेवारी १९९४ ला म्हणजे नामविस्ताराच्या घोषणेनंतर सातव्या दिवशी शिवसेनेने महाराष्ट्र बंद पुकारले होते. ते नामांतर विरोधासाठीच. मुंबई आणि मराठवाडय़ामध्ये या बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला होता. अन्य महाराष्ट्रात या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला होता.

तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवारांनी मुख्यमंत्रीपद गेले तरी चालेल पण बाबासाहेबांचे नाव विद्यापीठाला देणारच अशी कणखर भूमिका घेतली आणि नेहमी प्रमाणे अतिशय हुशारीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा नामविस्तार करून हा प्रश्न अत्यंत खुबीने मिटवला, समाजातील तेढ संपली आणि विद्यापीठाचा गौरव हि झाला.

पण आता काळ बदलला, राजकीय समीकरणेही बदलली. सध्या दलितांचे नेते (?) म्हणवणारे रामदास आठवले यांच्याशी जवळीक साधण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे, तसे कारणही स्पष्ट आहे कारण गेली १५ वर्षे महाराष्ट्राच्या सत्तेपासून दूर असलेली शिवसेना आणि मनसे च्या धसक्याने ग्रस्त असणारी शिवसेना येणारी मुंबई महापालिका निवडणूक कुठल्याही परिस्थितीत जिंकायच्या पूर्व तयारीत आहे. त्या साठी परत एकदा शिवशक्ती-भीमशक्ती चा प्रयोग.
राजकारणात असले प्रयोग काही नवीन नाहीयेत आणि आपले कार्यकारी प्रमुख असे एक नाही अनेक प्रयोग येणाऱ्या काळात करतीलही ( जस मध्यंतरी सेना - राष्ट्रवादी चर्चा ) त्यावर चर्चा हि होतील पण नवल वाटते ते बाळासाहेबांचे.

अख्या राजकीय जीवनात ह्या माणसाने आपली भूमिका कधी हि बदलली नाही मग आत्ताच का ? कॉंग्रेस, राष्ट्रवादी असो किंवा भाजप यांच्या कडून आम्हाला जास्त अपेक्ष हि नाहीयेत कारण या पक्षांनी अनेक प्रश्नांवर कधी स्पष्ट भूमिकाच घेतली नाही उलट प्रत्येक प्रश्नाचे राजकारण कसे करायचे त्यात हे सर्वच पक्ष अग्रेसर, परंतु मराठी माणसाच्या रक्तातून उभी राहिलेली संघटना म्हणजे शिवसेना त्यांनी वेळीच याइतर राजकीय पक्षांपासून लागलेल्या साथीच्या रोगातून मुक्त होण्याची गरज आहे कारण आज मतदार काही झोपलेला नाही, प. बंगाल मध्ये 35 वर्षे निर्विवाद सत्ता गाजवणार्या डाव्यांना त्यांची जागा दाखवणारा आजचा मतदार आहे, त्यामुळे असल्या बरबटलेल्या राजकीय खेळ्या खेळण्यापेक्षा मतदारांना एक विकासाचा विश्वास द्या, जातीचा मुद्दा कधी सेनेचा नव्हता तो कधी होऊ पण नये, जातीच्या नावावर मतांची भिक मागणार्यांच्या रांगेत शिवसेना शोभून दिसणार नाही एवढेच सांगू इच्छितो !

अगदी त्याच आदराने ..जय महाराष्ट्र !
अमोल सुरोशे(एक मराठी माणूस)

1 comment:

HOTMEAL.COM said...

this is one naked truth ! raja shivaji yani dalitanviruddha kadhich vidhan kele nahi! naaki hmm shivsena kunacha paksha ahe ?

Post a Comment