Tuesday, September 21, 2010

डॉ. अभय बंग यांच्या विषयी एक खूप छान लेख

ज्ञानयोगी
अनिल शिदोरे ,बुधवार, २२ सप्टेंबर २०१०

अभयची भेट पहिल्यांदा कधी झाली ते नीटसं आठवत नाही. तीस-एक वर्षांपूर्वी
वध्र्याला एकदा जंगल जमिनीच्या प्रश्नावर आदिवासी कार्यकर्त्यांची बैठक
झाली होती. तेव्हा शरद कुलकर्णीना भेटायला तो आला असताना भेटला असावा असं
वाटतं. पण खात्री नाही. तो तेव्हा भेटण्याच्या आधी डॉ. सुखात्मे आणि डॉ.
वि. म. दांडेकरांशी वृत्तपत्रातून चर्चा करणारा, वाद घालणारा, शास्त्रीय
मांडणी करून माणसाला जगायला किमान उष्मांक किती लागतात, हे सांगणारा एक
तरूण डॉक्टर म्हणून महाराष्ट्राला आणि मला माहीत होताच. त्याच्याशी
प्रत्यक्ष भेट आणि मैत्री त्यानंतर दहा-एक वर्षांनी झाली.
आज एक सामाजिक संशोधक म्हणून, शास्त्रीय अभ्यासक म्हणून, उत्तम लेखक,
प्रभावी वक्ते असून, महाराष्ट्रभूषण म्हणून डॉ. अभय बंग यांची उभ्या
महाराष्ट्राला ओळख आहे. असे हे डॉ. अभंय बंग २३ सप्टेंबरला आपल्या वयाची
साठ वर्षे पूर्ण करत आहेत. महाराष्ट्रातल्या मोजक्या, जाणत्या आणि आदरणीय
व्यक्तींपैकी आज डॉ. अभय बंग एक असले, तरी मी मात्र आज लिहिताना ‘माझा
मित्र अभय’ याच नात्यानं लिहिणार आहे. कारण तशा भूमिकेतून लिहिलं नाही तर
मला लिहिताच येणार नाही.
अभयचा जन्म पन्नास सालचा. स्वातंत्र्य मिळून तीनच वर्षे झालेली. पं.
नेहरूंच्या नेतृत्वाखाली उभ्या देशाला उभारी आलेली आणि अभय लहान होता.
प्राथमिक शाळेत होता. तेव्हा विनोबांच्या भूदान पदयात्रेनं देशात
समाजकारणाचा नवा आयाम बसवण्याचं काम चाललेलं! अभय अगदी तरूण होता, तेव्हा
जगभर, देशात, ठिकठिकाणी संघर्षवादी तरूण आंदोलनांचा मार्ग स्वीकारत होते.
अभय चाळीस वर्षांचा होता, तेव्हा देशभरात आर्थिक सुधारणांचं ताजं, जोमदार
वारं सुटलेलं! अभयची साठी त्याही अर्थानं आपल्या सर्वाना, महाराष्ट्राला
काळाच्या एका टप्प्याची जाणीव करून देणारी!
या सर्व काळात अभयची भेट वेगवेगळ्या कारणांनी होत राहिली. काही
प्रकल्पांवर, उपक्रमांमध्ये आम्ही एकत्र कामही केलं. खूप बोललो, चर्चा
केली. एक सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे, या प्रत्येक भेटीत अभयकडे
सांगण्याजोगं काहीतरी होतंच. काहीतरी असायचंच. मग तो रोजच्या रोज भेटताना
असो किंवा सध्या भेटतो तसं चार-सहा महिन्यांनी असो. अभयकडे काहीतरी
असतंच; सांगण्याजोगं, देण्याजोगं!
अगदी परवाचीच गोष्ट पाहा. महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्याविषयी आम्ही
बोलत होतो. ‘सध्याची स्थिती अशी आहे की, सरकारनं आणीबाणी जाहीर करावी’,
असं काहीसं मी म्हटल्याबरोबर अभयनं एक उत्तम रेखीव आणि प्रखर अभ्यासू
माडंणी केली. त्या विषयातल्या खाचाखोचा सांगितल्या. तेव्हा त्याने
१८६०च्या आसपासच्या लंडनमधील सार्वजनिक स्वच्छतेविषयीच्या एका मोठय़ा
लोकचळवळीची माहिती तर दिलीच, पण तशीच चळवळ आता महाराष्ट्रात, मुंबई-
पुण्यासारख्या शहरांतही करायला हवी, असं सांगितलं. लोकांच्या चळवळीसाठी
काय करायला हवं, हेही मांडलं.
तो अवघी पाच-एक मिनिटं बोलला असेल-नसेल, पुढे कित्येक दिवस त्यानं
दाखवलेल्या दिशेनं मी शोधत राहिलो. मला त्यातून कितीतरी गोष्टी सापडल्या.
