Wednesday, October 14, 2009

पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त .... हि तर कुठे सुरुवात !

"शाळा सुटली पाटी फुटली" या उक्ती प्रमाणे गेले दोन एक महिने चालू असलेला निवडणुकांची धामधूम अखेर मतदान नंतर संपली. काही काळापर्यंत का होईना सर्वत्र एक शांतता असल्या सारखे सर्वांनाच वाटले.

या निवडणुकीच्या धुळवडी मध्ये मग करोडो रुपयांची झालेली उधळण, दारू च्या वाहणाऱ्या गंगा,पार्ट्या आणि आरोप प्रत्यारोपांच्या फैरी .. याला काही काळापुरता का होईना एक अर्धविराम मिळाला.

कोणाला दिवसाढवळ्या सत्तेची स्वप्न पडत असतील तर आमचे काही नेते सत्ता जाण्याच्या भीतीने झोपेतून सुद्धा दचकून जागे होत असतील, पण ह्यांच्या नशिबी काय लिहिले आहे हे तर आमच्या एका दिवसाच्या राजाने म्हणजेच आमच्या मतदाराने ते वोटिंग मशीन मध्ये बंद करून ठेवले आहे. काही काळ का होईना आमचे हे नेते लोक सुखाने झोपू तरी नाही शकणार .. मग भले हि बाकी ५ वर्षे त्यांनी आमची झोप उडवलेली असो.

येणाऱ्या २२ तारखेला काय ते निश्चित कळेल, सत्तेची गणिते मांडली जातील, खुर्चीचा खेळ सुरु होईल. एरव्ही आमच्या शेतमालाला कधीच भाव नाही राहणार पण येणाऱ्या काळात बर्याच जणांचा भाव हा वधारलेला असेल. या निवडणुकीत झालेली बंडखोरी, युती आणि आघाडी मधील मतभेद , व्यायाक्तिक स्वरुपाची टीका टिपणी या मुळे निवडणुकीच्या आधीच येणाऱ्या मुख्य फिल्म चे ट्रेलर आपल्याला बघायला भेटले होते. असो जे झाले ते झाले.. आणि जे होणार आहे ते हि आता २२ तारखेलाच समजेल.

सध्या कोणी कौल दाखवतोय तर कोणी पोल दाखवतोय .. पण आपल्याला काय त्याचे, आम्ही मतदान केले .. म्हणजे आम्ही स्वतंत्र भारतचे जबाबदार नागरिक हि पदवी तर आम्हाला १३ तारखेलाच मिळाली. या पुढे सत्ता स्थापणारे सत्ता स्थापन करतील , विकले जाणारे विकले जातील, घोडे बाजार तेजीत चालेल, आणि पुन्हा मग तारेवरची कसरत करून कसे तरी कोणाचे सरकार स्थापन होईल. पण पुढे काय .. ये रे माझ्या मागल्या म्हणून आम्ही काय पुन्हा ५-५ वर्षांनी तेच करणार का.. भारत जगातील सर्वात मोठा लोकशाही असलेला देश आहे, पण आमच्या देशामध्ये लोकशाही चा अर्थ म्हणजे केवळ निवडणुका म्हणून घेतला जातो. एकदा का निवडणुका झाल्या कि मग निवडून देणारे आणि निवडून येणारे दोघे हि दीर्घ झोपेत .. मग पुन्हा आम्ही ५ वर्षांनी एकदा जागे होतो .. व्यवस्थेला शिव्या घालतो .. आणि फार मोठ्या आविर्भावाने मतदान करून काही उपकार केल्या सारखे वागतो.. एवढ्या मोठ्या लोकशाही च्या देशामध्ये आम्हाला लोकशाही कधी कोणी शिकवलीच नाही .. लोक शाही म्हणजे निवडणुका.. मतदान एवढा सरळ अर्थ आम्ही घेऊन बसलो आणि तिथेच गेली ६० वर्षे आम्ही फसलो.

या देशाच्या निर्मिती मध्ये प्रत्येक भारतीयांचा सहभाग होता, त्याचेच ऋण म्हणून आमच्या त्या काळाच्या नेत्यांनी या देशामध्ये लोकशाही प्रस्थापित करून प्रत्येक भारतीयाला या शासन व्यवस्थे मध्ये, सामाजिक व्यवस्थेमध्ये समाविष्ट करून घेतले, खरोखरच त्यांचे अनेक उपकार आहेत आमच्या वर, पण एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते .. आम्हाला या लोकशाही चा सर्वात मोठा आधारस्तंभ बनवले खरे पण एवढा मोठा आधार आम्ही आमच्या खांद्यावर पेलायचा कसा हे मात्र आमच्या नंतरच्या नेत्यांनी आम्हाला जाणीवपूर्वक कळू दिले नाही.. आता हि तेच चालले आहे.

