Thursday, January 7, 2010

मराठवाडा जनविकास परिषदेची स्थापना

१६ जानेवारी रोजी ठाण्यात बैठक
‘लोकसत्ता’
ठाणे/प्रतिनिधी
संतांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मराठवाडय़ातून नोकरी, व्यवसायानिमित्त ठाणे जिल्ह्यात येऊन वास्तव्य करीत असलेल्या रहिवाशांच्या सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक उत्थानासाठी ‘मराठवाडा जनविकास परिषद’ या नावाने सामाजिक संस्था स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय बुधवारी येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एस.एम. टोम्पे यांच्या अध्यक्षतेखाली येथे ही बैठक झाली. ठाणे महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.आर.टी. केंद्रे, जिल्हा रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.ए.बी. नांदापूरकर, ‘लोकसत्ता’चे सहसंपादक राजीव कुळकर्णी, जिल्हा प्रतिनिधी सोपान बोंगाणे, डॉ. अविनाश भागवत, डॉ. राहुल कुलकर्णी, डॉ. संतोष कदम आणि विविध विभागात सेवा बजावत असलेले अन्य वरिष्ठ शासकीय, निमशासकीय अधिकारी व इतर मान्यवर बैठकीला उपस्थित होते.
मराठवाडय़ातील औरंगाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद, जालना व लातूर या आठ जिल्ह्यांतील मूळ रहिवासी असलेले हजारो नागरिक नोकरी, व्यवसायानिमित्त ठाणे जिल्हा व परिसरात राहतात. अनेक जण शासनाच्या विविध खात्यात वरिष्ठ अधिकारी आहेत, तर पत्रकारिता, कला, साहित्य, शिक्षण, न्यायपालिका , वैद्यकीय अशा अनेक क्षेत्रात काम करणारे नागरिकही ठाणे जिल्ह्यात वास्तव्य करीत आहेत, परंतु त्यांचा एकमेकांशी परिचय नाही. या प्रत्येकाच्या मनात आपल्या जन्मभूमीबद्दल काही तरी करण्याची इच्छा आहे. मराठवाडय़ाचा परिसर अजूनही आर्थिकदृष्टय़ा मागासलेला आहे.
उद्योग, व्यवसाय, पाणी, रोजगार या अभावी मराठवाडय़ाची ससेहोलपट सुरू आहे. त्यातून अनेक लोक ठाणे, मुंबई भागात स्थलांतरित झाले आहेत. त्यांच्या दैनंदिन जीवनातही अनेक समस्या आहेत. या नव्या संस्थेच्या माध्यमातून सर्वांनी एकत्र येऊन या समस्यांना स्पर्श करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे डॉ. टोम्पे यांनी सांगितले.
ठाणे जिल्ह्यात विखुरलेल्या मराठवाडय़ातील लोकांनी एकत्र येण्यासाठी येत्या १६ जानेवारी रोजी ठाणे येथे एका बैठकीचे आयोजन करण्यात आले असून, या बैठकीत ‘मराठवाडा जनविकास परिषदे’च्या कामाची पुढील रूपरेषा व दिशा निश्चित केली जाणार आहे. त्यामुळे या महत्त्वाच्या बैठकीला मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
तपशीलासाठी डॉ. नांदापूरकर- ९४२२५७३६७८, सोपान बोंगाणे- ९९८७५५९३५५, डॉ. संतोष कदम-९८२०२४५५२६, डॉ. भागवत- ९२२६१०५९७७ या दूरध्वनिवर अथवा vidya_kadam@hotmail.com , ashok.nandapurkar@gmail.com या ई-मेलवर साधावा।

अमोल सुरोशे नांदापूरकर

No comments:

Post a Comment