Sunday, September 13, 2015

हाताला काम द्या. त्यांना फुकट मदत नकोय

गेले पंधरा दिवस ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे मराठवाडा आणि विदर्भातल्या दुष्काळग्रस्त भागात खचलेल्या शेतकरी कुटुंबांना मानसिक धीर आणि आर्थिक मदत देण्यासाठी दौरे करत आहेत. त्यांच्या या कृतीमुळे अनेक संवेदनशील व्यक्ती आणि संस्था प्रेरित होत आहेत, त्याचप्रमाणे संवेदनशील वर्गाला हादरे देणारे अप्रिय प्रसंगही समोर येत आहेत. दौर्‍यांदरम्यानच्या अनुभवांवर आधारलेले लेखक-गीतकार अरविंद जगताप यांचे हे मनोगत...
‘गोष्ट छोटी डोंगराएवढी’ सिनेमात एक संवाद लिहिला होता. शेतकर्‍यांना मेल्यानंतर लाख रुपये देण्यापेक्षा जगण्यासाठी पंधरा हजार द्या. सिनेमा सयाजी शिंदे, मकरंद अनासपुरे यांनी खिशातले पैसे टाकून बनवला होता. आज पंधरा हजार रुपये शेतकरी महिलांना द्यायलासुद्धा तेच पुढे आले. तुम्हाला खोटं वाटेल, पण त्या सरकारला सडेतोड जाब विचारण्यासाठी सिनेमा लिहिला होता. आत्महत्या कमी होतील, असं स्वप्न पाहिलं होतं. तसं घडलं नाही. सरकार बदललं आहे. परिस्थिती अजून तरी नाही. ‘गोष्ट छोटी डोंगराएवढी’ सिनेमा प्रदर्शित होऊन पाच वर्षांनंतर गावोगाव फिरून हे प्रश्न नव्याने समजून घेणे चालूच आहे. परिस्थिती आणखी भयंकर आहे. केवळ ३०० रुपये नाहीत म्हणून बीडमधली एक मुलगी परीक्षा देऊ शकलेली नाही. सरकारची एक लाखाची मदत नाकारणारी, एक ताई होती. का? कारण, सासरी होती. माहेरी जाऊन बापाला धीर देऊ शकली नाही. बापाने आत्महत्या केली. तिला ते पैसे नको होते. मला पैसे देऊ नका, म्हणून विनंती करत होती. नाना आणि मकरंद सोबत बीड, लातूर, नांदेड आणि औरंगाबादला फिरताना आलेले असे हे अनुभव.

औरंगाबादला नाना पाटेकर आले होते परवा. तिथल्या कार्यक्रमात लाज वाटली. कुणी संघटनेचे निवेदन घेऊन येत होतं, कुणी सत्कार करायचाय नानाचा म्हणून मागे लागत होतं, बरेच फक्त नानासोबत फोटो काढायची मरमर करत होते. शेतकर्‍यांच्या विधवा बायका मदत मिळण्यासाठी बसून होत्या आणि काही लोकांना आपला ‘सेल्फी’ महत्त्वाचा होता. शहरात या गोष्टीचं गांभीर्य कमी का होतं? कार्यक्रमात एक जण आला स्टेजवर. बायको आणि वडील आजारी आहेत, असं म्हणून त्याने कागद फेकले स्टेजवर. आरडाओरडा केला. त्याला पण पैसे दिले गेले, ते मी स्वत: पाहिले. पण इलेक्ट्रॉनिक मीडियाने ती गोष्ट समजून न घेता त्याची ‘ब्रेकिंग न्यूज’ केली. मनातून वाटलं, जीव दिलेल्या शेकडो शेतकर्‍यांनी असं का नाही केलं? असं थेट कुठेही स्टेजवर जाऊन राडा का नाही केला? शांतपणे जीव का दिला? ते असा आक्रस्ताळेपणा करून ‘ब्रेकिंग न्यूज’ का नाही झाले? स्वतःची चिता स्वतः रचून आत्महत्या केलेले शेतकरी आहेत. आजपर्यंत विष पिऊन ते जीव देत होते. आता पायाला विजेची तार लटकवून जीव देतात. का? त्यांना संदेश द्यायचाय; जगण्यासाठी जे शॉक सहन केले, त्यापुढे हे विजेच्या वायरचे शॉक काहीच नाहीत. आता तरी लक्ष द्या.

