Friday, June 5, 2015

शिवाजी भोसले

धारदार मिशा. डोक्यावर पिवळा पटका. खांद्यावर नक्षीदार नखीचे उपरणे. असे हे शहाजी भोसले पाटील. घरी आर्थिक स्थैर्य. वडिलांची ८० एकर. दोन भावात वाटून यांना ४० एकर आलेली. थोडक्यात सगळे बरे चाललेले. गहू, ज्वारी, मका, तूर, भुईमुग, केळी, ऊस आणि थोडा फार कापूस अशी लावगड. पुढे २ मुली झाल्या. दोघी जुळ्या. त्या दोघींच्या पाठीवर ३ वर्षांनी एक मुलगा झाला. लांबसडक नाक. गुबगुबीत तब्येत. वडील शहाजी म्हणून मुलाचे नाव शिवाजी ठेवले. म्हणून हे - शिवाजी शहाजी भोसले.

तर हे शिवाजी भोसले आपल्याकडे आधुनिक प्रगती आणि विकास येण्याच्या आधी जन्मलेले. यांचे शिक्षण होत असतांना नेमक्याच मोटारकारी खेड्या पाड्यात दगडा मातीच्या रस्त्याने धूळ उडवत येत होत्या. रस्त्याची आणि सिंचनाची कामे नेमकीच सुरु झालेली. गावातील गोर गरीब या सरकारी कामावर जाईत. गावात शाळा ४ थी पर्यंतच. तिथेच शिवाजीचे शिक्षण झाले. पुढे शिकण्यासाठी वडिलांनी त्याला शेजारच्या तालुक्याच्या शहरात ठेवले रोज मित्रांसोबत १० किलोमीटरचा पायी प्रवास. बाजाराच्या दिवशी गावातून अनेक गाडी-बैला शहराला जात. तितकाच त्या दिवशी त्यांच्या पायांना आराम मिळे. दहावी झाली. ६२% घेऊन चांगल्या मार्काने शिवाजी पास झाला. सोबतचे काही नापास तर काही ढकल पास झाले. पुढच्या शिक्षणासाठीही वडिलांनी तिथेच तालुक्याला अडमिशन दिले. जाऊन-येऊन बारावी काढली ती हि ६०% ने. पुढे हि तिथेच शिक्षण. आता मात्र घरचा व्याप वाढल्याने शेताकडील कामा धंद्यात जास्त लक्ष द्यावे लागे. दोन्ही बहिणींच्या लग्नासाठी काही शेती विकली गेली होती आणि काही साथ न देणाऱ्या निसर्गामुळे विकावी लागली होती. वडील थोडे थकले म्हणून शिवाजीचे शिक्षणही एस.वायलाच थांबले. उरलेली २०-२२ एकर कसायची म्हणजे मनुष्यबळ लागणारच. गढी होताच, पण तरीही घरचं कुणीतरी असावं म्हणून शिवाजी पूर्णवेळ शेतकरी झाला. एकीकडे शिक्षण खुणावत होते आणि दुसरीकडे जबाबदाऱ्या खेचत होत्या. शेवटी जबाबदाऱ्यांची ताकद भयंकर. शिक्षण सुटलेच.
वडील आजारी पडले आणि ग्रहण लागल्यागत दवाखाना पाठीशी लागला. दवाखाना कधीच एकटा येत नाही. शिवाजीच्या मागे दर एक-दोन महिन्यांनी जिल्ह्याच्या वाऱ्या आणि हजारोंचा खर्च. पैशाची होईल तोवर घरून व्यवस्था झाली. या काही वर्षात 'फक्त' खाजगी दवाखानेच सर्वसोयीनी तत्पर झाली होती. हे सगळे घरच्या पैशावर आणि जेमतेम उत्पन्नावर भागेना. एक दिवस तो मागच्या वर्षीची खर्चाची वहीच घेऊन बसला. खर्च आणि उत्पन्न याच्यात भयंकर ताफावत होती. वडलांची मोटार सायकल विकली आणि या महिन्याचा दवाखाना केला. असच तडजोड करत, कर्ज घेत आणि अर्धा एकर विकून एक वर्ष काढले.

घरातल कुणी करतं खचलं कि सगळेच खचतात; त्याच नियमाने आईही थोडी खचली. अर्थातच शिवाजीचे लग्न केले गेले. एक-अर्धे वर्ष मजेत निघाले. घरात हि सगळे आनंदी. वडिलांचा दवाखाना चुकत नव्हताच, पण शिवाजीच्या येणाऱ्या बाळाच्या चाहुलीने सगळ आनंदी वाटत होतं.

