मुंबई आणि न्यूयॉर्क या दोन जागतिक महानगरांमध्ये अनेक समान वैशिष्ट्ये आहेत. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राच्या शाश्वत आणि वेगवान विकासासाठी ब्लूमबर्गसोबतची भागीदारी अत्यंत महत्त्वाची ठरणार असून, हे सहकार्य राज्याला विकासाची नवी दिशा देईल. ही भागीदारी परिवर्तन घडवून आणणारी आणि ऐतिहासिक ठरेल, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. भारताची आर्थिक, व्यावसायिक आणि मनोरंजनाची राजधानी असलेल्या मुंबईत त्यांनी ब्लूमबर्गचे संस्थापक मायकल ब्लूमबर्ग यांचे स्वागत करत त्यांच्या योगदानाचे विशेष कौतुक केले.
मुंबईतील प्रसिद्ध हॉटेल ‘द सेंट रेजिस’ (The St. Regis) येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मायकल ब्लूमबर्ग यांची उच्चस्तरीय बैठक पार पडली. या प्रसंगी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे, मुख्यमंत्र्यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ ढवसे यांच्यासह उद्योग क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्रात संशोधन आणि तंत्रज्ञानाला बळ यावेळी संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले, "ब्लूमबर्गने भारतात आपल्या कार्याची ३० वर्षे पूर्ण केली असून या दीर्घ प्रवासात महाराष्ट्राचे स्थान अनन्यसाधारण राहिले आहे. ब्लूमबर्गचे भारतीय मुख्यालय मुंबईत असून पुणे येथेही कंपनीची महत्त्वाची कार्यालये कार्यरत आहेत, ही राज्यासाठी अभिमानाची बाब आहे. विशेषतः पुण्यात संशोधन, विकास (R&D) आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील निष्णात तज्ज्ञ जागतिक पातळीवरील ‘ब्लूमबर्ग टर्मिनल्स’च्या निर्मितीसाठी काम करत आहेत."
मायकल ब्लूमबर्ग यांच्यासोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा देत मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, २०१४ मध्ये झालेली पहिली भेट आणि २०१८ मध्ये त्यांच्या न्यूयॉर्क येथील कार्यालयाला दिलेली भेट आजही स्मरणात आहे. तो संवाद प्रशासकीय कामकाज आणि विकासाच्या दृष्टीने समृद्ध शिकण्याचा अनुभव ठरला होता.
रस्ते सुरक्षा आणि आरोग्य क्षेत्रात महत्त्वपूर्ण सहकार्य महाराष्ट्र शासन आणि ब्लूमबर्ग यांच्यातील भागीदारीतून केवळ व्यावसायिक नव्हे, तर लोकोपयोगी प्रकल्प यशस्वीपणे राबवले जात आहेत. यामध्ये प्रामुख्याने: रस्ते सुरक्षा सुधारणा उपक्रम सर्वसमावेशक आरोग्यविषयक माहिती व्यवस्था (Health Information Systems) ‘निरोगी शहरे’ (Healthy Cities) अभियान प्रशासकीय कामकाजातील नावीन्यपूर्ण डेटा-आधारित सुधारणा
मुंबई, पुणे आणि नाशिक या शहरांमध्ये हे प्रकल्प राबवले जात असून, यासाठी ब्लूमबर्गकडून मिळत असलेल्या सातत्यपूर्ण सहकार्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्यांचे आभार मानले.
२०२९-३० पर्यंत ३५० किमी मेट्रोचे लक्ष्य शहरी वाहतूक व्यवस्थेविषयी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "एकेकाळी मुंबईत मेट्रोचे जाळे अवघे ११ किलोमीटर होते. मात्र आजघडीला सुमारे ३५० किलोमीटर लांबीचे भव्य मेट्रो जाळे विकसित केले जात आहे. त्यापैकी १०० किलोमीटरचे मार्ग आधीच प्रवासी सेवेत दाखल झाले असून, पुढील वर्षापर्यंत आणखी ७० किलोमीटरचे मार्ग सुरू करण्याचे नियोजन आहे. २०२९-२०३० पर्यंत संपूर्ण ३५० किमीचे मेट्रो जाळे पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे."
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीतून देशभरातील शहरांमध्ये आधुनिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभी राहत असून पुण्यातही मेट्रोचा विस्तार वेगाने सुरू आहे. द्वितीय श्रेणीतील (Tier-2) शहरांमध्ये सार्वजनिक वाहतुकीच्या वापराला प्रोत्साहन दिल्यास नागरिकांच्या जीवनमानात आणि वर्तनात सकारात्मक बदल घडतो, असेही मुख्यमंत्र्यांनी अधोरेखित केले.
व्यवसायासोबतच सामाजिक बांधिलकीचा अभिमान – मायकल ब्लूमबर्ग मायकल ब्लूमबर्ग यांनी महाराष्ट्राच्या आर्थिक सामर्थ्याचे कौतुक करताना सांगितले, "महाराष्ट्र हे भारताचे अत्यंत महत्त्वाचे आर्थिक केंद्र आहे. भारतात एका छोट्या सामायिक जागेतून सुरू झालेल्या आमच्या प्रवासाने ३० वर्षे पूर्ण केली आहेत, याचा मनस्वी आनंद आहे. आज आमचे मुख्य कार्यालय मुंबईत दिमाखात उभे आहे आणि देशातील गुंतवणुकीत सातत्याने वाढ होत आहे. पुण्यात १०० हून अधिक अभियंते कार्यरत असून भविष्यात या केंद्राचा आणखी विस्तार केला जाईल."
पुढे बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, ब्लूमबर्गची भारताप्रती बांधिलकी केवळ व्यवसायापुरती मर्यादित नसून, गेली २० वर्षे सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता, रस्ते सुरक्षा आणि स्वच्छ ऊर्जा या क्षेत्रांत सातत्याने सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. महाराष्ट्रातील जनतेसाठी उपयुक्त ठरेल अशा तंत्रज्ञानाची आणि उत्पादनांची निर्मिती करण्यासाठी कंपनी कटिबद्ध राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.