Showing posts with label शिवाजी महाराज. Show all posts
Showing posts with label शिवाजी महाराज. Show all posts

Thursday, January 11, 2018

स्वराज्य प्रेरिका राजमाता जिजाऊ आऊसाहेब !!!

स्वराज्य नावाच्या संकल्पनेचे कठीण स्वप्न बघणाऱ्या आणि ते प्रत्यक्षात आणण्यासाठी उभे आयुष्य खर्ची घालणाऱ्या स्वराज्य प्रेरीका राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी अभिवादन! 🙏🌹👏
या सुंदर आणि स्वप्नवत स्वराज्याला मूर्तरुप देऊन आणि त्यास तितकेस साजेसे असे दोन छत्रपती राजे घडवणारी ही राजमाता.
केवळ राजा आणि त्याचे सैन्य यापुरती सीमित असणारी राजसत्ता या माऊलीने समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोचवली,नव्हे तशी खबरदारीच घेतली आणि त्यात त्यांना एकरूप करून घेतले. 
म्हणूनच समाजातील समस्त जाती - वर्गातील घटक हे स्वराज्य घडवण्यासाठी अगदी हिरारीने पुढे आला, आपले सर्वस्व विसरून तो या स्वराज्याचा एक मावळा झाला.
यापूर्वी कधी ही न घडलेले - बघितलेले ते ते प्रत्यक्षात उतरत होते, सामान्य कष्टकरी-शेतकरी हाती तलवार घेऊन लढत होते, गावकुसाबाहेर राहणारा सामान्य जातीतील माणूस शिवबाच्या खांद्याला खांदा लावून लढू लागला, अठरापगड जाती - बारा बलुतेदार स्वराज्य कार्यात आप आपल्या परीने योगदान देऊ लागले. या सर्वांमागे एक अदृश्य शक्ती एक अफाट प्रेरणा होती - जिजाऊ माँ साहेबांची!!
या राष्ट्रमतेची आज प्रखरतेने आठवण होण्याचे महत्वाचे कारण म्हणजे पुन्हा एकदा समाज व्यवस्थेची घडी विस्कळीत झालीये, पुन्हा एकदा व्यक्तिगत स्वार्थ, अहंकार आणि लाचारी यांची बजबजपुरी माजलेली आहे, स्वकीयांनीच घात करून आपली निष्ठा बईमानांच्या पायी वाहिली आहे, समाज वेगवेगळ्या जाती - समूहामध्ये विभागला गेलाय आणि या मातीच्या प्रत्येक प्रेरणादायी व्यक्तिमत्वाला जातीच्या घट्ट साखळदंडास बांधून ठेवले गेले आहे.
स्वराज्य म्हणजे रयतेचे राज्य, इथे सामान्य रयत आज गुलामीचे जीवन जगताना दिसत आहे मग ती सामाजिक, राजकीय किंवा आर्थिक गुलामी असो.
ही गुलामी झुगारून पुन्हा समतेचे आणि न्यायाचे राज्य निर्माण होणे गरजेचे आहे, त्यासाठी गरज आहे तसा समाज घडण्याची!
तुमच्याच नावाचा वापर करून आज तुमच्याच लोकांमध्ये फूट पाडली जाते, भ्रम निर्माण केले जातात, अश्यावेळी तुम्ही दाखवलेल्या स्वप्नांची आणि शिकवणीची उजळणी तेवढीच आवश्यक ठरते!
माँ साहेब आज तुम्ही नसल्या तरी तुमच्या प्रेरणेने लाखो - करोडो लोक आजही तुम्ही दाखवलेल्या मार्गावर आपले आयुष्य पणाला लावीत आहेत.
तुमच्या व्यक्तिमत्वाचे आणि प्रेरणेचे तेज एवढे असामान्य की त्याच्या केवळ विचारस्पर्शाने सामान्य व्यक्तीलाही त्याच्या सत्वाची आणि स्वाभिमानाची प्रखर जाणीव होते.
आज गरज आहे अश्या अनेकांनी एकत्र राहून प्रयत्नांची शर्थ लावण्याची... प्रयत्न स्वातंत्र्य आणि समतेसाठी, प्रयत्न सत्य आणि न्यायासाठी,
प्रयत्न भयमुक्त आणि स्वाभिमानी समाज निर्मितीसाठी,
प्रयत्न सामान्य कष्टकरी - शेतकरी यांच्या सुखासाठी, प्रयत्न नवा समाज घडवण्यासाठी आणि
प्रयत्न तुमची प्रेरणा प्रत्येकाच्या हृदयात जिवंत ठेवण्यासाठी!
मला माहित नाही मी हे सर्व करू शकेन की नाही, पण हे करण्यासाठी मी माझ्या प्रयत्नांची शर्थ लावेन.. हे वचन म्हणजेच जिजाऊ चरणी माझी खरी आदरांजली. 🌺🌸🌼
🌹आपल्याला आणि आपल्या कुटुंबातील सर्वांना राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँ साहेब यांच्या जयंतीनिमित्त प्रेरणादायी शुभेच्छा. 🌹
🙏 जय जिजाऊ - जय शिवराय 🙏

