मुख्य मजकुराकडे जा
मुख्यमंत्रीमुख्यमंत्री
ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रमहाराष्ट्र

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; १७, १८ आणि २४, २५ ऑक्टोबरला मतदान केंद्रांवर विशेष शिबिरे

· · २ मिनिटांचे वाचन
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; १७, १८ आणि २४, २५ ऑक्टोबरला मतदान केंद्रांवर विशेष शिबिरे

राज्यातील एकही पात्र नागरिक मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहू नये यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र आणि भारत निवडणूक आयोगाच्या वतीने संपूर्ण राज्यभरात मतदार नोंदणीची विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा भाग म्हणून १७, १८ ऑक्टोबर तसेच २४ आणि २५ ऑक्टोबर २०२६ रोजी राज्यातील प्रत्येक मतदान केंद्रावर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रारूप मतदार यादीत नाव तपासणे, नवीन नाव नोंदवणे अथवा आवश्यक दुरुस्ती करण्यासाठी नागरिकांना २६ ऑक्टोबर २०२६ पर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत.

मतदान केंद्रांवर केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) करणार मदत या राज्यव्यापी मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. यामध्ये:

राज्यातील ३६ जिल्हा निवडणूक अधिकारी

२८८ मतदार नोंदणी अधिकारी

७,१०० सहायक मतदार नोंदणी अधिकारी

१,००,२५३ केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) प्रत्यक्ष मैदानावर कार्यरत आहेत.

विशेष शिबिरांच्या दिवशी हे केंद्रस्तरीय अधिकारी मतदान केंद्रांवर प्रत्यक्ष उपस्थित राहतील. ते नागरिकांना प्रारूप मतदार यादीतील नावाची पडताळणी करणे, नवीन नोंदणी करणे आणि दुरुस्त्यांसाठी अर्ज भरण्याबाबत प्रत्यक्ष मार्गदर्शन करतील.

कोणत्या कामासाठी कोणता अर्ज भरावा? नागरिकांना ऑनलाइन तसेच ऑफलाइन पद्धतीने खालील नमुन्यांनुसार अर्ज करता येतील:

नमुना अर्ज क्र. ६: मतदार यादीत नवीन नाव नोंदवण्यासाठी (पहिल्यांदा नाव नोंदवणारे किंवा प्रारूप यादीत नाव नसलेले नागरिक).

नमुना अर्ज क्र. ७: मतदार यादीतील चुकीचे किंवा मयत व्यक्तीचे नाव वगळण्याची विनंती करण्यासाठी.

नमुना अर्ज क्र. ८: पत्ता बदलणे, नावात किंवा जन्मतारखेत दुरुस्ती करणे, नवीन डिजिटल मतदार ओळखपत्र (EPIC) मिळवणे किंवा दिव्यांग मतदार म्हणून नोंद करण्यासाठी.

मतदार नोंदणी आणि दुरुस्ती ही निरंतर चालणारी प्रक्रिया असली, तरी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रारूप यादीतील दुरुस्तीसाठी विहित मुदतीत अर्ज करणे आवश्यक आहे.

मदतीसाठी ‘१९५०’ टोल-फ्री हेल्पलाइन सुरू मतदार नोंदणी, अर्ज भरताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी किंवा मतदार यादीतील नावाबाबत शंका असल्यास नागरिकांसाठी ‘१९५०’ हा टोल-फ्री हेल्पलाइन क्रमांक कार्यान्वित करण्यात आला आहे.

याव्यतिरिक्त, कार्यालयीन वेळेत जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयातील जिल्हास्तरीय मदत केंद्र तसेच संबंधित विधानसभा मतदारसंघातील मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयाशी थेट संपर्क साधता येईल. जिल्हानिहाय मदत केंद्रांचा तपशील आणि हेल्पलाइन क्रमांक मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या [https://ceoelection.maharashtra.gov.in/ceo/Districtvoterhelpline.aspx](https://ceoelection.maharashtra.gov.in/ceo/Districtvoterhelpline.aspx) या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे.

पात्र नागरिकांनी आपल्या जवळच्या मतदान केंद्राला भेट देऊन मतदार यादीतील आपल्या नावाची खात्री करावी आणि २६ ऑक्टोबर २०२६ पूर्वी आपले दावे व हरकती नोंदवून लोकशाही प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.