Wednesday, August 24, 2011

जिजाऊ.कॉम तर्फे ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप कार्यक्रम.

परभणी पासून साधारण २२ किलोमीटर असलेले गाव कमलापूर,किमान २००० लोकसंख्या असणारे हे गाव, इयत्ता सातवी पर्यंत शाळा. गाव तसे शहरापासून दूर नाही, पण रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे सहसा जिल्हा परिषदेचे शिक्षक इकडे बदली करून घेण्यास फारसे उत्सुक नसतात. आड वळणाच्या रस्त्याने गावात प्रवेश केल्या केल्या एकदम साधी - सरळ माणसे तुम्हाला दिसतात. गाव तसे देशमुखी, पण इथे उसतोड कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. उसाच्या सिझन मध्ये हे लोक गाव सोडून कामाच्या शोधात इतर जिल्ह्याला जातात ह्यामुळे त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचे पुरते हाल व्हायचे. गावातील शिक्षक, जाणते नागरिक ह्यांच्या अथक प्रयत्नामुळे आत्ता हे कामगार, मजूर लोक आपली मुले गावातच त्यांच्या इतर नातेवाईकांकडे ठेवून कामाला जातात त्यामुळे निदान त्यांच्या शिक्षणात कुठलाही खंड पडत नाही. मजूर / कामगारांची मुले असली तरी हि ह्यांची जिद्द फार मोठी, कोणाला इथे मोठा होऊन डॉक्टर बनायचे तर कोणाला वकील, कोणी शिक्षक बनू इच्छितो तर कोणी अभियंता प्रत्येकाची स्वप्ने आहेत, प्रत्येकाकडे जिद्द आहे. शहरातील कुठल्याही मुलापेक्षा यांच्या कडे बुद्धिमत्ता कमी नाहीये गरज ती फ़क़्त चांगल्या मार्गदर्शनाची, चांगल्या शिक्षणाची आणि चांगल्या शैक्षणिक वातावरणाची.

अनंत अडचणींना समोर जात ह्या मुलांनी आपले शिक्षण अव्याहतपणे चालू ठेवले. त्यांच्या याच प्रयत्नांना प्रोत्साहित करण्यासाठी, त्यांच्या प्रयत्नांना एक छोटासा हातभार लावण्यास्ठी जिजाऊ.कॉम ची टीम या गावात पोहोचली. जिजाऊ.कॉम च्या "राष्ट्रमाता जिजाऊ ग्रामीण शिक्षण योजने" अंतर्गत १० गरजू, हुशार आणि होतकरू विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. त्यांच्या शिक्षणाला मदत म्हणून त्यांना शालेय गणवेश, बूट, सॉक्स, वह्या, पेन, कंपास, मराठी-इंग्लिश डीक्षनरी इ. चे वाटप करण्यात आले. गेली कित्येक वर्षे आपल्या छोट्याश्या खेड्यातच वाढणारी हि मुले ह्या सर्व गोष्टींनी हरखून गेली, त्यांच्यासाठी आणि त्या गावासाठी हि गोष्ट नवीच आणि नवलाईची.

कोणीतरी आपल्या पाठीशी आहे, कोणी तरी आपल्या प्रयत्नांचे कौतुक करणारे आहे हे बघून हि मुलेही अतिशय खुश होती. ह्या शाळेचे भाग्यच म्हणावे लागेल कारण खूप चांगला शिक्षक वृंद इथे लाभला. या शाळेतील दीपक घुसळे सर आणि मदन कदम सर यांच्या नव-नवीन कल्पनांनी येथील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाला, या शाळेचे आणि गावाचे वैशिष्ट्य म्हणजे या गावात पारधी समजा मोठ्या प्रमाणावर आहे, जन्मताच ज्यांच्याकडे सर्व समाज शंकेने बघतो असा अतिशय उपेक्षित समाज या गावात आढळतो. धड मराठी हि बोलता येत नसणारी हि मुले, त्यांच्या राहणीमानामुळे इतर मुलापेक्षा कायम वेगळी दिसणारी हि मुले कधी या सर्वांमध्ये एकरूप झाली हे गावालाही कळले नाही, या मध्ये या दोन शिक्षकांचे अथक परिश्रम असून त्यांची काही तरी करण्याची तळमळ आहे.

असे शिक्षक, अशी शाळा, असे गाव आणि असे आमचे विद्यार्थी असल्यामुळे जिजाऊ.कॉम ची टीम हि या गावी पोचली, तळागळातून कार्य करत असतांना अशा शाळेवर हा छोटासा कार्यक्रम घेणे म्हणजे खरोखरच आमचे महत भाग्यच.

जिजाऊ.कॉम तर्फे सर्व शिक्षकांना, गावकर्यांना आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्वल भवितव्यासाठी खूप खूप शुभेच्छा !!!

राष्ट्रानिर्मानाचे हे कार्य अखंडपणे चालू राहो हीच आई जिजाऊ चरणी प्रार्थना.जय जिजाऊ - जय शिवराय
कार्यकर्ते जिजाऊ.कॉम.

2 comments:

प्रभाकर फडणीस P.K. Phadnis said...

अतिशय उत्तम कार्य! अभिनंदन. तळागाळातील विद्यार्थ्यांसाठी गावपातळीवरच काम व्हायला हवे. तुम्ही असेच काम चालू ठेवलेत तर तुम्हाला पैशाची कमतरता कधीच पडणार नाही.

प्रकाश बा. पिंपळे said...

Nakkich Sir. Paisa tar nahi kami padat ahe, pan mansanchi barich kami bhasat ahe!

Post a Comment