Saturday, July 10, 2010

शिवाजी महाराज, महाराष्ट्र, धर्म, जाती आणि देश

महाराष्ट्रासाठी एक खूप दुर्दैवी घटना, म्हणजे जेम्स लेन च्या पुस्तकावरील बंदी उठणे. महाराष्ट्र शासनाला साधे ते ही थांबवा आले नाही; ही शरमेची बाब आहे. आणि या बंदी उठण्याला कुणी भाषण स्वातंत्र्यचा विजय असे म्हणत आहे, तर अशा वाचाळांना आणि बोलबच्चन बुद्धिवाद्यांना माझ्या कडून चार थोबाडीत ( संदर्भ: टी.ओ.आय मधील या संधार्भातील बातमी). महाराष्ट्र पुरोगामी राज्य आहे आणि ते काही आज काल परवा झाले नाही; कितेक वर्षां पासून या ना त्या मार्गाने आणि छोट्या आणि मोठ्या स्वरुपात पुरोगामीवाद महाराष्ट्रात अस्तित्वात आहेच. खुद्द शिवाजी महाराजांचे पुरोगामीपण सिद्ध आहे. पण पुरोगामी पण म्हणजे नवे आणि कसे का असेना स्वीकारणे नव्हेच. म्हणून या निर्णयाला स्वीकारणे म्हणजे पुरोगामी असे कुणी म्हणत असेल तर, असे लोक कृपया पुढे काही वाचू नका, आणि पुन्हा येथे भेट ही देऊ नका. उद्याच काय, आजच आपल्या याच स्वभावामुळे आपल्या 'अस्तित्वावरच' बाहेरचे आणि काही घरचेच संशय घेत आहेत आणि टिंगल उडवायल ही मागे पाहत नाहीत. जेम्स लेन सारखा परदेशी येतो काय आणि इथे राहून लिहितो काय, पुस्तक सुद्धा प्रकाशित करतो काय आणि आमच्या .... ला सुद्धा पत्ता नाही लागत. तो माxx लिहून जातो आणि मग आम्ही जाती-पातींच्या  मुद्यांना उकरतो आणि राजकारण सुरु करतो. असेल यात काही लोकांचा जात्यंधपणा, पण सगळ्या जातीलाच दोष देणे योग्य ही नाही आणि देऊ ही नये. मग पुन्हा कुण्या एका जातीने शिवाजी फक्त आमचाच आहे असे ही बोंब मारत फिरू नये आणि त्याच प्रकारे भांडारकर फुटले तर कुण्या एकाच जातीने गळ ही काढू नये.
तुम्हा सर्वांना विनंती करतो  की, जेम्स लेनचे पुस्तक बाजारात कुठे ही दिसता कामा नये, कुणी ही वाचता कामा नये. कारण त्या ह.खो. ने मांडलेला इतिहास त्याच्या सडक्या दिमाकातून बाहेर पडलेले काल्पनिक खेळ आहेत. उगाच काल्पनिक खेळांना इतिहास म्हणून सामान्य जणांची फसवणूक करण्याचा जो प्रकार समस्त शिकलेल्या लोकांनी मांडला आहे त्याचा समाचार इतर शिकलेल्या 'सर्व जातींच्या' लोकांनी घेने फार गरजेचे आहे.
