Sunday, January 12, 2014

"जिजाऊ जयंती विशेष - नक्की वाचा"


असं म्हणतात कि इतिहासाच्या पानांमध्ये हरखून न जाता येणाऱ्या भविष्याकडे वाटचाल करावी, परंतु याच इतिहासात अशी काही सोनेरी पानं असतात जी न कि केवळ आपल्याला आपल्या चुकलेल्या मार्गाची जानिव करून देतात, येणाऱ्या भविष्याचा मार्गही त्याच्या दिव्यत्वाने उजाळून टाकतात.

आपला महाराष्ट्र आणि या महाराष्ट्राची लेकरं या बाबतीत नशीबवानच ! कारण तसा वारसाच आम्हाला लाभला आहे, इतिहासातील प्रत्येल पण म्हणजे हिऱ्या - मानकांच्या शब्दांनी रचलेले निखळ सोनेरी पानं !

या मातीत थोर संत झाले , विचारवंत हि झाले ! इथेच वीर जन्माला आले, आणि इथेच आम्हाला हजारो वर्षांच्या निद्रेतून जागे केले ते समाजसुधारकांनी !

आज या इतिहासाची उजळणी करावी वाटली कारण आज १२ जानेवारी !

याच महान महाराष्ट्राच्या एका नव्या इतिहासाला जन्म देणाऱ्या माउलींची जयंती ! हरवलेल्या स्वाभिमान आणि अस्तित्वाला पुनरजन्म देणारी माता !
आपल्या पोटचा गोळा स्वराज्यास अर्पण करून या मातीला आपला पहिला छत्रपती राजा देणारी माता म्हणजेच राजमाता जिजाऊ मॉ साहेब यांची जयंती.

अगदी कालपरवाच अखंड क्रांतीज्योती सावित्रीबाईंची हि जयंती पार पडली, कुठे कुठे या जयंत्या मोठ्या प्रमाणावर साजऱ्या हि होत असतील.

आजच्या या दिनी आम्हाला एक प्रश्न पडलाय कि ज्या इतिहासाचे दाखले देऊन आम्ही नवीन पिढी घडवण्याचे स्वप्न पाहतो निदान त्या इतिहासाने तरी
आमच्या या प्रेरणामुर्तींसोबत न्याय केलाय का?

जिजाऊ शिवाय शिवबा छत्रपती झाला असता ?ज्योतीराव कुणाच्या खांद्याला खांदा लाऊन स्त्री शिक्षणासाठी झगडले असते ? या थोर स्त्रीयान्शिवाय इतिहास हा इतिहास तरी झाला असता का ? शेवटी इतिहासाला जन्म द्यायला हि एक माउली च लागते हे हि आम्ही विसरलो ?

ज्या समाजात हजारो वर्षे स्त्रियांना दुय्यम वागणूक दिली जाते, दुर्गा - शक्ती अशी उपमा तर देतात पण सर्वात जास्त अत्याचारहि तिच्यावरच होत असतात, मग अश्या समाजाला जिजाऊ - सावित्रीबाई सारख्या असामान्य महिलांची ओळख करून देण्यात हा इतिहास का कमी पडला ?

आज हि स्त्री हि दुय्यमच, मग ती दलिताची असो वा सवर्णा ची ! हिंदूंची असो व मुस्लिमांची ! तीच गुलामगिरी तोच अन्याय ! अगदी आमच्या घरा -घरापर्यत हि असमानता ! आज हि गर्भातच तिची हत्या !

मग हे धड धडीत सत्य समोर असतांना का इतिहासकार का कमी पडले ह्या असामान्य स्त्रियांचे संस्कार रुजवण्यात ! बर ज्यांनी प्रयत्न केले त्यांच्या पाठीशी समाज तरी उभा राहिला का ?

आजचा दिवस म्हणजे एक नवा इतिहास जन्माला घालणाऱ्या माउली चा जन्म दिवस !

इतिहास निर्माण करणे म्हणजे झालेल्या चुकांना सुधारून पुन्हा नवा इतिहास घडवणे … मग आजच्या या दिवशी करूया एक संकल्प….

स्त्रियांचे हिरावलेले हक्काचे स्थान त्यांना प्राप्त करून देण्याचा ! आमच्या माता - भगिनी आणि मुला-मुलींमध्ये जिजाऊ आणि सावित्री चे संस्कार रुजवण्याचा ! येणाऱ्या पिढीला जिजाऊ - सावित्री सारख्या स्त्रियांची खरी ओळख करून देण्याचा !

इतिहासातील हरवलेले हे सोनेरी पान समाजासमोर उघडे करण्याची आज खरी गरज आहे, खात्री आहे येणारा काळ त्यांच्या विचारांनी - संस्कारांनी उजाळून जाईल !

याची सुरुवात आपल्या घरापासून करा ! तुमच्या मुलीमध्ये जिजाऊ आणि सावित्री बघायला सुरुवात करा ! फ़क़्त तिलाच नवनिर्माणाचे सामर्थ्य आहे, त्यांच्या हातूनच या राष्ट्राचे नव - निर्माण घडू दे !!

पुन्हा एकदा राजमाता - राष्ट्रमाता जिजाऊ साहेब यांना अभिवादन !

जय जिजाऊ - जय शिवराय


आपलेच कार्यकर्ते,
जिजाऊ.कॉम
www.jijau.com

No comments:

Post a Comment