अभयचं हे मोठं वैशिष्टय़! सतत दक्ष, जिवंत असं मन आणि तत्पर, तीक्ष्ण अशी
बुद्धी! यातून अभय प्रासादिक विद्वतेचं, शहाणपणाचं दर्शन कायम देतो आणि
ही फक्त देवाची देणगी आहे, असं मला मुळीच वाटत नाही.
एखाद्या गोष्टीवर, मग तो लेख असो, भाषणाची तयारी असो किंवा एखादा अहवाल
असो, अभय जे काही कष्ट घेतो त्याला तोड नाही. पुन:पुन्हा घोटून घोटून,
तपासून, फेरफार करून तो जी अस्सल गोष्ट आपल्यासमोर ठेवतो, तो लख्ख शुद्ध
आणि तेजस्वी असा मानवी आविष्काराचा नमुना असतो. अचूक, तरीही रंजक, आकर्षक
असं स्वच्छ शहाणपण त्यातून समोर येतं. ज्ञानयोगीच तो! त्यानं स्वत:वर
ज्या पद्धतीनं काम केलं आहे, आपल्या मनाची - विचार कसा करावा याची- जी एक
शिस्त बसवली आहे, स्वत:ला जसे पैलू पाडले आहेत; त्याची कथा त्यानं एकदा
त्याच्याच अभ्यासू पद्धतीनं पुढच्या पिढीसमोर ठेवावी. खूप गुणी मुलांचं
आयुष्य बदलेल त्यानं! अर्थात हेही त्याचं संचित तो पुढच्या पिढीला
देण्याचं काम त्याच्या ‘निर्माण’मधल्या ताज्या प्रयत्नांद्वारे करतो
आहेच.
अभयचा मूळ पिंड काय, असं म्हटल्यास तो अभ्यासकाचा, संशोधकाचा आणि
द्रष्टय़ा विचारवंताचा आहे, असं मी म्हणेन. त्यानं आणि राणीनं मिळून लाखो
बालमृत्यू वाचवले असतील. जगातल्या बऱ्याच देशांनी आणि आपल्या देशातल्या
बऱ्याच राज्यांनी आता बालमृत्यू वाचविण्यासाठी हीच पद्धत अंगिकारली आहे.
कामाचा विस्तार या अर्थानं खूपच व्यापक पल्ला आज अभयने - राणीच्या आणि
शोधग्रामच्या इतर सहकाऱ्यांच्या मदतीनं - गाठला आहे. त्यावर एकदा
स्वतंत्रपणे लिहायला हवं.
मला आजही बऱ्याच वर्षांपूर्वीचं गडचिरोलीच्या जवळचं, झाडांनी आच्छादलेलं
मैदान आठवतं. एका संध्याकाळी अभय मला तिथं घेऊन गेला होता आण एका छोटय़ा
ढिगाऱ्यावर उभं राहून, ‘इथं आपण आता ‘सर्च’ हलवू’ असं म्हणाला होता. आज
मी जेव्हा जेव्हा शोधग्रामला जातो, तेव्हा मला तो प्रसंग आठवतो आणि त्या
जागेवर अभयनं आणि राणीनं जो काही सुंदर आश्रम उभा केला आहे त्याचं अप्रूप
वाटतं. शोधग्रामच्या त्या वातावरणात मला अभयचा नेटकेपणा, काटेकोरपणा,
शिस्त, कल्पकता आणि राणीचं मार्दव, सर्जनशीलता, आस्था यांचा विलक्षण संगम
झालेला दिसतो.
१९९२ च्या आसपास गडचिरोली जिल्हा दारूमुक्त व्हावा म्हणून चळवळ चालली
होती. गावागावांत बैठका चालू होत्या. आपल्या गावातून दारू हटवावी म्हणून
बायकांनी जोर लावला होता. त्या आंदोलनाचं नेतृत्वही अभयकडे होतं. तो ज्या
तन्मयतेनं, मनाचा ठाव घेत गावात लोकांशी संवाद साधायचा तो अनुभव, त्याची
ती प्रतिमा माझ्या आठवणीत अजूनही ताजी आहे. पुढे त्यानं संशोधनाचा
ज्ञानमार्ग स्वीकारला आणि त्यात खूप प्रवास केला. पण लोकांशी बोलणं,
त्यांना प्रोत्साहित करणं, संघटित करणं, लढाईला तयार करणं यातही तो खूप
वाकबगार आहे. तिथली मुलूखगिरी आणि त्यातला मोह अभयनं नंतर टाळलेला दिसतो.
आमचं महाराष्ट्रभर बालमृत्यूविषयक सर्वेक्षण चालू होतं. महाराष्ट्राच्या
वेगवेगळ्या भागांत, गावांत, वस्त्यांमध्ये जाऊन माहिती गोळा करण्याचं काम
आम्ही करत होतो. या कामाची आखणी, नियोजन अभयने अत्यंत चोख केलं होतं.
आम्हाला प्रशिक्षण दिलं होतं. प्रत्यक्ष गावात जाऊन माहिती मिळवावी,
