Skip to content
MukhyamantriMukhyamantri
MaharashtraMaharashtra

ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांचे निधन; लावणी आणि अभिनयाचा समृद्ध वारसा हरपला

This article is not available in English yet; showing the Marathi version.

महाराष्ट्राच्या समृद्ध लोककलेचा वारसा जतन करत आपल्या नजाकतदार नृत्यकौशल्याने आणि समर्थ अभिनयाने रुपेरी पडदा गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांच्या निधनाने मराठी कलाविश्वाची मोठी हानी झाली आहे. पारंपरिक लावणीला प्रतिष्ठा, दिमाख आणि नवी ओळख मिळवून देणाऱ्या या ज्येष्ठ कलावंताच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होत असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

· · 2 min read
ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांचे निधन; लावणी आणि अभिनयाचा समृद्ध वारसा हरपला
Image: Internet

लोककलेची पताका फडकवणारी चतुरस्त्र तारका निमाली: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोकभावना व्यक्त करताना म्हटले की, "लोककला, रंगभूमी ते चित्रपटसृष्टी असा मधू कांबीकर यांचा कलाप्रवास अत्यंत समृद्ध आणि वैशिष्ट्यपूर्ण राहिला. लोककलेतील लावणीचा पारंपरिक बाज जपत त्यांनी कथ्थकच्या अभ्यासातून नृत्यांगना म्हणून मोठा लौकिक मिळवला. लावणीला आपल्या नृत्यशैलीने आणि नजाकतीने त्यांनी एक वेगळा दिमाख मिळवून दिला, तसेच रुपेरी पडद्यावरही लावणीचे रूप आणखी खुलवून दाखवले."

पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, "मराठी चित्रपटसृष्टीत त्यांनी कसदार अभिनयाने अनेक वैविध्यपूर्ण भूमिका समर्थपणे साकारल्या. त्यांचा हा कलाप्रवास या क्षेत्रातील दोन पिढ्यांसाठी मार्गदर्शक आणि प्रेरणादायी राहिला आहे. ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांचे निधन ही कलाक्षेत्राची कधीही भरून न येणारी हानी असून, मराठी लोककलेची पताका रुपेरी पडद्यावर दिमाखाने फडकत ठेवणारी चतुरस्त्र तारका आज निमाली आहे. आम्ही कांबीकर कुटुंबीय आणि मधूताईंच्या तमाम चाहत्यांच्या दुःखात सहभागी आहोत. या सर्वांना हा आघात सहन करण्याची शक्ती ईश्वराने द्यावी."

लावणीला प्रतिष्ठा मिळवून देणारी कलावंत गमावली: सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनीही मधू कांबीकर यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. "महाराष्ट्राच्या लोककलेचा वारसा आपल्या नृत्याने आणि अभिनयाने अजरामर करणारी ज्येष्ठ कलावंत आपण गमावली आहे. पारंपरिक लावणीचा अस्सल बाज जपत आपल्या नृत्यकौशल्याने त्यांनी या लोककलेला वेगळी उंची मिळवून दिली. कथ्थकच्या सखोल अभ्यासातून समृद्ध झालेली नृत्यशैली, सहजसुंदर अदाकारी आणि वैविध्यपूर्ण भूमिकांना न्याय देणारा कसदार अभिनय ही त्यांच्या कलाप्रवासाची प्रमुख वैशिष्ट्ये होती. त्यांच्या कलासाधनेतून लोककलेचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचला असून त्यांचे योगदान नव्या पिढीसाठी सदैव प्रेरणादायी ठरेल," अशा शब्दांत त्यांनी श्रद्धांजली वाहिली.

गाजलेले चित्रपट आणि रंगभूमीवरील योगदान मधू कांबीकर यांनी लावणी, लोककला, रंगभूमी आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमांत आपल्या अष्टपैलू कलेचा अमिट ठसा उमटवला. रुपेरी पडद्यावर त्यांनी साकारलेल्या अनेक भूमिका आजही रसिकांच्या स्मरणात आहेत: शापित झाकली मूठ सव्वा लाखाची एक डाव धोबीपछाड हळद रुसली कुंकू हसले आशी ही बनवाबनवी बाई मी भोळी सख्या सजना चोरीचा मामला

याशिवाय 'सखी माझी लावणी' यांसारख्या रंगमंचीय लोककलाप्रधान कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांनी पारंपरिक लावणी घराघरांत आणि सुशिक्षित रसिकांपर्यंत सन्मानाने पोहोचवली. त्यांच्या निधनाने मराठी कलाविश्वातील एक मार्गदर्शक, दीपस्तंभ व्यक्तिमत्त्व अनंतात विलीन झाले आहे.