वर वरून पाहता जात गेली असली (शहरात तरी) तरी बऱ्याच लोकांच्या डोक्यातून जात अजून ही गेली नाही, म्हणूनच भांडारकर संस्थेचा सगळ्या ब्राम्हनांशी, संभाजी ब्रिगेडचा सर्व मराठ्यांशी अश्या प्रकारचे संबंध जोडले जातात. आज गावो गावी आणि गल्ली बोळात हजारो संघटना आहेत त्यांना 'अशी' राष्ट्रीय मान्यता देण्यात आणि समस्त लोकांशी सर्रास जोडण्यात काहीच अर्थ नाही! (या वाक्याने मी भांडारकर किंवा संभाजी ब्रिगेड ह्या मोठ्या किंवा लहान संघटना आहेत हे सांगत नाही) भांडारकर संस्थेने केले कार्य ही फार मोठे आहे आणि संभाजी ब्रिगेडने काही विषयांवर उठवलेला आवाज ही योग्य आहे, या दोन्ही गोष्टींना ना कुण्या ब्राम्हणाचा विरोध असावा ना कुण्या मराठ्याचा. छत्रपती 'फक्त' संभाजी ब्रिगेडचे, छावाचे, मराठा सेवा संघाचे किंवा एकाद्या विशिष्ट जातीचे कधीच होऊ शकत नाहीत आणि या पैकी कुण्या ही संस्थेच हा उदेश्या असावा असेही मला वाटत नाही, असेल तर त्यांनी स्वतःच  अस्तित्व पुन्हा एकदा तपासून पहाव. पण त्याच प्रकारे इतर कोणताही समाज या प्रकारे महापुरुषांना स्वतःचेच म्हणून ठेऊ शकत नाही किवा, सामान्यतः व्यक्तीवर, व्यवसायावर स्वतःची मक्तेदारी ही सांगू शकत नाही.
छत्रपती हे स्वयंप्रकाशित सूर्य होते, त्या सूर्याला कुणी आपल्या छत्राखाली घेण्याचा प्रयत्न करत असेल तर ते छत्र नक्कीच जाळून खाख होईल यात तीळ मात्र ही शंका नाही! कारण अजून ही विविध जातील प्रखर शिवप्रेमी जिवंत आहेत, आणि या शिव प्रेमींना शिवाजी महाराज  कोणत्या जातीचे होते त्या पेक्षा त्यांनी केलेले कार्य मोठे वाटते. या शिव प्रेमी मध्ये सर्व जातील लोक आहेत- माळी, कोळी, ब्राम्हण, मराठा,  सुतार, लोहार, कुंभार आणि अशा अनेक (जातींची आपल्याकडे कमी नाही :( ).
हा जो सगळा घोळ झालाय तो सगळा हा सगळा एकमेकांच्या जाती द्वेषामुळे आणि जात्यांधपणा मुळेच; याच अधिक स्पष्ट कारण मला देता येईल पण बऱ्याच भावनिक दुखापती होतील म्हणून नको.
महाराष्ट्राच्या अस्मितेच्या मुद्यावर सुद्धा आमचा श्रेय लाटण्याचा प्रयत्न चालाय, अगदी त्या यु. पी. च्या मायावती सारखा. आता हे जेम्स लेन प्रकरण का झालाय याच्या वर वाद करत बसण्या पेक्षा सगळ्या जातींनी एकत्र येऊन पुन्हा अशी पिल्लावळ जन्माला येऊ नये याची काळजी घ्यावी.
त्या सोबतच जातींच्या आणि धर्मांच्या कोशातून बाहेर येऊन मी महाराष्ट्रीय आहे, मी एक भारतीय आहे या भावनेला स्वतः मध्ये बळकट बनवूया.
जय जिजाऊ!                                                                        जय शिवराय!

