Wednesday, August 26, 2009

महाराष्ट्रातील समस्याग्रस्त शेतकऱ्यांची स्थिती अत्यंत वाईट - राष्ट्रपती प्रतिभा पाटील

लोकसत्ता - मुंबई, २६ ऑगस्ट/प्रतिनिधी
‘महाराष्ट्रातील आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचे अत्यंत मार्मिक व विदारक सत्य गोष्ट छोटी डोंगराएवढी या चित्रपटातून तुम्ही मांडले आहे. महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची ही अत्यंत वाईट स्थिती शहरात बसलेल्या लोकांच्या लक्षात येत नाही. विजेच्या भारनियमनामुळे तर शेतकऱ्यांची परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. या परिस्थितीतून मार्ग काढायला हवा’, असे उद्गार राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी चित्रपटाच्या कलाकारांसमवेत बोलताना काढले. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे हे यावेळी हजर होते. राष्ट्रपतींना चित्रपट दाखविण्याकरिता असलेल्या प्रतिक्षा यादीवर सुमारे शंभरेक चित्रपट असताना उद्धव ठाकरे यांच्या विनंतीवरून राष्ट्रपतींनी हा चित्रपट पाहिला. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपचा विरोध पत्करून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेसच्या ‘मराठी’ उमेदवार प्रतिभा पाटील यांना पाठिंबा दिला. त्यानंतर वरचेवर पाटील यांनी ठाकरे कुटुंबाला ‘राष्ट्रपती भवना’चा पाहुणचार घेण्याची विनंती केली होती. तो योग काल जुळून आला. उद्धव व रश्मी ठाकरे, पुत्र आदित्य व तेजस हे काल राष्ट्रपती भवनाचे पाहुणे होते. त्यांच्यासोबत खासगी सचिव मिलींद नार्वेकर होते. दुपारी साडेबारा वाजता राष्ट्रपती पाटील व त्यांचे पती देवीसिंग शेखावत यांनी ठाकरे कुटुंबाचे स्वागत केले. त्यानंतर भोजन झाल्यावर ठाकरे परिवाराने राष्ट्रपती भवनाची पाहणी केली. राष्ट्रपतींच्या कार्यालयातील रवींद्र जाधव यांनी राष्ट्रपती भवनाची सविस्तर माहिती ठाकरे परिवाराला दिली. राष्ट्रपती पाटील यांच्याकरिता ‘गोष्ट छोटी डोंगराएवढी’ या चित्रपटाचा खेळ सायंकाळी ठेवण्यात आला होता. हा चित्रपट पाहण्याची विनंती खुद्द उद्धव ठाकरे यांनी त्यांना केली होती. चित्रपट पाहिल्यावर राष्ट्रपती अत्यंत प्रभावित झाल्या होत्या. त्यांचा चेहरा चिंताजनक होता. शेतकऱ्याविषयीच्या आपल्या कळकळीच्या भावना त्यांनी व्यक्त केल्याचे चित्रपटातील कलाकारांनी सांगितले. यावेळी नागेश भोसले, मकरंद अनासपुरे, सयाजी शिंदे, सुरेश सुवर्णा, लक्ष्मीकांत खादिया, गिरीजा ओक, माधवी जुवेकर, अरविंद जगताप आणि मच्छिंद्र चाटे यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

No comments:

Post a Comment