सगळी सोंगे आणता येतात पण पैशाचे सोंग आणता येत नाही. वडलांचा आणि बायकोचा दवाखान्याचा खर्च, शेतातलं सगळ. हि सगळी कसरत शिवाजीसाठी खूप कठीण गेली. पर्याय नसल्याने जगण्यासाठी, जगवण्यासाठी आणि पिकवण्यासाठी जमिनीचे तुकडे विकण्याशिवाय पर्याय नव्हता. योग योगाने प्लॉटिंग वगैरे सारख्या गोष्टी पुढे येतील याची चाहूल लागलेला वर्ग अशा अडचणीतील लोकांच्या मोक्यावरील जमिनी पैशे मोजून घेऊ लागला. सरळ साधे सोपे आयुष्य जगणारांसाठी तो प्रांत नव्हताच आणि सध्याची अडचन समोर आ वासून उभी असल्याने असले प्लॉटिंग वगैरेचे विचारही त्याला कधी शिवले नाहीत. त्याला फक्त दिसत होते - मागे असलेला बाप आणि पुढे येणारे मुल.
               
योग योगाने शिवाजीलाही जुळे झाले. एक मुलगा आणि एक मुलगी. दोन्ही आत्यांनी हौशेने त्यांची नावे ठेवली 'विकास' आणि 'प्रगती'. पुन्हा आनंदाने घर भरून गेले. पाहुणे-राहुने-खर्च. पुन्हा तेच चक्र. आधी शिवाजी पायीच तालुक्याचा गावी जायचा. उन्हाळा पावसाळा कोणताही ऋतू असो. तसे सगळेच जायचे. म्हणून नवल नाही. सरकारी एसटी नाही किंवा प्रयाव्हेट गाड्या नाहीत असेच ते गाव.

वडिलांची तब्येत रहावी म्हणून दवाखाने केले, वैद केले आणि नवस हि केले. विशेष फरक नव्हताच. पुढे निवडणुका आल्या आणि जवळपास सगळीकडेच असलेल्या या दरिद्री अवस्थेला कंटाळून लोकांनी राज्यातले आणि देशातले सरकार बदलले. हळू हळू रस्ते झाले. लोक शहरांकडे राहायला गेले. शिवाजीने विकलेले तालुक्याच्या दिशेचे शेत आता लोक वस्तीत रुंपांतरित झाले. अनेक शेत मजूर मोठ्या शहरांमध्ये कामे करायला निघून गेली. हळू हळू गावे ओसाड झाली. शिवाजीलाही विचार आला. पण घरची ९-१० एकर शेती असतांना शहरात जाऊन काम म्हणजे - चार लोक काय म्हणतील? एक दिवस उन्हाळ्यात नेमक्याच बनलेल्या डांबरी रस्त्याने काहीही वाहन मिळत नसल्याने शिवाजी पायीच चालत होता. उन्हाने तापलेले डांबरी रस्ते चालण्यासाठी मातीच्या रस्त्या पेक्षा जास्त त्रासदायक वाटत होते. तो कसा बसा मिळालेच कुठे झाड तर आराम करत तालुक्याला पोहचला. संध्याकाळी घरी आला. निपचित पडलेला असतांना असाच विचार करत होता - "तशी दरिद्री तर काही वर्षांपासून या गावाच्या पाचवीला पुजलेलीच. पण लहानपणी दवाखाने नव्हते. खर्च नव्हते. कामापुरते पिकायचे. दुष्काळ पडायचा. पण आमचे निभायचे. मातीचे रस्ते उन्हाळा असो कि पावसाळा अवघड होतेच. पण डांबरी रस्त्यांनी प्रगती आणली पण तिने माझ्यासरख्याचे पायच जास्त पोळले. त्याच डांबरी रस्त्याने गावातली सुबत्ता अधिक वेगाने बाहेर जाऊ लागली आणि खर्च त्याही पेक्षा वेगाने गावात येऊ लागले." अचानक राडारड झाली, शहाजी गेले. 'सुटले' अस शिवाजीची आई म्हणाली. तोही पाणावला. काही महिने असेच गेले. वाड्याच्या बैठकीत वडलांचा तारुण्यातील रुबाबदार फोटो लागला. त्यावर खाली त्यांचे लाल रंगात नाव लिहिले - कै. शहाजी भोसले पाटील.

शिवाजीने निर्णय घेतला. आईला गावाकडे ठेऊन बायको पोरांसोबत तो पुण्याला आला. शिक्षण ठीकठाक असल्याने काम मिळाले - महिना ८ हजार. वर्षातच शिवाजीने घरात टीव्ही घेतला. प्रामाणिक आणि मेहनती असल्याने कामात बढती मिळाली.

एकदा 'राजवाडा हॉटेलच्या' भेटीवर असतांना पांढऱ्या शुभ्र कपड्यातील मालक रामदास माने यांनी म्यानेजरला सुपर वायजरचे नाव विचारले, त्याने थोडे वाकून सांगितले - शिवाजी भोसले. मानेंनी हॉटेलच्या दर्शनी भागात लावलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मोठ्या फोटो कडे पाहून लांब श्वास घेतला; हताश झालेले माने म्यानेजरला येतो म्हणून निघून गेले. म्यानेजरला अचानकच काहीतरी कळाल्यासारखे तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटो कडे तर कधी शिवाजी भोसले कडे बघतच राहिला.

No comments:

Post a Comment