मुख्य मजकुराकडे जा
मुख्यमंत्रीमुख्यमंत्री

कोकणात उभारणार नवी 'फिल्म सिटी'? आशिष शेलारांचे मोठे निर्देश!

· · २ मिनिटांचे वाचन
Ashish Shelar MTDC Meeting

रत्नागिरी जिल्ह्यातील निसर्गसंपन्न गुहागर तालुक्याला आता चित्रपट आणि पर्यटन क्षेत्राचे नवे केंद्र म्हणून विकसित करण्याची तयारी राज्य शासनाने सुरू केली आहे. गुहागरमधील पालशेत येथे उपलब्ध असलेल्या शासकीय जागेवर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (MTDC) संयुक्त भागीदारीतून ‘फिल्म टूरिझम’ प्रकल्प उभारण्याबाबत सविस्तर प्रस्ताव एका महिन्याच्या आत सादर करावा, असे थेट निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिले आहेत.

या प्रकल्पाच्या आर्थिक नियोजनासाठी ‘चित्रपट पर्यटन धोरणा’च्या माध्यमातून आणि आवश्यकतेनुसार ‘म्हाडा’ची (MHADA) मदत घेण्याबाबतही पर्याय तपासण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

मंत्रालयातील दालनात सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली यासंदर्भात एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत गुहागर आणि लगतच्या किनारपट्टी भागातील शासकीय जमिनींचा चित्रपट निर्मिती व पर्यटनासाठी सुनियोजित वापर करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली.

१२५ एकर जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधा गुहागर तालुक्यातील मौजे पालशेत येथे पर्यटन विभागाची सुमारे १२५ एकर शासकीय जमीन उपलब्ध आहे. या जागेचा पुरेपूर वापर करून तिथे चित्रपट निर्मिती आणि पर्यटनाला पूरक अशी अत्याधुनिक पायाभूत व्यवस्था निर्माण करण्याची संकल्पना माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी शासनासमोर मांडली होती. कोकणात अशा प्रकारची ‘मिनी फिल्मसिटी’ किंवा फिल्म हब उभे राहिल्यास स्थानिक तरुणांना मोठ्या प्रमाणावर थेट व अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी मिळतील, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

चित्रीकरणासाठी 'एक खिडकी' व एकत्रित सुविधांची गरज गुहागर, दापोली आणि परिसरातील नयनरम्य समुद्रकिनारे, नारळी-सुपारीच्या बागा आणि ऐतिहासिक वास्तू नेहमीच मराठी तसेच हिंदी चित्रपट, मालिका आणि वेबसिरीजच्या चित्रीकरणासाठी पसंतीस उतरतात. मात्र, सध्या विविध शासकीय परवानग्या मिळवणे, तंत्रज्ञांसाठी निवास व्यवस्था, तांत्रिक साधनसामग्री आणि स्टुडिओ सुविधांच्या अभावामुळे निर्मात्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर:

पालशेत, वेळणेश्वर आणि तवसाळ येथील शासकीय जागांचा विकास करणे.

सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP मॉडेल) तत्त्वावर आधुनिक चित्रीकरण संकुल उभारणे.

चित्रीकरणाच्या सर्व आवश्यक सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देणे.

महिन्याभरात आराखडा सादर करण्याचे आदेश या सर्व बाबींचा सकारात्मक विचार करून मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी एमटीडीसीच्या सहकार्याने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची आखणी करण्याचे निर्देश दिले. निधी उभारणीसाठी विविध शासकीय योजनांचा समन्वय साधून प्रकल्पाचा सविस्तर विकास आराखडा (DPR) पुढील एका महिन्यात सादर करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले.

या बैठकीला माजी आमदार डॉ. विनय नातू हे दूरदृश्य प्रणालीद्वारे (Video Conferencing) उपस्थित होते. तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल, एमटीडीसीचे वरिष्ठ अधिकारी आणि इतर संबंधित विभागांचे प्रतिनिधी प्रत्यक्ष उपस्थित होते.