Skip to content
MukhyamantriMukhyamantri
BREAKINGMaharashtraMaharashtra

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २५ वर्षांच्या यशस्वी जनसेवेबद्दल महाराष्ट्र मंत्रिमंडळात अभिनंदनाचा ठराव एकमताने मंजूर

This article is not available in English yet; showing the Marathi version.

· · 2 min read
PM Narendra Modi

मुख्यमंत्री आणि पंतप्रधान अशा घटनात्मक पदांवर राहून सलग २५ वर्षे यशस्वीरित्या जनसेवा पूर्ण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करणारा विशेष ठराव आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या या ठरावाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सर्व सदस्यांनी टाळ्यांच्या गजरात जोरदार स्वागत केले.

७ ऑक्टोबर २००१ ते ७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत गुजरातचे मुख्यमंत्री आणि भारताचे पंतप्रधान या नात्याने सरकारचे प्रमुख म्हणून मोदी यांनी बजावलेल्या २५ वर्षांच्या सेवेचा गौरव या ठरावात करण्यात आला आहे.

विकसित भारतासोबत 'एक ट्रिलियन डॉलर' विकसित महाराष्ट्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला २०२९ पर्यंत ५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचा संकल्प केला आहे. या संकल्पाला अनुसरून महाराष्ट्र शासनाने राज्यासाठी १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट ठेवले आहे. महाराष्ट्राला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील आर्थिक केंद्र बनवण्यासाठी केंद्र सरकारचे मोठे सहकार्य मिळत असल्याचे ठरावात नमूद केले आहे.

राष्ट्रीय स्तरावरील ऐतिहासिक निर्णय आणि सुरक्षा ठरावात केंद्रातील ऐतिहासिक निर्णय आणि धोरणात्मक यशाचा विशेष उल्लेख करण्यात आला:

राष्ट्रीय सुरक्षा: सर्जिकल स्ट्राइक, ऑपरेशन सिंदूर, संरक्षण उत्पादनातील आत्मनिर्भरता आणि राष्ट्रीय हिताला सर्वोच्च प्राधान्य.

ऐतिहासिक निर्णय: अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिराची उभारणी आणि जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटवणे.

आर्थिक सुधारणा व डिजिटल भारत: जीएसटीची यशस्वी अंमलबजावणी, डिजिटल पेमेंट क्रांती आणि 'डीबीटी'द्वारे (थेट लाभ हस्तांतरण) पारदर्शक प्रशासन.

वैश्विक प्रतिष्ठा: ठाम परराष्ट्र धोरणामुळे जागतिक पटलावर भारताचा वाढलेला दबदबा आणि विकसनशील देशांचे नेतृत्व.

महाराष्ट्राच्या विकासाला केंद्राची मोठी साथ: १२ लाख कोटींचे प्रकल्प महाराष्ट्रात केंद्राच्या सहकार्याने सुमारे १२ लाख कोटी रुपयांचे पायाभूत सुविधा प्रकल्प सुरू असल्याची नोंद ठरावात घेण्यात आली:

समृद्धी महामार्ग: ७०१ किमीचा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीचा कणा ठरला आहे.

अटल सेतू (MTHL): २२ किमी लांबीच्या या सागरी सेतूमुळे मुंबई आणि नवी मुंबईतील अंतर जलद झाले आहे.

मेट्रो नेटवर्क: कुलाबा-वांद्रे-सीप्झ (३३.५ किमी) या भुयारी मार्गासह मुंबई, पुणे आणि नागपूर मेट्रोचा केंद्राच्या मदतीने विस्तार.

मेगा प्रोजेक्ट्स: पालघरमधील वाढवण बंदर, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन आणि मुंबईतील धारावी पुनर्विकास प्रकल्प.

सांस्कृतिक आणि सामाजिक वारशाचा सन्मान महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि महापुरुषांच्या वारशाचा केंद्र सरकारने सातत्याने गौरव केल्याचे ठरावात अधोरेखित करण्यात आले:

मराठी भाषेला अभिजात दर्जा: ३ ऑक्टोबर २०२४ रोजी मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय आणि पुण्यात अभिजात मराठी भाषा अध्ययन उत्कृष्टता केंद्रास मान्यता.

छत्रपती शिवरायांचा वारसा: भारतीय नौदलाचे मानचिन्ह शिवमुद्रेवरून प्रेरित करणे आणि शिवरायांच्या १२ गडकिल्ल्यांचा युनेस्को (UNESCO) जागतिक वारसा यादीत समावेश.

महापुरुषांची स्मारके: मुंबईतील इंदू मिल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी जागा, आंबेडकरी पंचतीर्थांचा विकास, महात्मा जोतीराव फुले यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय उपक्रम आणि पुण्यातील भिडे वाडा येथे राष्ट्रीय स्मारक.

शेती, सिंचन आणि ग्रामीण जीवनमान महाराष्ट्रातील शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी केंद्र सरकारने दिलेल्या निधीचा ठरावात उल्लेख करण्यात आला:

सिंचन क्षमता: प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतून २९ मोठे व मध्यम प्रकल्प पूर्ण; जुलै २०२६ पर्यंत ४.४९ लाख हेक्टर सिंचन क्षमता निर्माण.

बळीराजा जलसंजीवनी योजना: विदर्भ-मराठवाड्यातील ९१ प्रकल्पांसाठी सुमारे १५ हजार कोटी रुपयांचे सहकार्य.

सौर ऊर्जा व घरे: पीएम कुसुम योजनेतून ११.८० लाख सौर कृषीपंप, पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेचा ८ लाखांहून अधिक घरांना लाभ, तसेच ग्रामीण भागात पीएम आवास योजनेतून ४३ लाख घरांना मंजुरी.

आदिवासी कल्याण: 'पीएम जनमन' आणि 'धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान' द्वारे दुर्गम भागात वीज, रस्ते, पाणी आणि आरोग्य सुविधांची पोहोच.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश आत्मनिर्भर, सुरक्षित आणि विकसित होण्याच्या मार्गावर अग्रेसर असून या राष्ट्रनिर्माणाच्या प्रवासात महाराष्ट्र आघाडीवर राहील, अशी ग्वाही या ठरावाद्वारे देण्यात आली. तसेच पंतप्रधान मोदी यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभावे, अशा सदिच्छा मंत्रिमंडळाने व्यक्त केल्या.