अजून पोस्ट संपली नाही, कारण वाचत असताना बऱ्याच लोकांना काही प्रश्न आले असतील ते थोडे स्पष्ट करतो. आता मी 'जय जिजाऊ' म्हटलं  म्हणजे मी नक्कीच मराठा सेवा संघ किंवा संबंधित संघटनेचा भाग असेल असे कुणास वाटले असेल तर, या ब्लॉगशी वा जिजाऊ.कॉमशी संबंधित कुणाचाही ही कोणत्याही जातीय व धार्मिक, राजकीय संघटनेशी संबंध नाही. आणि पुढचे काही प्रश्न तुमच्या साठी, जय महराष्ट्र म्हटलं की शिवसेनेचाच का? आणि जय जिजाऊ म्हटलं की सेवा संघाचाच का? गुत्त घेतलाय का त्यांनी हे सगळ? इतरांना का नाही अभिमान या सगळ्या गोष्टींचा?

टीप:सदर पोस्ट मधून कुणाच्या जातीय भावना दुखवल्या गेली असतील तर  क्षमा. सर्व जातींच्या नावांचा उल्लेख फक्त गरजेपायी केला गेलेला आहे. कुणास ही काही गैर वाटत असेल तर कळवावे.
            

Wednesday, March 4, 2009

शिव जन्मोत्सव .. एक संकल्प



शिव जन्मोत्सव.. ज्या व्यासपीठा वरुन आयुष्याला एक नवीन दिशा मिळाली .. जगण्याचे एक नवे ध्येय मिळाले.. आणि तोच आदर्श डोळ्यासमोर ठेवून आज पर्यंत एक-एक यश प्राप्त करीत आलो त्याच व्यासपीठावारती परत एकदा जाण्याचा योग आला..
खरच नशीब असावे लागते जेथून तुमची खरी जडन घडण झाली त्याच ठिकाणावरून तोच विचार तुम्हाला मांडण्याची संधी मिळते. तशी संधी मला मिळाली आणि एका क्षणाचाही विचार न करता मी निघालो परत त्याच वाटेवरती.. साजरी करायला शिव जयंती.... सोबत होते आगदी सुरुवाती पासूनच ज्यांची साथ मिळाली आसे श्याम वाढेकर, प्रकाश पिंपले पाटील, प्रशांत मिसाळ आणि सुधाकर पाटील...आणि अनेक जणांच्या शुभेच्छा घेऊन... निघालो एस जी जी एस च्या दिशेने...


कॉलेज मधे येताच आनंद झाला तो कॉलेज चा चेरा मोहरा बदलेला पाहून .. आगदी कोणत्याही आय आय टी ला पण लाजवेल अशी एक भव्य इमारत आगदी प्रवेश केल्या बरोबर दिसली.. नक्कीच येणार्‍या उज्वल भविष्याची जणू साक्ष देत होती.. त्याच भव्य वस्तू मधे साजरा होणार होता शिव जन्मोत्सव 2009.

कार्यक्रमाच्या आगोदर बर्‍याच सर लोकाना भेटण्याचा योग आला, तेच प्रेम तीच आपुलकी. फरक एवढाच की आमच्या कडे पाहून त्यांच्या डोळ्यातून एक अभिमान जाणवत होता . आपला एक विद्यार्थी त्याच्या आयुष्या मधे यशस्वी झालेला बघून कोणत्या गुरू ला अभिमान वाटणार नाही. आणि आयुष्या मधे काही तरी करून दाखवू शकलो ह्याचा अभिमान आम्हाला सुद्धा होता.