आमच्या देशामध्ये लोकशाही रुजली असे म्हणतात पण मला तरी तसे जाणवले नाही .. ६० वर्षे झाली आता नवीन पिढी येत आहे, या पिढीकडे समज आहे, काही करण्याची जिद्द आहे, सन २०२० पर्यंत आमचा देश जगातील सर्वात जास्त तरुण असलेला देश असणार आहे, म्हणजेच आमचा देश तरुण देश म्हणून ओळखला जाईल, मग आता आमचे हे कर्तव्य बनते कि या सर्वात मोठ्या लोकशाहीच्या देशात आमचा येणारा तरुण त्याला हि लोकशाही संपूर्ण समजली पाहिजे.

या देशाची संपूर्ण शासन व्यवस्था हि आम्हीच निर्माण केलेली असते, ज्या व्यवस्थेला आम्ही दोष देतो त्याचे आम्ही एक अविभाज्य घटक असतो, म्हणजे सामाजिक न्याय, समता आणि बंधुता प्रस्थापित करायची असल्यास फ़क़्त मतदान करून हे कार्य होणार नाही तर लोकशाही म्हणजे रोज रोज घडणाऱ्या सर्व राजकीय तथा सामाजिक घडामोडींमध्ये आम्हा सामान्य माणसांचा सहभाग वाढवणे. आम्ही स्वतः बनवलेले कायदे आम्ही स्वतः पाळले पाहिजे त्याची योग्य अंमलबजावणी होते कि नाही ह्याची दक्षता हि आम्हालाच घ्यावी लागते, या देशाच्या व्यवस्थेमध्ये जिथे जिथे आपण बोट ठेवतो तिथे तिथे आपल्यालाच सुधार करावा लागतो अन्यथा तो करवून घ्यावा लागतो.

कदाचित हे करवून घेण्यासाठीच आम्ही मतदान करतो .. पण लोकशाहीचा व्यापक अर्थ आपण समजून घेणे खूप गरजेचे आहे, कारण या लोकशाही मध्ये अंतिमतः आपणच या सर्व गोष्टींना सर्वस्वी जबाबदार असणार आहोत.

येत्या २२ तारखेला कोणी हि निवडून येवो .. पण आपण ही सत्याची धरलेली कास.. बदलाची केलेली अपेक्षा कधी ही सोडता कामा नये. जो देश, जे राष्ट्र आम्हाला पोसते त्या राष्ट्रासाठी आम्ही आहोत तिथे, आहे त्या परिस्थती मध्ये आमची लोकशाही अजून बळकट केली पाहिजे. नेते फ़क़्त निवडणुकीच्या काळातच दिसतात म्हणणारे आम्ही .. आता आपणच हि परिस्थती बदलली पाहिजे. सरकार कोणाचे हि येवो.. तुमची-माझी आपल्या सर्वांची एकाच इच्छा आहे ती म्हणजे या महाराष्ट्राची प्रगती .. आणि ती होईल एवढी अपेक्षा न करता .. ती आपण करवून घ्यायची .. खुर्चीवर बसणारा कोणी हि असेल .. पण तो आमच्याशी बांधील आहे एवढे लक्षात ठेवायचे आणि विकास खेचून आणायचा.

जो उत्साह .. जी अपेक्षा निवडणुकीमध्ये आपण करतो तोच जोश किंबहुना त्या हि पेक्षा जास्त कर्तव्य आपले पुढील ५ वर्ष मध्ये असणार आहे,

शेवटी एकच सांगतो .. मला आणि तुम्हाला, कोणाला सत्ता द्यायची किंवा कोणाला द्यायची नाही हे महत्वाचे नाहीये, तर महत्वाचे आहे ते आपल्याशी निगडीत असलेले प्रश्न.. आणि ते सोडवण्यासाठी किंवा सोडवून घेण्यासाठी आम्ही आमच्या सरकारला प्रवृत्त करणार .. हि मनामध्ये कायम भावना.

शासन व्यवस्थे मध्ये आपला सहभाग वाढवणे, निर्णय प्रक्रिये मध्ये आपले संघटीत योगदान देणे , आणि आपल्याच साठी असलेली हि लोकशाही आपणच मजबूत करणे हि येणाऱ्या काळाची खरी गरज असणार आहे.

शेवटी .. ज्यांनी १३ तारखेला आपले मत देऊन या लढाई मध्ये आपला सहभाग नोंदवला आहे .. त्यांनी आणि इतर सर्वांनी येणाऱ्या हक्काच्या लढाई साठी तयार राहावे..

सध्या साठी जय महाराष्ट्र ....

अमोल सुरोशे

1 comment:

Mayur Chitnis said...

Get Well soon Amol sir ..

We need your daily dose of thoughts ,..

I say sorry to you from bottom of my heart ...

Tumachya great ness la salam...

Jay maharashtra
Mayur

Post a Comment