Wednesday, January 11, 2012

राजमाता जिजाऊ जयंती २०१२


                                                                   जयंती निमित्त विशेष येथे डावून्लोड करा
साडे-तीनशे वर्षे यवनांच्या आणि विविध परकियांच्या अत्याचाराने होरपळली जाणारी आमची ही मायभुमी, हीन आणि पशू यातना भोगनारा अवघा मराठी मुलुख, स्वाभिमान शुन्य तथा गर्द काळोखात बुडालेली आमची जनता आणि आपली निष्ठा जुलमी गनिमाच्या पायाशी घालणारी आमची वतनदार आणि जहागीरदार यांची जमात असा अंधकार सगळीकडे असतांना त्या काळात जिने एक स्त्री असूनही शतकानू शतके चालणाऱ्या सुलतानी सत्तेवर घाव घातला; दबलेल्या-पिचलेल्या रयतेला भरवसा दिला; ओळख दिली. जिने पार विझलेल्या मनात स्वाभिमानाची ठिणगी पेटवली, जिने सामान्य कष्टकऱ्यांच्या-शेतकऱ्यांच्या खांद्यावर स्वराज्याच निशाण सोपवल, स्वराज्य निर्माण करण्यासाठी आपलं कुंकू, मुलगा आणि नातू अगदी आनंदाने या मातीच्या ओंजळीत टाकले, वेळ प्रसंगी चौकट ओलांडून आलेल्या संकटाचा धैर्याने मुकाबलाही केला, एका स्वभामिनाच्या ठिणगीचा वणवा करून जिने गुलामगिरी आणि संकुचित विचारांच्या जंगलाची राख केली आणि तिथेच स्वराज्याची आणि मराठी मुलुखाची फुलबाग उभी केली आणि फुलवली. अशा वीर कन्येचा, जिजाऊचा, राजमातेचा, आऊ साहेबांचा जन्म आजच्याच दिवशी म्हणजे १२ जानेवारी (वर्ष १५९८) ला आजच्या बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील राजे लखोजीराव जाधव यांच्या घरी झाला. याच शुभ दिनी या मातीत स्वाभिमानाचे पहिले बीज पेरले गेले, स्वातंत्र्याचा पहिला अंकुर फुटला, या मातीच्या प्रत्येक लेकराला अभिमान वाटावा अशा या दिनाच्या म्हणजेच राजमाता जिजाऊ जयंतीच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
स्वाभिमान या राष्ट्रात आधी ही होताच, पण मरगळलेला. परकीय आक्रमणे, धार्मिक दांभिकता, आपल्याच लोकांनी आपल्याच लोकांवर लादलेली वैचारिक गुलामगिरी यामुळे तो स्वाभिमान एका कोपऱ्यात विझलेल्या अवस्थेत होता. सामान्य रयत राजकीय, सामाजिक आणि आर्थिक अशा सगळ्याच अंधकारांनी भयभीत होती. अशा वेळी त्या सर्वसामान्य माणसांवर जिजाऊ साहेबांसारखी ठिणगी पडली आणि हाच स्वाभिमानाचा अंकुर पुन्हा याच मातीमध्ये नव चैतन्य निर्माण करून गेला. सबंध समाज एका दिलाने सर्व सामन्यांच राज्य प्रस्थापित करण्यासाठी शिवबा समवेत कामाला लागला.
खर तर हा दिवस आमच्या प्रत्येकाच्या हृदयात कायमचा कोरला गेला पाहिजे. याच दिवसाला आपण सगळ्यांनीच "स्वाभिमान बीज" दिन म्हणूनही इथून पुढे साजरा करायला हव. पुरोगामी महराष्ट्राच्या वाटचालीत हे फार मोठ आणि म्हत्वाच पाऊल असेल. आजच्या दिवशी शाळे-शाळेत आपल्या नव्या पिढीला गुलामगिरी विरहित आणि स्वाभिमानी समाज निर्मितीच शिक्षण द्याला हवं. आज आपण कितीही धर्मनिरपेक्ष आणि जाती विरहित समाजाच चित्र रंगवत असलो, तरी सत्य मात्र विपरीत आणि वेगळं आहे. आजही आपण धर्म, जाती आणि लिंग या आणि अशा अनेक बाबींनी माणसाला कमी किंवा जास्त लेखतो. कुणी कितीही विरोध करो पण हे मात्र खर आहे की अजूनही आमची शिक्षण पद्धत्ती कुण्या न कुण्या प्रकारचे गुलामच बनवत आहे. सत्याचा विचार देणार शिक्षण आणि फक्त माणुसकी शिकवणार शिक्षण अजून ही आपण स्वीकारलेला नाही.
आधुनिकी करणाच्या लाटेत जेंव्हा सगळं जग एक दुसऱ्याकडे अशेने बघत आहे. तेंव्हा आमच्या या संतांच्या भूमीत या जगाला नवा प्रकाश मिळावा अशी आपली इच्छा असेल तर महाराष्ट्राला ही सुरुवात आज करायलाच हवी. कारण याच मातीत ज्ञानेश्वर माउली झाले ज्यांनी जगत कल्याणासाठी पसायदान मागितले, वृक्षवल्ली आम्हा सोयरे म्हणणारे जगतगुरू तुकाराम महाराज झाले आणि गुलामगिरी पेक्षा कोणतही ओझं मोठ नसत अशी शिकवण आपल्याला मुलाला आणि रयतेला देणाऱ्या जिजाऊ झाल्या. मानवजातीचा आणि मानवीय मुल्यांचा आदर हा इथच्या मातीत खूप आधी पासूनच आहे आणि जिजाऊ सारख्या माउली मुळे तो या मातीत अगदी रुजला आणि बहरला. विचार केला तर लक्षात येईल जिजाऊ नसत्या तर शिवबा घडले नसते, शिवबा नसते तर पुढे त्याच विचारांचे शाहू, फुले आणि आंबेडकर ही कदाचित घडले नसते आणि आज ज्याला आपण आधुनिक भारत म्हणतो तो ही कदाचित काही तरी वेगळाच असता. म्हणून जिजाऊ हे पात्र भारताच्या इतिहासातील त्याच्या वर्तमानासाठी खूप म्हत्वाच अस आहे. आपण सर्वांनी ठरवलच तर याच पात्राला समोर ठेवून, तिच्या विचारांचे पाईक होऊन, स्वाभिमान आणि स्वातंत्र्याच्या विचारांच्या तळपत्या तलवारी हातात घेवून, या राष्ट्राच भवितव्य खूप उज्ज्वल करू शकू. आणि तेच ध्येय आम्हा सर्व तरुणांच्या अंगात रक्ता सारखे वाहतेय. म्हणूनच प्रत्येक तरुण आज हे नक्कीच गातोय
||शंभू अन् शिवबाचा तोच माझा वंश आहे, माझ्या रक्तात थोडा त्या जिजाऊचा अंश आहे||


आजच्या या दिवशी आपण सगळेच पुन्हा एकदा जाती-विरहित, द्वेष-विरहित आणि गुलामगिरी-विरहित समाज निर्मितीची शपथ घेऊ.
आपण सर्वांना जिजाऊ जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
जय जिजाऊ!
आपलेच कार्यकर्ते,
जिजाऊ.कॉम


शाळेला संगणक/पुस्तके द्या. गरजू विद्यार्थ्यांना मदत करा. सामाजिक आणि राजकीय प्रश्न मांडा आणि सोडवा - जिजाऊ.कॉम

No comments:

Post a Comment