Wednesday, May 1, 2013

आमच्या छाताडांवर चे गव्हेरा असतो मग ज्योतिबा फुले, बाबासाहेबांची लाज वाटते का? - -प्रसन्न जोशी



मी पुण्यात पत्रकारिता शिकत होतो (आताही आहे) तेव्हाची आमच्या रानडे इन्स्टिट्यूटमधील ही घटना. इकडं एकानं एकदा चे गव्हेराचा फोटो असलेला टी-शर्ट घातला होता. त्या चेच्या डोक्यावरची पट्टी, त्यावरचा लाल तारा, त्याचे उडते केस, डोळ्यातली रग, मागे लाल रंग आणि R E V O L U T I O N अशी अक्षरं होती. काळसर निळ्या डेनिम जीन्सवर तो टी-शर्ट खरंच छान दिसत होता. मी त्या पोराला विचारलं हे टी-शर्टवरचे भाऊसाहेब कोण? त्यानं सांगितलं की हा चे गव्हेरा आहे. मग लॅटिन अमेरिकेतील उठाव, अर्जेंटिना, फिडेल वगैरे आलंच. मी विचारलं की, पण या चेचे कर्तृत्वाच्याबाबतीत बाप, आजा, पणजा शोभतील अशी आपल्याच देशातली फुले, आंबेडकर ही मंडळी आहेत ना? त्यांच्या फोटोंचे टी-शर्टही मिळतात किंवा करून घेता येतात. ते का नाही वापरत. तो म्हणाला की, चे हा कम्युनिस्ट क्रांतीचा युवा चेहरा साऱ्या जगाच्या क्रांतीकारकांचं आराध्य दैवत आहे. मी म्हटलं हात तुझ्या....आमच्यावर पारतंत्र्य आणणारेही परके आणि मुक्तीची वाट दाखवणारे आदर्शही परकेच का? (झालंच तर आमचे एतद्देशीय आदर्श 'चे' सारखे देखणे, सिगार पिणारे नव्हते. त्यांचे चेहरे राकट हेही कारण असेल कदाचित ते 'कूल' न वाटायला...) त्याचं त्यावर सारवासरव करणं इतकंच होतं की फुले-आंबेडकर ग्रेटच रे पण आपण स्थानिक प्रवाहांना जागतिक मानवमुक्तीच्या प्रवाहाशी जोडलं पाहिजे आणि त्याचं प्रतीक म्हणजे चे गव्हेरा.....

चे गव्हेराचे बाप, आजे आमच्या भारतात जन्मले....

माझ्या मित्राची ही 'समजूत' जगातल्या लाखोंची आहे. 'त्यांचं' जे असतं ते काहीतरी जागतिक, रेव्होल्युशनरी असतं आपल्या अंगणातले मात्र स्थानिक प्रवाह, सुधारणावादी झालंच तर स्थानिक क्रांतीसदृश असतात (पुढे वेळ मिळाली तर हे आंतरराष्ट्रीय-राष्ट्रीय बुद्धिमंत एतद्देशीय महामानवांबाबत १. स्थानिक पातळीपुरता ठेवणं २. आपल्यात विलीन करून घेणं ३. त्यांच्या विचारांबद्दल भ्रम निर्माण करणं ४. त्यांना मोडीत काढत त्यांच्या अनुयायांना आपल्याकडे खेचणं, असंही करतात). माझा राग चे गव्हेराबद्दल नाही. पण, चे गव्हेराला माझ्या मित्राच्या भाषेत 'थानिक प्रवाहांना जागतिक मानवमुक्तीच्या प्रवाहाशी जोडलं पाहिजे आणि त्याचं प्रतीक म्हणजे चे गव्हेरा' असं बनवणं (बनवणं हा शब्द महत्त्वाचा) याला माझा आक्षेप आहे. हे त्याच्या आणि त्याच्यासारख्या लाखोंच्या डोक्यात सतत, हळू-हळू भिनवलं जातंय. जागतिक भांडवलशाही सर्वच प्रतीकांचं बाजारीकरण करतेय ही एक गोष्ट शिवाय जागतिक पुरोगामी, परिवर्तनवादी चळवळींपर्यंत आमच्या महामानवांची महत्ता पूर्णांशानं जात नाही, या दोन गोष्टी असं होण्यासाठी कारणीभूत आहेत. याच्याच जोडीला एक कटू सत्य हेही असेल की आम्हाला परदेशातला चे टी-शर्टवर मिरवायला आवडतो पण दलित-शूद्र जातींचे नायक आम्हाला तेवढेसे 'कूल' वाटत नसावेत. अन्यथा, जागतिक मानव मुक्तीच्या लढ्यातले दिग्गज तुकाराम, ज्योतिबा, आंबेडकर हे चे गव्हेराचे खापर पणजोबा नव्हेत काय?

नक्षलवाद, माओवादाचा कळवळा, उमाळा असणारी मंडळी या हिंसक आंदोलकांना बुद्ध-फुले-आंबेडकरी क्रांतीची वाट का दाखवत नाहीत?

आपल्या 'एबीपी माझा'वर 'माझा विशेष'मध्ये एकदा नक्षलवाद्यांच्या हिंसेविषयी चर्चा होती.
सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. किशोर ढमाले सहभागी होते. मी त्यांना विचारलं 'तुम्ही फुले-आंबेडकरी विचारधारेचे पाईक आहात. घटनेचा आदर करता मग घटना न मानणारे, हिंसक माओवादी यांच्याबाबत तुम्हाला आपुलकी का? जर शोषितांच्या मुक्तीसाठी माओवाद चालत असेल तर ही बुद्ध-फुले-आंबेडकरी विचारांची हार नाही का? कोणता माओवादी गट बुद्ध-फुले-आंबेडकरांचं नाव घेतो? मला थेट उत्तर मिळालं नाही. मी आजही त्या उत्तराच्या प्रतीक्षेत आहे. नक्षलवादी-माओवादी यांच्याबद्दल कळवळा आणि बुद्ध-फुले-आंबेडकरी विचारांवर निष्ठा एकाचवेळी असू शकत नाही.

माओवाद आणि चे गव्हेराचा टी-शर्ट....
ही दोन प्रतीकं आहेत. आम्ही आमच्या महापुरूषांना आमच्याच हातानं कसं गमावतोय याची.
टी-शर्टवर चे आला की डोक्यात माओ यायला वेळ लागणार नाही. प्रतीकं म्हणूनच महत्त्वाची असतात.

आज बाबासाहेबांचा स्मृती दिन आपण यासाठी पाळतो कारण हा एक दिवस त्यांच्या आयुष्यभर पुरणाऱ्या विचारांच्या शिदोरीची आठवण दरवर्षी करून देणारं प्रतीक असतं.

'आपली' ही प्रतीकं जपूयात....

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.

ता. क. - एक गोष्ट यात लिहिण्याची राहून गेली. अशा प्रतीकांबद्दल अनुकरणीय आदर असवा दुराभिमान नव्हे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे अशा व्यक्ती, त्यांचे विचार आणि असं सर्व काही पुन्हा पुन्हा तपासण्याची आपली प्रवृत्ती बनायला हवी.

                                                                                                                                  -प्रसन्न जोशी
सौजन्य: प्रसन्न जोशी यांची फेसबुक वरील वाल आणि हा लेख सापडला सिद्धार्थ मोकळे( https://www.facebook.com/siddharthjournalist?sk=wall)  यांच्या वाल हून. 

No comments:

Post a Comment