Friday, August 13, 2010

आम्हाला बदलेला देश बघायचा आहे


आम्हाला बदलेला देश बघायचा आहे

या देशात स्वातंत्र्य आहे, हे एक नेहमीचंच नियमित वाक्य. शुभ्र कपड्यातील गुंडांनी ग्रासलेला हा देश खऱ्या स्वातंत्र्या साठी अजून ही विव्हळत आहे. लहानपणी वाटायचं जग बदलण अगदी सोप्प आहे; १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी ला शाळेत मिरवणूक निघायची आम्ही त्यात उत्साहाने सामील व्हायचो, उरामध्ये प्रचंड स्वाभिमान घेऊन आगदी बेंबीच्या देठा पासून "भारत माता कि जय" चे नारे द्यायचो. लहानपणी बऱ्याच खोड्या देखील करायचो पण मनामध्ये नेहमी एक भीती असायची की चूक केली तर शिक्षा होईल. शिक्षकांची, पालकांची, वडिलधाऱ्यांची एक भीती असायची, म्हणून वाटायच खऱ्या देशात देखील असंच सरकारला आणि न्यायाला भीत असतील लोक. पण जसा जसा मोठा होत गेलो तसं तसा खरा भारत दिसायला लागला. इथे लोक घाबरतात पण न्यायाला नाही तर जे लोक आपल्या खिशामध्ये न्याय घेऊन फिरतात त्यांना. दिवसा ढवळ्या या देशाला लुटणाऱ्या लुटारूंना, आणि या भारत मातेच्या अब्रूचे धिंडवडे उडवणाऱ्या सैतानांना. एखादा प्रमाणपत्र काढायचं झाल तर जिथे २ दिवस लागायचे तिथे ७ दिवस लागतात कारण काय तर कामाचा बोजा, आणि ५० रुपये पुढे केले तर २ दिवसाचे काम २ तासामध्ये होते. कारण काय तर पैसा. पुढे कळायला लागला हा पैसा ह्या लोकांच्या घरात जात नाही तर दारूच्या दुकानात जातो, यांच्या मुलांच्या डोनेशन मध्ये जातो, ५०-५० रुपयांचा भ्रष्टाचार वेगळाच, पण १००-१०० करोड रुपयांचा घोटाळा ही होतो हे लक्षात यायला लागल. आजवर विकासाच्या नावावर करोडो रुपयांची अगदी राख रांगोळी झाली, पण विकासाचा लवलेशही अजून पर्यंत आमच्या करोडो भारतीयांच्या नशिबाला आला नाही.
निवडणुका म्हणजे आमच्या देशात राष्ट्रीय सनासारख्या झाल्या आहेत, दर वर्षांनी, महिन्यांनी कसली न कसली निवडणूक घ्यायची, लोकांच्या कल्याणाची भाषा करायची, आम्ही ही ती ऐकायची आणि टाळ्या वाजवून पुन्हा ये रे माझ्या मागल्या! तेच ते चालू आहे, १ नाही २ नाही गेली ६० वर्षे आम्ही तेच ते बघतो आहोत. स्वतंत्र भारतात तीन पिढ्या बदलल्या पण आमच्या समस्या त्याच होत्या आणि आज ही त्याच आहेत; किंबहुना त्या समस्यांनी आता महाकाय स्वरूप घेतलं आहे. देश तर स्वतंत्र झाला, पण आम्ही अजून ही गुलामच राहिलो. स्वतःच्या स्वातंत्र्य साठी स्वतःलाच लढावे लागते, पण लढणे म्हणजे काय हेच आता आम्ही विसरलो आहोत.

कुठे तरी एक छान वाक्य ऐकलय, आपलीच गाडी आपलीच माडी आणि आपल्याच बायकोची गोल गोल साडी, फ़क़्त एवढ्या पुरतेच आम्ही मर्यादित राहिलो आहोत. रोज अन्याय होतो म्हणून प्रत्येक जन रडत असतो, झोपडीत राहणाऱ्या सामान्य माणसापासून ते मोठ मोठ्या उद्योगपतीन पर्यंत सर्व च्या सर्व फ़क़्त आणि फ़क़्त रडत असतात, पण कधी ही कुणी पेटून उठत नाही, कधी कुणाची हाक ऐकू आलीच तर आम्ही साधा प्रतिसादसुद्धा देत नाहीत. स्वतंत्र भारतात आम्ही गुलाम आहोत अज्ञानाचे, भ्रष्टाचारचे, बेरोजगारीचे, निरक्षरतेचे, धर्मांधतेचे, आणि जाती पतीने ग्रासलेल्या घाणेरड्या मानसिकतेचे.

सुवर्ण अक्षरात लिहून ठेवावा इतका तेजस्वी आणि ओजस्वी इतिहास असणारे आम्ही एवढे निष्प्राण, निस्तेज कसे? कधी ऐकू येणार ती आरोळी, भारत माता की म्हंटल की कधी सबंध देश एका आवाजात "जय" चा उदघोष करणार? प्रत्येकाने आपल्या लहानपणी पाहिलेले भारत देशाचे स्वप्न कधी साकार होणार? ज्या महापुरुषांची भाषणे आम्ही द्यायचो, ऐकायचो कधी त्यांच्या विचारांना आम्ही आमच्या जीवनात खरं स्थान देणार आहोत? कित्येक स्वातंत्र्य दिन आले, येतील आणि जातील देखील पण जो बदल सहज घडेल असे कधी वाटायचे त्या बदलाची सुरुवात कधी होणार?

