Thursday, June 1, 2017

शेतकरी संपाची दिशा आणि स्वरूप काय असावं?

शेतकरी संपाची दिशा आणि स्वरूप काय असावं?
शेतकऱ्यांचा चालू असलेला संप कुणाच्याही विरोधासाठी नाही. ना सरकारच्या विरोधात आणि नाही इतर शहरी अकृषक वर्गाच्या विरोधात. हा संप आहे आपल्याच न्याय हक्कासाठी. देवेन्द्र फडणवीस किंवा कुणीही एक सरकार टार्गेट नाही. कुणी त्याचा संबंध लावत असेल तर संपाच्या आडून राजकारण करण्याचा प्रयत्न होतोय त्या लोकांकडून असं समजावं. काही प्रमाणात ते टाळता येणार नाही. पण अशा लोकांना दूर ठेवावं. एक तर संप घडून आलाय ही खूप चांगली गोष्ट. एक लक्षात ठेवा आपली परिस्थिती अचानक अशात बिघडलेली नाही. गेल्या १०-२० वर्षांपासून हे सगळं सुरु आहे. म्हणून हा संप अन्यायी आणि अकार्यक्षम अशी व्यवस्था सुधारावी म्हणून आहे. पुन्हा लक्षात ठेवा. हा संप सरकार किंवा लोकं बदलण्यासाठी नाही. संप आहे व्यवस्था बदलण्यासाठी.
हमीभाव हा आपला पहिला नारा हवा. एक तर कृषी उत्पन्न जीवन आवश्यक गोष्टीत मोडते म्हणून त्याला एकदमच मोकळं सोडता येत नाही. म्हंणून मग कमीत कमी हमीभाव तरी हवा. आणि तो ठरवण्यासाठी अनेक गोष्टींचा विचार व्हावा. तुरीचा ३ हजार हमी भाव म्हणजे निव्वळ चालूगिरी होती. कारण तीच तूर काही प्रोसेसिंग नंतर जर लाखोंच्या घरात विकली जात असेल तर कमीत कमी ३० हजाराच्या घरात हमी भाव असायला हवा होता. कारण शास्त्रीय नियमानुसार अन्नधान्याचा मार्केट भाव हा शेतकऱ्याच्या भावपेक्षा ३ पट असतो. म्हणजे १/३ भाग हा शेतकऱ्याला मिळायला हवा. आणि पावसाच्या प्रमाणानुसार, उत्पादनानुसार भाव कमी जास्त व्हायला हवा.
अजून एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. आपल्याला फुकटे फुकटे म्हणणारे हे अकलेचे कांदे आहेत. त्यांना दुर्लक्षित करायला हवं. त्यांच्याशी हुज्जत घालून वेळ आणि शक्ती वाया घालू नये.
संपात एक करावं. जमेल तितका माल गावातच विकावा. एक मेकांना विकावा. खूप जास्त काळ संप चालणार असेल तर खते आणि इतर महाग वस्तूंची खरेदी करू नये.
डॉक्टर लोकांनी सहकार्य करावं. भाजी पाल्याच्या बदल्यात उपचार करावेत. ज्यांच्याकडे कुणी बाहेरून विकत घ्यायला आलच तर माल चढ्या भावाने विकावा. तो मार्केटचा नियम आहे. तसच वागावं.
शेवटी हार मानू नये. अनेक वर्षांनंतर हे घडून येतंय. कुण्याही राजकीय नेत्याचं ऐकू नये. विशेषकरून सत्ताधारी भाजप आणि विरोधी काँग्रेस -राष्ट्रवादी च्या नेत्यांचे.
जे शहरात माल विकायला नेण्याचा विचार करत आहेत त्यांनी आजचे झालेले नुकसान पहिलेच असेल. म्हणून कृपा करून सहकार्य करावे. गोर गरीब कुठे उपाशी असतील मग ते कुठचे ही असोत त्यांनी सरळ गावाकडचा रस्ता धरावा. त्यांना कुण्याही शेतकऱ्याने नाही म्हणून नये.
चला व्यवस्था बदलू!

No comments:

Post a Comment