Thursday, June 7, 2012

कित्ती तोडणार शिवरायांना ?

शिवराय. सह्याद्रीच्या माथ्यावर वर्षानुवर्षे तळपणारा क्रांती सूर्य ! या मराठी मातीचा अखंड प्रेरणा स्त्रोत !

पण ह्या सूर्याला हि ग्रहण लावण्याचे काम गेले काही दिवस याच मातीमध्ये होतांना दिसते आहे.  शिवाजी महाराज किंवा त्यांचा इतिहास आला म्हणजे वाद हा आलाच हे काही आता या महाराष्ट्राला नवीन नाही , ज्या युगपुरुषाची कीर्ती आणि मूर्ती आम्ही सतत डोळ्यासमोर ठेवली पाहिजे त्यांचे नाव घेताच आज आठवण - उजळणी  होते ती त्यांच्याबद्दलच्या विविध वाद - विवादांची. बर हे वाद - विवाद निर्माण करणारे म्हणजे कोल्ह्या - कुत्र्यांच्या औलादीच ! लचके तोडून खाणे आणि पळून जाने हाच यांचा धंदा. पण आज माझा सवाल आहे कित्ती लचके तोडणार या महाराष्ट्राच्या आराध्याचे ! ज्याने सबंध अठरापगड जातींना एकत्र बांधून, खांद्याला खांदा लाऊन, उभा आयुष्य स्वराज्य निर्मितीसाठी खर्ची घातलं आज त्यालाच प्रत्येक जन टोळी टोळीने वाटून घेत आहे, ऐकायला आवडणार नाही पण हे सत्य आहे, आमच्या मातीचा आमचा पहिला वाहिला छत्रपती आम्ही वेगवेगळ्या गटा - तटांमध्ये वाटून टाकला.

तिथी वाल्यांचा एक गट ! तारखे वाल्यांचा एक गट !... ब्राम्हणांचा शिवाजी कुठे मराठ्यांचा शिवाजी ! बहुजनांचा शिवाजी .. तर कुठे आर एस एस वाल्यांचा शिवाजी .. एका शिवाजीचे एवढे तुकडे. खरतर शिवराय हे इतिहासातील एक निर्विवाद व्यक्तिमत्व आहे कि ज्याची दखल सबंध जगणे घेतली, सर्वांनी मानावे असे ते व्यक्तिमत्व पण आम्ही त्यांचे काय केले?

सर्वप्रथम तर आम्ही ह्या बहुआयाम्ही आणि धुरंदर व्यक्तिमत्वाला दैवत्व देऊन त्यांच्यातील असामान्य गुणांना झाकण्याचा प्रयत्न केला, शिवराय आणि त्यांचे विचार डोक्यात घालवण्या ऐवजी त्यांना फ़क़्त डोक्यावर घेऊन फिरणाऱ्या आणि मिरवणाऱ्या टोळ्या निर्माण करण्यात आल्या ! मला नेहमी प्रश्न पडतो.. शिवराय देवाचे अवतार होते का ? नक्कीच नाही... ते आपल्या सारखेच हाडामासाचे पण एक अद्भुत व्यक्तिमत्व. मग त्यांच्या जयंत्या - पुण्यतिथी - राज्याभिषेक सोहळे हे पंचांग पाहून का बरं?
जो राजा  उभे  आयुष्य कुठल्याही वेळेची - काळाची तमा न बाळगता केवळ आणि केवळ लढत राहिला.. तुमच्या आमच्या साठी.. या मातीसाठी ! त्यांचे  सोहळे - त्यांची आठवण आज आम्ही पंचांग पाहून करणार आहोत का ? बर हे पंचांग वाले .. वर्षातील उरलेले सर्व दिवस इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे चालणार.. ह्यांच्या शाळा.. सुट्ट्या.. कार्यालये.. हे सर्व तारखेनुसार ह्यांना चालते,  ३१ डिसेंबर सुद्धा चालतो. फ्रेन्डशिप डे चालतो, व्हैलेनटायीन डे चालतो ! पण शिवरायांच्या बाबतीत ह्यांचे नीती नियम वेगळे.

बर सबंध भारतातील इतर सर्व महापुरुषांची जयंती अथवा पुण्यतिथी हि तारखेनुसार होते, आज २ ऑक्टोबर ला काय असते हे सांगायची गरज नाही, १४ एप्रिल ला काय असते हे सांगायला कुण्या विद्वान पंडिताची गरज लागत नाही..  मग असे असतांना केवळ शिवरायांच्या बाबतीतच असे का ?

सरकारी पातळीवर हा प्रश्न सोडवला गेला.. पण राजकीय आणि सामाजिक पातळीवर हा प्रश्न फार मोठे स्वरूप घेऊन उभा आहे.

एका सामान्य माणसाला.. जो शिवरायांना त्याच्या मनापासून मानतो, त्यांच्या पासून प्रेरणा घेतो आज त्याला निट कळत नाही कि कधी या महापुरुषाचे मी स्मरण करू.. कधी त्यांना आदरांजली अर्पण करू.. कधी माझा राजा छत्रपती झाला तो सोहळा साजरा करू? तिथीने करू कि तारखेने ? मग तिथी वाले कोण आणि तारखे वाले कोण ? दोघांची विचारसरणी काय ? मी कुणाच्या सोबत उभा राहू.. ? त्यांचे वाद.. ?  राहू द्या .. जाऊ द्या  !!! म्हणजे सुरुवातीला शिवरायांचा विचार डोक्यात असणार्याचा शेवट हा असल्या विचारांनी होतो.. हे फार - फार भयावह आहे. इतिहासनी दिलेला हा अजरामर ठेवा आम्ही आमच्या हातांनी संपवतोय. का देतोय मुठभर टोळक्यांच्या हाती या मातीचा बहुमोल मुकुट मनी ?

महाराजांना मानणार्यांनो एकत्रित पणे उभे राहा, पुढच्या पिढीसाठी जपून ठेवलेली हि एक अनमोल शिदोरी आहे.. ती नष्ट होण्या अगोदर जागे व्हा.

का नाही आपण त्या राजाच्या नावे एकत्रित पणे उभे राहू शकत .. दुभंगलेली जनता पाहून तो सह्याद्री सारखा कणखर राजा हि आज अश्रू ढाळत असेल.. परकीयांशी तर ते लढले, पण स्वकीयांनीच घात केला असे म्हणण्याची वेळ येऊ देऊ नका.. खरच ती वेळ येऊ देऊ नका.

शिवरायांची जयंती, पुण्यतिथी किंवा शिव राज्यभिषेक दिन हा सद्य परिस्थती मध्ये दोन - दोन वेळा साजरे केले जातात, यामुळे निर्माण होणारा संभ्रम, शंका, आणि समाजमनातील दुही हे सर्वच खऱ्या शिव भक्तासाठी प्रचंड  वेदनादायक आहे. याच वेदनेने सर्वांना विनंती करीत आहे कि सबंध मानवजातीला आदर्श असणारे हे व्यक्तिमत्व जगभर न्यायचे असेल, मऱ्हाटी मुलुखाचा खरा स्वातंत्र्य दिन जगभर साजरा करायचा असेल तर आपण सर्वांनी  शिवरायांचे सर्व ऐतिहासिक क्षण  हे कुठल्याही वादाविना तारखे प्रमाणे एकत्र येऊन साजरे करावेत.


जय महाराष्ट्र.. जय जिजाऊ .. जय शिवराय

अमोल सुरोशे (नांदापूरकर)

No comments:

Post a Comment