Friday, April 3, 2020

शिवरायांप्रती खरी आदरांजलीफक्त जिवंत राहणे जरी माणसाच्या पृथ्वीवरील आयुष्याचं ध्येय असलं तरी, त्या जगण्याला स्वाभिमान आणि स्वातंत्र्याचं अधिष्ठान असावं. या विचाराचं बीज ज्यांनी इथं रुजवलं अशा शिवरायांचा आज स्मृतीदिन. सामान्यातल्या सामान्याला जग बदलता येतं, परिस्थिती बदलता येते आणि अगदीच शक्य नाहीं अशा वाटणाऱ्या गोष्टीही धीराने आणि मेहनतीने करता येतात. या सगळ्यांची अनेक उदाहरणे महाराजांनी आपल्या समोर ठेवलीयेत. भेद, द्वेष आणि कपट यांच्या शिवाय न्यायाने कसं राज्य करता येतं याचंही उदाहरण महाराजांनी घालून दिलय.

अतिशयोक्ती नाही. पण इथल्या प्रत्येक वर्गाच्या, जातीच्या, धर्माच्या आणि लिंगाच्या माणसाला खचलेल्या क्षणीं हा राजा प्रेरणा आहे. तो अवतार नव्हता. त्याच्याकडे गडगंज संपत्ती नव्हती. झालंच तर, आपल्या पेक्षाही जास्त संकटं नकळत्या वयात झेलावी लागली, पहावी लागली. त्यातूनही कोटींच्या मनावर आपल्या कर्तृत्वातून या राजाने स्थान मिळवलंय. तुम्हाला आम्हाला स्वाभिमानाचे संस्कार दिलेत.

म्हणून,
त्या संस्काराची आब राखणं
त्या स्वाभिमानाचा दुरूपयोग न करणं
त्याचं मग्रुरी म्ह्णून प्रदर्शन न करणं
दिन दुबळ्यांच्या शोषणाचं कारण न होणं
हीच आपली शिवरायांप्रती खरी आदरांजली होईल.

स्वतःचच उदाहरण म्हणून देतो. अगदी आपलं अस्तित्व शोधण्याच्या, त्याचं कारण शोधण्याच्या वयात 2003 ते 2007 साली, बरंच काही वाचलं. घरातून जिथं क्षणो क्षणी तुमची स्तुती होते, आपल्या छोट्याशा मित्रांच्या गटातून जिथं सगळ्यांना तुम्ही माहीत असता अशा जगातून तुम्ही जेंव्हा बाहेर पडता. तिथं असतं एक भलं मोठ्ठ जग. तुम्ही न पाहिलेल्या वर्गातली, वेगळ्या कापड्यातली, वेगळ्या भाषेची, आप आपल्या जगात ज्यांचं तुमच्यासारखच स्थान असतं अशा माणसांनी गच्च भरलेलं. त्यात तुम्ही स्वतःची जागा शोधता. अगदी गच्च भरलेल्या बस मध्ये जागा शोधण्यासारखं. तिथं कुणालाच ती सोडायची नसते. तेंव्हा शिवाजी महाराज भेटले. ईकडंच तिकडंच वाचूनझाल्यावर. कदाचित आपलं सोडून इतरांचं चांगलं असतं या न्यूनगंडाच्या प्रभावातून मला महाराजांपर्यंत यायला वेळ लागलेला असावा. पण जेंव्हा हे एक दोन वर्षांच्या शेवटीं कळालं तेंव्हा तेंव्हा कुठं पुन्हा आत्मविश्वास आला. खालच्या लिहलेल्या ओळीं माझ्या त्याच, माझ्यापुरत्याच का होईना, पण साक्षात्काराचा भाग होत्या. ज्या दिवशी हे कळालं तेंव्हाच्या भावना अजूनही मला जशास तशा आठवतात.

त्या ओळी -

कशास हवा तुम्हा सिकंदर
अन कशास हवा कोलंबस
छत्रपतीला स्मरा एकदा
शिव छत्रपतीला स्मरा एकदा
मग तुम्हीच हो सिकंदर
अन् तुम्हीच हो कोलंबस, तुम्हीच हो कोलंबस!

जय जिजाऊ. जय शिवराय.
- प्रकाश बालाजी पिंपळे
कार्यकर्ता, जिजाऊ.कॉम

No comments:

Post a Comment