कामाची प्रत्यक्ष पाहणी करावी म्हणून आम्ही दोघं मिरज तालुक्यातल्या एका
गावात पोहोचलो. पूर्वी सव्‍‌र्हे झालेल्या एका घराची, तिथल्या बाळाची
माहिती घ्यायला अभयने सुरुवात केली. अभय शांतपणे एक-एक प्रश्न विचारत
होता. बाळाची आई तिच्या गतीनं उत्तर सांगत होती. त्या बाळाच्या
तब्येतीविषयी चौकशी करता करता एकूणच सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा वेध
घेतला जात होता. पद्धतशीरपणे, शांतपणे, शास्त्रोक्त पद्धतीने! खूप उशीर
होत होता. पोटात भुकेनं कावळे ओरडत होते, पण तब्बल दोन तास अभयची ती
विचारपूस चालू होती. माझ्या आयुष्यात पाहिलेली सामाजिक क्षेत्रातली ती
सर्वात उत्तम मुलाखत!
त्या दिवशी मला त्याचं जे दर्शन झालं, ते मी कधीही विसरणार नाही. विसरू
शकणारच नाही. मला तो पुढय़ात बाळ ठेवून त्याच्याकडे बघणारा, गंभीर
मुद्रेचा; पण शांत, अविचल, शहाणा असा योगीच वाटत होता. ज्ञानयोगी! दोन
दशकांची खडतर तपस्या पाठीशी असताना ज्या तन्मयतेनं, एकाग्र चित्तानं तो
ज्ञानाचा शोध घेत होता, ती अवस्था फारच थोर होती. एखाद्या महान गायकाची
उत्तम गाताना असते, तशी ज्ञानी, योगी भावमुद्रा!
अभय थोर आहे, असं माझं मत आहे. मी त्याला असं म्हणणं कदाचित त्याला
आवडणार नाही. कदाचित आम्ही भेटल्यावर तो तसं म्हणेलही, पण आज मला ते
सांगू दे.
आज तो साठ वर्षांचा झाला आहे, पण त्याचा शोध संपलेला नाही. स्वत:वर काम
करणं तर त्यानं अजिबात थांबवलेलं नाही. कालपरवाच त्यानं नव्या कुठल्या
दोन गोष्टींचा शोध घेण्याचं ठरवलं आहे, ते सांगितलं. नित्य नवा विचार,
नवी प्रमेयं, नव्या पद्धती, नवी माहिती, नवं संशोधन याची तपासणी चालूच
आहे आणि ज्ञानाच्या, विचारांच्या क्षेत्रात पूर्ण रममाण होऊन त्याचा आनंद
देण्याघेण्याचं अभयचं कामही!  अभयबरोबर अनुभवलेले क्षण माझ्या आयुष्यातला
मोठा ठेवा आहे. खूपच मोठा ठेवा! कितीतरी गोष्टी मी अभयकडून शिकलो. कामाची
शिस्त, पद्धत, चिकाटी-चिवटपणा, खडतर अभ्यास, ज्ञानाचा शोध. कितीतरी
गोष्टी!
सध्या आमची क्षेत्रं खूपच वेगळी झाली आहेत. आमचा संवाद तरीही चालू आहे.
त्याला त्याविषयी कुतूहल आहे. मागे मला तो म्हटला होता, ‘अनिल, तू
राजकारणाचं नवं क्षेत्र स्वीकारलं आहेस. खूप वेगळं क्षेत्र आहे ते. त्या
राजकारणात काहीही होऊ दे बाबा, पण तू सगळ्या गोष्टी नीट लिहून ठेव.
मागाहून त्यावर लिहिता येईल.’ इथंही मला त्यानं अभ्यासच करायला सांगितला
आहे. राजकारणातले वेगवेगळे पदर समजून घ्यायला, नोंदी ठेवायला सांगितले
आहे. त्याच्या मते सारं संपतं; पण ज्ञान नाही, ज्ञानाचा शोध नाही. अगदी
राजकारणाच्या क्षेत्रातदेखील!
अभय माझा मित्र आहे हे माझं भाग्य आहे. अभय महाराष्ट्रात काम करतो,
मराठीत लिहितो ते महाराष्ट्राचं भाग्य आहे. प्रत्येकानं आपापल्या
भाग्याचं काय करायचं हे ठरवायचं असतं. तसंच महाराष्ट्रानंही ठरवायचं आहे,
अभय बंग यांच्या ज्ञानसाधनेचा उपयोग आपण कसा करावा ते!
त्याच्या साठाव्या वर्षी आमचं एवढंच मागणं आहे की, डॉ. अभय बंग यांनी
आजवर आपल्याला जे दिलं, तसं ते आणखी देत राहोत. अनेक र्वष, अनेक दशकं! आज
त्याच्या साठाव्या वाढदिवसादिवशी त्याच्या कामास आणि ज्ञानसाधनेस माझ्या
शुभेच्छा!
आज.. इतकंच!!


