Thursday, April 12, 2012

यशवंतरावांचे कवीवर्य ना.धों महानोर यांना पत्र

यशवंतराव चव्हाण,
१, रेसकोर्स रोड,
नवी दिल्ली - ११०११.
दि. : १९ सप्टेंबर १९८१

प्रिय नामदेवराव,

तुमचे पत्र येऊन बरेच दिवस झाले, सोबत आलेले पुस्तक वाचल्याशिवाय उत्तर द्यायचे नाही असे ठरविले होते. तुमच्या गद्यलेखनापैकी `गांधारी' मी पूर्ण वाचले होते. गावाकडल्या गोष्टी मी सर्व वाचून काढल्या. पहिल्या चार कथा व शेवटच्या चार कथा यात मौलिक फरक आहे. शेवटच्या चार कथांत वर्तमान परिस्थितीतील तळागाळातला अनुभव परखडपणानं मांडलेला आहे. त्याची गरज होती.

या पुस्तकातील पहिल्या चार कथा याचे कथा म्हणून महत्त्व मला विशेष आहे. पहिल्या कथा वाचून मला श्री.जी.ए. कुलकर्णी यांची आठवण झाली. व्यंकटेश माडगूळकरांची नाही. मी कुणी समीक्षक नाही. एक रसिक वाचक आहे. तुमच्या या पहिल्या चार कथा तंत्रदृष्ट्याही अतिशय उत्कृष्ट आहेत. वाचून झाल्यानंतर त्या कथांचा विषय डोळ्यांपुढे तरंगत राहतो. `सवंगडी' ही कथा वाचून ग्रामीण जीवनात काढलेल्या माझ्या लहानपणची आठवण झाली आणि डोळे भरून आले.
इतकेच तूर्त पुस्तकासंबंधी.

कळावे.

आपला,
यशवंतराव चव्हाण
--


सौजन्य: आमचे प्रिय मित्र निशिकांत वारभुवन

No comments:

Post a Comment