निराशेने ग्रासलेल्या या देशाला खऱ्या स्वातंत्र्याचा सूर्य दाखवायचा असेल तर एक सशक्त आणि ठणठणीत विचारच हे काम साध्य करू शकतो. नशिबाने येणारी नवी पिढी विचार करणारी आहे, जी पिढी स्वतःच्या उत्कर्षासाठी दिवस रात्र मेहनत घेऊन आपला आयुष्य उभारतात त्या पिढी कडून हा देश ही घडण्याची देखील अपेक्षा आहे. आपल्या सारखे विचार करणारे खूप आहेत, बदलाची आणि खऱ्या स्वातंत्र्याची प्रचंड भूक लागलेले खूपजन आहेत, म्हणूनच एक नवी आशा निर्माण झालीये- 'आम्हाला बदलेला देश बघायचा आहे'. जे स्वप्न आम्ही लहान पाणी बघायचो त्या निर्मळ स्वप्नासाठी आपल्या प्रत्येकाला आपला सहभाग द्यावाच लागेल. कुठलही देश एका रात्री मध्ये उभा राहत नाही, त्या साठी वर्षानुवर्षे कठोर मेहनत घ्यावी लागले, आमच्या नशिबाने आमच्या महापुरुषांनी ही मेहनत घेतली आहे गरज आहे फ़क़्त त्यांच्या विचारांची कास धरून नवे पाऊल उचलण्याची, हे नवे पाऊल उचलण्याची प्रतिज्ञा आजच्या या स्वातंत्र्य दिनी घेऊन, हातामध्ये हात घेऊन सबंध देश घेऊन पुढे जाऊया. जमेल तेथे- जमेल त्या प्रकारे- जमेल ते प्रयत्न राष्ट्रनिर्मिती साठी करूयात. प्रयत्न छोटा आहे किंवा मोठा आहे न बघता प्रयत्न कण्यावर भर देवूयात. रोजच तो प्रयत्न होत असेल तर ठीक आणि नसेल होत तर आठवण येईल तेंवा तो करत राहुयात. पर्फेक्षनिष्टांच्या टीकांना दुर्लक्षित करून जमेल त्या प्रमाणात राष्ट्रकार्यात सहभाग घेऊयात. संघटना झालीच तर खूप छान, पण संघटना नाही म्हणून थांबायला नको, सुरवात करूयात, इतरलोक काही करत असतील तर त्यांना मदत करूयात. कमीत कमी अन्यायाची जाणीव अज्ञानात खिचपत पडलेल्या समाजाला तर कुणीही करून देऊ शकतो. नाहीच लढता आला तर अन्याय होतोय हे तरी मान्य करा.

महाराष्ट्रात, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी पेरलेली आपली मस्तके नापीक होवूच शकत नाहीत कारण त्यांना वेळोवेळी फुले, टिळक, आंबेडकर यांनी विचारांचा खात घातलाय. तेव्हा स्वाभिमानाने, निधड्या छातीने पसरलेल्या अंधाकाराला दूर करण्यासाठी हवे ते प्रयत्न करा.

जिजाऊ .कॉम त्या प्रत्येक तळमळ असलेल्या भारतीय युवकांना आवाहन करते आहे. हे पाऊल तुम्हीच उचलण्याची गरज आहे. अथक प्रयत्नाने आणि हजारोंचे रक्त सांडून आपला देश स्वतंत्र झाला, त्या सर्वांच्या सांडलेल्या रक्ताची शपथ आहे तुम्हाला, जमेल तिथे जमेल त्या प्रकारे एक खरा स्वतंत्र भारत निर्माण करण्यासाठी तुम्ही हे पाऊल उचला.
तुम्हाला साथ आहे आमची, आणि आमच्या सारख्या हजारोंची.


जय हिंद ! जय महाराष्ट्र!
नोट:.आमचा कोणत्याही राजकीय पक्षाशी, जातीय संघटनेशी कुठल्याही प्रकारे संबंध नाही. आम्हाला घेणे आहे ते फक्त राष्ट्राच्या निर्माणाशी, शेतकऱ्यांशी आणि सामान्य माणसाशी. .आम्हाला कोणत्याही जात, धर्म, राष्ट्र, राज्य, पक्ष, वर्ग [आर्थिक/शिक्षित/अशिक्षित/शहरी/ग्रामीण] चे वावडे नाही!

*आपण हा लेख हवा त्याला हवा तेथे पाठवू शकता, छापू शकता आणि बदल ही करू शकता, कृपया फक्त जिजाऊ.कॉम चा उल्लेख करावा


[हक्क CC3.0 न्वे मर्यादित www.jijau.com ]

3 comments:

Anonymous said...

स्वातंत्र्य मिळाले तरी ते राबविण्याची पात्रता राजकीय फायद्यासाठी हेतुपूर्वक निर्माण होऊ दिली गेलेली नाही हे या अवस्थेचे कारण आहे.आपणही या लेखाद्वारे त्या हेतूचेचे समर्थन करीत आहात

प्रकाश बा. पिंपळे said...

@Anamit ते कसे? कळाले तर उत्तर द्यायला सोपे जाईल!

Kadam007 said...

India is superpower but also superpoor. More than 50% of its population is below the age of 25. Before I breathe my last, I am sure I will see a changed India- India of my dreams- no corruption, no rapes, no inhuman killings, no terrorism, no kashmir issues, no regional issues.

Jai Hind!!

Post a Comment