Monday, October 13, 2014

तुम्ही सरकार निवडण्यासाठी मतदान करत नाही आहात.....१५ ऑक्टो २०१४ ला होणारी विधानसभेची निवडणूक महाराष्ट्रासाठी एक अतिशय महत्वाची अशी संधी आहे. सर्व पक्ष यावेळी आपली ताकत अजमावत आहेत. माजलेले सत्ताधारी आणि आम्हीही आल्यावर सत्तेचा आणि धर्माचा मज दाखवू हे जाणू न देता 'आम्ही आता बदलोय' असा बोम्बलत सांगणारे विरोधी.

या सगळ्या गोंधळात मतदार भांबावलेला आहे. विधानसभेला शक्यतो अतिशय लोकल अशा विषयांवर निवडणूक होत असते. पण शेवटी सरकार कुणाची येईल किंवा बहुमत कुणाला मिळेल हे शक्यतो एकंदर मागील कारकीर्दीवर आणि घोषनापत्रावर ठरते.

यावेळी सगळेच पक्ष आप-आपल्या चुली मांडून बसल्याने मागील वेळी करपलेली भाकर ही युती किंवा आघाडील इतर घटक पक्षामुळे, असे आरोप होत आहेत. एकंदर पाहता थंड असलेले विरोधक अचानक निवडणुकीलाच जागे झालेत. आघाडीचा कारभार हवा तसा झालेला नाहीच, पण त्याच मानाने विरोधक ही याला जबादार. शासन चालवणे म्हणजे फक्त सत्तेतील पक्षाची जबाबदारी असते असे धरून चालणारे राजकारण इथे निपाजाल्याने सत्ते साठीच हे लोक राजकारण करतात यात शंका नाही.

आज प्रचार थांबतोय. शेवटी प्रचारांती असे दिसते कि जाहिरातबाजी ही लोकमन वळवण्यासाठी अतिशय खमके साधन आहे आणि त्याच्या अतिशय चांगला उपयोग या वेळी केला गेला. तोही इतकाकी 'निरमाची पावडर विकणाऱ्या हेमा, रेशमा … गायबच झाल्या!' एकंदर प्रचारात कॉंग्रेसची जाहिरात ही कॉंग्रेस सारखी शांत काही अंशी सुस्त, तर राष्ट्रवादीची त्या सारखीच 'प्रचंड आशावादी'. पण या वेळी आशावादी राहून फायदा होईल कि नाही माहित नाही! भाजप वर्षभर शाळेत न येता अचानक परीक्षेला सगळा 'थेअरी' अभ्यास करून  येणाऱ्या विध्यार्थ्या सारखा जाहिरात तंत्रातील सगळे हथखंडे वापरून जाहिरातींच्या बाबतीत आपले 'व्यापारी' तंत्र चांगले आजमावून गेला. त्यांच्या जाहिराती ह्या निश्चितच त्या क्षेत्रातील जबरदस्त लोकांनी चांगल्या मोबदल्याच्या अपेक्षेने बनवल्यात यात शंका नाही. पण जाहिराती खर्या मराठी वाटल्या त्या शिवसेनेच्या. लोकगीतांचा अतिशय चांगला वापर आणि आपण अस्सल मराठी आहोत याचे दर्शन यातून झाले. पण शिवसेनेतील सगळा राडेबाजपणा किंवा येन केन प्रकारे जनतेच्या प्रश्नाबाद्दलची तळमळ दिसली नाही. मनसेने शेवटच्या काही दिवसात सरकारी जाहिराती सारखी जाहिरात करून आपणही टीव्हीवर जाहिरात देऊ शकतो हे दाखवले. असो. जाहिरातीवर इतका लिहिण्याच कारण म्हणजे, जाहिरात बाजी या वेळची सत्ता ठरवणार आहे!

कोट्यावधी रुपये खर्चून त्यांनी जाहिराती केल्या असल्या तरी, स्वतःचे डोके स्वतःच्या शरीवारच असल्याने मतदारराजा भुलणार नाही अशी भाबडी अशा. तर आज एक प्रयत्न करा. सगळ्या जाहिराती विसरा. महाराष्ट्र इथेच आहे आणि फक्त आशावादी असूनच काहीच होत नाही, मराठी अस्मिता महत्वाची पण पोट भारत नाही आणि फक्त स्वच्छ प्रशासनाने प्रश्न सुटत नाहीत, त्या स्वच्छतेचा सामान्य माणसाच्या आयुषावर जाहिराती बाहेर हि परिणाम झाला पाहिजे; हे लक्षात ठेवा.

मतदान करण्यापूर्वी एकदा आपल्या मतदारसंघातील सगळे उमेदवार कोण आहेत हे समजून घ्या. सार्वजनिक, व्यक्तिगत नव्हे, प्रश्नाला कुणी आपला वेळ दिलाय आणि लोकांच्या नव्या प्रश्नाची आणि नव्या जगाची कुणाला जाणीव आहे असे नेतृत्व शोधा. तो निवडून येईल की नाही याचा विचार करू नका. निर्वाचन आयोग त्यासाठीच नेमालेय. परत एकदा लक्षात ठेवा तुम्ही सरकार निवडण्यासाठी मतदान करत नाही आहात. ते करत आहात तुम्ही तुमचा प्रतिनिधी निवडण्यासाठी. नसता वरती वेगळे सरकार असल्याने आम्ही काम करू शकत नाही असे म्हणारे सरकार आले तरी काहीच करू शकत नाहीत, ते मुळातच षंढ असतात. कार्यकुशल आमदार कार्य कुशलच असतात.  ते इतरांच्या नावे बोंबा मारत नसतात. पैसे घेउन मतदान करणार असाल तर, पैसे देवूनच कामे करून घ्यायची तयारी ठेवा.

यावेळी दोन गोष्टींशी आपला लढा आहे :
१) सत्तेचा माज
२) धर्मांध आणि जातीय शासन

बाकी. शिवरायांच्या महाराष्ट्रात कोणत्याही गलथान व्यवस्थेला पलटवून लावायची ताकत आहेच!

मतदान ही इतकी महत्वाची बाब आहे कि जिने तुमचे भविष्य उज्वल होऊ शकते आणि न केल्याने अंधकारमय!  


जय जिजाऊ! जय शिवराय!        

No comments:

Post a Comment