Skip to content
MukhyamantriMukhyamantri
PoliticsMaharashtra

रोहित पवारांच्या स्टंटबाजीकडे खुद्द शरद पवार साहेबांनी पाठ फिरवली : आमदार चित्रा वाघ

This article is not available in English yet; showing the Marathi version.

विद्यार्थ्यांच्या प्रश्नाचा राजकीय वापर करणाऱ्यांना चित्राताई वाघ यांचा चांगलाच दणका

By mukhymantri.com· · 2 min read
रोहित पवारांच्या स्टंटबाजीकडे खुद्द शरद पवार साहेबांनी पाठ फिरवली : आमदार चित्रा वाघ
Image: mukhyamantri.com

स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नाचा आधार घेऊन रोहित पवार यांनी केलेल्या वैयक्तिक चिखलफेकीचा आणि वापरलेल्या पोरकट भाषेचा मा. आमदार चित्राताई वाघ यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. रोहित पवार यांच्या या गलिच्छ स्टंटबाजीकडे खुद्द शरद पवार साहेबांनी पाठ फिरवल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

चित्राताई वाघ यांनी रोहित पवार यांना सुनावले की, काल शरद पवार साहेब स्वतः पुण्यात असूनही आंदोलनाकडे फिरकले देखील नाहीत; यावरूनच हे स्पष्ट होते की रोहित पवारांची ही संपूर्ण नौटंकी स्वतः शरद पवार साहेबांनाही मान्य नाही. ज्यांना स्वतःच्या पक्षातच पाठिंबा मिळत नाही, त्यांनी दुसऱ्यांवर टीका करू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.

"वैयक्तिक चिखलफेक करून किंवा पोरकट भाषा वापरून आपली गलिच्छ स्टंटबाजी कोणालाही लपवता येणार नाही. 'लाज वाटली पाहिजे' हा शब्द आम्हाला नाही; स्वतःच्या राजकीय अस्तित्वासाठी MPSC च्या प्रामाणिक विद्यार्थ्यांचा वापर करणाऱ्यांनाच तो शोभतो," असे चित्राताई वाघ यांनी म्हटले आहे.

दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांमधील कथित गैरप्रकार, गुणांतील तफावत आणि निवड प्रक्रियेतील अनियमितता या कारणांमुळे स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांनी आंदोलन केले आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या प्रश्नाचा राजकीय स्वार्थासाठी वापर करण्याचा आरोप चित्राताई वाघ यांनी केला आहे.

चित्राताई वाघ यांनी प्रामाणिक स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या बाजूने ठाम राहण्याची ग्वाही दिली असून, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना वैयक्तिक वादांऐवजी ठोस कार्यवाहीची गरज असून मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस योग्य ती कारवाई करत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले आहे.