Tuesday, June 7, 2011

हिंदू - नक्कीच खूप चांगली असणार

भारतीय उपखंडात एकाच प्रकारची संस्कृती सर्व धर्मामध्ये आढळते. मृत व्यक्तीचे श्राद्ध करणे, परलोकावर विश्वास ठेवणे वगैरे सर्व घटक या खंडात सगळीकडे आढळतात. ‘हिंदू’ शब्दाची व्युत्पत्ती शोधायची झाली तर सिंधु नदीच्या तीरावर रुजलेली संस्कृती म्हणजे हिंदू संस्कृती असे म्हणता येईल. या नदीच्या पलिकडील लोकांनी अल्लाउद्दीन खिल्जी, अकबर यांनाही हिंदूच म्हटल्याचे दाखले मिळतात. दरम्यानच्या काळात ‘हिंदू’ या शब्दाचे अर्थ बदलत गेले. परंतु हिंदू ही भूसांस्कृतिक संकल्पना आहे आणि त्याचे भूसांस्कृतिक वैशिष्टय़ आपण जपले पाहिजे असे प्रतिपादन आज भालचंद्र नेमाडे यांनी केले. तब्बल तीस वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भालचंद्र नेमाडे यांची ‘हिंदू - जगण्याची समृद्ध अडगळ’ ही कादंबरी आज प्रकाशित झाली. त्या निमित्ताने मुक्त शब्द मासिकातर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्यांनी हे विचार मांडले.
‘हिंदू चतुष्टय़ा’तील पहिला भाग असलेल्या पॉप्युलर प्रकाशनतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या या कादंबरीचे प्रकाशन जी. के. ऐनापुरे, रमेश इंगळे-उत्रादकर, सदानंद देशमुख, प्रवीण बांदेकर, कृष्णा खोत हे नव्या पिढीतील लेखक आणि समीक्षक निखिलेश चित्रे यांच्या हस्ते करण्यात आले. या कादंबरीबाबत बोलण्यापूर्वी नेमाडे म्हणाले की, आजच्या प्रकाशनप्रसंगी भाऊ पाध्ये, अरूण कोल्हटकर, दिलीप चित्रे, प्र. ई. सोनकांबळे, अरूण सोनकांबळे, मुकुंद गायकवाड या माझ्या सहकाऱ्यांची आठवण होत आहे. कारण त्या सर्वानाच या कादंबरीबाबत खूप उत्सुकता होती. यावेळी ज्येष्ठ पत्रकार जयंत पवार आणि समीक्षक अरूणा दुभाषी यांनी भालचंद्र नेमाडे यांना या कादंबरीबाबत आणि इतर अनेक मुद्दय़ांबाबत बोलते केले. ‘हिंदू’मधील ‘खंडेराव विठ्ठल’ हा आक्रमक आहे, असे सांगून आक्रमकतेबद्दल सांगताना नेमाडे म्हणाले की, माणूस आक्रमक असलाच पाहिजे. फक्त हा आक्रमकपणा कुठवर पुढे न्यायचा त्या त्या समाजातील पुढाऱ्यांनी ठरवायचे असते. याबाबत युरोपीय देशांकडून शिकण्यासारखे बरेच काही आहे. ती राष्ट्रे आक्रमक आहेत. परंतु आपण तसे असल्याचे दाखवत मात्र नाहीत. भारतात असलेल्या विविधतेबाबत ते म्हणाले की, भारतात तब्बल १६५२ भाषा बोलल्या जातात. त्यापैकी २४ आपण वापरतो. एकटय़ा महाराष्ट्रातच १५ निरनिराळ्या भाषा बोलल्या जातात. ही विविधता आपण जपली पाहिजे आणि त्याबद्दल आपल्याला अभिमानही असला पाहिजे. असे असले तरी जनुकांची पाहणी केली असता मात्र भारतातील व्यक्तींमध्ये असलेल्या जनुकांमध्ये समानता आढळून येते.
भालचंद्र नेमाडे त्यांच्या कादंबऱ्यांमध्ये विराम चिन्हे टाळतात. त्यामुळे त्यांचे लिखाण लक्षपूर्वक वाचावे लागते. हा विरामचिन्हे न वापरण्याचा निर्णय का घेतला, अशी विचारणा केल्यावर, वाचकांनी लक्षपूर्वक वाचावे म्हणूनच मी विरामचिन्हांचा वापर टाळतो, असे त्यांनी उत्तर देताच सभागृहात एकच हशा पिकला. ते पुढे म्हणाले की, आपल्या भाषेत आधी विरामचिन्हे नव्हती. ही पाश्चात्त्यांनी दिलेली आहेत. केरूनाना छत्रे यांचा विरामचिन्हे वापरताना गोंधळ उडत असे. विरामचिन्हांची गरजही नसते. एकाहून अनेक प्रश्न विचारायचे असतील तर प्रश्नचिन्हाच्या खाली पूर्णविरामाऐवजी स्वल्पविराम असणे आवश्यक होते, परंतु इंग्रजीमध्ये तसे विरामचिन्ह नाही. त्यामुळे भारतीय भाषांमध्येही ते आलेले नाही.
माणसाला धर्माची गरज आहे का, असे विचारल्यावर ते उत्तरले की, माझ्या मते धर्माची गरज नाही. परंतु लोकांचा विचार केला तर धर्माची गरज आहे. हे सांगताना त्यांनी गावातील उदाहरण दिले. रोजनदारीवर जगणाऱ्या एका मजुराचे मुकादमाशी भांडण झाल्यामुळे तीन दिवस काम नव्हते. पर्यायाने पैसा आणि जेवणही नव्हते. त्या तीन रात्री तो देवळात जाऊन आसवे गाळेपर्यंत प्रार्थना करून झोपत असे. ही शक्ती दुसऱ्या कशातही नाही. परंतु मी धर्माचा पाठीराखा नाही, हेही त्यांनी स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले की, पाश्चात्यांकडे पाहण्याआधी आपला पाया पक्का असायला हवा. भवभूती माहित नाही, मृच्छकटिकामधील पात्रे माहित नाहीत. परंतु शेक्सपिअर पाठ असेल तर त्याला अर्थ नाही, असे मतही त्यांनी व्यक्त केले. जेम्स लेन वादाबद्दलही नेमाडे यांनी रोखठोक मत मांडले. ते म्हणाले मूळात अमेरिकन माणसाने शिवाजींवर लिहू नये. लिहिले तर तिकडेच काय ते छापा, त्या प्रती इकडे का पाठवता, असा सवालही त्यांनी विचारला. आपणच नको ते वाचत राहतो, चर्चा करतो. सुमारे अडीच तासांच्या मुलाखतीत नेमाडे यांनी महाभारत, कृष्ण, हिंदू संस्कृतीकडे पाहण्याचा दृष्टीकोन, या संस्कृतीतून आलेला पर्यावरणाच्या बाबतीतील दृष्टीकोन याबाबतची मते दाखले देत स्पष्ट केली. या कार्यक्रमास दिग्दर्शक जब्बार पटेल, अभिनेत्री रिमा लागू, अभिनेते रमेश भाटकर इत्यादी उपस्थित होते. अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी यावेळी ‘हिंदू - जगण्याची समृद्ध अडगळ’ या कादंबरीतील काही भाग वाचून दाखविला.   सौजन्य: लोकसत्ता 

No comments:

Post a Comment