Skip to content
MukhyamantriMukhyamantri
MaharashtraMaharashtra

इन्स्पायर-मानक स्पर्धेत महाराष्ट्राचा डंका! श्रद्धा लोंढेला राष्ट्रीय सुवर्णपदक; 'सुपर ६०' मध्ये ७ विद्यार्थ्यांची भरारी

This article is not available in English yet; showing the Marathi version.

· · 2 min read
इन्स्पायर-मानक स्पर्धेत महाराष्ट्राचा डंका! श्रद्धा लोंढेला राष्ट्रीय सुवर्णपदक; 'सुपर ६०' मध्ये ७ विद्यार्थ्यांची भरारी

विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन, सर्जनशीलता आणि समाजोपयोगी नवकल्पनांना प्रोत्साहन देणाऱ्या १२ व्या राष्ट्रीय इन्स्पायर–मानक प्रदर्शन व प्रकल्प स्पर्धेत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली आहे. या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्रातील सात विद्यार्थ्यांनी देशातील अव्वल 'सुपर ६०' गटात स्थान मिळविले असून, अहिल्यानगरच्या श्रद्धा रमेश लोंढे हिने राष्ट्रीय पातळीवर प्रथम क्रमांक पटकावत विशेष सुवर्णपदक जिंकले आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे, त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचे आणि पालकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

नवी दिल्लीतील 'भारत मंडपम'मध्ये रंगली स्पर्धा नवी दिल्ली येथील 'भारत मंडपम' येथे १२ ते १४ ऑक्टोबर २०२६ दरम्यान ही राष्ट्रीय स्पर्धा पार पडली. देशभरातून सुमारे ८०० बालवैज्ञानिकांनी यात सहभाग घेतला होता. महाराष्ट्रातून २०२३-२४ आणि २०२४-२५ या शैक्षणिक वर्षांतील ३५ विद्यार्थ्यांचे प्रकल्प सादर झाले होते. प्रकल्पांमधील नाविन्यता, सामाजिक उपयुक्तता, वापरण्यातील सहजता आणि प्रत्यक्ष जीवनातील उपयुक्तता या निकषांच्या आधारे देशभरातून उत्कृष्ट ६० प्रकल्पांची 'सुपर ६०' गटासाठी निवड करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातील सात प्रकल्पांनी बाजी मारली.

श्रद्धा लोंढेच्या AI प्रकल्पाला राष्ट्रीय सुवर्णपदक अहिल्यानगर जिल्ह्यातील न्यू इंग्लिश स्कूल, चांदगाव येथील विद्यार्थिनी श्रद्धा रमेश लोंढे हिने दृष्टिबाधित विद्यार्थ्यांसाठी विकसित केलेल्या ‘एआय बेस्ड टीचर असिस्टंट फॉर ब्लाइंड्स’ (AI Based Teacher Assistant for Blinds) या प्रोटोटाइपसाठी राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला.

कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून दृष्टिबाधित विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील अडचणी दूर करणाऱ्या या प्रकल्पासाठी केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह यांच्या हस्ते श्रद्धाला सुवर्णपदक, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र आणि लॅपटॉप देऊन सन्मानित करण्यात आले.

‘सुपर ६०’ मध्ये झळकलेले महाराष्ट्राचे सात बालवैज्ञानिक १. श्रद्धा रमेश लोंढे – न्यू इंग्लिश स्कूल, चांदगाव (जि. अहिल्यानगर) – राष्ट्रीय प्रथम क्रमांक व सुवर्णपदक

२. राजवर्धन प्रदीप काळे – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, लक्ष्मीवाडी (जि. सांगली)

३. देविका सुहास ताड – एम. ई. एस. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा (पुणे)

४. अर्णव भुसारी – सिटी प्राइड स्कूल (पुणे)

५. गीता गणपत धनवडे – डी. ई. एस. माधव सदाशिव गोलवलकर गुरुजी माध्यमिक विद्यालय (पुणे)

६. शांभवी रामनप्पा अजगुंडे – के. एल. ई. मंगरुळे हायस्कूल, अक्कलकोट (जि. सोलापूर)

७. विराज संदीप शिंदे – पोदार इंटरनॅशनल स्कूल (वाशिम)

या सर्व बालवैज्ञानिकांना डॉ. जितेंद्र सिंह यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र प्रदान करून गौरविण्यात आले.

शासनाकडून 'नासा' ते 'जपान' भेटीची सुवर्णसंधी विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक प्रतिभेला वाव देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले. राज्य शासनाच्या 'विद्यार्थी विज्ञान वारी' उपक्रमाच्या माध्यमातून यापूर्वीच गुणवंत विद्यार्थ्यांना अमेरिकेतील 'नासा' (NASA) या नामांकित अंतराळ संशोधन संस्थेला भेट देण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

तसेच, राष्ट्रीय स्तरावर ‘सुपर ६०’ मध्ये निवड झालेल्या या विद्यार्थ्यांना आता राज्य विज्ञान शिक्षण संस्था तथा प्रादेशिक विद्या प्राधिकरणाच्या वतीने 'साकुरा विज्ञान विद्यार्थी विनिमय' (Sakura Science Exchange Program) कार्यक्रमांतर्गत जपान भेटीची सुवर्णसंधी मिळणार आहे.