मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनात्मक पदावर राहून सलग पंचवीस वर्षे यशस्वीरित्या जनसेवा पूर्ण केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. या ऐतिहासिक कामगिरीच्या सन्मानार्थ राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अभिनंदनाचा ठराव एकमताने संमत करण्यात आला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा अभिनंदनाचा ठराव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडला. या ठरावाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सर्व सदस्यांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात पाठिंबा दर्शवत एकमुखाने मंजुरी दिली.
ठरावातील ठळक मुद्दे आणि गौरवौद्गार:
सलग २५ वर्षांची अविरत सेवा: ७ ऑक्टोबर २००१ रोजी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून ते आज देशाचे पंतप्रधान म्हणून कार्यरत असण्यापर्यंत, नरेंद्र मोदी यांनी घटनात्मक पदांवर राहून कोणतीही खंड न पडू देता सलग २५ वर्षे लोकसेवेत घालवली आहेत.
देशहिताचे आणि जनहिताचे निर्णय: गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी राज्याला विकासाच्या नव्या उंचीवर नेले. त्यानंतर २०१४ पासून भारताचे पंतप्रधान म्हणून त्यांनी घेतलेले धाडसी निर्णय, राबवलेल्या जनकल्याणकारी योजना आणि जागतिक स्तरावर भारताची निर्माण केलेली भक्कम प्रतिमा याचा ठरावात विशेष गौरव करण्यात आला.
विकसित भारताचा संकल्प: गरीब, शेतकरी, महिला आणि युवक या चार स्तंभांवर आधारित आत्मनिर्भर आणि विकसित भारताच्या उभारणीसाठी पंतप्रधान मोदी सातत्याने अहोरात्र कार्यरत आहेत, असे या ठरावात नमूद करण्यात आले.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठराव मंजूर झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निरोगी आणि दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.