Saturday, March 27, 2010

मराठी एक पैलू : आपल्या मुलांना मराठी शिकवण्यात लाज कसली?


तुम्ही अलीकडच्या काळात कधी पुस्तकाच्या दुकानात गेला होतात? म्हणजे क्रॉसवर्डमध्ये नाही, मराठी पुस्तकांच्या दुकानात? किंवा पुस्तकांच्या जाहिराती पाहिल्या आहेत? त्यात बहुसंख्य मराठी पुस्तके अनुवादित असतात ! सगळ्यात जास्त पुस्तके आहारशास्त्र, व्यक्तिमत्त्व विकास, श्रीमंत कसे व्हावे आणि झटपट इंग्रजी कसे बोलावे या विषयांवर असतात. चांगली मराठी कादंबरी आपण कधी वाचली होती हे तुम्हाला सहजासहजी आठवते का? एकूणच मराठी साहित्य रोडावले आहे, कारण मराठीचा परीघच आक्रसला आहे. आज मराठी ही मोलकरणींशी बोलण्याची भाषा आहे. या मोलकरणींनाही इंग्रजी शिकवले की तिही गरज संपेल आणि खऱ्या अर्थाने आपण जागतिकीकरण साध्य करू असे आपल्याला वाटते.
मराठीची ही हीनदीन अवस्था काही अचानक झालेली नाही. मराठीत शिकलेल्या लोकांचा आत्मविश्वास खचला म्हणून मराठीची आज अशी गत झालेली आहे. १९२७ पर्यंत महाराष्ट्रात वैद्यकीय शिक्षणही मराठीत दिले जात होते. आज आपण ज्या हिंदी भाषकांच्या नावाने बोटे मोडतो, त्या हिंदी भाषकांनी आजही संपूर्ण हिंदीत अभियांत्तिकीचे शिक्षण देण्याची व्यवस्था केलेली आहे. पण मराठी लोकांना मात्र आपली भाषा ही ज्ञानभाषा होऊ शकत नाही असा साक्षात्कार झाला. ज्ञानभाषा होऊ न शकणारी भाषा मेली तरी मग रडायचे कारण काय? इंग्रजीत शिकलेल्या मराठी लोकांनी तरी काय असे अभूतपूर्व ज्ञान संपादन केले आहे? काय शोध लावले आहेत? ज्यांनी ज्ञानाच्या क्षेत्रात यश संपादन केले आहे ते सगळे आपल्या मातृभाषेत शिकल्यामुळेच यशस्वी झालेले आहेत. साहित्यक्षेत्रात इंग्रजी लिहिणाऱ्या लेखकांनीही इथल्या इंग्रजी न येणाऱ्या समूहांविषयीच लिहून नाव आणि पैसा कमावला आहे. म्हणजे स्थानिक भाषा बोलणारा समूह त्यांना केवळ कच्चा माल म्हणून हवा आहे.
स्वत:च्या भाषेविषयी तिरस्कार वाटणाऱ्या समाजात मराठी साहित्य संमेलन नावाची उधळपट्टी मात्र सुरू असते. आता मराठीच्या नावाने संमेलन भरवलेच आहे तर करू या चमचाभर चिंता मराठी भाषेची, म्हणून काही परिसंवादही होत असतात. मोले घातले रडाया, नाही आसू, नाही माया ! अशा या परिसंवादात थोडेसे जरा मराठीच्या बाजूने बोलले की लागलीच वक्ता 'इंग्रजीवरही आपण प्रभुत्व मिळविलेच पाहिजे' असे सांगून पापक्षालन करून टाकतो. जणू असे सांगितले नाही तर इंंग्रजी शाळा बंदच पडतील ! इंग्रजीविषयी पराकोटीचा न्यूनगंड असणे हे मराठी असण्याचे व्यवच्छेदक लक्षणच आहे. अमेरिकेतील मराठी साहित्य संमेलनाचा वृत्तांत लिहिताना एका पत्रकार बाईंनी, 'मराठी लोकांनी आपली मुले मराठी शाळेत घातली पाहिजे, हा आग्रह आपण सोडून दिला पाहिजे' असे लिहिले होते. हे वाक्य मराठी असूनही मला अद्याप त्याचा अर्थ कळू शकलेला नाही ! मुळात असा आग्रह साहित्यिकांनी तर कधीच धरलेला नाही. साहित्य सहवासात राहणाऱ्या मराठी साहित्यिकांपैकी य. दि. व विंदा या दोघांचा अपवाद सोडला तर (बहुधा) कुणाचीच मुले मराठी शाळेत गेली नाहीत. मराठीच्या नावाने घरे मात्र लाटली ! साहित्यिकांना पैसा व प्रतिष्ठा यासाठी मराठीचा उमाळा येतो, राजकारण्यांना मतांसाठी मराठीच्या नावाने हुंदका येतो. साहित्यिक मराठीच्या नावाने गळा काढतात, तर राजकारणी दुसऱ्याचा गळा धरतात, दोघांची मुले मात्र जातात इंग्रजी शाळेत ! सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रात इतके ढोंगी नेतृत्व मिळाल्यावर मराठीला बाहेरच्या मारेकऱ्यांची गरजच नाही ! (चला, एवढ्या एका बाबतीत तरी मराठी लोक आत्मनिर्भर आहेत.)