आता कार्यक्रमाला सुरूवात होणार होती.. व्यासपीठ भरले होते मान्यवरणि.. आम्हाला कार्यक्रम परत एकदा एक शिव भक्त म्हणूनच बघायचा होता.. मग काय सामील झालो आम्ही आमच्याच कॉलेज च्या तमाम शिव भक्तासमवेत..

सर्व कॉलेज तर्फे आमचे हार्दिक स्वागत करण्यात आले.. सर्वाना आनंद झाला होता कारण बर्‍याच दिवसा नंतर असा आजी - माजी विद्यार्थ्यांचा मेळावा भरला होता.

खूप काही बोलायचे होये.. वेळे चे पण बंधन होते .. तरी पण कमी वेळे मधे जेवढा काही महत्वाचे बोलायचे होते ते बोलण्याचा प्रयत्न केला.. तरी पण आज सर्व विचार परत एकदा कुठे तरी मांडण्याचा प्रयत्न करतोय..

करपुनि गेली होती धरणी जेंव्हा यवनांच्या जाळाखाली
रोज लुटली जात होती अभ्रू धर्माच्या नावाखाली
तेव्हा एक सुर्या उगवला होता या महाराष्ट्राच्या धरती वरती
त्रिवार वंदन करितो त्या शिवरायास
आजच्या या शुभ मुहूर्तावरती !!!!

सर्व प्रथम मला आभार मानायचे आहेत ते कॉलेज च्या शिव जान्मोत्सव टीम चे ज्यांनी आम्हा सर्वांना कॉलेज मधे परत येण्याची संधी दिली, आणि आपल्या मा. डायरेक्टर सरांचे ज्यानी केवळ कार्यक्रमाला परवानगीनाही दिली तर त्यांचा पूर्ण मार्गदर्शन या कार्यक्रमास लाभले.

खर तर माझ्या साठी ही एक आभिमाणाचीच बाब होती कारण मी जिथे घडलो आज तिथून बोलण्याची संधी मला मिळाली होती, माझ्या आगोदर बोलताना बरेच वक्ते इथे आसलेल्या कमी उपस्थिती बद्दल बोलले.. पण एक सांगावे वाटते.. कार्यक्रमाला असलेले आणि इथे नसलेले ह्यांच्या मधे फार मोठा फरक आहे मित्राणो .. मी , माझा काम, माझा आयुष्य , आणि माझे प्रॉब्लैम्स ह्यांच्या बाहेर कधी विचार नाही करत ते म्हणजे कार्यक्रमाला नसलेले... आणि ज्यानी मी चे वर्तुळ तोडून मी , माझी भाषा, माझी संस्कृती, माझे राष्ट्र ह्यांचा विचार केला आसे म्हणजे कार्यक्रमाला बसलेले.. स्वतहाच्या पलीकडे जाऊन ज्यानी विचार केला आसे आपण सर्व.

आयुष्या मधे हे 'मी' चे जे वर्तुळ आसते ना ते सर्वात कठीण आसे चक्रव्यूह असते.. ते आज ज्यानी तोडले त्यांच्या साठी
आता या जीवनाच्या चार ही दिशा मोकळ्या झाल्या आहेत .. आणि प्रत्येक दिशे मधे यश तुमच्या पायाशी लोळल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे.

आपण सर्व या शिव जान्मोत्सवा निमीत्याने एकत्र जमलो त्या बद्दल सर्वांचे अभिनंदन करतो आणि आभार सुद्धा मानतो कारण सध्या राष्ट्राला गरज आहे ती अशाच स्वाभिमानी युवकांची....

