महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील, दुर्गम खेड्यापाड्यातील होतकरू तरुणांच्या डोळ्यांत आता केवळ नोकरीचे नव्हे, तर सातासमुद्रापार स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करण्याचे स्वप्न तरळू लागले आहे. या स्वप्नांना पंख देण्यासाठी राज्य शासनाने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. जागतिक स्तरावर कुशल मनुष्यबळाची वाढती मागणी लक्षात घेऊन 'ग्लोबल स्किल्स मोबिलिटी असोसिएशन ऑफ इंडिया' (GSMAI) सोबत सामंजस्य करार करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.
या महत्त्वपूर्ण भागीदारीमुळे आणि राज्य सरकारच्या ‘महिमा’ (MAHIMA) या विशेष उपक्रमामुळे महाराष्ट्रातील तरुणांना जागतिक कौशल्य, परदेशी भाषांचे प्रशिक्षण आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर रोजगाराच्या थेट संधी उपलब्ध होणार आहेत.
"दुर्गम भागातील तरुणालाही जगाच्या पाठीवर करिअर घडवण्याचा आत्मविश्वास मिळावा" - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ऐतिहासिक कराराच्या पार्श्वभूमीवर आपल्या भावना व्यक्त करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले:
"महाराष्ट्रातील अगदी दुर्गम आणि ग्रामीण भागातील तरुण-तरुणींमध्ये अपार गुणवत्ता आणि कष्ट करण्याची ताकद आहे. जगातील कोणत्याही प्रगत देशात आत्मविश्वासाने करिअर घडविण्याची ताकद त्यांच्यात निर्माण व्हावी, हाच आमचा ध्यास आहे. यासाठी लागणारे दर्जेदार कौशल्य, आर्थिक सहाय्य आणि संस्थात्मक पाठबळ देण्यासाठी शासन खंबीरपणे पाठीशी उभे राहील. जागतिक रोजगाराच्या संधी केवळ महानगरांतील मोजक्या घटकांपुरत्या मर्यादित न राहता, राज्यातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचाव्यात यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत."
नवी दिल्लीत 'जीएसएमएआय'ची औपचारिक स्थापना नवी दिल्लीतील 'आयटीसी मौर्या' येथे १२ ऑक्टोबर रोजी 'ग्लोबल स्किल्स मोबिलिटी असोसिएशन ऑफ इंडिया' (जीएसएमएआय) ची अधिकृत स्थापना झाली. जागतिक मनुष्यबळ गतिशीलतेमध्ये (Global Workforce Mobility) भारताची पत वाढवण्यासाठी १७ संस्थापक संस्था, केंद्र व राज्य सरकारे, उद्योगपती आणि विविध देशांचे राजनैतिक प्रतिनिधी एकत्र आले.
लोगो व संकेतस्थळाचे अनावरण: भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी 'जीएसएमएआय'चा लोगो व वेबसाईट लाँच केली. तरुणांच्या या स्थलांतराकडे केवळ कामगार स्थलांतर म्हणून न पाहता, आंतरराष्ट्रीय अनुभव मिळवून भारताच्या आर्थिक व सामाजिक विकासात योगदान देण्याची मोठी संधी म्हणून पाहिले पाहिजे, असे मिसरी यांनी स्पष्ट केले.
उद्योग क्षेत्राची बांधिलकी: जीएसएमएआयचे संस्थापक अध्यक्ष अजय खन्ना यांनी तात्पुरत्या तडजोडींऐवजी संस्थात्मक उभारणी आणि विश्वासार्हतेला प्राधान्य देण्याचा संकल्प व्यक्त केला.
आंतरराष्ट्रीय उपस्थिती: या सोहळ्याला डेन्मार्कचे राजदूत रास्मस अबिल्डगार्ड क्रिस्टेन्सन, जर्मनीचे उपराजदूत जॉर्ज एन्झवायलर, इटलीच्या उपप्रमुख ऑरोरा रुसी, संसदेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष खासदार शशांक मणी, महाराष्ट्र शासनाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा, ओडिशाचे सचिव भूपेंद्र सिंह पूनिया यांच्यासह अनेक आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी उपस्थित होते.
कौशल्याला मिळणार आंतरराष्ट्रीय दिशा - कौशल्य मंत्री मंगलप्रभात लोढा कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी या उपक्रमाचे स्वागत करताना सांगितले की:
"मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र कौशल्य विकासात देशाचे नेतृत्व करत आहे. या करारामुळे राज्यातील कौशल्य विकास परिसंस्था आणि आंतरराष्ट्रीय उद्योग जगत यांच्यातील दुवा अधिक भक्कम होईल. महाराष्ट्राचा युवक केवळ आंतरराष्ट्रीय नोकऱ्या मिळवणार नाही, तर आपल्या बुद्धिमत्तेने आणि कष्टाने देशाची मान जगात उंचावेल."
‘महिमा’ : परदेशात रोजगाराची नवी पहाट कौशल्य विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा यांनी ‘महिमा’ (महाराष्ट्र व्यापक आंतरराष्ट्रीय गतिशीलता आणि क्षमता संस्था) या 'सेक्शन ८' कंपनीच्या भूमिकेविषयी माहिती दिली:
मागणीनुसार प्रशिक्षण: जगातील विविध देशांमधील विशिष्ट क्षेत्रांतील मनुष्यबळाची मागणी ओळखून जिल्हा पातळीवर तरुणांना प्रशिक्षण व समुपदेशन दिले जात आहे.
विशाल नेटवर्क: महाराष्ट्रात सध्या १,००० हून अधिक आयटीआय (ITI) आणि १,८०० हून अधिक तंत्रशिक्षण संस्था कार्यरत असून, या मजबूत पायावर जागतिक स्तरावर स्पर्धा करू शकेल असा कुशल तरुण वर्ग घडवला जात आहे.
सुरक्षित व विश्वासार्ह मार्ग: भाषेचे ज्ञान, सांस्कृतिक समज आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांशी थेट समन्वय या त्रिसूत्रीवर 'महिमा' काम करत आहे.
महाराष्ट्राच्या या दूरगामी पावलामुळे राज्यातील तरुणांना आता जागतिक क्षितिजावर आपली स्वतंत्र ओळख निर्माण करण्याची मोठी संधी मिळणार आहे.