गेल्या पाच वर्षांपासून शासनाने मराठी शाळांवर बंदी घातलेली आहे. यासंबंधी नामवंत शिक्षणतज्ज्ञांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी निषेधपत्रक काढले त्यावर एकाही साहित्यिकाची काहीही प्रतिक्रिया आली नाही. साहित्यिक तर सोडाच; पण एरवी घरच्या आमटीत जरा मीठ कमी-जास्त झाले तर वाचकांच्या पत्रव्यवहारात बाणेदारपणे पत्र लिहिणाऱ्या जागरूक नागरिकांपैकी कुणीही या विषयावर लिहायचे कष्ट घेतले नाहीत.
गेल्या वर्षी शाळांकडून मान्यतेसाठी अर्ज मागविताना शासनाने १५,००० रुपयांची खंडणी उकळली. इंग्रजी शाळांना मुक्त हस्ते परवानग्या दिल्या आणि मराठी शाळांना अनुदान द्यायला लागेल म्हणून अंगठा दाखवला. सर्व मराठी शाळांचे प्रस्ताव रद्द करण्यात आले आहेत असे एक पत्र आले. अर्जासोबत हजारो मराठी शाळांनी भरलेले १५,००० रुपये मात्र एखाद्या खिसेकापूच्या सराईतपणे शिक्षण खात्याने हडप केले. या पैशातून आता दारूच्या कारखान्यांच्या उभारणीसाठी शासन अनुदान देणार आहे. सरकार दारूच्या करातून जमा केलेल्या पैशातून अनुदान देते म्हणून शाळांनी शासकीय अनुदान घेऊ नये अशी भूमिका महात्मा गांधीनी घेतली होती. दारूच्या कारखान्यांनी आजवर शिक्षणक्षेत्राला केलेल्या मदतीची शाळांकडून अशा रीतीने परतफेड करण्याची शासनाची ही नामांकित योजना आहे. याला अर्थातच मराठी साहित्यिकांचा पाठिबा असणे स्वाभाविक आहे, याचे कारण सर्वांना ठाऊकच आहे ! महात्मा गांधींच्या काळात विनाअनुदान शाळा चालविण्याचा तरी हक्क होता, आता मराठीत विनाअनुदान शाळा काढण्यासही शासनाची परवानगी नाही.
सालाबादप्रमाणे याही संमेलनात बेळगावविषयी ठराव होईल; पण महाराष्ट्रातील मराठीची दुर्दशा पाहता खरेतर बेळगाव कर्नाटकातच राहावे असा ठराव करायला हवा. तिथे निदान अल्पसंख्याकांची भाषा म्हणून तरी मराठी शाळांना काही घटनात्मक संरक्षण मिळेल आणि मराठी तग धरून राहील अशी आशा करता येईल ! बेळगाव महाराष्ट्रात आले की तेथील मराठीही लुप्त होऊन जाईल यात काहीच शंका राहू नये एवढे कर्तृत्व तरी महाराष्ट्र शासनाने नक्कीच सिद्ध केले आहे.
सलील कुलकर्णी, कौशल इनामदार यांच्या मराठी गाण्यांच्या मैफलींना तरुणांची गर्दी होते याविषयीच आपण समाधान मानून घेतो; पण या गर्दीचा अर्थ असा होतो की 'इंग्रजी शाळांमध्ये शिकलेल्या या मुलांनाही मराठी हीच आपल्या अभिव्यक्तीची भाषा वाटते.' ज्या शाळांमध्ये मधल्या सुटीत जरी मराठीत बोलले तरी शिक्षा होते असे आपण प्रौढीने सांगतो त्या शाळा मुलांची त्तिशंकू अवस्था करतात. ज्या भाषेत त्याला सहजपणे अभिव्यक्ती शक्य असते त्या भाषेविषयी तेथे तुच्छता शिकविली जाते आणि परक्या भाषेत अभिव्यक्ती शक्य होत नाही. ही त्तिशंकू पिढी काय साहित्य निर्मिती करणार?