शिवरायांनी सुद्धा जीवनभर एकच वसा घेतला होता तो म्हणजे माणसे घडवण्याचा आणि त्यांना एकत्र जोडण्याचा... आपल्या कर्मानेच आपल्या राष्ट्राची निर्मिती आथवा विकृती सुद्धा होत असते हा विचार त्यानी स्वराज्यातील लोकांमधे खोलवर रुजविला . म्हणूनच तानाजी, बाजीप्रभू, बाजी पासलकर,जिवा महाले असे अनेक ज्यांची इतिहासामधे साधी नोंद पण नाहीए असे लोक स्वराज्या निर्मिती च्या कार्या मधे कामी आले.

त्या सर्वांच्या मनामधे एकच भावना होती ती म्हणजे स्वराज्य निर्मिती हे आमचे कार्य आहे .. आणि आमचे प्राण गेले तरी बेहत्तर पण स्वराज्याची घौड्दौड... शिवबाची घौड्दौड कधी ही थांबली नाही पाहिजे...

एकदा पन्हाळगडला आसच वेढा पडलेला होता, सिद्धी जौहर आपल्या प्रचंड सैन्यासह ताण मांडून बसला होता, संकट सर्व दिशेने चालून येत होते .. अशावेळी एक तरुण पुढे आला .. त्याचे नाव होते शिवा न्हावि, खोटा शिवाजी बनून तो त्या प्रचंड सैन्या समोर गेला.. तेवढीच उसंत मिळताच राजे पन्हाळगडचा वेढा तोडण्यात यशस्वी झाले, त्याला त्याचा अंत माहीत होता तरी पण तो स्वता हून मृत्युच्या जबड्यात गेला .. कारण त्याला काळजी होती स्वराज्या वाचण्याची...

पण संकट अजुन ही संपले नव्हते .. विशालगड अजुन गाठायचा होता, संकट अजुन पण महाराजांची पाठ सोडत नव्हते , आशावेळी परत एक वीर मावळा समोर आला आणि म्हणाला , राजे तुम्ही विशाल गडाकडे कूच करा आम्ही येणार्‍या संकटाला इथेच आडवून ठेवू ,आमच्या शरीरा मधे शेवटचा श्वास असे पर्यंत दुश्मन एक पाऊल सुद्धा पुढे जाणार नाही ... तो वीर मराठा होता बाजीप्रभू देशपांडे. अंगावर शत्रुंचे घाव झेलत , सपासप आपली तलवार चालवत तो शत्रुंच्या खान्डोळ्या-खान्डोळ्या करत होता.. आपल्या पवित्र रक्ताने त्या घोडखिंडीस त्याने पावन केले.. उदाहरण खूप आहेत .. निष्कर्ष एकच.. त्या सर्वामधे एकच भावना होती ती म्हणजे माझ्या राष्ट्रासाठी मलाच काही तरी करावे लागणार .. आज आपण पण हीच गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपल्याला काही बदल हवा असल्यास तो बदल आपणच घडवून आणला पाहिजे

लोकसभा किंवा विधानसभे मधे बदल घडवून आपल्या देशाचे भवितव्य बदलणार नाही .. त्या साठी गरज आहे आपल्याला बदलण्याची, आपले विचार बदलण्याची, आपल्या विचारणा एक योग्या दिशा देण्याची.

देशाची कमान जो पर्यंत एक दिशा आणि दूरदृष्टी असलेल्या तरुणांकडे आसणार नाही तो पर्यंत या देशाला साक्षात ब्रम्हदेव सुद्धा वाचवू शकनार नाही.

स्वराज्यातला एक किस्सा सांगावा वाटतो, एकदा छत्रपती असेच साध्या वेशा मधे आपल्या 10 -11 घोडस्वारां सोबत राज्याच्या फेरफटक्यला निघाले. समय धामधूमीचा होता, सैन्याची पळापळ चालू असायची, आचानक एक 10-11 वर्षाचा कोवळा पोरगा शिवरयासमोर येऊन उभा टाकला आणि म्हणाला ..

खबरदार .. जर टाच मारुनी जाल पुढे, तर चिंधड्या उडविल राई राई एवढ्या.