कांदा महाग झाला म्हणून एकापेक्षा एक विनोद तयार होताहेत. कांदा महाग होणार, ही गोष्ट शेतकरी आणि सरकार यांना एकाच वेळी कळते. काही महिने आधी. पण दोघे काहीच करत नाहीत. शेतकर्‍याला अंदाज असतो की, उत्पन्न नाही, कांदा महाग होणार. पण तो साठवू शकत नाही. सरकारला पण माहीत असतं. पण सरकारला पावलं उचलायची नसतात. मागच्या सरकारप्रमाणे हे सरकार पण जखम गुडघ्याला आणि उपचार कपाळाला, हेच चालू ठेवणार आहे का? आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांच्या बायकांशी बोलताना लक्षात आलं की, त्या प्रचंड असुरक्षित आहेत. माहेरी आणि सासरी सारखीच परिस्थिती. जाणार कुठे? सरकारने लवकरात लवकर जमीन स्त्रियांच्या नावावर करायला सक्तीने सुरुवात करावी. तरच त्यांना आधार मिळेल. मान मिळेल. नाहीतर घरातला कर्ता पुरुष गेल्यावर त्यांचा कुणीच वाली नाही. तीन मुख्यमंत्री आणि एक उपमुख्यमंत्री देणार्‍या मराठवाड्याचे हाल आता पाहवत नाहीत. शेतकर्‍याचा आता कशावर विश्वास नाही, हे तो जीव देऊन सिद्ध करतोय. जिल्हा परिषद, महानगरपालिकेसमोर रेग्युलर उपोषणाचं नाटक करणं हा शेतकर्‍याचा स्वभाव नाही. तो थेट आयुष्य संपवतो, हे वाईट आहे. म्हणून त्याला आधार द्यायला गेलं पाहिजे. नाना पाटेकर प्रत्येक कार्यक्रमात सांगत होते की, आत्महत्या करू नका. तसाच विचार डोक्यात आला तर माझ्याशी आधी बोला. हे खूप महत्त्वाचं आहे. आपल्या सीएमपासून प्रत्येक मंत्र्याने असे आवाहन करायला पाहिजे. शेतकर्‍याला आत्मविश्वास येईल. पण आपण कशात मग्न आहोत आजकाल?

सगळ्याच धर्माचे लोक आजकाल आक्रमक होताहेत. हाडामासाची माणसं मरताहेत. आणि चार दिवस मांस खावे की खाऊ नये, ही फार मोठी समस्या आहे, सध्या देशापुढे. नेत्यांच्या किंवा सरकारच्या विरोधात बोलाल, तर देशद्रोह होईल, अशी धमकी देतंय सरकार. पाऊस पाडण्याच्या गप्पा मारणार सरकारचं विमान अजून जमिनीवर येत नाही. कुठलाच ठोस उपाय होत नाही. फडणवीस मराठवाड्यात येऊन मागच्या सरकारला दोष देत होते. विरोधी पक्षात असताना केलेली भाषणं आता विसरायला हवीत. नाहीतर मग आपलेच मंत्री मागे जांभया देऊ लागतात, हे त्यांना कळायला हवे. दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीवाले सेना-बीजेपीवर टीका करतात. आता काँग्रेसने तोंड बंद ठेवावं आणि सरकारने काम करावं, एवढीच अपेक्षा.

या वेळी सरकार नाही देवाला, पण जाब विचारायची वेळ आलीय. प्रत्येक धर्म आपल्या परंपरा जपण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करतो. पण कुंभमेळ्याचे पैसे असोत किंवा हजचे अनुदान; सगळे पैसे पाण्याचा प्रश्न सोडवायला वापरले
गेले पाहिजेत. प्रत्येक वेळी सरकारच्या तिजोरीकडे बघण्यापेक्षा देवाच्या नावाने प्रत्येक धर्माने तिजोरीत जमा केलेले कोट्यवधी रुपये बाहेर काढले पाहिजेत. लाखो माणसं मरत असताना तिजोरीत पैसे दाबून ठेवणारा कुठलाच धर्म आदर्श नसतो.
माणसं जगली तर धर्म जगेल, एवढी साधी गोष्ट समजून घेतली पाहिजे.

मला सांगा, मराठवाड्याला मदत करायला खरंच नाना पाटेकरांची गरज आहे का? त्यांनी केलं ते काम खूप मोठं आहे. पण त्याची गरज होती? आपला मराठवाडा हे स्वतः का करू शकत नाही? आपल्याकडे हे नेतृत्व का नाही? मराठवाड्यात पैसे नाहीत? मराठवाड्यात बुद्धिमत्ता नाही? काय कमी आहे? शरद पवार श्रेष्ठ का शरद जोशी? देवेंद्र फडणवीस चांगले का उद्धव ठाकरे? या वायफ‌ळ चर्चा मराठवाडा किती दिवस करणार आहे? आपल्याकडे आपला माणूस का नाही? आपण वर्षानुवर्षं निवडून दिलेले खूप लोक आहेत. मग ते कुठे आहेत? आपण ओवेसीसारख्या वाचाळ माणसाला मोठं करून का मतदान करतो? आपल्याकडे जास्तीत जास्त आत्महत्या केलेल्या मराठा समाजाच्या संघटना एवढे एकच काम मन लावून का करत नाहीत? रिपब्लिकन किंवा इतर बहुजन पक्षांचा शेतकर्‍याशी संबंध नाही का? मुस्लिम संघटना काय फक्त बघ्याची भूमिकाच घेणार आहेत का? पुरंदरेंसाठी तांडव करण्याची तयारी असणार्‍यांनी शेतकर्‍यांसाठी थोडे हात-पाय हलवायला काय हरकत आहे?
जाता जाता एक गोष्ट. बरेच लोक विचारतात, आम्हाला पण मदत करायची आहे. कशी करू? मुळात ही मदत नाही. आपलं अन्न पिकवण्यातला हा आपला सहभाग आहे. आणि प्रत्येकाने पैसे द्यावेतच, हीसुद्धा अपेक्षा नाही. दहा झाडं लावली, तरी ती सगळ्या देशासाठी मोठी कामगिरी आहे.

http://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-arvind-jagtap-rasik-article-5111651-PHO.html

No comments:

Post a Comment