मुख्य मजकुराकडे जा
मुख्यमंत्रीमुख्यमंत्री
ब्रेकिंग न्यूजआरोग्यमहाराष्ट्र

BMC चा ‘बाल दृष्टी’ प्रकल्प ठरणार वरदान; ३ लाख विद्यार्थ्यांचे बदलणार आयुष्य!

· · २ मिनिटांचे वाचन
BMC

शाळेत फळ्यावर लिहिलेले नीट दिसत नाही म्हणून वाचन टाळणे, वहीत संथ गतीने उतरवणे किंवा पहिल्या बाकावर बसूनही धडे समजून घेण्यात अडचण येणे—अनेकदा या लक्षणांकडे शिक्षक व पालक "अभ्यासातील दुर्लक्ष" किंवा "आळस" म्हणून पाहतात. मात्र, यामागील खरे कारण डोळ्यांचे गंभीर आजार किंवा दृष्टीदोष असू शकते. याच समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) आणि 'व्हिजन फाउंडेशन ऑफ इंडिया' यांच्या संयुक्त विद्यमाने ‘बाल दृष्टी’ हा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष पुढाकारातून साकारलेल्या या मोहिमेअंतर्गत आगामी तीन वर्षांत मुंबई महापालिकेच्या १,२०० शाळांमधील सुमारे ३ लाख विद्यार्थ्यांची सर्वसमावेशक नेत्रतपासणी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

अपवर्तनदोष आणि बालअंधत्वावर थेट प्रहार ‘बाल दृष्टी’ मोहीम प्रामुख्याने अपवर्तनदोष (Refractive Error) आणि ॲम्ब्लायोपिया (Amblyopia - लेझी आय) यांच्या वेळेवर निदानावर केंद्रित आहे. हा उपक्रम केंद्र सरकारच्या ‘आयुष्मान भारत’ अंतर्गत शालेय आरोग्य व कल्याण कार्यक्रमाशी जोडण्यात आला आहे.

आकडेवारी काय सांगते: देशभरात सुमारे ९३ लाख मुले विविध दृष्टीदोषांनी बाधित आहेत. 'इंडियन जर्नल ऑफ ऑप्थॅल्मॉलॉजी'च्या एका अभ्यासानुसार, बालअंधत्वामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला दरवर्षी सुमारे १,३०० कोटी रुपयांचे अप्रत्यक्ष नुकसान सहन करावे लागते.

उपचारांची शक्यता: मुलांमधील ७५ टक्क्यांपेक्षा जास्त दृष्टीदोष हे वेळेत निदान झाल्यास योग्य चष्मा किंवा साध्या उपचारांनी पूर्णपणे बरे करता येतात.

अवघ्या काही महिन्यांत ४० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांची तपासणी फेब्रुवारी ते सप्टेंबर या कालावधीत मुंबईतील २२७ महापालिका शाळांमध्ये प्रत्यक्ष तपासणी मोहीम राबवण्यात आली. या शाळांमधील ५९,१५० विद्यार्थ्यांपैकी ६८ टक्के, म्हणजेच ४०,२७० विद्यार्थ्यांची तपासणी पूर्ण झाली आहे. यामध्ये २०,३९० मुले आणि १९,८८० मुलींचा समावेश असून, दोन्ही घटकांचा सहभाग समसमान राहिला आहे.

तपासणीदरम्यान अनेक धक्कादायक आणि गंभीर बाबी समोर आल्या:

अतिउच्च निकटदृष्टीदोष: काही विद्यार्थ्यांमध्ये उणे ११.५० SPH तर काहींमध्ये थेट उणे १६ SPH इतका तीव्र निकटदृष्टीदोष आढळला (सामान्य दृष्टी ० मानली जाते, तर उणे ६ नंतर अतिगंभीर स्थिती मानली जाते, जिथे काही अंतरावरचेही दिसत नाही).

मोतीबिंदू व इतर आजार: लहान वयातच मोतीबिंदू असणे, तसेच घरात व वर्गात लक्षात न आलेले इतर नेत्रविकारही या तपासणीमुळे वेळेत उघडकीस आले.

रंगदृष्टीदोष (Colour Blindness): ३१ विद्यार्थ्यांना रंग ओळखण्यात अडचण असल्याचे निदान झाले. हा आजार बरा होत नसला तरी शिक्षकांना याची कल्पना आल्याने अध्यापन पद्धती बदलता येते, तसेच मुलांच्या भविष्यातील करिअर निवडीत योग्य मार्गदर्शन मिळते.

घरभेटी आणि पाठपुराव्याद्वारे मोफत शस्त्रक्रिया व चष्मावाटप केवळ तपासणी करून न थांबता गरजू विद्यार्थ्यांना ताडदेव येथील 'कम्युनिटी आय क्लिनिक'मध्ये पुढील सखोल तपासणीसाठी पाठवले जात आहे:

मोफत चष्मे: आतापर्यंत ३६१ विद्यार्थ्यांना आवश्यक नंबरचे चष्मे मोफत वितरित करण्यात आले आहेत.

शस्त्रक्रिया: तिरळेपणाचा गंभीर त्रास असलेल्या ४ विद्यार्थ्यांवर मोफत यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली आहे.

घरोघरी जाऊन समुपदेशन: तपासणीनंतर संशयित १,९५० विद्यार्थ्यांपैकी आतापर्यंत ५४९ विद्यार्थी पुढील तपासणीसाठी दवाखान्यात पोहोचले असून, उर्वरित विद्यार्थ्यांच्या पालकांशी घरभेटी व शाळाभेटींद्वारे सातत्याने पाठपुरावा केला जात आहे.

वेदांतची यशोगाथा:

लोअर परळच्या गणपतराव कदम महापालिका शाळेत इयत्ता चौथीमध्ये शिकणारा ९ वर्षांचा वेदांत नेरुळकर तिरळेपणामुळे पहिल्या बाकावरूनही फळा वाचू शकत नव्हता. त्यामुळे तो वर्गात अबोल झाला होता. ‘बाल दृष्टी’ अंतर्गत त्याच्यावर मोफत शस्त्रक्रिया झाल्यानंतर आता तो सहजतेने फळा वाचत असून, वर्गात आत्मविश्वासाने उत्तरे देत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालिकेच्या आरोग्य पथके, शिक्षक आणि व्हिजन फाउंडेशनच्या समन्वयाचे विशेष कौतुक केले आहे. विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासोबतच त्यांचे भविष्य अंधकारमय होण्यापासून वाचवणारा हा उपक्रम इतर शहरांसाठीही मार्गदर्शक ठरणार आहे.