कोण आहात आपण? कुठे चाललात ? काय काम आहे ?

एव्हढासा तो कोवळा पोरगा हे सर्व विचारात होता कारण त्याला काळजी होती स्वराज्याच्या सुरक्षेची, त्या वेड्याणे तर शिवबना कधी पहिले पण नव्हते.

आज परिस्थिती उलटी आहे, अतिरेकी आमच्या घरा मधे घुसून आमचे मुडदे पाडीत आहेत आणि आज आम्ही 24 तास न्यूज़ चॅनेल समोर बसून त्यांचे पोट भरण्याचे काम करतो.

काळ फार कठीण आहे मित्राणो , गरज आहे आता आपल्यालाच पेटून उठण्याची, डोळ्यात तेल घालून आपल्या देशाची,भाषेची आणि आपल्या संस्कृतीची सुरक्षा करण्याची. गरज आहे मानसिक गुलामगिरीतून मुक्त होण्याची

शिव चरित्रा सारखा धगधगता दिपस्तंभ समोर आसताना हे कार्य कठीण नाही, छ्त्रपती शिवाजी महाराजांना आदर्श माननारा कधीच कुठल्याही प्रकारच्या गुलामगिरी मधे असूच शकत नाही, त्याच्या मधे प्रचंड आत्मविश्वास आणि स्वाभिमान असतो. अत्यंत प्रतिकूल परिस्थीत मधे सुद्धा निराश न होता संकटातून बाहेर पडण्याची ताकत त्याच्या मधे असते .

शिवाजी महाराज आज येणार नाहीत, आणि कधी आले तरी ते तूंमच्या आमच्या हात मधे ढाल तलवार देणार नाहीत, आजचे युद्ध आहे ते ज्ञानाचे, विचारांचे, संगणक आणि माहिती तंत्रज्ञानाचे.

शिव चरित्रातून प्रेरणा घेऊन आपण आपल्यातला मी पणा सोडून, आजच्या या स्पर्धात्मक युगात कला, क्रीडा, विज्ञान , संस्कृती, भाषा,प्रशासन अशा अनेक क्षेत्रा मधले विविध गड जिंकून आपल्याला एका उज्वल आणि बलवान भारत देशाची निर्मिती करायची आहे ,तेव्हाच आपल्या देशाकडे कोणाची पण वाकडी नजर टाकण्याची हिंमत देखील होणार नाही.



हे सर्व प्रत्यक्षात पण होईल कारण तशी मला खात्री आहे , शिव जयंतीच्या या कार्यक्रमा मधे मला याची जाणीव सुद्धा झाली. निव्वळ टेकनो लेबर घडवण्या पेक्षा, देशाला गरज आसलेल्या प्रज्वलित मनांची निर्मिती सुद्धा ही झालीच पाहिजे आणि कमीत कमी माझा कॉलेज या बाबतीत मागे राहणार नाही आणि शिव जयंती सारखे कार्यक्रम आसेच दिशा आणि दृष्टी असलेले युवक आपल्या समजा मधे घडवत राहतील.

मला खरच आभार मानावे वाटतात ते सर्व माझ्या कॉलेज च्या मित्रांचे ज्यानी ही विचारांची ज्योत सतत पेटती ठेवली. ही ज्योत नेहमी एक स्वाभिमाणाची आणि राष्ट्रा प्रेमाची भावना आपल्या र्‍हदया मधे पेटवत राहील.


शिव जान्मोत्सव हा निव्वळ एक कार्यक्रम नसून एक संकल्पना आहे , हीच भावना आपल्या कॉलेज मधे रुजावी एवढीच अपेक्षा होती आणि त्यात आम्ही यशस्वी झालो हे सांगण्यात मला खूप अभिमान वाटतो.

हे अविस्मरणीय असे क्षण कॅमरा मधे संग्रहीत केले आहेत ...



इथे तुम्ही बघू शकता


जय महाराष्ट्र .

अमोल सुरोशे