इंटरनेटवर रसेल पीटर या भारतीय वंशाच्या पण कॅनडात राहणाऱ्या तरुणाचा स्टॅण्ड अप टॉक शो पहायला मिळतो. तो या कॉन्व्हेण्टमध्ये शिकलेल्या लोकांच्या भारतीय इंग्रजीवर दिसणाऱ्या प्रादेशिक हेलाची टर उडवत असतो. म्हणजे आपण कितीही साहेब व्हायचा प्रयत्न केला तरी आपले प्रादेशिक संस्कार प्रकट होतातच. यावर उपाय म्हणजे हे प्रादेशिक संस्कार घासून घासून घालविणे (मग त्यात आपली कातडी सोलली गेली तरी बेहत्तर !) किंवा इंग्रजीचा न्यूनगंड घालविणे. खरे म्हणजे इंग्रजी ही कामापुरती वापरायची भाषा आहे. तिचे फारतर कामचलाऊ ज्ञानसुद्धा पुरे आहे. त्यासाठी मुलांच्या अभिव्यक्तीवर बंधन घालून त्यांना सांस्कृतिकदृष्ट्या पोरके करण्याची गरज नाही हे कुणाही शहाण्या माणसाला पटेल. अशा सांस्कृतिक पाया हरवलेल्या समाजात उत्तम दर्जाचे साहित्य निर्माण होणार कसे?
मराठी माणसांची ही क्षुद्र मानसिकता जात नाही तोपर्यंत मराठीच्या वाट्याला अशी दुरवस्थाच येणार. 'इंग्रजीमुळे नोकऱ्या मिळतील' या भ्रमात सारे गटांगळ्या खात आहेत. खुद्द साहेबाच्या देशातही इसवीसन १६५१ पर्यंत इंग्रजी बोलली जात नव्हती. तेव्हा युरोपवर फ्रेंच भाषेचे वर्चस्व होते. शेवटी इंग्लंडच्या राजाला इंग्लंडमधील सर्व व्यवहार इंग्रजीतच होतील असा वटहुकूम काढावा लागला. त्यातून पुढे औद्योगिक क्रांती झाली व इंग्रज सर्व जगात पसरले. त्यांच्या विजिगिषू वृत्तीने त्यांनी जग जिंकले. आम्हाला साहेबाकडून काही घ्यायचे असेल तर ही विजिगिषू वृत्ती घ्यायला हवी. त्याऐवजी आपण त्यांची भाषा उरावर घेऊन बसलो आहोत. कुणाकडे काय मागावे हेही समजावे लागते. याविषयी एक मराठी बोधकथा सगून हे अरण्यरुदन थांबवितो.
एका गावात लक्ष्मीचे एक जागृतदेवस्थान होते. 'मागाल ते मिळेल' अशी ख्याती असल्याने तेथे भक्तांची गर्दी असे. एक दिवस एक गरीब माणूस बराच वेळ या रांगेत उभा राहून कंटाळला. त्याने पाहिले लक्ष्मीच्या शेजारीच अक्काबाईचे मंदिर आहे. त्यापुढे मात्र एकही माणूस दिसत नाही. तो सरळ त्या मंदिरात गेला. लोक त्याला हसले; पण काही दिवसांनी त्या माणसाची आर्थिक स्थिती पालटू लागली. पाहता पाहता तो श्रीमंत झाला. मग कुणाला तरी आठवले की तो तर शेजारच्या अक्काबाईच्या मंदिरात गेला होता. मग लोकही तेथे जाऊ लागले; पण त्या मंदिरात गेलेला माणूस काही दिवसातच भिकेला लागू लागला. लोक संतापले व त्यांनी त्या माणसाला याचे रहस्य काय आहे ते विचारले. तो माणूस म्हणाला, 'मला आधी हे सांगा की तुम्ही अक्काबाईच्या मंदिरात जाऊन काय मागितले?' लोक म्हणाले, 'देवी आमच्यावर कृपा कर असे म्हणालो, आणखी काय म्हणणार?' तो माणूस म्हणाला, 'मग बरोबर आहे. अरे मुर्खांनो अक्काबाई ही जरी लक्ष्मीची बहीण असली तरी तिचे कार्य लक्ष्मीच्या उलट असते. मी तिच्या देवळात जाऊन म्हणालो, बाई गं आजवर तू माझ्यावर खूप कृपा केलीस, आता तू माझ्या घरातून निघून जा ! अक्काबाई गेली की लक्ष्मी आलीच. तुम्ही अक्काबाईची कृपा मागितली तर मग भीक मागायचीच पाळी येणार ! कुणाकडे काय मागावे हेही समजावे लागते बाबांनो.'
आम्ही हा इंग्रजीच्या अक्काबाईचा फेरा मनोभावे पूजा करून मागितल्यावर आमच्या समाजाची अवस्था खालावणारच, आत्मविश्वास खचणारच. अर्थात ही कथा मराठीत असल्याने ती सांस्कृतिक वा राजकीय क्षेत्रातील नेत्यांनी वाचली असणे शक्य नाही. त्यामुळे आमची अवनीतीकडे यशस्वी वाटचाल सुरूच राहील !!
- अरुण ठाकूर, नाशिक


साभार: लोकमत ( http://onlinenews1.lokmat.com/php/detailedsuppliment.php?id=Manthan-52-1-21-03-2010-de894&ndate=2010-03-21&editionname=manthan )

(विशेष आभार: सदर लेख इ-मेल द्वारे जगदीश म्हामने यांचे कडून मिलालेला आहे )

No comments:

Post a Comment