Showing posts with label freedom of marathwada. Show all posts
Showing posts with label freedom of marathwada. Show all posts

Sunday, September 16, 2012

निजामाच्या तावडीतून सुटून आम्ही, म्हणजे आम्ही सध्याचे आठ जिल्हे


निजामाच्या तावडीतून सुटून आम्ही, म्हणजे आम्ही सध्याचे आठ जिल्हे औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, उस्मानाबाद, लातूर, नांदेड आणि हिंगोली भारत नावाच्या देशात ज्याचा की आपल्या सगळ्यांनाच अतिशय अभिमान आहे, मराठवाडा म्हणून सामील झालो. एक प्रकारे मुक्त झालो. निझाम गेले पळून. पटेलांना मानावे लागेल. पण निझाम जातांना निझामशाही मात्र तशीच सोडून गेले. पण त्यात पटेलांचा काही दोष नाही.

निझामशाहीचे संस्कार आमचे इतके घट्ट की अगदी अलीकडे पर्यंत आमच्याकडे राजकारणी सरंजामशाही वगैरे काही गेलेली नाही अशा अविर्भावात राहायचे. धर्मसत्ता आमच्याकडे मागपर्यंत इतकी सशक्त होती की भल्या भल्या दलितांना आम्ही छोट्या मोठ्या मंदिरात ही प्रवेश नाकारलाय. नामांतराला विरोध आम्ही जितका केला तितका कदाचित दुसरीकडे होणे अशक्य होते. पुण्यात झाला असता पण नुसताच शाब्दिक; आमच्याकडे धर्म आणि जातीवर जीव ओवाळून टाकण्याची फार महान परंपरा आहे. स्त्रीचा आदर कसा नाही करायचा हे आम्हाला विचारा. आणि ते करण्याची पाळीच येऊ नये म्हणून काय करायचे ते ही आमच्या इतके कुणालाच माहित नाही. कमीत कमी लेखी तरी. पण आमचा असा संशय आहे की हरयाणा आणि पंजाब मध्ये आम्हाला या क्षेत्रात मागे टाकण्याची ताकत आहे. ही फार मोठी खंत.

आमच्याकडे पाणी वगैरे हा देवानेच बघायचा कारभार असल्याने आम्ही 'दादां' ना देव मानून अनेक गोष्टी त्यांच्यावर सोडल्यात. बाकी कधी कधी पाऊस पडतो; पण तो कदाचित इथे होवून गेलेल्या संतांच्या वशिल्याने पडत असावा असे वाटते. इथे अनेक संत होवून गेले. नावे आठवत  नाहीत. कदाचित एकनाथ, नामदेव, हम्म, हम्म, ज्ञानेश्वर, तुकाराम आणि आम्हाला असे दाट वाटते की संत कबीर सुद्धा. पण असे ही कुणाच्या काहीच लक्षात नसल्याने उगाच सांगून ही जास्त अर्थ नाही. पण इकडे संत जन्माला जरी आले असले तरी अनेकांनी हा भाग सोडून जाण्याचाच निर्णय घेतला. अनेकांच्या प्रबोधनालाही अशी माती दाखवाणारा आमचा हा भाग. इथून ज्ञानेश्वर शिकून निघून गेले, रामदास स्वामी निघून गेले आणि साई बाबाही. इतकेच काय तर शिवाजी महाराजही मूळचे इथचेच. तर असा हा आमचा संतांना आणि महान लोकांना जन्माला घालणारा प्रदेश. कदाचित पृथ्वी अस्तित्वात असल्यापासून येथे आहे आणि तरीही अजूनही आहे तेथेच आहे. वेरूळ-अजंठा वगैरे सोडले तर जग प्रसिद्ध म्हणवे असे मानव निर्मित आमच्याकडे काही नाही; किल्लारीचा भूकंप नैसर्गिक होता! आणि असेल तर कमीत कमी आतल्या नवीन पिढीला आणि बाहेरच्या कुणालाही माहित तरी नाही. असो.

