Thursday, October 22, 2009

सर्व निवडून 'दिल्या' गेलेल्या आमदारांचे हार्दिक अभिनंदन!

हाराष्ट्र विधानसभेचे निकाल पाहता हे आता नक्की झाले आहे की कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस हेच पुन्हा सत्तेवर येणार आहेत. शिव सेनेची  झालेली पीछेहाट एक राजकीय विशेष आहे  आणि  मनसे व भाजप ने  केलेली कामगिरी या गोष्टी वाखाणन्या जोग्या आहेत. असो; एकंदर पुन्हा कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीलाच सत्तेत ठेवण्याचे जनतेने ठरवले आणि इतरांना आपली इमेज पुन्हा बनवण्यासाठी, आत्मपरीक्षण करण्यासाठी आणि विरोधक म्हणूनही व्यवस्थीत धोरणे राबवून घेता येतात हे दाखवण्यासाठी काही वर्ष वेळ दिला आहे. जे हरले त्यांनी कुठे न कुठे चूक केली; तुम्ही नापास झालात म्हणजे चूक उत्तर लिहिलं [जास्ती वेळेस] हे जितका पक्क असतं तितकच हेही आहे.

या निवडणुकीत काही जणांची स्तुती करावी अस ही वाटत आणि काही जणांच्या राजकीय धोरणांवर टीका करावी अस ही वाटत [तितके आम्ही मोठे नाहीत, पण आता नाही करणार तर कधी?]. शरद पवारांनी आपल्या राजकारणातील कौशल्याची चांगलीच चुणूक दाखवली [हे वाक्य बोलण्या इतपत आम्ही मोठे नाहीत, पण लेखाची मागणी म्हणून!]. येत्या निवडणुकीत एन.सी.पी ४ थ्या नंबर ला राहील असा गाजावाजा करणारांना हे छान उत्तर आहे! शरदा पवारांनी या वयात एका तरुणाला लाजवेल इतके  काम केले. उमेदवारी देण्यापासून ते अगदी सभा घेणे आणि इतर राजकीय आराखडे बनवण्यात व्यक्तिगत लक्ष घातले. महाराष्ट्राला आणि सगळ्याच पक्षांना अशा धोरणी, समजूतदार, प्रगल्भ  आणि अतिशय उत्साह असणाऱ्या कार्यकर्त्यांची/नेत्यांची गरज आहे. त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि महाराष्ट्राला त्याचं प्रगतीसाठीच मार्गदर्शन लाभत राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

    राज ठाकरेंनी ही छान कामगिरी केली. युवक आणि स्त्रीवर्ग यांच्या सदिच्छा मनसेच्या कमी आल्या आणि  मुख्य म्हणजे राज ठाकरेंचे  यासाठी अभिनंदन करावे की या दोन्ही वर्गांना त्यांनी या लोकशाही प्रक्रियेत सामावून घेतले. त्यांचे १३ 'शिलेदार' सरकारवर, त्यांच्या धोरणांवर अंकुश ठेवतील आणि महराष्ट्राच्या प्रगतीला एक वळण देतील हीच अपेक्षा. मनसे ला  आमच्या हार्दिक शुभेच्छा.

खूप सारे, या ना त्या कारणाने झालेले बंडखोर निवडून आले, त्यांना ही वाखाणावे अशीच त्यांची कामगिरी; त्यांचे अभिनंदन! पण या वरून हे मात्र लक्षात येईल की पक्ष आणि त्याची आयाडोलोजी याच्याशी जनतेला विशेष देणे घेणे नाही. माझा प्रश्न सुटतो का?, तो सोडण्याची कुणात ताकद आहे का? या प्रश्नांची उत्तर ज्याच्यात मिळतील  मग त्यालाच माझा पाठींबा. ही गोष्ट नवीन कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवावी. इथून पुढे पक्ष श्रेष्ठी आणि वरिष्ठ यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा कार्कर्ते जोडा, जनतेची कामे करा, पक्षाकडून उभे रहा की अपक्ष, सत्ता तुमचीच असेल; आणि हे सूत्र या वेळेस काही बंडखोरांच्या विजयाने/शक्ती प्रदर्शनाने निश्चित झाले आहे.

 भाजप ने छान कामगिरी केली आणि शिवसेनेच्या जीवावर भाजप महाराष्ट्रात चालते हा धब्बा तरी दूर केला. सेनेपेक्षा जास्त [की सेनेने अपेक्षे पेक्षा कमी]  जागा मिळवून आपल महाराष्ट्रातील अस्तित्व सिद्ध केल आहे. उद्धव ठाकरेंनी ग्रामीण महाराष्ट्रात जाऊन चंगली आंदोलन केली, त्याची फळ अहि दिसतीलच; पण या पराभवने त्यांनी खचून जाऊ नये [खाचाल तर सगळी आंदोलन सत्तेसाठी होती हा धब्बा लागेल आणि धब्बे पुसायला फार वेळ लागतो]. महाराष्ट्र,  प्रश्न 'या ना त्या मार्गाने' [सत्तेतून किंवा बाहेरून] सोडवानारांच्या सदैव पाठीशी राहील, पण जनतेचा विश्वास कमवायला वेळ लागतो. तितकासा वेळ अजून उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील सेनेला झालेला नाही, किंवा या आंदोलनांना तितका वेळ झालेला नाही आणि व्याप्ती ही आलेली नाही. अजून खूप काम करायचे आहे. शिवसेनेच्या वाटचालीला आमच्या शुभेच्छा आणि महाराष्ट्रात भाजप सोबत शिवसेना एक खंबीर विरोधी पक्ष, प्रगतीशील धोरणांना पाठींबा देणारा आणि  जाचक धोरणांना त्याचा प्रखरतेने विरोध करणारा विरोधी पक्ष म्हणून काम करेल ही अपेक्षा.

स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि इतर काही [सर्व नाही!] मित्र पक्ष/संघटना यांची ही कामगिरी त्यांची व्याप्ती बघता अभिनंदनाची  पात्र ठरतात. त्यांचे अभिनंदन.

आता येणाऱ्या सरकारने आणि विरोधी पक्षाने आपले कर्तव्य चोख पणे पार पडावे हीच अपेक्षा ठेवून महाराष्ट्राच्या वाटचालीला शुभेच्छा!

जय महाराष्ट्र!


- प्रकाश पिंपळे आणि अमोल सुरोशे

[ टीप: शीर्षकातील 'दिल्या' हा शब्द आवर्जून वापरलेला आहे. लोक निवडून येत नसतात ते दिले जातात, लोक पडत नाहीत ते पाडले जातात आणि ते ही फक्त जनतेकडूनच, त्या मुळे ही कमावलेली जहागिरी नाही तर दिले गेलेले काम आहे]

No comments:

Post a Comment