सौजन्य: लोकसत्ता 

3 comments:

saurabh V said...

"Dabang" ...... oh i mean to say "The Bang" [:-)] great personality.

माझी ब्लॉग शाळा said...

प्रिय योगदानकर्ते,

आज डॉ. अभय बंग सारख्या अभ्यासकाचा, संशोधकाचा आणि द्रष्टया विचारवंतांची गरज या महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण भारत देशाला आहे. जेव्हा आजुबाजुला पहातो तेव्हा लगेच मनातल्या वादळाचा हिरमोड होउन जातो ....

सस्नेह ....

अनिरुद्ध

अमोल सुरोशे (नांदापूरकर) said...

खरोखरच आपण जे बोललात ते १००% खरे आहे, पण मनातले हे वादळ शांत होऊ देऊ नका, आज हि आप आपल्या परीने काही तरी समाजासाठी करणारे खूप लोक आहेत, समाजात खूप काही चांगल आहे, वाईट प्रवृत्तींची चर्चा फ़क़्त जास्त होतांना आपल्याला दिसते, चांगले कार्य, चांगले विचार सर्वांपर्यंत पोचवणे हे तर आपण अगदी सहजपणे करू शकतो, आणि नक्कीच संधी भेटल्यावर आपल्यातला प्रत्येक सामान्य माणूस काही तरी असामान्य काम करू शकते हे हि तितकेच खरे,
अशाच कार्यांचा गौरव जिजाऊ.कॉम च्या माध्यमातून केला जातो.. आणि आशाच कार्यकर्त्यांची एक साखळी निर्माण करायचा नेहमी प्रयत्न करीत असतो.. वेळ असल्यास जरूर भेट द्या ..

Post a Comment