अनेक बाहेरच्या लोकांना, म्हणजे महाराष्ट्र बाहेरच्या लोकांना आणि अनेक कोकणातल्या लोकांनाही शरद पवार मराठवाड्यातले वाटतत. ही एक क्षणिक आनंदाची गोष्ट. पण ते खरच नाहीत ही अतिशय दुर्दैवाची बाब. मग बाकी आमच्याकडे नावे सांगण्या सारखे कुणी नाही. गोपीनाथ मुंडेना बाहेर लोक ओळखतात, पण नागपूर इतके मोठे आहे की परळी दिसतच नाही, अगदी त्यांच्या धरमपेठेतही मावेल इतकिच. बाकी धर्माच्या बाबतीत परळीत रुद्र आहेत, म्हणजे जोतिर्लिंग हो. पण रुद्राच्या इतके जवळ असूनही परळीला नागपूरचा जास्त राग येत नाही किंवा पर्यायाने करता येत नाही. शेवटी रुद्र ही विष्णूंच्या मानाने... असू द्या. पण मुंडे साहेब आहेत हा तितकाच मराठवाड्याला, देश्मुखांनंतर, काडीचा आधार (काडीचा = काडीचा; बुडत्याला = मराठवाड्याला,  so मराठवाड्या = बुडत्या, finally बुडता = मराठवाडा!). कारण मराठवाड्यात नेतृत्व असले तरी त्याला फक्त लोकांचा आधार आहे, त्याचा लोकांना नाही! म्हणजे इथे निर्विवाद सत्ता आहे अनेकांची अगदी वडिलोपार्जित. पण  पाणी प्रश्न? दादा ठरवतील. उद्योग? अबब, आपल्याला काय करायचे ते पुण्या-मुंबईचे फ्याड! असे आहे सगळे. पण अगदीच चटणी भाकरी वर समाधान मानणारा सामान्य वर्ग इथे असल्याने अतिशय संत वृत्तीचे लोक इथे पाहायला मिळतात आणि म्हणूनच “ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान” असे इथले राजकारणीही लोकांना सतत आठवण करून देतात. असो.

पण आम्ही आठही जिल्हे आम्हाला मुक्त करण्यासाठी लढलेल्या समस्त मराठवाडा/हैद्राबाद मुक्ती संग्रामातील प्रत्येकाला वंदन करून, विनंती करतो की “हे महान पुरुष हो आणि स्त्रियांनो, इथल्या खचलेल्यांना बळ द्या आणि असंख्य राजा बळींना जन्म देणाऱ्या आयांना कळ द्या”.

मराठवाडा/हैदराबाद मुक्ती संग्रामातील सर्व स्वातंत्र्य सैनिकांना स्मरून आणि इथल्या शांतचित्त जनतेच्या शांततेवर आश्चर्य व्यक्त करून सर्व मराठवाड्याच्या जनतेला आणि या मुक्तीने आनंदित झालेल्या इतर प्रत्येकाला मराठवाडा मुक्ती दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!            
                                                                                                      - आम्ही आठही जिल्हे.
                     

Saturday, September 17, 2011

मराठवाडा मुक्ती दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

इंग्रजांच्या तावडीतून देश जेंव्हा १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र झाला होता तेंव्हा देशातील अजून बरेच संस्थानिक आपले राज्य सोडायला तयार नव्हती. ह्या अशाच संस्थानांपैकी हैदराबाद संस्थान जिथे निजामांची सत्ता होती.
भारतीय स्वातंत्र्य लढ्यात ज्या प्रमाणे मराठवाड्यातील अनेकांनी आपले योगदान दिले त्याच प्रमाणात त्यांना पुन्हा निजामशाही विरोधात ही लढा द्यावा लागला. या प्रकारे मराठवाड्याचा मुक्तीसंग्राम हा दुहेरी लढा अतिशय अवघड होता. भारत स्वातंत्र्य झाल्यावर निजामावर कारवाई करून मराठवाडा मुक्तीचे शेवटचे पाउल पडले. आणि १७ सप्टेंबर १९४८ ला हैदराबाद संस्थान आणि त्याचा भाग असलेला मराठवाडा मुक्त झाला. पण या लढ्यात अनेकांनी आपले सर्वस्व त्यागले. हा इतिहास तितकासा नीट जतन झालेला नाही आणि लोकां पर्यंत पोहचलेला ही नाही याचे दु:ख वाटते. त्या सर्व हुतात्म्यांना मुख्यमंत्री कार्यकर्ता चे शतशः नमन.
मराठवाडा मुक्ती संग्रामाचे नेतृत्व स्वामी रामानंदतीर्थ (व्यंकटेश खेडगीकर) यांनी केले होते आणि मराठवाड्यातील अनेक स्वातंत्र्य सैनिक जसे गोविंदभाई  श्रॉफ, भाऊराव भिमाजी पाटील मतसागर, माणिकचंद पहाडे, सय्यद अखिल तसेच अनेक ज्ञात आणि अज्ञात स्वातंत्र्य सेनानी यांनी आपले मोलाचे योगदान दिले होते.
त्या सर्व स्वातंत्र्य वीरांना स्मरून, मराठवाडा मुक्ती दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
जय हिंद!                                                जय महाराष्ट्र!

थोडीफार अधिक माहिती  येथे मिळेल