Thursday, January 11, 2018

स्वराज्य प्रेरिका राजमाता जिजाऊ आऊसाहेब !!!

स्वराज्य नावाच्या संकल्पनेचे कठीण स्वप्न बघणाऱ्या आणि ते प्रत्यक्षात आणण्यासाठी उभे आयुष्य खर्ची घालणाऱ्या स्वराज्य प्रेरीका राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी अभिवादन! 🙏🌹👏
या सुंदर आणि स्वप्नवत स्वराज्याला मूर्तरुप देऊन आणि त्यास तितकेस साजेसे असे दोन छत्रपती राजे घडवणारी ही राजमाता.
केवळ राजा आणि त्याचे सैन्य यापुरती सीमित असणारी राजसत्ता या माऊलीने समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोचवली,नव्हे तशी खबरदारीच घेतली आणि त्यात त्यांना एकरूप करून घेतले. 
म्हणूनच समाजातील समस्त जाती - वर्गातील घटक हे स्वराज्य घडवण्यासाठी अगदी हिरारीने पुढे आला, आपले सर्वस्व विसरून तो या स्वराज्याचा एक मावळा झाला.
यापूर्वी कधी ही न घडलेले - बघितलेले ते ते प्रत्यक्षात उतरत होते, सामान्य कष्टकरी-शेतकरी हाती तलवार घेऊन लढत होते, गावकुसाबाहेर राहणारा सामान्य जातीतील माणूस शिवबाच्या खांद्याला खांदा लावून लढू लागला, अठरापगड जाती - बारा बलुतेदार स्वराज्य कार्यात आप आपल्या परीने योगदान देऊ लागले. या सर्वांमागे एक अदृश्य शक्ती एक अफाट प्रेरणा होती - जिजाऊ माँ साहेबांची!!
या राष्ट्रमतेची आज प्रखरतेने आठवण होण्याचे महत्वाचे कारण म्हणजे पुन्हा एकदा समाज व्यवस्थेची घडी विस्कळीत झालीये, पुन्हा एकदा व्यक्तिगत स्वार्थ, अहंकार आणि लाचारी यांची बजबजपुरी माजलेली आहे, स्वकीयांनीच घात करून आपली निष्ठा बईमानांच्या पायी वाहिली आहे, समाज वेगवेगळ्या जाती - समूहामध्ये विभागला गेलाय आणि या मातीच्या प्रत्येक प्रेरणादायी व्यक्तिमत्वाला जातीच्या घट्ट साखळदंडास बांधून ठेवले गेले आहे.
स्वराज्य म्हणजे रयतेचे राज्य, इथे सामान्य रयत आज गुलामीचे जीवन जगताना दिसत आहे मग ती सामाजिक, राजकीय किंवा आर्थिक गुलामी असो.
ही गुलामी झुगारून पुन्हा समतेचे आणि न्यायाचे राज्य निर्माण होणे गरजेचे आहे, त्यासाठी गरज आहे तसा समाज घडण्याची!
तुमच्याच नावाचा वापर करून आज तुमच्याच लोकांमध्ये फूट पाडली जाते, भ्रम निर्माण केले जातात, अश्यावेळी तुम्ही दाखवलेल्या स्वप्नांची आणि शिकवणीची उजळणी तेवढीच आवश्यक ठरते!
माँ साहेब आज तुम्ही नसल्या तरी तुमच्या प्रेरणेने लाखो - करोडो लोक आजही तुम्ही दाखवलेल्या मार्गावर आपले आयुष्य पणाला लावीत आहेत.
तुमच्या व्यक्तिमत्वाचे आणि प्रेरणेचे तेज एवढे असामान्य की त्याच्या केवळ विचारस्पर्शाने सामान्य व्यक्तीलाही त्याच्या सत्वाची आणि स्वाभिमानाची प्रखर जाणीव होते.
आज गरज आहे अश्या अनेकांनी एकत्र राहून प्रयत्नांची शर्थ लावण्याची... प्रयत्न स्वातंत्र्य आणि समतेसाठी, प्रयत्न सत्य आणि न्यायासाठी,
प्रयत्न भयमुक्त आणि स्वाभिमानी समाज निर्मितीसाठी,
प्रयत्न सामान्य कष्टकरी - शेतकरी यांच्या सुखासाठी, प्रयत्न नवा समाज घडवण्यासाठी आणि
प्रयत्न तुमची प्रेरणा प्रत्येकाच्या हृदयात जिवंत ठेवण्यासाठी!
मला माहित नाही मी हे सर्व करू शकेन की नाही, पण हे करण्यासाठी मी माझ्या प्रयत्नांची शर्थ लावेन.. हे वचन म्हणजेच जिजाऊ चरणी माझी खरी आदरांजली. 🌺🌸🌼
🌹आपल्याला आणि आपल्या कुटुंबातील सर्वांना राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँ साहेब यांच्या जयंतीनिमित्त प्रेरणादायी शुभेच्छा. 🌹
🙏 जय जिजाऊ - जय शिवराय 🙏

1 comment:

Unknown said...

Sir mera bizli connection nhi mil rha hai
Kya kare sir btaiye
Appp
Mera mobile noo. 8115060534

Post a Comment